20 November, 2024
हिंगोली जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 61.18 टक्के मतदान
• निवडणूक विभागाची 515 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगद्वारे करडी नजर
• पोलिस विभागाचा मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त
• आदर्श सखी, युवा आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून 9 मतदान केंद्रांचे संचलन
हिंगोली, (जिमाका) दि.20: हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदार संघात 11, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 19 व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 23 असे जिल्ह्यात एकूण 53 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, आज जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात 1023 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 61.18 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर सायंकाळी 7 वाजेनंतरही काही मतदान केंद्रांवर मतदान सुरु असल्यामुळे अंतिम आकडेवारी येण्यास वेळ लागणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदार संघात 59.67, 93-कळमनुरी 63.20 आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात सरासरी 60.62 टक्के मतदान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण 9 लाख 84 हजार 764 मतदार असून, त्यामध्ये 5 लाख 10 हजार 393 पुरुष तर 4 लाख 74 हजार 361 महिला मतदार आहेत. त्याशिवाय इतर 10 मतदारांचा यात समावेश आहे.
92-वसमत विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 20 हजार 765 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 64 हजार 931 पुरुष, 1 लाख 55 हजार 828 महिला व 6 इतर मतदारांचा यात समावेश आहे. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 30 हजार 686 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 71 हजार 937 पुरुष, 1 लाख 58 हजार 747 महिला व 2 इतर मतदारांचा समावेश आहे. 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 33 हजार 313 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 73 हजार 525 पुरुष, 1 लाख 59 हजार 786 महिला व 2 इतर मतदारांचा समावेश आहे.
निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची प्रक्रिया पूर्ण
निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव, निवडणूक खर्च निरीक्षक अर्जुन प्रधान, निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ. राकेश कुमार बन्सल यांनी हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडली, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले.
जिल्हा प्रशासनाची वॉर रुममधून वेब कास्टींगद्वारे करडी नजर
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल हे भल्या पहाटेपासून ते दिवसभर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 515 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगद्वारे करडी नजर ठेवून होते. जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी त्यांनी वेबकास्टींगच्या माध्यमातून सतत मार्गदर्शन केले. तर निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहस्थित 515 मतदान केंद्रांवर सुरु असलेल्या वेब कास्टींग रुमला भेट देत पाहणी केली.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाळ यांच्यासह सर्व पथक प्रमुख जिल्हा नियोजन समिती सभागृहातील वॉर रुममध्ये उपस्थित होते. तर जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने (वसमत), श्रीमती प्रतिक्षा भुते (कळमनुरी) आणि समाधान घुटुकडे (हिंगोली) हे निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पार पाडले आहेत.
मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रयत्न करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक याप्रमाणे महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र-3, दिव्यांग कर्मचारी संचलित 3 व युवा मतदान केंद्र-3 असे एकूण 9 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गोयल यांनी दिली आहे.
या सर्व मतदान केंद्रावर शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सक्षम ॲपवर नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती.
मतदार संघात आज सकाळपासूनच शहरी व ग्रामीण मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतल्याचे जागोजागी दिसून येत होते.
जिल्हा प्रशासनाकडून मतदारांना प्रोत्साहन
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विक्रमी संख्येने मतदारांना आवाहन केले होते. त्यासाठी स्वीपच्या माध्यमातून रॅली, पथनाट्य, आई-बाबांना पत्र असे विविध उपक्रम राबवून व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात आली. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले.
प्रथम मतदान करणारे युवा-युवती, ज्येष्ठ मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा…!
जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात प्रथम मतदान करणारे युवक-युवतींनी मतदान करणासाठी दाखवलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता. तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर रांगा लावून मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सुरुवातीपासूनच मतदान प्रक्रियेवर विशेष लक्ष देत सर्व पथकप्रमुखांना मार्गदर्शन, प्रशिक्षण देत वेळोवेळी आढावा घेतला.
सर्व पथक प्रमुखांचा सहभाग
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय, शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी 22 पथक प्रमुखांच्या समिती स्थापन केल्या होत्या. त्यामध्ये आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, कर्मचारी व्यवस्थापन, प्रशिक्षण व्यवस्थापन, निवडणूक साहित्य, वाहतूक व्यवस्था, तांत्रिक कक्ष, स्विप, कायदा व सुव्यवस्था, ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्यवस्थापन, उमेदवारांचे खर्चविषयक व्यवस्थापन, टपाली मतपत्रिका व सर्व्हीस व्होटर, प्रसार माध्यम व संदेशवहन, संपर्क आराखडा, मतदार यादी व्यवस्थापन, मदत कक्ष व तक्रार निवारण, दिव्यांग व्यक्तीसाठी मदत कक्ष व सोयीसुविधा पुरविणे, वेब कास्टींग, परवानगी कक्ष, अवैध मद्यवाटपास प्रतिबंध, सी-व्हीजील ॲप, निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणाली, निवडणूक निरीक्षकांचे नोडल अधिकारी आदी समिती प्रमुखांनी या निवडणूक प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment