11 November, 2024

लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्यासाठी सर्वांना प्रोत्साहित करावे - जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांचे मतदारांना आवाहन

• मतदारांनी 100 टक्के मतदान करण्यासाठी आपले योगदान द्यावे हिंगोली (जिमाका), दि. 11 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात मतदान होणार आहे. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीची 15 ऑक्टोबर, 2024 पासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. 15 ऑक्टोबरपासून जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्यासह पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांच्यासह जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघाचे निवडणूक निर्णय अधिकारी व सर्व विभागाकडून निवडणूक प्रक्रिया राबविली जात आहे. हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात एकूण 1015 मतदान केंद्रांवर ही मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. त्याकामी मतदारसंघातील विविध अधिकारी-कर्मचारी, पोलीस विभागाचे अधिकारी-कर्मचारी कर्तव्यावर आहेत. त्यामुळे हिंगोली जिल्ह्यातील तीनही मतदारसंघात नवमतदारांनी आपले मतदान करत, आई-वडीलांना मतदान करण्यासाठी केंद्रापर्यंत पोहचवत 100 टक्के मतदान करून घ्यावे, असे आवाहन जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. निवडणूक आयोगही आता मतदारांच्या दारापर्यंत पोहोचत असून, वृध्द असो जवान सर्वजण करा मतदान… , तुमचे मत तुमचे भविष्य…, मी हिंगोलीचा मतदार आवर्जून मतदान करणार…, एक दिवस केवळ मतदानासाठी…., मतदानाच्या दिवशी नको दुसरा प्लॅन, केवळ मतदान, मतदान आणि मतदान…., एक दिवस केवळ मतदानासाठी विधानसभा निवडणुकीमध्ये मतदान करुया, एक नागरिक म्हणून राष्ट्रीय कर्तव्य पार पाडूया…, लक्षात ठेवा, तुमचे मतदान भविष्य बदलू शकते…. ! मतदानाचा हक्क नक्की बजावा… !!, आपल्या देशाला पुढे नेण्यासाठी संघटित होऊ या… ! चला मतदान करुया !! यासह विविध घोषवाक्याचे बॅनर संपूर्ण जिल्ह्यात ग्रामीण आणि शहरात सर्वत्र लावून मतदान करण्याबाबत जिल्हा प्रशासनातर्फे जनजागृती करण्यात येत आहे. निवडणूक आयोगही आता मतदारांच्या दारी पोहचला असून, निवडणूक यंत्रणा डोंगर-दऱ्या, नदी-नाले, काट्याकुट्याचे रस्ते तुडवत एकेक ज्येष्ठ व दिव्यांगांचे टपाली मतदान करून घेत आहे. त्यामुळे तिन्ही विधानसभा मतदारसंघातील सर्व मतदारांनी तसेच सर्वांना मतदान करण्यासाठी प्रोत्साहीत करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. *****

No comments: