22 November, 2024

तीनही विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी प्रशासन सज्ज

> • सकाळी ८ वाजता मतमोजणीला सुरुवात, प्रत्येक विधानसभेसाठी १४ टेबल > • पोलिसांचा चोख बंदोबस्त > • ५३ उमेदवारांच्या भाग्याचा होणार फैसला हिंगोली, दि.२२ (जिमाका) : जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी आणि हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी बुधवारी (दि.२०) मतदान झाले असून मतमोजणी उद्या शनिवारी (दि.२३) होणार आहे. मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून, कुठेही कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी प्रचंड पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. उद्या होणाऱ्‍या मतमोजणीतून तीन विधानसभेच्या ५३ उमेदवारांच्या भाग्याचा फैसला होणार आहे. प्रत्येक विधानसभा क्षेत्रातील मतमोजणी १४ टेबल होणार आहे. *निवडणूक निर्णय अधिकारी* जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या नेतृत्वात विकास माने (वसमत), श्रीमती प्रतिक्षा भुते (कळमनुरी) आणि समाधान घुटुकडे (हिंगोली)उप विभागीय अधिकारी तथा निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. त्यांना तहसीलदार तथा सहायक निवडणूक निर्णय अधिकारी म्हणून श्रीमती शारदा दळवी, हरिष गाडे, जीवककुमार कांबळे, श्रीकांत भुजबळ आणि सखाराम मांडवगडे यांच्यासह नायब तहसीलदार सहाय्य करणार आहेत. मतमोजणी ठिकाण याप्रमाणे : ९२-वसमत विधानसभा मतदार संघाची मतमोजणी औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय), परभणी रोड, वसमत, ९३-कळमनुरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय, कळमनुरी आणि ९४- हिंगोली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय तंत्र निकेतन महाविद्यालय, लिंबाळा मक्ता, महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ (एमआयडीसी), हिंगोली येथे होणार आहे. मतमोजणीच्या फेऱ्या याप्रमाणे : विधानसभेच्या मतमोजणीस त्या-त्या ठिकाणी सकाळी ८ वाजता सुरुवात होणार असून, मतदान केंद्राच्या संख्येनुसार फे-या होणार आहेत. प्रथम टपाली मतदानाची मतमोजणी होईल व त्यानंतर ईव्हीएम मतमोजणीस सुरुवात होईल. मतमोजणीसाठी तीनही विधानसभा मतदारसंघात प्रत्येक टेबलवर प्रत्येकी एक सूक्ष्म निरीक्षक, एक पर्यवेक्षक आणि एका सहाय्यकाची नियुक्ती करण्यात आली आहे, असे प्रत्येक मतदारसंघासाठी ४२ जणांची नियुक्ती करण्यात आली आहे. *विधानसभा मतदारसंघनिहाय मतदानाची अंतिम टक्केवारी* जिल्ह्यात एकूण ७२.२४ टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असून, मतदारसंघनिहाय ९२- वसमत ७५.०५, ९३- कळमनुरी ७३.६३ आणि ९४- हिंगोली विधानसभा मतदारसंघात ६८.१६ टक्के मतदान झाले आहे. *मतमोजणी निरीक्षकांनी घेतला आढावा* जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात होणा-या मतमोजणीसाठी नियुक्त मतमोजणी निरीक्षकांनी आपापल्या मतदारसंघातील मतमोजणी केंद्रांची पाहणी केली. यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी तसेच सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते. उद्या मतमोजणीसाठी नियुक्त अधिकारी-कर्मचा-यांना प्रशिक्षण देत कामकाजाचा आढावा घेतला. यावेळी कळमनुरी विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणी निरीक्षक टी. एल. संगीता यांनी माध्यम कक्षाची पाहणी केली. तसेच ९२-वसमत विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणी निरीक्षक श्री. हिमांशु कुमार गुप्ता व ९४-हिंगोलीसाठी श्रीमती वंदना राव हे काम पाहणार आहेत. ****

No comments: