06 November, 2024

मतदान केंद्रावर मूलभूत सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करा निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव

• जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली पूर्वतयारीची माहिती हिंगोली (जिमाका), दि. 06 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या आदर्श आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच निवडणूक प्रक्रियेत सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांनी योग्य समन्वय राखावा. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रांवर सर्व मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश निवडणूक निरीक्षक सामान्य श्रीमती वंदना राव यांनी निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांना दिले. छत्रपती संभाजीनगर येथे आयोजित भारत निवडणूक आयोगाचे उपनिवडणूक आयुक्त हिर्देशकुमार यांनी निवडणूक यंत्रणेची आढावा बैठक घेतली. या बैठकीला हिंगोली जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृश्य प्रणालीद्वारे श्रीमती वंदना राव, निवडणूक निरीक्षक खर्च अर्जुन प्रधान, निवडणूक निरीक्षक पोलीस डॉ. राकेश कुमार बन्सल, 92- वसमतचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी विकास माने, 93-कळमनुरीच्या श्रीमती प्रतिक्षा भुते आणि 94-हिंगोली समाधान घुटुकडे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे उपस्थित होते. उमेदवारांनी निवडणूक कालावधीत दैनंदिन येणारा खर्च अभिरुप नोंदवहीत लिहावा. वेळोवेळी खर्च तपासणी करून घ्यावी. मतदान केंद्रांवर पुरेशा प्रमाणात मूलभूत सोयी-सुविधा उपलब्ध असल्याची खात्री करावी. प्रकाशझोत असावा. मतदानाच्या दिवशी मतदान केंद्रावरील ईव्हीएम मशीन, मतदार संख्या आणि होणाऱ्या मतदानाच्या टक्केवारीबाबत तात्काळ अद्ययावत माहिती अपलोड करावी. मतदारांसाठी प्रतीक्षालय कक्ष, टोकन सिस्टम सुरू करणे, दिव्यांगांसाठी व्हिलचेअर, रॅम्प सुविधा, सक्षम ॲपच्या माध्यमातून तात्काळ सुविधा, पाणी/ स्वच्छतागृहाची सोय यांची खात्री करावी. पोलींग पार्टीच्या राहण्या-खाण्याची सोय असल्याची खात्री करावी. गृह मतदानाची (होम वोटींग) सुविधा उपलब्ध करून देण्यात यावे, अशा सूचना त्यांनी दिल्या. विधानसभा मतदार संघातील 85 वर्षावरील ज्येष्ठ नागरिक व दिव्यांग बांधवाचे गृह भेटीद्वारे दोन टप्यात मतदान घेण्यात येणार आहे. याकामी नियुक्त अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण आयोजित करावे. स्ट्रॉंगरूममध्ये नियुक्त सुरक्षा जवानांच्या राहण्या-खाण्याची पुरेशी व्यवस्था असल्याची खात्री करून घेण्याचे निर्देश दिले. सी-व्हिजील अँपवर येणाऱ्या तक्रारी तात्काळ निकाली काढाव्यात. समाज माध्यमांवरील पोस्टवर अत्यंत बारकाईने लक्ष ठेवावे, अशा सूचना केल्या. यावेळी जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी छत्रपती संभाजीनगर येथील बैठकीत जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघातील पूर्वतयारीबाबात उपनिवडणूक आयुक्तांना माहिती दिली. येथील मतदान केंद्र, प्रत्येक मतदान केंद्रासाठी लागणारे बॅलेट युनिट, ईव्हीएम मशीनची पुरवणी सरमिसळीकरण झाले असल्याबाबत माहिती दिली. जिल्ह्यातील तिन्ही मतदार संघातील निवडणुकीची तयारी झाली असून जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. तसेच जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता पथकाच्या कार्यवाहीत जप्त करण्यात आलेल्या बाबींची माहिती दिली. ******

No comments: