13 November, 2024

मतदारांनो, ऐनवेळची धावपळ टाळा ; मतदार यादीतील नाव तपासा - जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल

हिंगोली (जिमाका), दि.13: महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 निवडणुकीची जिल्ह्यात आदर्श आचारसंहिता लागू झाली असून, येत्या बुधवारी, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी मतदान होणार आहे. त्यामुळे जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदानाच्या दिवशी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी मतदार यादीतील नाव व केंद्राची खात्री करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी येत्या बुधवारी (दि.20) सकाळी 7 ते सायंकाळी 6 या वेळेदरम्यान मतदानाची प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. या दिवशी जिल्ह्यात 5 लक्ष 10 हजार 393 पुरुष तर 4 लक्ष 74 हजार 361 स्त्री तर 10 इतर असे एकूण 9 लक्ष 84 हजार 764 मतदार 1 हजार 015 मतदान केंद्रांवर मतदानाचा हक्क बजावणार आहेत. इतक्या मोठ्या प्रमाणावर मतदारांची संख्या असल्यामुळे मतदारांनी मतदानाच्या दिवशी ऐनवेळी होणारी धावपळ टाळण्यासाठी मतदाराने मतदार यादीतील आपले नाव, मतदान केंद्र तपासून त्याच केंद्रावर मतदान असल्याची खात्री करून घ्यावी. केवळ यादीतील नाव दुसऱ्या ठिकाणी असल्यामुळे मतदानाच्या हक्कापासून वंचित राहू नये, यासाठी मतदारांनी मतदार यादीत नाव तपासून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गोयल यांनी केले आहे. मतदारांना मतदान करण्यासाठी ओळख चिठ्ठ्या वितरीत करण्याचे काम निवडणूक विभागाकडून सुरु झाले आहे. त्यानुसार मतदारांना यादीतील नाव व केंद्रांची माहिती मिळणार आहे. असे पाहा आपले मतदार यादीतील नाव निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर जावून आपल्याला मतदान केंद्र क्रमांक, मतदार यादी आणि यादीतील नाव तपासता येणार आहे. त्यासाठी मतदारांना भारत निवडणूक आयोगाच्या व्होटर्स डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट इन (https://voters.eci.gov.in/) या संकेतस्थळावर जावे लागेल. त्यानंतर इलेक्ट्रोल सर्च डॉट ईसीआय डॉट जीओव्ही डॉट ईन (https://electoralsearch.eci.gov.in/) येथे गेल्यानंतर राष्ट्रीय मतदाता सेवा पोर्टल (नॅशनल व्होटर्स सर्व्हीस पोर्टल) जावून मतदाराविषयीच्या माहितीची खात्री करून घेता येणार आहे. ही माहिती मिळविण्यासाठी भाषा निवडा, त्यानंतर निवडणूक ओळखपत्र (ईपीक) क्रमांक टाका, त्यानंतर राज्य महाराष्ट्र निवडा आणि कॅप्चा टाकून तपासल्यावर मतदाराला त्याचे नाव, यादीतील अनुक्रमांक, मतदान केंद्र याबाबत सर्व माहिती पाहता येणार आहे. व्होटर हेल्पलाईन ॲपची घ्या मदत मतदारांना त्यांच्या स्मार्टफोनमध्ये निवडणूक आयोगाच्या व्होटर हेल्पलाईन ॲप प्ले स्टोअरवरून डाऊनलोड करून आपला मोबाईल क्रमांक टाकावा. त्यानंतर ओटीपी प्राप्त होईल. हा ओटीपी टाकल्यानंतर याबाबतची माहिती मिळू शकेल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे. *****

No comments: