18 November, 2024

निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची तिसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

हिंगोली (जिमाका), दि. 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या मतदान प्रक्रियेत नियुक्त अधिकारी-कर्मचारी (पोलींग पार्टी) यांची आज निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांच्या उपस्थितीत तिसरी सरमिसळीकरणाची प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, हिंगोली विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे, कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती प्रतिक्षा भुते, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अब्दुल बारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ही तिसरी सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यातून हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात मतदानाच्या ठिकाणी कोणता अधिकारी-कर्मचारी मतदारसंघातील कोणत्या मतदान केंद्रावर जाणार, हे निश्चित करण्यात आले. तसेच दहा टक्के अधिकारी-कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. यापुढे कोणत्याही निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्यास निवडणूक प्रक्रियेतून वगळणे अथवा ड्युटी रद्द करण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघाच्या मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी बुथनिहाय 4 व्यक्तीचे एक मतदान पथक याप्रमाणे 1137 पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकामध्ये मतदान अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघासाठी 328 पथक निश्चित करण्यात आले असून 37 पथक राखीव ठेवण्यात आले आहेत. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी 352 पथक निश्चित करण्यात आले असून 39 पथक राखीव ठेवण्यात आले आहेत. 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी 343 पथक निश्चित करण्यात आले असून 38 पथक राखीव ठेवण्यात आले आहेत. भारत निवडणूक आयोगातर्फे विकसित संगणक प्रणालीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय निवडणूक कामी नियुक्त करण्यांत आलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना पाठविण्यात येते. *****

No comments: