10 November, 2024
सुजाण मतदार राजा, तुझं एक मत लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी…
• पहिल्या दिवशी 700 मतदारांचे गृहभेटीद्वारे मतदान
• सेनगाव तालुक्यातील हुडी येथील 102 वर्षीय आजोबांनी बजावला हक्क
हिंगोली (जिमाका), दि 10: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार निवडणूक प्रक्रिया राबविण्यासाठी लोकशाहीचा लोकोत्सव सुरू आहे. याच लोकोत्सवाचा प्रमुख आहे तो, येथील मतदारराजा. या मतदारराजाच्या एकेका मतासाठी निवडणूक यंत्रणा जेव्हा गृहभेटीद्वारे ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांच्या घरी पोहचून त्यांचे मतदान करून घेते तेव्हा देशातील नागरिकांचा लोकशाहीवरील विश्वास अधिक दृढ होतो, हे मात्र तितकेच खरे…!
हिंगोली विधानसभा मतदारसंघातील सेनगाव तालुक्यातील हुडी या गावात मतदान केंद्राचे फिरते पथक आज (दि. 10) दुसऱ्या दिवशी रविवारी पोहचले. हुडी येथील ज्येष्ठ मतदार असलेले 102 वर्षीय मारोतराव हरजी कुटे यांनी गृहभेटी मतदान अभियानाच्या फिरत्या पथकाच्या माध्यमातून मतदानाचा हक्क बजावत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. हुडी या गावातील 4 ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी पहिल्याच गृहभेटीतून 100 टक्के मतदान झाले आहे. त्यांच्यासोबत श्रीमती पारूबाई सटवाराव पोले या 87 वर्षीय, श्रीमती पंचफुलाबाई शंकरराव पोले या 87 वर्षीय आजींनीसुद्धा मतदानाचा हक्क बजावला. तर कान्हू मेघा जाधव 77 वर्षीय दिव्यांग मतदारानेही मतदानाचा हक्क बजावत भारत निवडणूक आयोगाच्या वतीने आलेल्या गृहभेटी फिरते मतदान पथकाचे आभार मानले. या पथकामुळे या वयातही मला मतदान करता आल्याचे समाधान श्री. जाधव यांनी व्यक्त केले. कान्हू मेघा जाधव यांनीही टपाली मतदानातून लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी आपले अमूल्य मत दिल्यामुळे झालेला आनंद त्यांच्या चेहऱ्यावर स्पष्टपणे दिसून आला. जिल्ह्यात 9 आणि 10 नोव्हेंबर रोजी टपाली मतदान प्रक्रिया पार पडली आहे.
तसेच जामदया येथील नामदेव किसन चिबडे (95) आणि वत्सलाबाई नामदेव चिबडे (90) या ज्येष्ठ मतदार असलेल्या दाम्पत्यानेही गृहभेटी मतदानातून मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. एकही मतदार मतदानापासून वंचित राहू नये, यासाठी भारत निवडणूक आयोग प्रयत्नशील असून, त्यासाठी जिल्ह्यात निवडणूक विभागाची पथके गठित करण्यात आली आहेत. ही पथके घरोघरी जावून ज्येष्ठ आणि दिव्यांग मतदारांचे मतदान करून घेत आहेत. पथक प्रमुख देविदास इंगळे, बीएलओ शिक्षक माणिक सिताफळे, अविनाश चव्हाण, तलाठी मदन राठोड आणि सूक्ष्म निरीक्षक पोलीस कर्मचारी यांचा समावेश होता.
जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाची अधिसूचना 15 ऑक्टोबर रोजी प्रसिद्ध झाली असून, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल हे तिन्ही मतदार संघातील निवडणूक प्रक्रियेत जातीने लक्ष घालत आहेत. त्यांच्या सोबतीला अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, टपाली मतदानाचे जिल्हा समन्वयक तथा उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, प्रतिक्षा भुते, समाधान घुटुकडे हे त्याकामी आपापली कर्तव्ये पार पाडत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात ज्येष्ठ नागरिकांचे 888, दिव्यांग 157 आणि अत्यावश्यक सेवेतील 25 असे एकूण 1 हजार 70 मतदार असून पहिल्या दिवशी गृहभेटी मतदान अभियानाद्वारे 700 ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला असल्याचे सांगितले आहे. सर्व विधानसभा निहाय टपाली आणि गृह मतदानाची प्रक्रिया सुरू झाली आहे.
92-वसमत विधानसभा मतदार संघात ज्येष्ठ 245, दिव्यांग 56, अत्यावश्यक सेवेतील 03 मतदार असून 188 ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग 50 मतदारांनी मतदानांचा हक्क बजावला आहे. 93-कळमनुरी विधानसभा मतदारसंघातील ज्येष्ठ 250, दिव्यांग 56 आणि 15 अत्यावश्यक सेवेतील मतदारांचा समावेश असून 126 ज्येष्ठ मतदार, 36 दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील ज्येष्ठ मतदार 393, दिव्यांग 45 आणि अत्यावश्यक सेवेतील 7 मतदाराचा समावेश असून 267 ज्येष्ठ आणि 33 दिव्यांग मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. असे एकूण 581 ज्येष्ठ आणि 119 दिव्यांग मतदारांनी पहिल्या दिवशी मतदानाचा हक्क बजावत आपले राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. यावेळी घरबसल्या मतदान करता येत असल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावरील आनंद स्पष्टपणे दिसून आला तर निवडणूक आयोगाच्या गृहभेटी मतदान अभियानाचे कौतुक केले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment