21 November, 2024

तीनही विधानसभा मतदार संघात होणार प्रत्येकी 14 टेबलवर मतमोजणी

• विधानसभा मतमोजणी केंद्र निश्चित • विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती हिंगोली (जिमाका), दि.21 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात सकाळी 8 पासून मतमोजणीला सुरुवात होणार आहे. मतमोजणीसाठी प्रत्येक फेरीसाठी प्रती मतदार संघ 14 टेबल लावण्यात आलेले आहेत. त्याचप्रमाणे टपाली मतपत्रिकासाठी वेगळे टेबल लावण्यात आलेले असून प्रत्येक टेबलवर मतमोजणीसाठी एक पर्यवेक्षक, एक सहाय्यक पर्यवेक्षक आणि एक सूक्ष्म निरीक्षक यांची नेमणूक करण्यात आली असल्याची माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे. *विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी केंद्र* 92-वसमत विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था, परभणी रोड वसमत ता. वसमत जि. हिंगोली येथे होणार आहे. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघाची मतमोजणी उपविभागीय अधिकारी कार्यालय कळमनुरी जि. हिंगोली येथे होणार आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाची मतमोजणी शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, एमआयडीसी, लिंबाळा मक्ता ता. जि. हिंगोली येथे होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर रोजी 1023 मतदान केंद्रावर मतदान पार पडले आहे. जिल्ह्यात एकूण मतदारांची संख्या 9 लाख 84 हजार 764 मतदारांपैकी 7 लाख 11 हजार 429 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले आहे. त्यामध्ये 3 लाख 75 हजार 339 पुरुष, 3 लाख 36 हजार 85 महिला आणि 5 तृतीयपंथीय मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. *विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती* भारत निवडणूक आयोगाने विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणी निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघासाठी हिमांशुकुमार गुप्ता, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती टी. एल. संगीता आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी श्रीमती वंदना राव यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गोयल यांनी दिली आहे. ******

हिंगोली जिल्ह्यात 72 टक्के मतदान

• वसमत विधानसभा मतदार संघात सर्वाधिक मतदान • हिंगोलीतील मतदारांचा शेवटचा क्रमांक • पुरुषांच्या तुलनेत महिला मतदारांचे मतदान कमी • तृतीयपंथीयाचे 50 टक्केच मतदान हिंगोली (जिमाका), दि.21: हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात 53 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, 1023 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात बुधवारी झालेल्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत 72.24 टक्के मतदारांनी मतदान केले आहे. यामध्ये वसमत विधानसभा मतदार संघ 75.05, कळमनुरी 73.63 आणि हिंगोली विधानसभा मतदार संघात 68.16 टक्के मतदान झाले आहे, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. ही निवडणूक पार पाडण्यासाठी निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव, खर्च निरीक्षक श्री. अर्जुन प्रधान, निवडणूक निरीक्षक (पोलीस) श्री. राकेशकुमार बन्सल आणि जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांच्या निगराणीखाली ही प्रक्रिया पार पडली. हिंगोली जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदार संघामध्ये मतदारांनी राष्ट्रीय कर्तव्यात सहभागी होत मतदानाचा हक्क बजावला आहे. त्याचा विधानसभा मतदार संघनिहाय तपशीलपुढीलप्रमाणे आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघामध्ये 2 लाख 40 हजार 737 मतदारांनी मतदान केले असून त्यामध्ये 1 लाख 26 हजार 818 पुरुष, 1 लाख 13 हजार 917 महिला तर 2 तृतीयपंथी मतदाराने मताचे दान उमेदवाराच्या पारड्यात टाकले. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 2 लाख 43 हजार 490 मतदारांनी मतदान केले असून 1 लाख 28 हजार 771 पुरुष, तर 1 लाख 14 हजार 718 महिला व एका तृतीयपंथीयाचा समावेश आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदानाची टक्केवारी सर्वात कमी असून त्यामध्ये 2 लाख 27 हजार 202 मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये 1 लाख 19 हजार 750 पुरुष, 1 लाख 7 हजार 450 महिला आणि 2 तृतीयपंथीयाचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यातील एकूण मतदारांची संख्या 9 लाख 84 हजार 764 मतदारांपैकी 7 लाख 11 हजार 429 मतदारांनी या निवडणुकीत मतदान केले आहे. त्यामध्ये 3 लाख 75 हजार 339 पुरुष, 3 लाख 36 हजार 85 महिला आणि 5 तृतीयपंथी मतदारांने मतदानाचा हक्क बजावला आहे. मतदानाची एकूण टक्केवारी पाहता 92-वसमत विधानसभा मतदार संघ (75.05 टक्के) अव्वलस्थानी राहिला असून हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान (68.16 टक्के) सर्वात कमी राहिले आहे. मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाळ यांच्यासह सर्व पथक प्रमुख तसेच जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने (वसमत), श्रीमती प्रतिक्षा भुते (कळमनुरी) आणि समाधान घुटुकडे (हिंगोली) यांनी कामकाज सुरळीत पार पाडण्यासाठी प्रयत्न केले आहेत. *******

20 November, 2024

निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव यांची विविध मतदान केंद्राला भेट

हिंगोली (जिमाका), दि. 20: जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांनी आज हिंगोली येथील सरजू देवी भिकुलाल आर्य कनिष्ठ महिला महाविद्यालयातील मतदान केंद्र, सिटी क्लब येथील सखी मतदान केंद्राला भेट देऊन पाहणी केली. तसेच श्रीमती वंदना राव यांनी 94-हिंगोली विधानसभा मतदार संघ कार्यालयास व तेथे असलेल्या आदर्श आचारसंहिता कक्ष, प्रसार माध्यम कक्षाला भेट देऊन पाहणी केली. यावेळी 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे, आदर्श आचारसंहिता पथकाचे नोडल अधिकारी अरविंद मुंढे, प्रसार माध्यम कक्षाचे नोडल अधिकारी पंडित मस्के, तसेच निवडणुकीसाठी नियुक्त अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. यानंतर निवडणूक निरीक्षक श्रीमती राव यांनी 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील कळमनुरी, साळवा, आखाडा बाळापूर व शेवाळा येथील मतदान केंद्रांना भेटी देऊन पाहणी केली. तसेच निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्यांच्या कामकाजावर त्यांनी समाधान व्यक्त केले. ******

हिंगोली जिल्ह्यात सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 61.18 टक्के मतदान

• निवडणूक विभागाची 515 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगद्वारे करडी नजर • पोलिस विभागाचा मतदान केंद्रांवर कडक बंदोबस्त • आदर्श सखी, युवा आणि दिव्यांग कर्मचाऱ्यांकडून 9 मतदान केंद्रांचे संचलन हिंगोली, (जिमाका) दि.20: हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदार संघात 11, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 19 व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 23 असे जिल्ह्यात एकूण 53 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, आज जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघात 1023 मतदान केंद्रावर मतदान प्रक्रिया शांततेत पार पडली. जिल्ह्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत आज सायंकाळी 5 वाजेपर्यंत सरासरी 61.18 टक्के मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला. तर सायंकाळी 7 वाजेनंतरही काही मतदान केंद्रांवर मतदान सुरु असल्यामुळे अंतिम आकडेवारी येण्यास वेळ लागणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदार संघात 59.67, 93-कळमनुरी 63.20 आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात सरासरी 60.62 टक्के मतदान झाले आहे. हिंगोली जिल्ह्यात एकूण 9 लाख 84 हजार 764 मतदार असून, त्यामध्ये 5 लाख 10 हजार 393 पुरुष तर 4 लाख 74 हजार 361 महिला मतदार आहेत. त्याशिवाय इतर 10 मतदारांचा यात समावेश आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 20 हजार 765 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 64 हजार 931 पुरुष, 1 लाख 55 हजार 828 महिला व 6 इतर मतदारांचा यात समावेश आहे. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 30 हजार 686 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 71 हजार 937 पुरुष, 1 लाख 58 हजार 747 महिला व 2 इतर मतदारांचा समावेश आहे. 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात एकूण 3 लाख 33 हजार 313 मतदार असून, त्यामध्ये 1 लाख 73 हजार 525 पुरुष, 1 लाख 59 हजार 786 महिला व 2 इतर मतदारांचा समावेश आहे. निवडणूक निरीक्षकांच्या मार्गदर्शनाखाली मतदानाची प्रक्रिया पूर्ण निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव, निवडणूक खर्च निरीक्षक अर्जुन प्रधान, निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ. राकेश कुमार बन्सल यांनी हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची प्रक्रिया शांततेत, निर्भय व मुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी परिश्रम घेतले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा प्रशासनाने विधानसभा निवडणुकीच्या मतदानाची प्रक्रिया शांततेत पार पाडली, असे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. जिल्हा प्रशासनाची वॉर रुममधून वेब कास्टींगद्वारे करडी नजर जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल हे भल्या पहाटेपासून ते दिवसभर निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी 515 मतदान केंद्रांवर वेबकास्टींगद्वारे करडी नजर ठेवून होते. जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघातील मतदान प्रक्रिया सुरळीत राहण्यासाठी त्यांनी वेबकास्टींगच्या माध्यमातून सतत मार्गदर्शन केले. तर निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव यांनी जिल्हा नियोजन समिती सभागृहस्थित 515 मतदान केंद्रांवर सुरु असलेल्या वेब कास्टींग रुमला भेट देत पाहणी केली. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, अपर जिल्हाधिकारी खुशाल सिंह परदेशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुषा मुथा, जिल्हा पुरवठा अधिकारी राजेश पुंजाळ यांच्यासह सर्व पथक प्रमुख जिल्हा नियोजन समिती सभागृहातील वॉर रुममध्ये उपस्थित होते. तर जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने (वसमत), श्रीमती प्रतिक्षा भुते (कळमनुरी) आणि समाधान घुटुकडे (हिंगोली) हे निवडणूक प्रक्रियेचे कामकाज पार पाडले आहेत. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रयत्न करण्यात आले. त्याचाच भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक याप्रमाणे महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र-3, दिव्यांग कर्मचारी संचलित 3 व युवा मतदान केंद्र-3 असे एकूण 9 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले होते, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी श्री. गोयल यांनी दिली आहे. या सर्व मतदान केंद्रावर शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा आदी सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या होत्या. तसेच दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सक्षम ॲपवर नावनोंदणी करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली होती. मतदार संघात आज सकाळपासूनच शहरी व ग्रामीण मतदारांनी मोठ्या उत्साहाने लोकशाहीच्या या उत्सवात भाग घेतल्याचे जागोजागी दिसून येत होते. जिल्हा प्रशासनाकडून मतदारांना प्रोत्साहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विक्रमी संख्येने मतदारांना आवाहन केले होते. त्यासाठी स्वीपच्या माध्यमातून रॅली, पथनाट्य, आई-बाबांना पत्र असे विविध उपक्रम राबवून व्यापक स्वरुपात जनजागृती करण्यात आली. जिल्हा प्रशासन व पोलिस प्रशासनातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मतदान प्रक्रिया शांततेत व निर्भय वातावरणात पार पाडण्यासाठी महत्वपूर्ण योगदान दिले. प्रथम मतदान करणारे युवा-युवती, ज्येष्ठ मतदारांचा उत्साह वाखाणण्याजोगा…! जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघात प्रथम मतदान करणारे युवक-युवतींनी मतदान करणासाठी दाखवलेला उत्साह वाखाणण्याजोगा होता. तसेच ज्येष्ठ नागरिकांनीही सकाळपासूनच मतदान केंद्रांबाहेर रांगा लावून मतदानाचा हक्क बजावत राष्ट्रीय कर्तव्य पार पाडले. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सुरुवातीपासूनच मतदान प्रक्रियेवर विशेष लक्ष देत सर्व पथकप्रमुखांना मार्गदर्शन, प्रशिक्षण देत वेळोवेळी आढावा घेतला. सर्व पथक प्रमुखांचा सहभाग विधानसभा सार्वत्रिक निवडणूक निर्भय, शांततापूर्ण वातावरणात पार पाडण्यासाठी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी 22 पथक प्रमुखांच्या समिती स्थापन केल्या होत्या. त्यामध्ये आदर्श आचारसंहिता अंमलबजावणी, कर्मचारी व्यवस्थापन, प्रशिक्षण व्यवस्थापन, निवडणूक साहित्य, वाहतूक व्यवस्था, तांत्रिक कक्ष, स्विप, कायदा व सुव्यवस्था, ईलेक्ट्रॉनिक मतदान यंत्र व्यवस्थापन, उमेदवारांचे खर्चविषयक व्यवस्थापन, टपाली मतपत्रिका व सर्व्हीस व्होटर, प्रसार माध्यम व संदेशवहन, संपर्क आराखडा, मतदार यादी व्यवस्थापन, मदत कक्ष व तक्रार निवारण, दिव्यांग व्यक्तीसाठी मदत कक्ष व सोयीसुविधा पुरविणे, वेब कास्टींग, परवानगी कक्ष, अवैध मद्यवाटपास प्रतिबंध, सी-व्हीजील ॲप, निवडणूक जप्ती व्यवस्थापन प्रणाली, निवडणूक निरीक्षकांचे नोडल अधिकारी आदी समिती प्रमुखांनी या निवडणूक प्रक्रियेत महत्त्वपूर्ण योगदान दिले. ******

वसमत व कळमनुरी विधानसभा मतमोजणीसाठी हिमांशू कुमार गुप्ता व श्रीमती टी. एल. संगीता निरीक्षक

• हिंगोलीसाठी श्रीमती वंदना राव यापूर्वीच दाखल हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारत निवडणूक आयोगाने हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी हिमांशू गुप्ता, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणीसाठी श्रीमती संगीता यांची तर 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघाच्या मतमोजणीसाठी श्रीमती वंदना राव यांची मतमोजणी निरीक्षक म्हणून नियुक्ती केली आहे. श्रीमती वंदना राव ह्या यापूर्वी हिंगोली जिल्ह्यासाठी निवडणूक निरीक्षक (सामान्य) म्हणून काम करत आहेत. 92-वसमत विधानसभा मतदारसंघाचे मतमोजणी निरीक्षक श्री. गुप्ता हे 2013 उत्तर प्रदेश कॅडरचे एससीएस सेवेचे अधिकारी असून 8604015479 हा त्यांचा संपर्क क्रमांक आहे. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे मतमोजणी निरीक्षक श्रीमती टी. एल. संगीता तेलंगाणा कॅडरच्या 2022 च्या एससीएस बॅचच्या अधिकारी असून त्यांचा संपर्क क्रमांक 9515678010 असा आहे. तर 94-हिंगोली विधानसभा मतदार संघाच्या मतमोजणी निरीक्षक श्रीमती वंदना राव या सन 2015 च्या दिल्ली कॅडरच्या आयएएस अधिकारी असून त्यांचा संपर्क क्रमांक 7820869248 असा आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या मतमोजणीसाठी आलेल्या मतमोजणी निरीक्षकांना कोणत्याही राजकीय पक्षांची, उमेदवारांची, नागरिकांची किंवा मतदाराची तक्रार असल्यास त्यांच्याशी मोबाईल क्रमांकावर संपर्क साधता येईल, असे निवडणूक विभागाकडून प्राप्त प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. ******

जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सपत्नीक बजावला मतदानाचा हक्क

• जिल्हाधिकारी यांनी घेतली सेल्फी • लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी मतदान करण्यासाठी केले आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार आज महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी आज दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत आहे. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल व त्यांच्या सुविद्य पत्नी शुभी गोयल यांनी आज येथील सिटी क्लब येथे उभारण्यात आलेल्या सखी मतदान केंद्रावर जाऊन सपत्नीक आपला मतदानाचा हक्क बजावला आहे. यावेळी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी लोकशाहीला बळकट करण्यासाठी मी मतदान केले आहे. तेंव्हा आपणही आपले मतदान करुन लोकशाहीच्या बळकटीकरणासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी केले. तसेच त्यांनी व त्यांच्या पत्नीनी येथील मतदान केंद्रावर असलेल्या सेल्फी पॉईंटवर सेल्फीही घेतली. सखी मतदान केंद्रावर असलेल्या सुविधांची माहिती घेऊन समाधान व्यक्त केले. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र- 3, दिव्यांग कर्मचारी संचलित 3 व युवा मतदान केंद्र-3 असे एकूण 9 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत. यापैकी हिंगोली येथील हे मतदान केंद्र महिलाद्वारे संचालित सखी मतदान केंद्र आहे. या मतदान केंद्रावर मतदान केंद्र अधिकारी, मतदान अधिकारी, पोलीस, परिचारिका यांसह सर्वच महिला कर्तव्यावर आहेत. या मतदान केंद्रावर फुग्याचे डिझाईन करुन आकर्षक सजावट करण्यात आली आहे. ******

19 November, 2024

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी प्रशासनाची जय्यत तयारी - जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल

• हिंगोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघातील पथके मतदान केंद्राकडे रवाना • ‘है तय्यार हम’ निवडणूक कामी नियुक्त पथकांची भावना हिंगोली, (जिमाका) दि.19: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी उद्या बुधवार, दि. 20 रोजी मतदान होणार आहे. या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्हा प्रशासन आणि निवडणूक विभागाची मतदानासाठी जय्यत तयारी झाली असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी आज येथे सांगितले. जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी नेहा भोसले आणि जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनाखाली उद्या, दि. 20 नोव्हेंबर रोजी होणाऱ्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रशासनाने जय्यत तयारी केली असून जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील तिन्ही विधानसभा मतदार संघातील पथके आज मतदान केंद्राकडे रवाना करण्यात आली आहेत. वसमतचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, कळमनुरीच्या निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिक्षा भुते आणि हिंगोलीचे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांच्या नियंत्रणाखाली ही पथके आज सकाळपासून रवाना करण्यात आली आहेत. जिल्ह्यात उद्या होणाऱ्या‍ विधानसभा सार्वत्रिक निवडणूक कामी नियुक्त पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांनी ‘है तय्यार हम’ची भावना व्यक्त केली. 92-वसमत विधानसभा मतदार संघ 92-वसमत विधानसभा मतदार संघात एकूण 328 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर 1702 मतदान अधिकारी, 656 पोलिस कर्मचारी व होमगार्ड, 328 शिपायांची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच स्थानिक स्तरावरील पोलीस पाटील, ग्रामसेवक, अंगणवाडी सेविका यांची मदत घेण्यात येणार आहे. समन्वय करण्यासाठी 38 क्षेत्रीय अधिकारी व सोबत पथक तैनात करण्यात आले आहेत. पोलीस विभागाच्या 18 पथकामार्फत संपूर्ण निवडणूक प्रक्रियेवर नजर ठेवली जाणार आहे. सशस्त्र सेना बलाचे 90 जवान मतदार संघात गस्तीवर असतील. सर्वांनी निर्भयपणे व न चुकता मतदान करून लोकशाही बळकट करावी, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी केले आहे. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघ विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने कळमनुरी येथील उपविभागीय अधिकारी कार्यालयात निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिक्षा भुते यांच्या अध्यक्षतेखाली 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी नियुक्त मतदान केंद्रावरील मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी यांचे तिसरे प्रशिक्षण घेऊन त्यांना मतदान यंत्र व मतदानासाठी लागणारे सर्व साहित्य देऊन 352 मतदान केंद्रावर 36 क्षेत्रीय अधिकारी यांच्या नियंत्रणाखाली पथके रवाना करण्यात आली. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात एकूण 328 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर 352 मतदान केंद्राध्यक्ष, 1056 मतदान अधिकारी, 95 महिला कर्मचारी, 704 पोलीस कर्मचारी व होमगार्ड असे एकूण 2207 अधिकारी कर्मचारी मतदान केंद्रावर रवाना करण्यात आले आहेत. या कामी सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा कळमनुरीचे तहसीलदार जीवककुमार कांबळे, औंढा नागनाथचे तहसीलदार हरीश गाडे यांच्या सहाकार्याने मतदान अधिकारी, कर्मचारी यांना प्रशिक्षण देऊन मतदान केंद्रावर साहित्य व कर्मचारी पाठविण्यासाठी सहकार्य केले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रतिक्षा भुते यांनी दिली आहे. 94-हिंगोली विधानसभा मतदार संघ 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी उद्या दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी होणाऱ्या मतदानासाठी 343 मतदान केंद्रांवर 1524 अधिकारी व कर्मचारी नेमणूक करण्यात आली आहे. त्यापैकी 35 मतदान केंद्रावर महिला कर्मचारी यांची नेमणूक करण्यात आली आहे. ही सर्व पथके हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केद्रांकडे रवाना करण्यात आली आहेत. त्यासाठी 25 बस, 6 मिनीबस, 108 जीप व्यवस्था करण्यात आली आहे. समन्वय करण्यासाठी 41 क्षेत्रीय अधिकारी व सोबत पथक तैनात करण्यात आले असल्याची माहिती निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे यांनी दिली आहे. ******

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांना जिल्हाधिकारी कार्यालयात अभिवादन

हिंगोली, दि.19 (जिमाका): भारताच्या पहिल्या महिला पंतप्रधान इंदिरा गांधी यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित कार्यक्रमात निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड यांनी इंदिरा गांधी यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. यावेळी नायब तहसीलदार संतोष बोथीकर, सचिन जोशी यांच्यासह उपस्थित अधिकारी -कर्मचाऱ्यांनी प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी श्री. बोधवड यांनी उपस्थित अधिकारी-कर्मचाऱ्यांना राष्ट्रीय एकात्मतेची शपथ दिली. ******

आपल्या अमूल्य मताची किंमत जाणा अन् मतदान करा - जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल

हिंगोली, (जिमाका) दि. 19 : लोकशाहीमध्ये प्रत्येकाला मतदान करण्याचा महत्त्वाचा अधिकार आहे. लोकशाहीत प्रत्येक मताला सारखेच महत्व आहे. त्यामुळे आपल्या अमूल्य मताची किंमत जाणून उद्या सर्वांनी विधानसभा निवडणुकीसाठी अवश्य मतदान करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. उद्या बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी राज्यात विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदान आहे. जिल्हा प्रशासनाकडून जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मतदानासाठी घराबाहेर पडून 92- वसमत, 93- कळमनुरी आणि 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी नागरिकांनी मतदान करावे, असे आवाहन त्यांनी केले आहे. जिल्ह्यातील सर्व मतदारांनी मोठ्या संख्येने आपल्या मतदान केंद्रावर जाऊन लोकशाही बळकट करण्यासाठी आपले एक मत अत्यंत अमूल्य आहे. त्यामुळे प्रत्येकाने आपला मतदानाचा हक्क अवश्य बजावावा, असेही जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी केले आहे. 20 नोव्हेंबरला सर्व मतदान केंद्रांवर प्रशासनामार्फत सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करण्यात आलेल्या आहेत. दिव्यांग, ज्येष्ठ नागरिक मतदाराला आपले मतदान केंद्र कुठे आहे हे माहित करून घेण्यासाठी 'वोटर हेल्पलाईन' अँप डाउनलोड करून त्यावरून ते शोधता येईल. या सर्व निवडणुकीसाठी आपण सर्वांनी लाभ घ्यावा व मतदानाचा हक्क बजावावा. सर्व मतदारांच्या पुढाकारामुळे मतदानाची टक्केवारी नक्कीच वाढेल, असेही जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे. ******

मतदारांनो, मतदानासाठी हे 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य

हिंगोली (जिमाका), दि. 19 : येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ईपीक म्हणजेच मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मतदार केंद्रावरील अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता छायाचित्रासह मतदार ओळखपत्र म्हणजेच ईपीक देण्यात आले आहे. ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र नसल्यास अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त इतर 12 पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी स्वत:ची ओळख पटविण्यासाठी पुराव्यांमध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले दिव्यांग प्रमाणपत्र असे 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहेत, ते मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. ईपीक सादर करणे शक्य नसल्यास इतर 12 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणत्याही एका ओळखपत्राचा उपयोग करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. *****

मतदानासाठी आज सुट्टी अथवा दोन तासांची सवलत

हिंगोली (जिमाका), दि. 19 : विधानसभा निवडणुकीसाठी उद्या बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी कामगारांना सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्यासाठी शासनाने परिपत्रक निर्गमित केले आहे. कामगारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा, यासाठी शासनाने आदेश दिलेले आहेत. मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. तसेच ही सुट्टी राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टीऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी, व्यवस्थापनाने वरील आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता की स्थापना करण्यात आली आहे. तक्रार निवारणसाठी नोडल अधिकारी टि. ई. कराड सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली (मो.नं. 7218161627) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. ******

हिंगोली जिल्ह्यात 515 मतदान केंद्रांवर होणार वेब कास्टींग - जिल्हाधिकारी अभिनव गोयल

हिंगोली, (जिमाका) दि.19: हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी उद्या बुधवारी 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघात एकूण 1 हजार 23 मतदान केंद्र असून, त्यापैकी निम्मे म्हणजेच 515 मतदान केंद्रांवर वेब कास्टींगद्वारे करडी नजर राहणार असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 ही भयमुक्त, खुल्या वातावरणात आणि पारदर्शी पद्धतीने पार पडावी, यासाठी जिल्हा आणि पोलीस प्रशासन काम करत आहे. त्यासाठी भारत निवडणूक आयोग जिल्ह्यातील 50 टक्के मतदान केंद्रावर वेबकास्टींगद्वारे देखरेख ठेवणार आहे. हिंगोली जिल्ह्यात 92-वसमत 328, 93-कळमनुरी 352 आणि 94-हिंगोली 343 अशा एकूण तीन विधानसभा मतदारसंघामध्ये 1 हजार 23 मतदान केंद्र आहेत. 92-वसमत विधानसभा मतदार संघात 164 मतदान केंद्रावर, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघात 180 आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 171 मतदान केंद्रावर वेबकास्टींगची सुविधा तयार करण्यात आली असून, या सर्व मतदान केंद्रावर बारकाईने लक्ष ठेवण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे. *******

हिंगोली जिल्ह्यात 9 आदर्श मतदान केंद्र, लोकशाहीला बळकट करण्यासाठी आपले अमूल्य मत नोंदवा -जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल

• महिला, दिव्यांग आणि युवा कर्मचारी संचालित आदर्श मतदार केंद्र हिंगोली (जिमाका), दि. 19: विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024मध्ये जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी उद्या बुधवार, दिनांक 20 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 7 ते सायंकाळी 6 पर्यत मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोग आणि जिल्हा निवडणूक विभागातर्फे प्रयत्न सुरु आहेत. त्याचाच भाग म्हणून हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी एक याप्रमाणे महिला कर्मचारीद्वारे संचालित मतदान केंद्र- 3, दिव्यांग कर्मचारी संचलित 3 व युवा मतदान केंद्र-3 असे एकूण 9 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आली आहेत, अशी माहिती जिल्हा निवडणूक अधिकारी तथा जिल्हाधिकारी अभिनव गोयल दिली आहे. या सर्व मतदान केंद्रावर शामियाना, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, रॅम्पची सुविधा, व्हील चेअर, दिव्यांग व्यक्तींसाठी पूरक सेवा जसे प्रथमोपचार, दिव्यांग मतदारांना ने-आण करण्यासाठी सक्षम ॲपवर नोंदणी यासह आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात आलेल्या आहेत. लोकशाहीला बळकट करण्यासाठी जास्तीत जास्त मतदारांनी आपले अमूल्य मतदान करावे, असे आवाहनही त्यांनी केले आहे. महिला कर्मचारीद्वारे संचालित सखी आदर्श मतदान केंद्र हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे महिला कर्मचारीद्वारे संचालित 3 सखी आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 190-बहिर्जी स्मारक विद्यालय गिरगाव, पूर्व विंग रुम नं. 2 येथे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 81-जिल्हा परिषद प्राथमिक शाळा नवीन इमारत, कळमनुरी रुम नं. 2 येथे आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 286-सिटी क्लब हिंगोली खोली क्र. 1 येथे महिला कर्मचारीद्वारे संचालित 3 सखी मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित आदर्श मतदान केंद्र हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित 3 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 252-बहिर्जी स्मारक विद्यालय वसमत खोली क्रमांक 1 येथे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 73-गुलाम नबी आझाद हायस्कूल कळमनुरी खोली क्र. 1 येथे आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 260-कृषि उत्पन्न बाजार समिती हिंगोली येथे दिव्यांग कर्मचारीद्वारे संचालित 3 आदर्श मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. आदर्श युवा मतदान केंद्र हिंगोली जिल्ह्यात प्रत्येक विधानसभा मतदार संघनिहाय एक याप्रमाणे 3 आदर्श युवा मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 267-जिल्हा परिषद प्रशाळा वसमत, नवीन इमारत खोली क्रमांक- 3 येथे, 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 183-ग्रामपंचायत, औंढा नागनाथ खोली क्र. 2 येथे आणि 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदान केंद्र क्र. 271-आदर्श महाविद्यालय हिंगोली येथे अशाप्रकारे 3 आदर्श युवा मतदान केंद्र तयार करण्यात आले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी दिली आहे. *****

लोकशाहीच्या महोत्सवासाठी .... चला करू मतदान -जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल

• आज दिवस तुमचा; मतदानाचा हक्क बजावण्याचा • मतांचा टक्का वाढविण्यासाठी प्रशासन सज्ज • गृहभेटीतून 989 मतदारांनी बजावला मतदानाचा हक्क • ज्येष्ठ व दिव्यांगांनी सक्षम ॲपमध्ये नावनोंदणी करून ने-आण सुविधेचा लाभ घ्यावा हिंगोली, (जिमाका) दि.19: भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी उद्या बुधवार, दि. 20 रोजी मतदान होणार आहे. मतदानाची टक्केवारी वाढावी, यासाठी निवडणूक आयोगासह जिल्हा निवडणूक विभागाने सर्व तयारी केली आहे. त्यामुळे सर्व मतदारांनी कोणतेही कारण न देता मतदान करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदार संघात मतदानाची टक्केवारी वाढावी, दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना घरबसल्या मतदान करता यावे, यासाठी निवडणूक विभाग गृहभेटी घेत निवडणूक विभाग मतदारांपर्यंत पोहोचला आहे. जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघात एकही मतदार आपल्या मतदानाच्या अधिकारापासून वंचित राहू नये, यासाठी त्यांच्या घरापर्यंत पोहोचत 835 ज्येष्ठ व 154 दिव्यांग असे एकूण 989 मतदारांचे मतदान करून घेतले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी श्री. गोयल यांनी सांगितले. निवडणूक विभागाने निवडणूक पथकांनाच मतदारांच्या गृहभेटी घेऊन मतदानाचा हक्क बजावत लोकशाहीच्या सोहळ्यात आपल्या मतांचे दान केले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघात 92-वसमत विधानसभा मतदारसंघात 328 मतदान केंद्र असून त्यापैकी किन्होळा-185 हे संवेदनशील मतदान केंद्र आहे. तर 93- कळमनुरी विधानसभा मतदार संघात 352 व 94-हिंगोली विधानसभा मतदार संघात 343 मतदार केंद्र असून या दोन्ही विधानसभा मतदार संघात एकही संवेदनशील केंद्र नाही. निवडणूक प्रक्रिया शांततेत पार पाडण्यासाठी पोलीस विभाग, राज्य राखीव पोलीस बल आणि केंद्रीय राखीव पोलीस बलाचे अधिकारी, कर्मचारी तैनात करण्यात आले असून चोख बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याशिवाय जिल्हा निवडणूक विभागाने उद्या बुधवारी सकाळी 7 ते सायंकाळी 6 वाजेपर्यंत ज्येष्ठ व दिव्यांग मतदारांना घरापासून ते मतदान केंद्रापर्यंत ने-आण करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. मात्र, त्यासाठी त्यांना सक्षम ॲपमध्ये नावनोंदणी करणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. ******

18 November, 2024

जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर आरोग्य पथक होणार दाखल

• आरोग्य यंत्रणा सतर्क : तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांच्यावर जबाबदारी हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्ह्यातील तिन्ही विधानसभा मतदारसंघातील बूथवर दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. हिवाळा ऋतू असूनही वातावरणातील बदलाची दखल घेत मतदान बूथवरील सर्व नियुक्त अधिकारी, कर्मचारी तसेच मतदानासाठी येणाऱ्या मतदारांसाठी प्राथमिक आरोग्य सेवा मिळावी यासाठी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सूचना दिल्या आहेत. त्या अनुषंगाने जिल्ह्यातील तिन्ही मतदारसंघातील प्रत्येक मतदान बूथवर प्रथमोपचार किटसह आशा वर्कर उपस्थित राहणार आहेत. यांची जबाबदारी तालुका आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना देण्यात आली आहे. तसेच तातडीच्या उपचारासाठी व संदर्भ सेवेसाठी 102 व 108 रुग्णवाहिका जवळच्या प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण रुग्णालय येथे उपलब्ध राहणार आहे. मतदानाच्या दिवशी मतदान प्रक्रिया सुरू झाल्यापासून ते मतदान पूर्ण होईपर्यंत सर्व आरोग्य कर्मचारी, समुदाय आरोग्य अधिकारी व वैद्यकीय अधिकारी यांना मुख्यालयी राहण्याच्या सूचना देण्यात आले असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे. ******

विधानसभा निवडणूक मतदानासाठी जिल्ह्यात 387 वाहने

हिंगोली (जिमाका), दि. 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 साठी जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदारसंघाच्या मतदानासाठी मतदान केंद्रावर मतपेट्या, मतदान कर्मचारी, तसेच आवश्यक असेल तेथे मतदारांना मतदानासाठी घेऊन जाण्यासाठी 387 वाहनाची व्यवस्था करण्यात आली आहे. यामध्ये 122 क्रुझर, 65 एसटी बस, 41 मिनीबस, 17 जीप, 27 राखीव वाहने तसेच क्षेत्रीय अधिकाऱ्यांसाठी 115 जीप वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. विधानसभा मतदारसंघनिहाय वाहनाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघात मतदान कर्मचाऱ्यांसाठी 54 क्रुझर, 16 एसटी बस, 18 मिनीबस, 12 जीप, 12 राखीव जीप तसेच क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी 38 जीप अशी 150 वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 93- कळमनुरी विधानसभा मतदार संघात मतदान कर्मचाऱ्यांसाठी 40 क्रुझर, 24 एसटी बस, 17 मिनीबस, 5 राखीव वाहने तसेच क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी 36 जीप अशी 122 वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत. 94- हिंगोली विधानसभा मतदार संघात मतदान कर्मचाऱ्यांसाठी 28 क्रुझर, 25 एसटी बस, 6 मिनीबस, 5 जीप, 10 राखीव वाहने तसेच क्षेत्रीय अधिकारी यांच्यासाठी 41 जीप वाहने अशी 115 वाहने उपलब्ध करुन देण्यात आली आहेत, अशी माहिती सहायक प्रादेशिक परिवहन अधिकारी तथा वाहन व्यवस्थेचे नोडल अधिकारी जगदीश माने यांनी दिली आहे. ***

निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांच्या प्रमुख उपस्थितीत सूक्ष्म निरीक्षकांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न

हिंगोली (जिमाका), दि. 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 92-वसमत, 93- कळमनुरी,94- हिंगोली विधानसभा मतदार संघात नियुक्त सूक्ष्म निरीक्षकांचे द्वितीय प्रशिक्षण आज दि. 18 नोव्हेंबर 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथील सभागृहात घेण्यात आले. सूक्ष्म निरीक्षकांचे कार्य व प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया सुरू असताना करायची कामे, परिशिष्ट 28 सूक्ष्म निरीक्षकांच्या अहवालाचे स्वरूप, सूक्ष्म निरीक्षकांनी मतदान सुरू होण्यापूर्वी करावयाची कामे, मतदान केंद्रावरील तयारीचे निरीक्षण करणे, निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार मॉक पोल पार पाडणे, मॉक पोल नंतर प्रत्यक्ष मतदान सुरू होण्यापूर्वी कंट्रोल युनिट (CU) मधील मते clear झाली आहेत का ? हे पाहणे तसेच प्रत्यक्ष मतदान प्रक्रिया आदी करावयाच्या कामाची सविस्तर माहिती पीपीटीद्वारे देण्यात आली. यावेळी सोबत Annuxuar 28, Checklist For Micro Observer Manual यांच्या प्रतीही सूक्ष्म निरीक्षकांना देण्यात आल्या. यावेळी सामान्य निवडणूक निरीक्षक श्रीमती वंदना राव व जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सर्व सूक्ष्म निरीक्षकांना मार्गदर्शन करून येणाऱ्या अडचणी व त्यावरील करायवयाच्या उपाययोजना याविषयी अवगत केले. तसेच विविध फॉर्म जसे 17 C, 17A, Annuxare No 28 यांची पण माहिती दिली . तसेच निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे यांनी उपस्थित सूक्ष्मनिरीक्षकांसोबत संवाद साधला. प्रशिक्षण व्यवस्थापन समिती नोडल अधिकारी डॉ. दीपक साबळे यांनी प्रशिक्षणार्थ्यांसी संवाद साधताना निवडणुकीचे काम अतिशय काळजीपूर्वक करण्याच्या सूचना देऊन उपस्थितांसोबत संवाद साधला. यावेळी निवडणूक प्रशिक्षण टीमचे सदस्य वरिष्ठ अधिव्याख्याता निळेकर,अधिव्याख्याता जाधव तसेच बालाजी काळे, विजय बांगर आणि दीपक कोकरे हे उपस्थित होते. *******

निवडणूक निरीक्षकांच्या उपस्थितीत मतदानासाठी नियुक्त कर्मचाऱ्यांची तिसरी सरमिसळ प्रक्रिया पूर्ण

हिंगोली (जिमाका), दि. 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीकरिता जिल्ह्यातील मतदान केंद्रावर वितरीत करावयाच्या मतदान प्रक्रियेत नियुक्त अधिकारी-कर्मचारी (पोलींग पार्टी) यांची आज निवडणूक निरीक्षक (सामान्य) श्रीमती वंदना राव यांच्या उपस्थितीत तिसरी सरमिसळीकरणाची प्रक्रिया पार पडली. यावेळी जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, हिंगोली विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी समाधान घुटुकडे, कळमनुरी विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती प्रतिक्षा भुते, जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी अब्दुल बारी उपस्थित होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या राष्ट्रीय सूचना केंद्रात ही तिसरी सरमिसळ प्रक्रिया संगणक प्रणालीद्वारे पूर्ण करण्यात आली. यातून हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात मतदानाच्या ठिकाणी कोणता अधिकारी-कर्मचारी मतदारसंघातील कोणत्या मतदान केंद्रावर जाणार, हे निश्चित करण्यात आले. तसेच दहा टक्के अधिकारी-कर्मचारी राखीव ठेवण्यात आले आहेत. यापुढे कोणत्याही निवडणूक कामी नियुक्त कर्मचाऱ्यास निवडणूक प्रक्रियेतून वगळणे अथवा ड्युटी रद्द करण्यात येणार नसल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. हिंगोली जिल्ह्यातील तिनही विधानसभा मतदार संघाच्या मतदानाची प्रक्रिया पार पाडण्यासाठी बुथनिहाय 4 व्यक्तीचे एक मतदान पथक याप्रमाणे 1137 पथक तयार करण्यात आले आहेत. या पथकामध्ये मतदान अधिकारी, कर्मचारी यांचा समावेश आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघासाठी 328 पथक निश्चित करण्यात आले असून 37 पथक राखीव ठेवण्यात आले आहेत. 93-कळमनुरी विधानसभा मतदार संघासाठी 352 पथक निश्चित करण्यात आले असून 39 पथक राखीव ठेवण्यात आले आहेत. 94-हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी 343 पथक निश्चित करण्यात आले असून 38 पथक राखीव ठेवण्यात आले आहेत. भारत निवडणूक आयोगातर्फे विकसित संगणक प्रणालीमध्ये हिंगोली जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदारसंघातील मतदान केंद्रनिहाय निवडणूक कामी नियुक्त करण्यांत आलेल्या अधिकारी-कर्मचारी यांना पाठविण्यात येते. *****

शाळा, महाविद्यालयामध्ये 'बालहक्क सप्ताह आणि बाल अधिकार'वर मार्गदर्शन

हिंगोली (जिमाका), दि. 18 : जिल्ह्यात महिला व बाल विकास विभाग अंतर्गत हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथील श्री स्वामी समर्थ बालगृह व हिंगोली येथील सरस्वती मुलीचे निरीक्षणगृह या दोन स्वयंसेवी संस्था कार्यरत असून येथे बाल दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन बालकाना मार्गदर्शन करण्यात आले. तसेच जिल्ह्यात जिल्हा महिला व बालविकास अधिकारी यांच्या मार्गदर्शनाखाली दि. 14 ते 20 नोव्हेंबर 2024 दरम्यान बालहक्क सप्ताह व आंतरराष्ट्रीय दत्तक महिना साजरा करण्यात येत आहे. यानिमित्त जिल्ह्यातील शाळा, महाविद्यालयांमध्ये बालहक्क सप्ताह आणि बालअधिकार या विषयावर मार्गदर्शन करण्यात येत आहे. तसेच पॉक्सो कायदा, बालविवाह प्रतिबंधक कायदा, बाल कामगार इत्यादीबाबत जिल्ह्यातील शाळेमध्ये बाल कायद्याची जनजागृती करण्यात येणार आहे. तसेच जिल्हा बाल संरक्षण कक्षाकडून बाल हक्क सप्ताहनिमित्त व आंतरराष्ट्रीय दत्तक महिनानिमित्त 18 वर्षांखालील बालकांसाठी ऑनलाईन प्रश्नमंजुषा आयोजित करण्यात येत आहे. या प्रश्नमंजुषेच्या आधारे बालकांना ऑनलाइन प्रमाणपत्राचे वितरण करण्यात येणार आहे. जिल्ह्यात हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी जिल्हा बाल संरक्षण कक्षाचे अधिकारी व कर्मचारी, चाइल्ड हेल्पलाइन 1098 चे कर्मचारी सहभागी होणार आहेत. *****

विधानसभा निवडणुकीच्या मतदानासाठी मतदाराना 20 नोव्हेंबर रोजी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत

हिंगोली (जिमाका), दि. 18 : विधानसभा निवडणुकीसाठी बुधवार, दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या मतदानासाठी कामगारांना मतदानाच्या दिवशी मतदान करण्यासाठी सुट्टी अथवा दोन तासांची सवलत देण्यासाठी शासनाने परिपत्रक निर्गमित केले आहे. कामगारांना त्यांच्या मतदानाचा हक्क योग्य रीतीने बजावता यावा यासाठी शासनाने आदेश दिलेले आहेत. मतदान क्षेत्रात मतदार असलेले कामगार, अधिकारी, कर्मचारी यांना मग ते कामानिमित्त निवडणूक होणाऱ्या क्षेत्राबाहेर कार्यरत असले तरीही त्यांना निवडणुकीच्या दिवशी मतदानाचा हक्क बजावण्यासाठी भरपगारी सुट्टी देण्यात यावी. तसेच ही सुट्टी राज्य शासन, केंद्र शासन व खाजगी कंपन्या यामधील आस्थापना, सर्व दुकाने व इतर आस्थापना, निवासी हॉटेल, खाद्यगृहे, नाट्यगृहे, व्यापार, औद्योगिक उपक्रम किंवा इतर आस्थापना तसेच माहिती व तंत्रज्ञान कंपन्या, शॉपिंग सेंटर, मॉल्स, रिटेलर्स इत्यादी सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींना लागू राहील. अपवादात्मक परिस्थितीत कामगार, अधिकारी, कर्मचारी इत्यादीना पूर्ण दिवस सुट्टी देणे शक्य नसेल तर, मतदान क्षेत्रातील कामगारांना मतदानाचा हक्क बजावण्यासाठी सुट्टी ऐवजी केवळ दोन ते तीन तासांची सवलत देता येईल. मात्र त्याबाबत त्यांनी संबंधित महानगरपालिका आयुक्त अथवा जिल्हाधिकारी यांची पूर्व परवानगी घेणे आवश्यक राहील. कोणत्याही परिस्थितीत कामगारांना मतदानासाठी किमान दोन ते तीन तासांची सवलत मिळेल याची दक्षता संबंधित आस्थापना मालकांनी घेणे आवश्यक राहील. सर्व आस्थापना, कारखाने, दुकाने इत्यादींच्या मालकांनी, व्यवस्थापनाने वरील आदेशाचे अनुपालन होईल याची खबरदारी घ्यावी. मतदारांकडून मतदानाकरिता योग्य ती सुट्टी अथवा सवलत प्राप्त न झाल्याने मतदान करता येणे शक्य न झाल्याबाबत तक्रार आल्यास, त्यांच्या विरुद्ध योग्य ती कारवाई करण्यात येईल. या तक्रारीचे निवारण करण्यासाठी जिल्हास्तरीय दक्षता की स्थापना करण्यात आली आहे. तक्रार निवारणसाठी नोडल अधिकारी टि. ई. कराड सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली (मो.नं. 7218161627) यांच्याशी संपर्क साधावे, असे आवाहन सरकारी कामगार अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. *******

विधानसभा निवडणूक 2024 मतदान व मतमोजणीच्या दिवशी मद्यविक्री बंद

• अवैध मद्य विक्रीची तक्रार टोल फ्री क्रमांक व दूरध्वनी क्रमांकावर देण्याचे आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 18 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी जिल्ह्यात बुधवारी (दि.२०) मतदान होत असून, त्याची मतमोजणी 23 नोव्हेंबर 2024 रोजी संबंधित निवडणूक निर्णय अधिकारी यांनी निश्चित केलेल्या स्थळी होणार आहे. मतदानाची प्रक्रिया मुक्त व निर्भयपणे व शांततेत पार पाडण्याच्या दृष्टीने व शांतता, सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊन अनुचित प्रकार घडू नये यासाठी लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 चे कलम 135 (सी) महाराष्ट्र दारुबंदी कायद्याच्या कलम 142 (1) तरतुदीनुसार तसेच निवडणूक आयोगाच्या विविध निर्देशानुसार हिंगोली जिल्ह्यातील सर्व ठोक व किरकोळ अनुज्ञप्ती मद्यविक्री बंद ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी दिले आहेत. निवडणुकीच्या आचारसंहितेची प्रभावी अंमलबजावणी व खर्चावर नियंत्रण, आर्थिक बळाचा दुरुपयोग टाळणे, मतदारांवर प्रभाव टाकणाऱ्या वस्तुंच्या वाटपावर अंकुश ठेवण्यासाठी तसेच सार्वजनिक शांतता अबाधित ठेवण्यासाठी हिंगोली जिल्ह्यात मतदान संपण्यापूर्वी 48 तास अगोदर ते मतदान संपेपर्यत 18 नोव्हेंबर 2024 सायंकाळी 6 वाजेपासून ते 20 नोव्हेबर 2024 पर्यंत तसेच मतमोजणीच्या दिवशी 23 नोव्हेंबर 2024 रोजी संपूर्ण दिवस मतमोजणी प्रक्रिया संपेपर्यत संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात अनुज्ञप्ती बंद ठेवण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाचे उल्लंघन करुन मद्यविक्री करीत असल्याचे आढळून आल्यास संबंधित अनुज्ञप्ती रद्द करण्याची कारवाई करण्यात येईल यांची नोंद घ्यावी, असे आदेशात नमूद केले आहे. अवैध मद्य निर्मिती, विक्री, वाहतूक किंवा मद्य वाटप आदी संबंधी माहिती, तक्रार द्यावयाची असल्यास टोल फ्री क्रमांक 18002339999 व अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क हिंगोली कार्यालयाच्या 02456-220106 या दूरध्वनी क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधीक्षक आदित्य पवार यांनी केले आहे. ******

17 November, 2024

विशेष निवडणूक निरीक्षक (पोलीस) दीपक मिश्रा यांच्याकडून निवडणूक कामाकाजाचा आढावा

हिंगोली, दि. 17 (जिमाका) :- विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी नियुक्त विशेष निवडणूक निरीक्षक (पोलीस) दिपक मिश्रा यांनी आज दूरदृष्य प्रणालीव्दारे विधानसभा निवडणुकीसाठीच्या मतदान व मतमोजणीच्या पूर्वतयारीचा आढावा घेतला. विधानसभा निवडणुकीची मतदान व मतमोजणीची प्रक्रिया पारदर्शक व निर्भय वातावरणात यशस्वीपणे पार पाडण्यासाठी सर्व निवडणूक निर्णय अधिकारी, पोलीस यंत्रणा व संबंधितअधिकऱ्यांनी दक्षता घ्यावी, असे निर्देश त्यांनी यावेळी दिले. बैठकीस निवडणूक निरीक्षक (पोलीस) डॉ. राकेशकुमार बन्सल, जिल्हाधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे आणि उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे उपस्थित होते. मतदारांना निर्भयपणे मतदान करता यावे याकरिता मतदान केंद्र व परिसरात कडक सुरक्षा व्यवस्था ठेवावी. मतदान केंद्रांवर मतदारांसाठी आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. संवेदनशील मतदान केंद्रांवर सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अधिक दक्षता घ्यावी. प्रतिबंधात्मक उपाययोजना लागू कराव्यात. मतदान झाल्यानंतर मतदान यंत्र मतमोजणी केंद्रावर अतिशय सजगतेने घेऊन जावेत, अशा सूचना श्री. मिश्रा यांनी केल्या. प्रारंभी दोन्ही जिल्ह्याचे निवडणूक निरीक्षक (पोलीस), जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक यांनी निवडणुकीच्या नियोजनाची सविस्तर माहिती दिली. *

मतदार जनजागृती अभियानातून मतदारांमध्ये जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 17: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार आहे. या विधानसभा निवडणुकीत हिंगोली जिल्ह्यातील मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी जिल्हा प्रशासनासोबत विविध सामाजिक संस्थांच्या माध्यमातून व्यापक प्रमाणात जनजागृती करण्यात येत आहे. मतदान करणे हा माझा हक्क आणि कर्तव्य आहे. ते करण्यास मी संकल्पित आहे ही भावना घेऊन जिल्ह्यातील विविध योग समित्यांकडून मतदान जनजागृती करण्यात येत आहे. या मतदार जनजागृतीमध्ये मतदार यादीत आपले नाव असल्याची खात्री करा, मतदान केंद्रावर जाऊन मतदान करा, 85 वर्षे वयापुढील वयोवृध्द नागरिकांसाठी, अपंग आणि आजारी व्यक्तींसाठी घरच्या लोकांनी फॉर्म भरुन नोंदणी केल्यास मतदान अधिकारी घरी येऊन आपले मत नोंदवतील, आपल्या परिचयातील सर्वांना मतदान करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी जनजागृती करण्यात येत आहे. सर्व सुजाण नागरिकांनी आपल्या मतदानाचा हक्क आणि कर्तव्य आवश्य पार पाडावेत यासाठी आज हिंगोली शहरात रॅली काढून जनजागृती करण्यात आली. या जनजागृतीसाठी कुंडलिकराव निर्मले, माधुरी शास्त्री, विठ्ठल सोळंके, मन्मथ गुमटे, राजकुमार टिळे, प्रणत अग्रवाल यांनी यासाठी परिश्रम घेत आहेत. *****

आज संध्याकाळी प्रचार तोफा थंडावणार

• सोमवारी सायंकाळी 6 वाजेपासून 48 तासाच्या शांतता कालावधीला सुरुवात • जिल्ह्यामध्ये प्रतिबंधात्मक आदेश लागू; सर्वत्र चोख बंदोबस्त हिंगोली (जिमाका), दि. 17: विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या शेवटच्या 48 तासाला उद्या सोमवारी सायंकाळी 6 वाजता प्रारंभ होणार आहे. 48 तासांसाठी सर्व राजकीय पक्षांना आपला प्रचार थांबावावा लागणार असून बुधवार, दि. 20 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी सात ते सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान होणार आहे. सर्वत्र चोख बंदोबस्त ठेवण्यात आला असून निर्भय व पारदर्शी वातावरणात मोठ्या संख्येने नागरिकांना मतदान करण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 अन्वये प्रमाणे विधानसभा मतदारसंघांमध्ये मतदानाच्या समाप्तीसाठी निश्चित केलेल्या वेळेच्या 48 तासा अगोदरच्या कालावधीमध्ये कलम 163 लागू होईल, याची नोंद घेण्याचे आवाहन केले आहे. या काळात सार्वजनिक सभा आयोजित करता येणार नाही. ध्वनिक्षेपकाचा वापर करता येणार नाही. बेकायदेशीरित्या जमा होता येणार नाही. पाच पेक्षा जास्त व्यक्ती एकत्रित जमा होता येणार नाही किंवा एकत्रित फिरता येणार नाही, सोशल मीडिया, इलेक्ट्रानिक मीडियामध्ये आवाहन करता येणार नाही, जाहिराती देता येणार नाही, असे स्पष्ट केले आहे. हिंगोली जिल्ह्यातील विधानसभा मतदार संघनिहाय एकूण मतदार हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत विधानसभा मतदारसंघात (320765), 93-कळमनुरी (330686), 94- हिंगोली (333313) असे जिल्ह्यात एकूण 9 लाख 84 हजार 764 मतदार असून यामध्ये पुरुष 5 लक्ष 10 हजार 393 तर महिला 4 लाख 74 हजार 361 तर तृतीयपंथी 10 मतदाराचा समावेश आहे. 1 हजार 15 मतदान केंद्र; 1 संवेदनशील जिल्ह्यामध्ये मतदान केंद्राची संख्या एकूण 1 हजार 15 आहे तर 681 मतदान केंद्रांची ठिकाणे आहेत. यामध्ये शहरी मतदान केंद्र 78 व ग्रामीण 603 केंद्र आहेत. जिल्ह्यामध्ये 100 टक्के मतदान अधिकारी महिला असलेले, 100 टक्के मतदान अधिकारी दिव्यांग असलेले, तर 100 टक्के मतदान अधिकारी युवा असलेले मतदान केंद्र प्रत्येकी 3 आहेत. याशिवाय जिल्ह्यात 1 संवेदनशील मतदान केंद्रही आहेत. यामध्ये 92-वसमत मधील किन्होळा मतदान केंद्राचा समावेश आहे. जिल्ह्यात सर्वच मतदान केंद्रांवर चोख सुरक्षा यंत्रणा तैनात राहणार आहे. जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी उद्यापासूनच पोलीस दल कार्यरत होणार आहे. जिल्ह्यातील निवडणुका शांततेत व सुखद अनुभवाच्या ठराव्यात यासाठी प्रशिक्षित सुरक्षा यंत्रणा तैनात केली आहे. जिल्हा प्रशासनाने या संदर्भात आधीच नियोजन केल्यामुळे कर्मचाऱ्यांची तरतूद मुबलक प्रमाणात करण्यात आली आहे. बुथ व्यवस्थापन महत्त्वाचे यासोबतच राजकीय पक्षांनी निवडणूक बूथ कुठे उभारावे, बुथवर कशी व्यवस्था असावी, त्या ठिकाणचे बॅनर बैठक व्यवस्था व गर्दीचे व्यवस्थापन या संदर्भातील निर्बंध जारी करण्यात आले आहे. मतदान केंद्राजवळ शस्त्र बाळगणे किंवा शस्त्र प्रदर्शन करणे प्रतिबंधित आहे. कडेकोट बंदोबस्त जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांच्या मार्गदर्शनात जिल्ह्यात चोख बंदोबस्त करण्यात येत आहे. केंद्रीय राखीव दलाच्या पोलीस पथकांसह ठिकठिकाणी पोलीस पथके बंदोबस्तासाठी तैनात करण्यात आली आहेत. निवडणूक केंद्रावरही कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे. राजकीय नेत्यांच्या उपस्थितीवर निर्बंध प्रचाराचा कालावधी संपल्यामुळे 48 तासापूर्वी मतदारसंघाबाहेरील राजकीय नेते, कार्यकर्ते यांनी मतदारसंघ सोडावा, असे आवाहन करण्यात आले आहे. प्रचार कालावधी संपल्यामुळे या जिल्ह्याचे, मतदार संघाचे मतदार नसलेले, राजकीय कार्यकर्ते पक्षाचे कार्यकर्ते, निवडणुकीतील कार्यकर्ते, मोहिमेचे कार्यकर्ते यांची उपस्थिती प्रतिबंधित करण्यात आली आहे. मोबाईल वापरावर बंदी मतदारांसाठी महत्त्वपूर्ण सूचनेद्वारे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की, आयोगाने ज्यांना अधिकार दिले आहे त्यांच्या व्यतिरिक्त इतर कोणत्याही व्यक्तीला मतदान केंद्राच्या शंभर मीटर परिघात, मतदान केंद्रात शेजारील परिसरात आणि मतदान केंद्रामध्ये मोबाईल वापरण्यास बंदी करण्यात आली आहे. उमेदवार, त्यांचे प्रतिनिधी, पोलिंग एजंट, मतदार तसेच माध्यम प्रतिनिधींनी देखील याची नोंद घ्यावी. कोणालाही मोबाईल घेऊन मतदान केंद्रात प्रवेश नाही, असे प्रशासनाने स्पष्ट केले आहे. सार्वजनिक सुटी किंवा दोन तासाची सवलत 20 नोव्हेंबर रोजी मतदान होत असून या दिवशी केवळ मतदानासाठी सार्वजनिक सुटी जाहीर करण्यात आली आहे. ज्या अत्यावश्यक व खाजगी आस्थापना दुकाने, रेस्टॉरंट या काळात सुरू असतील त्या ठिकाणाच्या सर्व व्यवस्थापनांनी कर्मचाऱ्यांना किमान दोन तासाची सुटी द्यावी, असे आदेश कामगार आयुक्त मार्फत जारी करण्यात आले आहे. 48 तास मद्य विक्री बंद कायदा सुव्यवस्थेसाठी सोमवारच्या सायंकाळी सहा वाजतापासून मतदान पूर्ण होईपर्यंत 48 तास मद्य विक्री बंद करण्यात आली आहे. रेडिओ संदेश बल्क एसएमएस, सोशल मिडीया प्रसिद्धीस बंदी 48 तासाच्या शांतता काळामध्ये आकाशवाणी, सोशल मीडियावरील व खाजगी चॅनलवरील निवडणूक विषयीच्या बाबीचे प्रसारण बंद करण्याचे निर्देशही जिल्हा प्रशासनाने दिले आहेत. तसेच मोबाईल वरील बल्क एसएमएस सेवाही या काळात बंद ठेवण्याचे निर्देशित करण्यात आले आहे. पुढील बाबींवर प्रतिबंध असणार नाही घरोघरी प्रचार करता येईल तथापि ही संख्या पाच पेक्षा जास्त नसावी. रुग्णालयाच्या गाड्या, ॲब्युलन्स, दुधगाड्या, पाण्याचे टँकर, विद्युत विभाग, पोलीस निवडणूक कर्मचाऱ्यांचे व निवडणूक कर्मचाऱ्यांचे वाहन, विहित मार्गाने जाणाऱ्या बसगाड्या, शाळेला जाणारी वाहने यावर बंदी असणार नाही. ******

एसएसटी पथकाकडून 90 लाखांची रोकड जप्त

हिंगोली (जिमाका), दि. 17 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार आहे. 92-वसमत विधानसभा मतदार संघासाठी स्थिर निगराणी (एसएसटी) पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. वसमत तालुक्यातील चिखली फाटा येथे नियुक्त केलेल्या या पथकाने आज दि. 17 नोव्हेंबर, 2024 रोजी सकाळी 8.15 वाजता मुंबईवरुन नांदेडकडे जाणारी ट्रॅव्हल्स बस क्रमांक एमएच-23 एयु-7703 या वाहनाची तपासणी केली. एसएसटी पथक व पोलीस विभागाच्या या संयुक्त तपासणीमध्ये सदर वाहनातून 89 लाख 78 हजार 500 रुपयाची रक्कम जप्त करण्यात आली आहे. जप्त करण्यात आलेली रक्कम उपकोषागार कार्यालय वसमत येथे जमा करण्यात आली आहे. याबाबतची पुढील कायदेशीर कार्यवाही अनुसरण्यात येत आहे. या कार्यवाहीमध्ये नोडल अधिकारी जी. बी. पवार, हट्टा पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक जाधव हे होते. ही कार्यवाही जिल्हाधिकारी अभिनव गोयल, पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, 92-वसमत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी शारदा दळवी, आचारसंहिता प्रमुख सुनिल अंभोरे यांच्या मार्गदर्शनाखाली एसएसटी पथकाकडून करण्यात आली असल्याची माहिती 92-वसमत विधानसभा मतदार संघाचे निवडणूक निर्णय अधिकारी विकास माने यांनी दिली आहे. ******

मतदारांनो, मतदानासाठी हे 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य

हिंगोली (जिमाका), दि. 17 : येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये दि. 20 नोव्हेंबर रोजी मतदान करण्यासाठी भारत निवडणूक आयोगाने ईपीक म्हणजेच मतदार फोटो ओळखपत्र आणि इतर 12 ओळखीचे पुरावे ग्राह्य धरले आहेत. यापैकी कोणताही एक ओळखीचा पुरावा मतदार केंद्रावरील अधिकाऱ्यांना दाखविल्यानंतर मतदारांना मतदान करता येणार आहे. भारत निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता छायाचित्रासह मतदार ओळखपत्र म्हणजेच ईपीक देण्यात आले आहे. ते मतदार मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. परंतु मतदारांकडे छायाचित्रासह मतदार ओळखपत्र नसल्यास अशा मतदारांना त्यांची ओळख पटविण्यासाठी मतदार ओळखपत्राच्या व्यतिरिक्त इतर 12 पुराव्यापैकी कोणताही एक पुरावा ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मतदारांना मतदानाचा हक्क बजावता यावा, यासाठी स्वत:ची ओळख पटविण्यासाठी पुराव्यांमध्ये आधारकार्ड, मनरेगा जॉब कार्ड, बँक किंवा पोस्ट ऑफिसने जारी केलेले छायाचित्र असलेले पासबुक, कामगार मंत्रालयाच्या योजनेंतर्गत जारी केलेले आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, वाहन चालक परवाना, पॅन कार्ड, रजिस्टार जनरल ऑफ इंडिया यांच्याद्वारे नॅशनल पॉप्युलेशन रजिस्टर अंतर्गत निर्गमित स्मार्ट कार्ड, भारतीय पासपोर्ट, छायाचित्रासह पेन्शन दस्तऐवज, केंद्र, राज्य सरकार, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपनी यांनी कर्मचाऱ्यांना जारी केलेले सेवा ओळखपत्र, खासदार, आमदारांना जारी करण्यात आलेले अधिकृत ओळखपत्र, भारत सरकारच्या सामाजिक न्याय व सशक्तीकरण मंत्रालयाने जारी केलेले दिव्यांग प्रमाणपत्र असे 12 कागदपत्रे पुरावा म्हणून ग्राह्य धरण्यात येणार आहेत. मतदारांना छायाचित्रासह मतदार ओळखपत्र देण्यात आलेले आहेत, ते मतदान केंद्रावर त्यांची ओळख पटविण्यासाठी छायाचित्रासह मतदार ओळखपत्र सादर करतील. ईपीक सादर करणे शक्य नसल्यास इतर 12 प्रकारच्या ओळखपत्रांपैकी कोणत्याही एका ओळखपत्राचा उपयोग करून मतदानाचा हक्क बजावावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. ******

जिल्ह्यात 93 टक्के ओळखचिठ्ठयाचे वाटप पूर्ण -जिल्हाधिकारी अभिनव गोयल

• आतापर्यंत 9 लक्ष 12 हजार मतदारांना झाले वाटप हिंगोली (जिमाका), दि. 17 : महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 ची जिल्हा निवडणूक प्रशासनाची प्रक्रिया अंतिम टप्प्यात पोहोचली असून, उद्या सोमवार, (दि.18) रोजी सायंकाळी 5 वाजता प्रचार थांबणार आहे. जिल्ह्यातील तीनही विधानसभा मतदार संघात प्रत्येक मतदाराला मतदार चिट्ठी (पोलचीट) पोहचवण्याची जबाबदारी 1 हजार 15 मतदान केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांवर (बीएलओ) सोपविण्यात आली आहे. आतापर्यंत जिल्ह्यात 9 लक्ष 12 हजार 811 ओळखचिठ्ठयांचे वाटप झाले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. 92- वसमत विधानसभा मतदार संघात 327, 93- कळमनुरी विधानसभा मतदारसंघात 345 आणि 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघासाठी 343 केंद्रस्तरीय अधिकाऱ्यांच्या (बीएलओ) माध्यमातून या ओळखचिठ्ठ्यांचे वाटप करण्यात येत आहे. जिल्ह्यातील तीन विधानसभा मतदारसंघात 9 लक्ष 84 हजार 764 मतदारांपैकी 9 लक्ष 12 हजार 811 ओळखचिठ्ठ्यांचे वितरण करण्यात आले आहे. त्यामध्ये 92-वसमत विधानसभा मतदारसंघातील 3 लक्ष 20 हजार 765 मतदारांपैकी 2 लक्ष 97 हजार 712 ओळखचिठ्ठ्या वितरीत करण्यात आल्या आहेत. 93- कळमनुरी 3 लक्ष 30 हजार 686 मतदारांपैकी 3 लक्ष 6 हजार 449 तर 94 -हिंगोली विधानसभा मतदारसंघातील 3 लक्ष 33 हजार 313 मतदारांपैकी 3 लक्ष 8 हजार 650 जणांपर्यंत ओळखचिठ्ठ्यांचे वाटप करण्यात आले आहे. ओळखचिठ्ठ्या वाटपाची एकूण टक्केवारी 92.69 अशी आहे. तसेच हिंगोली जिल्ह्यातील सर्व विधानसभा मतदारसंघात 2 लक्ष 77 हजार 988 मतदार मार्गदर्शिका पुस्तिका (92.66%) वितरीत करण्यात आल्या असून, उर्वरीत ओळखचिठ्ठ्या वाटपाची प्रक्रिया सुरु असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. निवडणुकीची आदर्श आचारसंहिता लागू झाल्यापासून निवडणूक पारदर्शक पध्दतीने पार पडावी, यासाठी जिल्हा निवडणूक प्रशासनाकडून योग्य ती खबरदारी घेण्यात येत आहे. निवडणूकविषयक बैठका, प्रशिक्षण तसेच इतर कामे करण्यासाठी विविध कार्यालयांतील अधिकारी व कर्मचाऱ्यांवर जबाबदारी सोपविण्यात आली आहे. आचारसंहितेची कडक अंमलबजावणी करण्यासाठी विविध पथके २४ तास कार्यरत आहेत. तसेच महामार्ग वाहनाची कसून तपासणी केली जात आहे. राजकीय पक्ष व उमेदवारांकडून बैठका, जाहीर सभा, कॉर्नर सभा आयोजित करताना आदर्श आचारसंहितेची अंमलबजावणी व्हावी, यासाठी प्रशासन २४ तास नजर ठेवून असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. *****

निवडणूक खर्चाची तृतीय लेखे तपासणी आज, उमेदवारांनी खर्चाच्या तपासणीसाठी उपस्थित राहण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि 17 : हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली विधानसभा मतदारसंघातून विधानसभा सार्वत्रिक निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांची निवडणूक खर्च निरीक्षक अर्जुन प्रधान यांच्या उपस्थितीत तृतीय निवडणूक खर्च लेखे तपासणी उद्या सोमवार, दि. 18 नोव्हेंबर रोजी नियोजन सभागृह, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे सकाळी 10 वाजता होणार आहे. हिंगोली जिल्ह्यातील 92-वसमत, 93-कळमनुरी व 94-हिंगोली या तिन्ही विधानसभा मतदार संघातील अंतिम झालेले सर्व उमेदवार अथवा त्यांच्या अधिकृत खर्च प्रतिनिधींनी उद्या मंगळवार रोजी द्वितीय लेखे तपासणीसाठी खर्चाच्या दैनंदिन हिशोबाची नोंदवही व खर्चाच्या प्रमाणकासह प्रत्यक्ष उपस्थित राहून ही तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक खर्च नियंत्रण समितीचे नोडल अधिकारी दिगंबर माडे यांनी खर्च सनियंत्रण कक्षातर्फे केले आहे. या लेखे तपासणीसाठी अनुपस्थित राहणाऱ्याविरुद्ध निवडणूक आयोगामार्फत लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 मधील बाब क्र. 77 (1) मधील तरतुदीनुसार कार्यवाही करण्यात येईल, असे प्रसिद्धीपत्रकाद्वारे निवडणूक खर्च सनियंत्रण कक्षातर्फे कळविण्यात आले आहे. *******

16 November, 2024

राजकीय जाहिरातीच्या पूर्व प्रमाणिकरणासाठी आज शेवटचा दिवस !

• मंगळवार, बुधवारच्या जाहिरातींसाठी दोन दिवस आधी अर्ज करा • शेवटच्या 48 तासात फक्त मुद्रित माध्यमात जाहिरात देता येईल • शेवटच्या 48 तासात इलेक्ट्रॉनिक्स, सोशल मिडियावर प्रसिध्दीस निर्बंध हिंगोली (जिमाका), दि. 16 : विधानसभा निवडणुकीत कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा इतर संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या मतदानाच्या एक दिवस आधी मंगळवार (दि.19) व मतदानाच्या दिवशी बुधवार (दि. 20) रोजी मुद्रित माध्यमामध्ये प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिरातीसाठी आज शनिवार (दि. 16) व उद्या रविवार (दि.17) रोजी राज्य, जिल्हा स्तरावरील माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करुन घेणे आवश्यक असून उद्या रविवार (दि.17) हा जाहिरात प्रमाणिकरण करुन घेण्यासाठी शेवटचा दिवस असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या आदर्श आचारसंहितेचे पालन करताना भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुका-2024 मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी मुद्रित माध्यमातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना उक्त कालावधीत प्रिंट मीडियामध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास अर्जदारांनी सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी जिल्हा माध्यम व प्रमाणिकरण संनियंत्रण समिती (एमसीएमसी)कडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. तसेच सोशल मीडिया, यू- ट्यूबर्स यांना प्रचाराच्या दिवसापासून मतदानापर्यंतच्या सर्व जाहिराती, मुलाखती आदींच्या प्रसारणासाठी प्रत्येक बाबींचे प्रमाणिकरण बंधनकारक आहे. जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार 19 व 20 नोव्हेंबरला वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती पूर्वप्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. पूर्व-प्रमाणिकरणासाठी समितीकडे दोन दिवस आधी अर्ज सादर करावा लागतो. प्रमाणिकरणाचे अर्ज मिडिया कक्ष, तसेच जिल्हा माहिती कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करू नये, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे. सोशल मीडिया व यू-टयूबर्सना शेवटच्या 48 तासात प्रचार प्रसारास बंदी आहे. 48 तासापूर्वी दर दिवशी प्रमाणिकरण बंधनकारक आहे. उमेदवारांची जाहिरात, मुलाखत तसेच निवडणूकसंदर्भातील कुण्या एका उमेदवारांबाबत विश्लेषण, त्यांची विधाने, चलचित्र आदींसाठी सोशल मीडिया, यू-ट्यूबर्स आदींना प्रत्येक बाबींचे दरदिवशी प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. वृत्तपत्रात प्रकाशित जाहिरातींसह अन्य बाबीदेखील अपलोड करण्यासाठी त्यांना परवानगी अर्थात प्रमाणिकरण करावे लागणार आहे. इलेक्ट्रॉनिक्स माध्यमांप्रमाणेच मुद्रित माध्यमांमध्ये जाहिरात देताना जाहिरात संहितेचे पालन करण्यात यावे. कोणते महापुरुषांचे फोटो जाहिरातींमध्ये वापरू नये, तसेच आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही याचीही काळजी घ्यावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. शेवटच्या 48 तासात अन्य कोणत्याही माध्यमांना जाहिराती देता येणार नाही. केवळ मुद्रित माध्यमांना ही परवानगी आहे, याचीही नोंद घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. *******

हिंगोली विधानसभा मतदारसंघातील मतदान अधिकारी, कर्मऱ्यांना प्रशिक्षण

हिंगोली (जिमाका), दि. 16 : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी दि. 20 नोव्हेंबर, 2024 रोजी मतदान होणार आहे. 94-हिंगोली विधानसभा मतदार संघातील मतदानासाठी मतदान केंद्रावरील मतदान साहित्य वाटप, स्वीकृती करणे तसेच या कामाची सचोटी, कर्तव्य पारदर्शक व निःपक्षपातीपणे व बिनचूक पार पाडण्यासाठी मतदान अधिकारी, कर्मचारी यांचे प्रशिक्षण आज येथील शिवाजीराव देशमुख सभागृहात आयोजित करण्यात आले होते. या प्रशिक्षणामध्ये निवडणुक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार श्रीकांत भुजबळ, सखाराम मांडवगडे यांनी उपस्थित अधिकारी व कर्मचारी यांना सादरीकरणाद्वारे मार्गदर्शन केले आहे. या प्रशिक्षणास मतदान अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. *******

15 November, 2024

निवडणूक निकालाचे अंदाज प्रसारित करण्यास प्रसारमाध्यमांना प्रतिबंध

हिंगोली, (जिमाका) दि. 15 : भारत निवडणूक आयोगाने विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 च्या अनुषंगाने निवडणूक निकालाचे अंदाज (Exit Poll) दि. 13 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 7 वाजेपासून ते दि. 20 नोव्हेंबर 2024 सायंकाळी 6 वाजेपर्यंत प्रसारमाध्यमांवर प्रसारित करण्यास प्रतिबंध केल्याचे कळविले आहे. सर्व प्रसारमाध्यमांनी (प्रिंट मीडिया/ इलेक्ट्रॉनिक मीडिया/ सोशल मीडिया इत्यादी) या अधिसूचनेचे पालन करण्याचे आवाहन जिल्हा निवडणूक प्रशासनाने केले आहे. ******

उमेदवारांनो, राजकीय जाहिरातीच्या पूर्व प्रमाणिकरणासाठी आज व उद्याचीच मुदत ! • मंगळवार, बुधवारच्या जाहिरातींसाठी दोन दिवस आधी अर्ज करा

हिंगोली (जिमाका), दि. 15 : विधानसभा निवडणुकीत कोणताही राजकीय पक्ष किंवा उमेदवार किंवा इतर संस्था किंवा व्यक्ती यांनी महाराष्ट्र विधानसभा सार्वत्रिक निवडणुका 2024 च्या मतदानाच्या एक दिवस आधी मंगळवार (दि.19) व मतदानाच्या दिवशी बुधवार (दि. 20) रोजी मुद्रित माध्यमामध्ये प्रकाशित करावयाच्या राजकीय जाहिरातीसाठी शनिवार (दि.16) व रविवार (दि.17) रोजी राज्य, जिल्हा स्तरावरील माध्यम प्रमाणिकरण व सनियंत्रण समितीकडून (एमसीएमसी) पूर्व प्रमाणित करुन घेणे आवश्यक असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 च्या आदर्श आचारसंहितेचे पालन करताना भारत निवडणूक आयोगाने महाराष्ट्र सार्वत्रिक निवडणुका-2024 मतदानाच्या दिवशी व मतदानाच्या एक दिवसापूर्वी मुद्रित माध्यमातून कोणत्याही भडकाऊ, दिशाभूल करणाऱ्या किंवा द्वेषपूर्ण जाहिरातींमुळे कोणतीही अप्रिय घटना घडू नये, ज्यामुळे निवडणूक प्रक्रियेला खीळ बसेल, अशा जाहिराती प्रकाशित होऊ नये याबाबत दक्षता घेण्याचे निर्देश दिले आहेत. तसेच राजकीय पक्ष किंवा निवडणूक उमेदवार किंवा इतर कोणतीही संस्था किंवा व्यक्ती यांना उक्त कालावधीत प्रिंट मीडियामध्ये राजकीय जाहिरात द्यावयाची झाल्यास अर्जदारांनी सदर जाहिरात प्रकाशित करण्याच्या प्रस्तावित तारखेच्या दोन दिवस आधी जिल्हा माध्यम व प्रमाणिकरण संनियंत्रण समिती (एमसीएमसी)कडे अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. तसेच सोशल मीडिया, यू- ट्यूबर्स यांना प्रचाराच्या दिवसापासून मतदानापर्यंतच्या सर्व जाहिराती, मुलाखती आदींच्या प्रसारणासाठी प्रत्येक बाबींचे प्रमाणिकरण बंधनकारक आहे. जिल्ह्यात 20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. त्यानुसार 19 व 20 नोव्हेंबरला वृत्तपत्रांत प्रसिद्ध होणाऱ्या जाहिराती पूर्वप्रमाणित करून घ्याव्या लागणार आहेत. पूर्व-प्रमाणिकरणासाठी समितीकडे दोन दिवस आधी अर्ज सादर करावा लागतो. प्रमाणिकरणाचे अर्ज एक खिडकी कक्ष, तसेच जिल्हा माहिती कार्यालयात उपलब्ध करून देण्यात आले आहेत. पूर्व प्रमाणित केल्याशिवाय कोणतीही जाहिरात मुद्रित माध्यमांमध्ये प्रकाशित करू नये, असे निर्देश भारत निवडणूक आयोगाने दिले असल्याचे जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले आहे. सोशल मीडिया व यू-ट्यूबर्सना दर दिवशी प्रमाणिकरण बंधनकारक उमेदवारांची जाहिरात, मुलाखत तसेच निवडणूकसंदर्भातील कुण्या एका उमेदवारांबाबत विश्लेषण, त्यांची विधाने, चलचित्र आदींसाठी सोशल मीडिया, यू-ट्यूबर्स आदींना प्रत्येक बाबींचे दरदिवशी प्रमाणिकरण करणे बंधनकारक आहे. वृत्तपत्रात प्रकाशित जाहिरातींसह अन्य बाबीदेखील अपलोड करण्यासाठी त्यांना परवानगी अर्थात प्रमाणिकरण करावे लागणार आहे. *******

14 November, 2024

मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी विशेष प्रयत्न करा - विभागीय आयुक्त दिलीप गावडे

• विधानसभा निवडणूक तयारीचा आढावा • सर्वांनी योग्य समन्वयातून जबाबदारी पार पाडा • मतदार जागृतीसाठी विविध उपक्रम राबविण्याच्या सूचना हिंगोली, (जिमाका) दि. 14 : विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रक्रिया पारदर्शकपणे पार पाडण्यासाठी निवडणूक प्रक्रियेतील प्रत्येक अधिकारी, कर्मचारी यांनी काळजीपूर्वकपणे काम करावे. जिल्ह्यात येत्या विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीत मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी निवडणूक यंत्रणेने विशेष प्रयत्न करण्याच्या सूचना छत्रपती संभाजीनगरचे विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज येथे दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आयोजित विधानसभा निवडणूक तयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल, मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती नेहा भोसले, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यु बोधवड, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, उपजिल्हाधिकारी श्रीमती मंजुषा मुथा यांच्यासह नोडल अधिकारी यावेळी उपस्थित होते. लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीतील मतदानाची कमी टक्केवारी पाहता बुधवारी होणाऱ्या निवडणुकीत त्यात वाढ करण्याबाबतच्या सूचना देताना, मतदारांना मतदान केंद्राच्या ठिकाणी जास्त वेळ वाट पाहण्याची आवश्यकता पडणार नाही. त्यांना काही मोजक्या मतदारांना एकत्र मतदान केंद्रांमध्ये पाठविण्याबाबतची सुविधा देता येईल, यादृष्टीने नियोजन करण्याबाबतच्या सूचना दिल्या. मतदानाची टक्केवारी वाढविण्याकामी मतदार जनजागृतीवर विशेष भर देण्याचे निर्देशही विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी दिले. टपाली मतपत्रिकांची देवाण-घेवाण करताना आवश्यक मनुष्यबळासह यावे. डिस्पँच सेंटर, रिसिप्ट, ट्रेनिंग आणि स्ट्रॉंगरूमची तयारी झाल्याबाबत माहितीही त्यांनी जाणून घेतली. स्वीपच्या माध्यमातून मतदार जनजागृतीपर विविध उपक्रम राबविण्यात यावेत. मतदानाच्या दिवशी व्होटर टर्नआऊट अँपवर मतदानाच्या टक्केवारीची तात्काळ माहिती भरावी, त्यासाठी आवश्यक ती खबरदारी घेण्याचे निर्देश विभागीय आयुक्त श्री. गावडे यांनी दिले. तसेच आदर्श आचारसंहिता, कायदा व सुव्यवस्था अबाधित ठेवणे, प्रसारमाध्यमांमध्ये पेड न्यूज येणार नाहीत, याबाबतची खबरदारी घेण्यासोबतच समाजमाध्यमांवर विशेष लक्ष देण्याचे निर्देश त्यांनी दिले. निवडणूक प्रचारात, तसेच मतदानाचा जाहीर प्रचार संपल्यानंतर कोणत्याही प्रकारे आदर्श आचारसंहितेचा भंग होणार नाही, याची दक्षता घ्यावी. मतदान प्रक्रिया भयमुक्त वातावरणात पार पाडण्यासाठी, तसेच मद्य, पैसे याचे वाटप होवू नये, यासाठी पोलीस प्रशासन, राज्य उत्पादन शुल्क विभागाने विशेष मोहीम हाती घ्यावी. भरारी पथके, स्थिर निगराणी पथकांच्या माध्यमातून मोहीम स्वरुपात तपासणी करून आदर्श आचारसंहितेचे पालन काटेकोरपणे होईल, याकडे विशेष लक्ष देण्याच्या सूचनाही विभागीय आयुक्त यांनी केल्या. मतदार जागृतीसाठी जिल्हा निवडणूक यंत्रणेकडून राबविण्यात आलेल्या उपक्रमाचे त्यांनी कौतुक केले. नवमतदार तसेच महिला यांच्यामध्ये जागृती करून त्यांना मतदान करण्याचे आवाहन करण्यात येत आहे. तसेच सर्व शासकीय अधिकारी, कर्मचारी यांचे 100 टक्के मतदान होण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत, असे जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी सांगितले. लोकसभेतील राज्याच्या सरासरीपेक्षा कमी मतदान झालेल्या मतदान केंद्रांवर विशेष लक्ष केंद्रित करण्यात आले असून, अशा मतदान केंद्रावर विशेष पथके नेमून मतदार जागृती केली जात असल्याचे त्यांनी सांगितले. जिल्ह्यात ठिकठिकाणी आंतरजिल्हा तपासणी नाके उभारून वाहनांची तपासणी केली जात आहे. यासोबतच पोलीस दलामार्फत अचानक तपासणी मोहीम राबवून गुन्हेगारी पार्श्वभूमी असलेल्या व्यक्तींची तपासणी केली जात आहे. कळमनुरी विधानसभा मतदारसंघात आचारसंहिता भंगाच्या वाढत्या तक्रारी लक्षात घेता विशेष पथके तैनात करण्यात आली आहेत. यासोबतच अवैध मद्यसाठे, पैसा जप्त करण्यासाठीही शोध मोहीम राबविण्यात आली आहे. पिस्तुलसह विविध शस्त्रे तपासणी मोहिमेमध्ये जप्त करण्यात आली आहेत. यासोबतच मतदान कक्ष, मतदान यंत्र सुरक्षा कक्ष आदी ठिकाणी चोख बंदोबस्त ठेवण्यात येणार असल्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे यांनी सांगितले. यावेळी उपस्थित पथक प्रमुखांनी त्यांच्या कामकाजाबाबतची माहिती विभागीय आयुक्तांना दिली. *****

माजी प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन

हिंगोली (जिमाका), दि. 14 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात पंडित जवाहरलाल नेहरु यांची जयंती साजरी करण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी पंडित जवाहरलाल नेहरु यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. यावेळी उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) मंजुषा मुथा, नायब तहसीलदार सचिन जोशी, संतोष बोथीकर यांच्यासह प्रशासकीय इमारतीमधील सर्व अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. *****

‘स्वाधार’च्या अर्ज नूतनीकरणासाठी 30 नोव्हेंबरपर्यंत मुदत • पोर्टलवर ऑनलाईन अर्ज भरणे बंधनकारक

हिंगोली, (जिमाका) दि.14: भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेचे 2024-25 मधील नवीन व नूतनीकरणाचे अर्ज www.hmas.mahait.org या पोर्टलवर भरणे आवश्यक आहे. नूतनीकरणाचा अर्ज भरताना विद्यार्थ्यांनी न्यू ऐवजी एक्झिस्टींग या टॅबवर क्लिक करून स्वाधार सर्व्हिस हा पर्याय निवडावा व इयत्ता 11 वी, प्रथम वर्षासाठी अर्ज करणाऱ्या विद्यार्थ्यांनी न्यू टॅबवर क्लिक करून स्वाधार पर्याय निवड करून अर्ज करणे आवश्यक आहे. सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौद्ध घटकांतील शासकीय वसतिगृहासाठी पात्र परंतु जागेअभावी वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार योजना राबविण्यात येत आहे. सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात शासकीय वसतिगृहात प्रवेश न झालेल्या विद्यार्थ्यांसाठी स्वाधार लाभ घेण्यासाठी नवीन पोर्टल विकसित करण्यात आले आहे. या पोर्टलवर विद्यार्थ्यांनी कागदपत्रे अपलोड करावीत. ज्या विद्यार्थ्यांनी मागील वर्षी स्वाधार योजनेचा ऑफलाईन अर्ज समाज कल्याण कार्यालयात भरलेला आहे, असे विद्यार्थी 2024-25 या कालावधीत नूतनीकरणासाठी पात्र होतात. त्यासाठी पोर्टलवर एक्झिस्टींग स्वाधार सर्व्हिस असा टॅब उपलब्ध करून देण्यात आला आहे. मागील वर्षी प्रवेशित तसेच चालू वर्षात प्रवेशित नवीन व नूतनीकरणास पात्र विद्यार्थ्यांनी www.hmas.mahait.org या पोर्टलवर स्वाधार योजनेचा अर्ज दि. 30 नोव्हेंबर, 2024 पर्यंत ऑनलाईन अर्ज आवश्यक कागदपत्रांसह सादर करावी. तसेच ऑनलाईन अर्जाची प्रिंट आवश्यक कागदपत्रासह सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांच्या कार्यालयात जमा करण्याचे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. ******

विधानसभा सार्वत्रिक निवडणुका-2024 दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी ‘सक्षम ॲप’

हिंगोली (जिमाका), दि. 14 : आगामी विधानसभा निवडणुकीत दिव्यांग आणि ज्येष्ठ मतदारांना सुलभ रीतीने मतदान करण्यास मदत व्हावी, यासाठी निवडणूक आयोगाने सक्षम नावाचे मोबाईल ॲप तयार केले आहे. या ॲपवर दिव्यांग व ज्येष्ठ मतदारांसाठी मूलभूत सुविधा उपलब्ध करून दिले आहे. या सुविधेचा सर्व दिव्यांग मतदारांनी आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून मतदारांसाठी दिलेल्या सोयी सुविधा प्राप्त करून घ्याव्यात, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. दिव्यांग मतदारांकरिता आयोगाने तयार केलेले सक्षम ॲपवर विविध सोयी सुविधा देण्यात येत आहेत. या सुविधेचा लाभ घेण्यासाठी सर्वप्रथम प्रत्येक दिव्यांग मतदाराने सक्षम ॲप आपल्या मोबाईलमध्ये डाऊनलोड करून घ्यावे. निवडणूकसंदर्भात सेवा घेण्यासाठी दिव्यांग व वयोवृद्ध मतदारांना त्यांचे नाव पत्ता आणि मोबाईल क्रमांक इत्यादी माहिती ॲपमध्ये भरावी. दिव्यांग, वयोवृद्ध मतदारांना या सक्षम ॲपद्वारे मतदानासाठी लागणाऱ्या सहायतेची मागणी नोंदविता येईल. त्याद्वारे मतदार संघातील दिव्यांग वयोवृद्ध मतदानाचे मतदार संघ व स्थाननिश्चिती यंत्रणेला करणे शक्य होईल. ॲपद्वारे नोंदणी झाल्यानंतर या मतदारांना ने-आण करण्यासाठी वाहतूक व्यवस्था, व्हील चेअर, सहाय्यक मदतनीस इत्यादी प्रकारची सुविधा या ॲपच्या माध्यमातून मिळवू शकतो. सक्षम ॲप अनेक वैशिष्ट्ये प्रदान करते. दृष्टीहीन असलेल्यांसाठी आवाज प्रदान करते. श्रवण अक्षम असलेल्यांसाठी ॲप-टेक्स्ट-टु-स्पीच प्रदान करते. ॲपमध्ये मोठे फॉन्ट आणि उच्च कॉन्ट्रास्ट रंग असल्यामुळे ते वापरण्यासाठी सोपे होते. ॲपमध्ये मतदान केंद्राबद्दल माहिती उपलब्ध असून त्यामध्ये मतदान केंद्राचे स्थान, मतदान केंद्र उपलब्ध प्रवेश योग्यता वैशिष्ट्ये आणि मतदान अधिकाऱ्यांच्या संपर्क तपशिलांचा समावेश आहे. दिव्यांग मतदाराला निवडणूक प्रक्रियेत सहभागी होतांना येणाऱ्या कोणत्याही समस्याबद्दल ॲपवर तक्रारी नोंदविता येतात. दिव्यांग मतदारांना निवडणूक प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी सक्षम ॲप हे महत्वाचे असून, वापरण्यास सोपा आहे. दिव्यांग मतदारांना मतदान करण्यासाठी नोंदणी करणे, त्यांचे मतदान केंद्र शोधणे आणि त्यांचे मत देणे सोपे होते. जिल्ह्यातील सर्व दिव्यांग मतदारांनी सक्षम ॲप डाऊनलोड करून विविध सुविधेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी अभिनव गोयल यांनी केले आहे. *******

मतदान केंद्रावरील सुविधा सुनिश्चित करा प्रशासनाच्या सर्व शाळा व आस्थापनांना सूचना

हिंगोली, (जिमाका) दि.14: शासकीय असो वा खासगी शाळा व अन्य कार्यालय मतदान केंद्रे निश्चित झालेल्या ठिकाणी मूलभूत सुविधा उपलब्ध करणे हे मुख्याध्यापक व संस्थाप्रमुखांची जबाबदारी आहे. 19 नोव्हेंबरला मतदान चमूच्या आगमनापासून तर 20 नोव्हेंबरला मतदान होईपर्यंत सर्व सुविधा निश्चित करण्यात याव्यात, असे निर्देश प्रशासनाच्यावतीने देण्यात आले आहेत. हिवाळ्याचे दिवस असल्यामुळे जिल्हाभरातील सर्व शाळा, महाविद्यालय, खासगी संस्थांमध्ये मतदान केंद्र निश्चित झाली आहेत. या ठिकाणी पायाभूत सुविधांसोबतच रात्रीची प्रकाश व्यवस्था सर्वात महत्त्वपूर्ण आहे. त्यामुळे पुरेशा दिवाबत्तीची व्यवस्था आहे, अथवा नाही याची खातरजमा करणे संस्थेच्याप्रमुखांची जबाबदारी असून, त्याबाबत अडचण येत असेल तर प्रशासनाशी चर्चा करावी, असेही स्पष्ट करण्यात आले आहे. सर्व संबंधितांनी शहरी व ग्रामीण भागातील मतदान केंद्रावर वीज, पाणी, रॅम्प, स्वच्छता गृहे आदी व्यवस्था तसेच मतदान केंद्राच्या मोडकळीस आलेल्या खिडक्या, दरवाजे दुरुस्त करुन घ्यावेत तसेच शाळेचा परिसर स्वच्छ करण्यात यावा, अशा सूचना केल्या आहेत. ******

प्रचारामध्ये महिलासंदर्भात आक्षेपार्ह टिप्पणी नको, बालकांचा वापर ही नको; जिल्हा प्रशासनाचे निर्देश

हिंगोली, (जिमाका) दि.14: भारत निवडणूक आयोगाने आचारसंहितेमध्ये स्पष्ट केल्याप्रमाणे निवडणूक प्रचारादरम्यान महिलांचा सन्मान राखला गेला पाहिजे. प्रचारादरम्यान महिलांसंदर्भात कोणतीही आक्षेपार्ह टिप्पणी करण्यात येऊ नये, तसेच मुलांचा वापर प्रचारामध्ये कुठेही होणार नाही. याची सर्व राजकीय पक्षानी तसेच उमेदवारांनी काळजी घ्यावी, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे. विधानसभा सार्वत्रिक निवडणूक प्रचाराच्या अंतिम टप्प्यात येत असून अशा वेळी प्रचारासंदर्भातील आदर्श आचारसंहितेचे पालन करणे अत्यावश्यक आहे. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज या संदर्भात प्रशासनातर्फे सर्व उमेदवारांना तसेच राजकीय पक्षांना याबाबत सूचना केली आहे. अनेक ठिकाणी प्रचारामध्ये शाळकरी मुलांचा किंवा लहान मुलांचा अनावधानाने वापर केला जातो मात्र हा आचारसंहितेचा भंग ठरतो. यासंदर्भात तक्रारी आल्यास त्यावर कारवाई केली जाते. त्यामुळे उमेदवारांनी आपल्या प्रचारामध्ये कुठेही लहान मुलांचा वापर होणार नाही, याची काळजी घ्यावी. उमेदवारांनी प्रचारादरम्यान आपली उपलब्धी आपले भविष्यातील नियोजन सांगताना कुठेही महिलांबाबत आपत्तीजनक टिप्पणी अजाणतेपणे का होईना सार्वजनिक होणार नाही, याची काळजी घ्यावी. महिलांसंदर्भातील अनावश्यक टिप्पणी, अनादर अपमानजनक शब्द, लज्जा निर्माण होईल असे शब्द वापरल्यास आचारसंहिता भंग केल्याचे गुन्हे दाखल करण्याचे निर्देश आयोगाने दिले आहे. त्यामुळे यासंदर्भात काळजी घ्यावी. असे आवाहनही त्यांनी केले आहे. *****