01 July, 2017

कृषि क्षेत्रातील वसंतराव नाईक यांचे योगदान अमुल्य
--- पालकमंत्री दिलीप कांबळे

हिंगोली,दि.1: माजी मुख्यमंत्री आणि हरित क्रांतीचे प्रणेते कै. वसंतराव नाईक हे दूरदृष्टी असलेले नेते होते. वसंतराव नाईक यांनी कोणताही स्वार्थ बाळगता शेती आणि शेतकऱ्यांसाठी दिलेल्या अमुल्य योगदानामुळे त्यांचे नाव राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आदराने घेतले जाते. त्यांनी कृषी विकासाकरीता केलेल्या महान कार्यामुळेच त्यांचा स्मृती दिन हा कृषि दिन म्हणून साजरा करण्यात येतो असे प्रतिपादन राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
जिल्हा परिषद येथील षटकोणी सभागृहात कृषि दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात पालकमंत्री दिलीप कांबळे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकूळे, आमदार डॉ. जयप्रकाश मुंदडा, नगर परिषदेच्या नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिपचे कृषि सभापती प्रल्हादराव राखोंडे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, जिल्हा परिषदेचे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी ए.एम.देशमुख, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी विजय लोखंडे, आत्माचे प्रकल्प संचालक बी.पी. लोंढे आणि कृषी विकास अधिकारी श्री. डूबल यांची प्रमुख उपस्थिती होती.  
यावेळी पालकमंत्री कांबळे म्हणाले की, राज्यातील अडचणीत असलेल्या शेतकऱ्यांना 34 हजार कोटी रुपयांची कर्जमाफी देण्याचा ऐतिहासिक निर्णय नुकताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केला. राज्याच्याच नव्हे तर देशाच्या इतिहासातील हा सर्वात मोठा निर्णय असून त्यामुळे राज्यातील सुमारे 89 लाख शेतकऱ्यांना फायदा होणार आहे. कर्जमाफी मुळे सुमारे 40 लाख शेतकऱ्यांचा सातबारा कोरा होणार असून जे शेतकरी नियमित कर्ज भरत आहेत त्यांच्या बँक खात्यात 25 टक्के प्रोत्साहनपर अनुदान जमा करण्यात येणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेच्या माध्यमातून राज्यातील शेतकऱ्यांना कर्जमाफीचा दिलासा मिळला आहे.
राज्य शासन सदैव शेतकऱ्यांच्या पाठीशी असून, शेतकरी बांधवांना सक्षम करण्यासाठी प्रयत्नशील आहे. शेती आणि शेतकरी बांधवासाठी राज्य शासनाने अनेक कल्याणकारी निर्णय देखील घेतले आहे. यात शेतमालाला चांगला भाव मिळण्यासाठी पिक क्षेत्रनिहाय कृषि प्रक्रिया उद्योगाची उभारणी, कृषी प्रक्रिया उद्योगासाठी 25 टक्के किंवा रुपये 50 


लाखापर्यंत अनुदान, हळद प्रक्रिया उद्योगासाठी रुपये 50 लाखापर्यंतची योजना, नांदेड येथे फळ प्रक्रिया केंद्र, जालन्यात सीड पार्क उभारण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच हवामानाच्या अचूक माहितीसाठी हवामान केंद्र, दूध उत्पादनाला चालना देण्यासाठी  राष्ट्रीय दूग्ध विकास मंडळाच्या माध्यमातून विदर्भ मराठवाड्यातील दूष्काळग्रस्त 11 जिल्ह्यातील 3 हजार गावामध्ये सुमारे 340 कोटीचे प्रकल्प, फलोत्पादन विकासातंर्गत सुमारे 17 हजार हेक्टर क्षेत्रावर फळबाग लागवड करण्यात आली. तसेच शेतकऱ्यांना अन्न सुरक्षा योजने अंतर्गत आत्महत्याग्रस्त  जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मागील दोन वर्षात 68 लाख शेतकऱ्यांना सुमारे 1400 कोटी रुपयांचे धान्य देण्यात आले आहे. तसेच दूष्काळग्रस्त भागातील शेतकऱ्यांच्या पाल्यांना शिक्षण शुल्क ही माफ करण्यात आले आहे.
कृषी विभागाच्या योजना आणि तंत्रज्ञान अधिकाधिक लोकाभिमुख होण्यासाठी शासन प्रयत्नशिल असून प्रधानमंत्री पीक विमा योजना, जलयुक्त शिवार अभियान, मागेल त्याला शेततळे, जमीन आरोग्य पत्रिका, स्व. गोपीनाथ मुंढे शेतकरी अपघात विमा योजना, एकात्मिक पाणलोट क्षेत्र विकास कार्यक्रम, बहुपीक पध्दती आदी कल्याणकारी योजना शेतकऱ्यांसाठी राबविण्यात येत आहे. सद्या बदलत असलेले ऋतुचक्र लक्षात घेता शेतकरी बांधवांनी कमी पाण्यावरील पिके घ्यावीत. तसेच आत्याआधुनिक तंत्रज्ञानाच्या साह्याने शेती करावी असे अवाहन ही पालकमंत्री कांबळे यांनी यावेळी केले.
यावेळी कृषि सभापती प्रल्हादराव राखोंडे, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, शिवाजीराव माने यांची ही समायोचित भाषणे झाली.
प्रारंभी सर्वप्रथम पालकमंत्री कांबळे यांच्या हस्ते प्रातिनिधीक स्वरुपात खत विक्रेत्यांना ई-पॉस मशीनचे वितरण करण्यात आले. तसेच औंढा तालूक्यातील तुर्क पिंपरी या गावाने जलयूक्त शिवार अभियान अंतर्गत उत्कृष्ट काम करुन सहभाग नोंदविल्या बद्दल पालकमंत्री कांबळे यांच्या हस्ते गावाचा सत्कार करण्यात आला.
यावेळी कार्यक्रमास शेतकरी बांधव, विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

**** 
पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ

  • जिल्ह्यात होणार 7 लाख 66 हजार वृक्षांची लागवड
                                             
हिंगोली,दि.1: राज्याचे सामाजिक न्याय आणि विशेष सहाय्य, मदत पुनर्वसन, भूकंप पुनर्वसन, अल्पसंख्याक विकास वक्फ राज्यमंत्री तथा हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते येथील स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता वन उद्यान, एस.आर.पी.एफ. कॅम्प येथे वृक्षारोपण करुन 4 कोटी वृक्ष लागवड उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला.  
यावेळी पालकमंत्री श्री. दिलीप कांबळे म्हणाले की, महाराष्ट्र शासनाने 2017 ते 2019 पर्यत या तीन वर्षांच्या कालावधीत वृक्ष लागवडीचा संकल्प केला आहे. सन 2017 मध्ये 4 कोटी वृक्ष लागवड करण्यात आली होती. यावर्षी 2018 मध्ये 13 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार असून, पुढील वर्षी 2019 मध्ये 33 कोटी वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. त्यामुळे तीन वर्षात एकूण 50 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प राज्यासाठी करण्यात आला आहे. यावर्षी राज्यात 4 कोटी वृक्ष लागवडीचा संकल्प असताना 1 ते 7 जूलै या कालावधीत जिल्ह्यात 7 लाख 66 हजार वृक्ष लागवड करण्यात येणार आहे. सदर वृक्ष लागवडीचे उद्दिष्टपूर्तीसाठी प्रशासनाने पुर्ण तयारी केली आहे. स्व. उत्तमराव पाटील जैव विविधता वन उद्यान, एस.आर.पी.एफ. कॅंम्प येथील परिसरात सुमारे दोन हजाराहून अधिक वृक्षांची लागवड करण्यात आली आहे. प्रत्येक नागरिकांनी किमान एक वृक्ष लावून त्याची निगा राखल्यास राज्यातील वृक्ष लागवडीखालील क्षेत्र वाढण्यास नक्कीच मदत होईल. लोकप्रतिनीधी यांच्यासह पदाधिकारी, महाविद्यालयीन-शालेय विद्यार्थी तसेच नागरिकांनी पुढील पिढीसाठी व निसर्गाचे समतोल राखण्यासाठी जास्तीत-जास्त वृक्ष लागवड करण्याचे आवाहन पालकमंत्री कांबळे यांनी यावेळी केले.
यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकूळे, डॉ. जयप्रकाश मुंदडा, रामराव वडकुते, नगर परिषदेचे नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एच.पी. तुम्मोड, अतिरिक्त जिल्हा पोलीस अधीक्षक सचिन गुंजाळ, राज्य राखीव पोलिस बलाचे प्रभारी समादेशक श्री. तडवी, सामाजिक वनीकरण विभागाचे वन उपसंचालक केशव वाबळे, यांच्यासह विविध विभाग प्रमुख आणि कर्मचारी यांची उपस्थिती होती.

*****


 
महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 45 मध्ये सुधारणा

हिंगोली, दि. 1 : महाराष्ट्र शासनाने दि. 01 एप्रिल, 2017 च्या शासन निर्णयाव्दारे असे आदेश निर्गमी केले आहेत की, शेत जमीनीची अकृषीक वापर करण्याकरिता सक्षम महसूल प्राधिकाऱ्याची मान्यता घेण्यात आली नसेल मात्र संबंधीत नियोजन प्राधिकरणाची किंवा बांधकामास मंजूरी देण्यासाठी सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याची मंजूरी घेण्यात आली असेल तर अशा प्रकरणात महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या कलम 45 प्रमाणे दंडाची आकारणी 40 पटी ऐवजी 20 पट करण्यात येईल असा निर्णय घेण्यात आला आहे.
त्याचप्रमाणे विशिष्ट प्रयोजनासाठी अकृषीक वापराकरिता सक्षम महसूल प्राधिकरणाकडून मंजूरी देण्यात आलेल्या वापरा व्यतिरिक्त इतर अकृषिक प्रयोजनाकरिता जमीनीचा अनाधिकृतरित्या वापर करण्यात येत असेल व अशा वापरासाठी सक्षम महसूल अधिकाऱ्याची परवानगी घेण्यात आली नसेल मात्र संबंधीत नियोजन प्राधिकाऱ्याची अथवा बांधकामास मंजूरी देण्यासाठी सक्षम असणाऱ्या प्राधिकाऱ्याची मजूरी घेण्यात आली असेल तर अशा प्रकरणातही वरीलप्रमाणे कलम 45 प्रमाणे 40 पट दंड आकारण्याऐवजी 20 पट दंड आकारून असा वापर नियमित केला जाऊ शकतो. ही सवलत केवळ 31 मार्च, 2018 पर्यंत लागू असणार आहे. त्यामुळे ज्या नागरिकांनी अकृषीक परवानगी शिवाय वापर सुरू केला असेल मात्र आवश्यक त्या बांधकाम परवानग्या घेतल्या असतील त्यांनी विनाविलंब आपल्या नजीकचे जिल्हाधिकारी कार्यालयात अथवा तहसील कार्यालयात संपर्क साधून वरील सुधारित धोरणानूसार वापर नियमीत करुन या निर्णयाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाच्या वतीने करण्यात येत आहे.

***** 
गोवंर्धन गोवंश सेवा केंद्रासाठी स्वयंसेवी संस्थेनी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली, दि. 1 : राज्यात दि. 04 मार्च, 2015 पासून महाराष्ट्र प्राणी रक्षण (सुधारणा) अधिनियम 1995 करण्यात आला आहे. परिणामी, कालांतराने शेती व दुध यासाठी अनुत्पादक असलेल्या गोवंशीय पशुधनाच्या संख्येत वाढ होणार आहे. त्या अनुषंगाने दि. 1 मार्च, 2016 रोजी गोवंर्धन गोवंश सेवा केंद्र सुरू करण्याची योजना आखली गेली आहे. गोरक्षणाचा अनुभव असलेल्या स्वयंसेवी संस्थामार्फत ही योजना राबविण्यात येईल. यासाठी अशा संस्थाना गोरक्षण गोवंश रक्षा केंद्र एक रकमी 1 कोटी रुपये अनुदान देण्यात येणार आहे.
गोवंर्धन गोवंश सेवा केंद्र स्थापन करण्यासाठी लाभार्थी निवडीचे निकष / अटी व शर्ती : सदरची संस्था धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणीकृत असावी, संस्थेस गोवंश संगोपनाचा कमीत-कमी 3 वर्षाचा अनुभव असावा, केंद्रावर असलेल्या पशुधनास आवश्यक असलेली वैरण / चारा उत्पादनासाठी तसेच पशुधन संगोपनासाठी संस्थेकडे स्वत:च्या मालकीची अथवा 30 वर्षाच्या भाडेपट्यावरची किमान 15 एकर जमीन असावी, संस्थेने या योजनेंतर्गत मागणी केलेल्या एकूण अनुदानाच्या कमीत कमी 10 टक्के एवढे खेळतं भाग - भांडवल संस्थेकडे असणे आवश्यक आहे, संस्थेचे नजीकच्या मागील 3 वर्षाचे लेखापरिक्षण झालेले असणे आवश्यक आहे, संस्थेस गोसेवा/गो-पालनाचे कार्य करण्यासाठी शासनासोबत करारनामा करण्याचे बंधनकारक राहील, संबंधीत संस्थेचे राष्ट्रीयकृत बॅकेत खाते असणे आवश्यक आहे, संस्थेवर कार्यरत कर्मचारी / मजुर यांचे वेतन इत्यादीचा खर्च संस्थेकडून अदा करण्यासाठी संस्था आर्थिकदृष्ट्या सक्षम असावी, या योजनेंतर्गत ज्या बाबीसाठी अनुदान उपलब्ध करून देण्यात येईल त्याच बाबीसाठी भविष्यात नव्याने कोणतेही अनुदान उपलब्ध करून देण्यात येणार नाही, ज्या संस्थांकडे पशुधनाच्या देखभालीसाठी व चाऱ्यासाठी स्वत:च्या उत्पनाचे साधन आहे, अशा संस्थांना प्राधान्य देण्यात येईल, राज्यस्तरावरील समितीची पुर्वपरवानगी घेऊन केवळ नवीन मुलभूत सुविधा निर्माण करण्याकरिता सदर योजनेत रु. 1.00 कोटी इतके अनुदान अनुज्ञेय राहील, राज्यस्तरावरील समितीची पुर्वपरवानगी घेतल्याशिवाय मुलभूत सुविधा निर्माण केल्यास अशा बाबीसाठी सदर योजनेत अनुदान मंजुर करण्यात येणार नाही.
                सदरील योजनेचे अर्ज पशुधन विकास अधिकारी (विस्तार) पंचायत समिती यांच्या मार्फत सादर करण्यात यावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.

*****
वसमत येथे स्वयंरोजगार प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन

हिंगोली, दि. 01 : स्थानिक वसमत येथे युवक / युवती करिता स्वयंरोजगार वर आधारित 12 दिवसांच्या कालावधीचे प्रशिक्षणाचे आयोजन दि. 05 जुलै, 2017 या कालावधीत करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, (एम. सी. ई. डी.) हिंगोली व्दारा आयोजित करण्यात येत आहे. या कार्यक्रमातून स्वयंरोजगार व रोजगार प्राप्त होण्याकरिता या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
सदरील कार्यक्रमात शेळीपालन, म्हैसपालन इत्यादी विषयी या प्रकारचे प्रशिक्षण दिल्या जाणार आहे सोबतच व्यवसाय मार्गदर्शन, व्यक्तीमत्व विकास, शासनाच्या विविध कर्ज योजना, बँकेची कार्यप्रणाली, आदीबाबत तज्ज्ञ व्यक्तीकडून मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमात युवक व युवतींना प्रवेश घ्यावयाचा असल्यास वयोमर्यादा 18 ते 45, शिक्षण 7 वी पास, प्रवेशाची अंतिम तारीख 04 जुलै, 2017 च्या दुपारी 4.00 वाजेपर्यंत कार्यक्रम आयोजक रुपेश डाहळे मो. 7020869384/9767222237 वसमत येथे प्रत्यक्ष भेटून आपला अर्ज सादर करावा, असे आवाहन महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी प्रसन्न रत्नपारखी यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये केले आहे.
*****


जिल्हाधिकारी कार्यालयात हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांना अभिवादन

हिंगोली, दि. 1 : हरित क्रांतीचे प्रणेते वसंतराव नाईक यांची जयंती आज जिल्हाधिकारी कार्यालयात साजरी करण्यात आली. याप्रसंगी जिल्हाधिकारी अनिल भंडारी यांनी वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.  यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी गोविंद रणवीरकर, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी आदीसह प्रशासकीय इमारतीमधील विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी यांनी ही वसंतराव नाईक यांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून अभिवादन केले.

*****