08 October, 2020

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 15 रुग्ण ; तर 27 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 202 रुग्णांवर उपचार सुरु

         हिंगोली,दि. 8 : जिल्ह्यात 15 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 12 व्यक्ती, औंढा परिसरात 03 व्यक्ती असे एकूण 15 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 27 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.

            सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 35 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 08 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 43 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 808 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 564 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 202 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 42 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. राजेंद्र सुर्यवंशी यांनी कळविले आहे.

 

****

07 October, 2020

माजी सैनिक आपत्ती निवारण कक्षसाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली, दि. 7 : जिल्ह्यातील सर्व माजी सैनिकांनी आपल्या जिल्ह्यातील जे माजी सैनिक इतर स्वयंसेवी संस्थाप्रमाणे स्वयंस्फूर्तीने आपत्ती व्यवस्थापनाकरिता विना वेतन/मानधन सेवा देण्यास इच्छूक असतील त्यांनी दिनांक 30 ऑक्टोबर, 2020 पर्यंत जिल्हा सैनिक कल्याण कक्ष, हिंगोली येथे नांव नोंदणीसाठी अर्ज सादर करावे, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

*****

जिल्ह्यासाठी 692 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर


हिंगोली, दि. 7 : सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांसाठी शासनाने माहे ऑक्टोबर, नोव्हेंबर आणि डिसेंबर-2020 या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. या तीन महिन्‍याचे जिल्‍ह्यासाठी  692  क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकांस संबंधीत स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे.  

तालुका निहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे.  हिंगोली-240 क्विंटल, औंढा ना.-40.46 क्विंटल, सेनगाव-77.54 क्विंटल, कळमनुरी-189 क्विंटल, वसमत-145 क्विंटल असे जिल्ह्यासाठी एकूण 692 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर झाले आहे. सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी , हिंगोली यांनी  केले आहे.

*****

जिल्ह्यातील राज्य सेवा पूर्व परीक्षा केंद्रावर 144 कलम लागू

 हिंगोली, दि. 7 : महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा पूर्व परीक्षा-2020 हिंगोली मुख्यालयाच्या ठिकाणी दि. 11 ऑक्टोबर, 2020 रोजी सकाळी 10.00 ते 12.00 व दुपारी 3.00 ते 5.00 या वेळेत घेण्यात येणार आहे.

या कालावधीत हिंगोली जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यासाठी आदर्श महाविद्यालय, अकोला रोड, हिंगोली भाग-अ व भाग-ब, सरजूदेवी भिकूलाल भारुका आर्य कन्या विद्यालय, हिंगोली, सेक्रेट हार्ट इंग्लीश स्कूल शास्त्रीनगर, हिंगोली, अनुसया विद्या मंदीर, खटकाळी बायपास, हिंगोली आणि जिल्हा परिषद कन्या शाळा, हिंगोली या सहा परीक्षा केंद्र परिसरात फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 चे कलम 144 लागू करण्यात आले आहे. वरील सहाही  परीक्षा केंद्रावर सकाळी 9.00 ते सायंकाळी 6.00 कालावधीमध्ये खालीलप्रमाणे निर्बंध असतील.

परीक्षा उपकेंद्राच्या इमारती व परिसरामध्ये परीक्षेच्या शांतता पूर्ण आयोजनासाठी प्राधिकृत व्यक्तीशिवाय इतर कोणत्याही व्यक्तीस प्रवेश करता येणार नाही. परीक्षा उपकेंद्राच्या 200 मीटर परिसरात फोन, झेरॉक्स मशीन, टेलीफोन बुथ चालू ठेवण्यास निर्बंध, हा आदेश परिक्षेसाठी नियुक्त केलेले अधिकारी, कर्मचारी तसेच परीक्षेसाठी येणारे विद्यार्थी यांना परीक्षा केंद्रात प्रवेशासाठी लागू राहणार नाही. हा आदेश शासकीय कर्तव्यावरील अधिकारी-कर्मचारी आणि पोलीस अधिक्षक यांनी बंदोबस्तकामी नेमणूक केलेल्या पोलीस कर्मचारी यांना परवानगी दिलेली आहे, अशा व्यक्तींना लागू राहणार नाही. परीक्षार्थी यांना परीक्षा केंद्रात डिजिटल डायरी, पेजर, मायक्रोफोन, मोबाईल, गणकयंत्र इत्यादी घेऊन जाण्यावर बंदी असेल.

या नियमांचे उल्लघन केल्यास संबंधितास नोटीस बजावून त्यांचे म्हणणे ऐकून घेण्यास पुरेसा अवधी नसल्याने आणीबाणीचे प्रसंगी फौजदारी प्रक्रीया संहिता 1973 चे कलम 144(2) अन्वये एकतर्फी आदेश निर्गमित करण्यात येतील, असे जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकान्वये कळविले आहे.

*****

हिंगोली जिल्ह्यात अतिवृष्टीचा इशारा

 

 हिंगोली, दि. 7 : जिल्ह्यात दि. 10 ते 13 ऑक्टोबर, 2020 या चार दिवसाच्या कालावधीत वादळी वाऱ्यासह पाऊस पडून अतिवृष्टी होणार असल्याचा इशारा भारतीय हवामान विभागाने दिला आहे.

        सध्या खरीप हंगामातील सोयाबीन, ज्वारीची काढणी सुरु आहे. या पिकांचे नुकसान होऊ नये यासाठी सर्व शेतकरी बांधवांनी आवश्यक ती काढणी व मळणीचे कामे पूर्ण करुन घ्यावीत. या कामी वेळ लागत असल्यास कापणी केलेल्या सोयाबीनची गंजी उंचीच्या ठिकाणी ताडपत्रीने झाकून ठेवण्याची व्यवस्था करावी. जेणेकरुन सोयाबीन पाण्याच्या संपर्कात येणार नाही व होणारे नुकसान टळेल, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

 

******

जिल्ह्यात कोविड-19 चे नवीन 15 रुग्ण ; तर 35 रुग्ण बरे झाल्याने डिस्चार्ज · 221 रुग्णांवर उपचार सुरु तर दोघांचा मृत्यू

  

        हिंगोली,दि. 6 : जिल्ह्यात 15 नवीन कोविड-19 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोरप्रसाद श्रीवास यांनी आज दिली आहे.

            आज प्राप्त झालेल्या अहवालानुसार रॅपीड अँटीजन टेस्टद्वारे हिंगोली परिसरात 08 व्यक्ती, औंढा परिसरात 03 व्यक्ती व कळमनुरी परिसरात 02 व्यक्ती तर आरटीपीसीआर टेस्टद्वारे हिंगोली परिसर 01 व्यक्ती व कळमनुरी परिसर 01 व्यक्ती असे एकूण 15 कोविड-19 पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. तर आज 35 कोविड-19 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज दोन कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झाला आहे.

            सद्य:स्थितीत जिल्हा सामान्य रुग्णालयातील आयसोलेशन वार्डमध्ये भरती असलेल्या कोविड-19 रुग्णांपैकी 32 रुग्णांची  प्रकृती गंभीर असल्याने त्यांना ऑक्सीजन चालू आहे. तर कोविड-19 च्या 09 रुग्णांची प्रकृती अतिगंभीर असल्याने त्यांना बायपॅप मशीनवर ठेवण्यात आले आहे. असे एकूण 41 रुग्णांची सद्य:स्थितीत प्रकृती चिंताजनक असून तज्ज्ञ डॉक्टरामार्फत त्यांच्यावर उपचार सुरु आहेत. 

           जिल्ह्यात आजपर्यंत कोविड-19 चे एकूण 2 हजार 774 रुग्ण झाले असून, त्यापैकी 2 हजार 511 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर आज घडीला जिल्ह्यात एकूण 221 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तसेच कोविड-19 मुळे जिल्ह्यात आतापर्यंत 42 व्यक्तींचा मृत्यू झाला असल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक किशोरप्रसाद श्रीवास यांनी कळविले आहे.

 

****

 

06 October, 2020

पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी अर्ज करावेत

 

हिंगोली,दि.6:  पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना आंबिया बहार सन 2020-21 मध्ये द्राक्ष, डाळींब, केळी, संत्रा, मोसंबी, आंबा, काजू व स्ट्रॉबेरी (प्रायोगिक तत्वावर) या आठ फळ पिकांसाठी 30 जिल्ह्यामध्ये 5 जून व 12 जूनच्या शासन निर्णयातील अटी, शर्ती व अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोके निकषानुसार राबविण्यात येत आहे. पुनर्रचित हवामान आधारीत फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे.

कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होणेबाबतचे घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या सात दिवस अगोदर बँकेला देणे अपेक्षित आहे. जेणेकरुन बँक विमा हप्ता परस्पर कपात करणार नाही. शेतकऱ्यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतकऱ्यांना आंबिया बहार सन 2020-21 या हंगामासाठी योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने, भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. आंबिया बहारातील गारपीट या हवामान धोक्यासाठी अतिरिक्त विमा संरक्षण देण्यात येते. त्यासाठी अतिरिक्त विमा हप्ता शेतकऱ्यांना देय आहे. जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित  फळपिकासाठी चार हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोदंणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागानाच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल, त्यासाठी अधिसूचित फळपिकांचे उत्पादनक्षम वय खालीलप्रमाणे आहे.

संत्रा व मोसंबी या फळपिकासाठी उत्पादनक्षम वय तीन वर्षे, डाळींब या फळपिकासाठी उत्पादनक्षम वय दोन वर्षे असा आहे. ही योजना 2020-21 या वर्षासाठी आंबिया बहार  मध्ये पाच जिल्हा समुहांसाठी असून भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्चेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रिट, फोर्ट मुंबई-400023, टोल फ्री क्रमांक: 1800116515, दूरध्वनी क्रमांक 022-61710912, ई-मेल mhwbcis@aicofindia.com या विमा कंपनीमार्फत हिंगोली जिल्ह्यात राबविण्यात येत आहे.

आंबिया बहार 2020-21 या वर्षामध्ये फळपीक निहाय योजनेमध्ये सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था, बँक, आपले सरकार सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे, शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज करणे यासाठी मोसंबी व केळी या फळपिकांसाठी अंतिम मुदत दि. 31 ऑक्टोबर, 2020 पर्यंत आहे. संत्रा या फळपिकासाठी  दि. 30 नोव्हेंबर, 2020 आणि डाळींब या पिकांसाठी 31 डिसेंबर, 2020 याप्रमाणे अंतिम मुदत आहे.

आंबिया बहार 2020-21 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी निर्धारित करण्यात आला असून निर्धारत केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत देय होईल.

आंबिया बहारातील अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या सविस्तर माहितीसाठी कृषि विभागाचे संकेतस्थळ  www.krishi.maharashtra.gov.in पहावे. तसेच ई-सेवा केंद्र व बँक स्तरावरही ही माहिती उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबंधित सहभागी विमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत.

शेतकऱ्यांनी अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोक्यांची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजीकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक, वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन व्ही.डी. लोखंडे, जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.

0000