20 October, 2022

 

भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन

 

हिंगोली (जिमाका), दि. 20 : येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागामार्फत दि. 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत भ्रष्टाचार निर्मूलन दक्षता जनजागृती सप्ताहाचे आयोजन करण्यात आले आहे.

 दक्षता जनजागृती सप्ताहानिमित्त  दि. 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत विविध उपक्रम राबवून साजरा करण्यात येणार आहे, असे पोलीस उप अधीक्षक, लाचलुचपत प्रतिबंधक विभाग, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.

 

*****

 

खाजगी प्रवासी बस धारकांकडून जास्तीचे भाडे आकारल्यास

उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या ई-मेलवर तक्रार दाखल करावी

- उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अनंता जोशी

हिंगोली (जिमाका), दि. 20 : आगामी सणासुदीच्या काळामध्ये प्रवासी मोठ्या प्रमाणात ये-जा करतात. त्यामुळे खाजगी प्रवासी बस धारकांकडून मनमानी भाढेवाढ करण्यात येते. वास्तविक खाजगी प्रवासी बसेसने एसटी महामंडळाने विशिष्ट बस संवर्गासाठी विहित केलेल्या भाड्याच्या दिड पट पेक्षा अधिक आकारु नये , असे निर्देश परिवहन आयुक्तांनी वेळोवेळी दिलेले आहेत. याबाबत शासनाने 27 ऑक्टोबर, 2021 रोजी शासन निर्णय जारी करुन कमाल भाडेदर निश्चित केले आहेत. त्यानुसार कंत्राटी बसेसचे प्रती आसन कमाल भाडेदर पुढीलप्रमाणे आहे.

44 प्रवासी क्षमता असलेल्या साधी बस (3x2) साठी हिंगोली येथून मुंबईसाठी 1320 रुपये, पुणे-1006, कोल्हापूर-1241, नागपूर-719, इंदौर (वाशिम मार्गे)-1006, सुरत (औरंगाबाद मार्गे)-1346, औरंगाबाद-510, हैद्राबाद-837,सोलापूर-902, अमरावती-380, अकोला-276, हिंगोली ते वाशिम-106, हिंगोली ते परभणी-171, हिंगोली ते नांदेड-197 रुपये प्रवासी भाडे आहे.

  39 प्रवासी क्षमता असलेल्या वातानुकुलीत सिटसाठी हिंगोली येथून मुंबईसाठी 1875 रुपये, पुणे-1423, कोल्हापूर-1763, नागपूर-1022, इंदौर (वाशिम मार्गे)-1422, सुरत (औरंगाबाद मार्गे)-1912, औरंगाबाद-726, हैद्राबाद-1189,सोलापूर-1282, अमरावती-1541, अकोला-393, हिंगोली ते वाशिम-152, हिंगोली ते परभणी-244, हिंगोली ते नांदेड-281 रुपये प्रवासी भाडे आहे.

  44 प्रवासी क्षमता असलेल्या नॉन एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी हिंगोली येथून मुंबईसाठी 1800 रुपये, पुणे-1373, कोल्हापूर-1686, नागपूर-974, इंदौर (वाशिम मार्गे)-1373, सुरत (औरंगाबाद मार्गे)-1835, औरंगाबाद-697, हैद्राबाद-1142,सोलापूर-1248, अमरावती-520, अकोला-378, हिंगोली ते वाशिम-146, हिंगोली ते परभणी-235, हिंगोली ते नांदेड-271 रुपये प्रवासी भाडे आहे.

30 प्रवासी क्षमता असलेल्या एसी स्लीपर (टाटा/अशोक लेलँड) साठी हिंगोली येथून मुंबईसाठी 2025 रुपये, पुणे-1544, कोल्हापूर-1917, नागपूर-1103, इंदौर (वाशिम मार्गे)-1544, सुरत (औरंगाबाद मार्गे)-2065, औरंगाबाद-783, हैद्राबाद-1284,सोलापूर-1384, अमरावती-583, अकोला-423, हिंगोली ते वाशिम-162, हिंगोली ते परभणी-262, हिंगोली ते नांदेड-302 रुपये प्रवासी भाडे आहे.

अधिकचे भाडे आकारल्यास आपण हिंगोली उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या dyrto.38-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार दाखल करावी. तसेच वरील निश्चित केलेले भाडे दर विविध ठिकाणी खाजगी प्रवासी बसेस बुकींगच्या दर्शनी भागात , बसेसमध्ये , कार्यालयाच्या आवारात लावण्यात आलेले आहेत. शासन निर्णय दि. 27 ऑक्टोबर, 2021 नुसार खाजगी कंत्राटी परवाना वाहनाचे दर राज्य परिवहन महामंडळ यांच्या समक्ष संवर्गाच्या वाहनाच्या एकूण भाडे दराच्या दिड पट पेक्षा अधिक राहणार नाही .

या अनुषंगाने हिंगोली  जिल्ह्यातील सर्व जनतेनी प्रवास करतानां खाजगी बस वाहनधारकाकडून निश्चित केलेल्या वाहनदरापेक्षा जास्त भाडेदर आकारत असतील तर आपण उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या dyrto.38-mh@gov.in या ई-मेलवर तक्रार दाखल करावी, असे आवाहन अनंता जोशी, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

19 October, 2022

 

पात्र दिव्यांगानी विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी

20 नोव्हेंबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : जिल्ह्यातील दिव्यांगांसाठी शासनाने विविध योजनांचे आयोजन केले असून त्याचा लाभ जिल्ह्यातील दिव्यांगाना मिळावा यासाठी पंचायत समिती मार्फत अर्ज मागविण्यात येत आहेत.

ही योजना दिव्यांग विवाहित जोडप्यासाठी असून विवाहित जोडप्यांचे विवाह नोंदणी प्रमाणपत्र अर्जासोबत सादर करणे आवश्यक आहे. या योजनेमध्ये दिव्यांग विवाहित जोडप्यांना प्रोत्साहन म्हणून 50 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. त्याचप्रमाणे जिल्ह्यातील दुर्धर आजाराने त्रस्त असलेल्या दिव्यांगाना त्यांच्या आजारावरील उपचारासाठी 25 हजार रुपये अनुदान देण्यात येणार आहे. दुर्धर आजारामध्ये कॅन्सर, क्षयरोग, हृदयशस्त्रक्रिया, मेंदूविकार इत्यादी आजारांचा समावेश आहे.

पात्र दिव्यांगांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी पंचायत समितीमार्फत दि. 20 नोव्हेंबर, 2022 पर्यंत अर्ज सादर करावेत, असे आवाहन आर. एच. एडके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी, जिल्हा परिषद, हिंगोली यांनी केले आहे.  

*****

 

तोंडापूर कृषी विज्ञान केंद्राद्वारे विविध गावांमध्ये स्वच्छता अभियान

 

हिंगोली (जिमाका), दि. 19 : संत नामदेव सेवाभावी संस्था, संचलित भारतीय कृषी अनुसंधान परिषद, नवी दिल्ली संलग्न कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर ता. कळमनुरी जि. हिंगोली अंतर्गत 'स्वच्छता अभियान 2.0' तसेच प्रलंबित कार्य पूर्ण करण्यासाठी मोहीम राबविण्यात येत आहे.  या मोहिमेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील कळमनुरी व सेनगाव तालुक्यातील वांजोळा, तोंडापूर, कोंढुर, सिंदगी, कुर्तडी , भवानी मंदिर, येडशी, भोसी, भुवनेश्वर, जिल्हा परिषद हायस्कुल कुर्तडी व कृषी विज्ञान केंद्राच्या परिसरामध्ये विविध उपक्रमाद्वारे स्वच्छता मोहीम राबविण्यात येत आहे.

स्वच्छ भारत अभियान अंतर्गत विविध गावांमध्ये स्वच्छता व स्वच्छता शपथ गावकऱ्यांना तसेच शाळेतील विद्यार्थ्यांना सोबत घेऊन मोहि  पूर्ण करण्यात येत आहे. या मोहिमेमुळे  गाव आणि शहरे स्वच्छ राहतील आणि रोगांचा प्रसार होणार नाही. त्याचबरोबर माणसाची जीवनशैली सुद्धा बदलून जाईल.

या कार्यक्रमाची सुरुवात माजी खासदार शिवाजीराव माने यांनी  2 ऑक्टोबरला कृषी विज्ञान केंद्रात भेट देवून केली असून हा उपक्रम कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ व प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या मार्गदर्शनाखाली राबविण्यात येत आहे.

या उपक्रमामध्ये कृषी विज्ञान केंद्राचे प्रा. राजेश भालेराव, प्रा. अनिल ओळंबे, प्रा. अजयकुमार सुगावे, प्रा. रोहींनी शिंदे, डॉ. अतुल मुराई, डॉ. कैलाश गीते यांनी  विविध गावामध्ये जाऊन स्वच्छता मोहिमेचे कार्य करुन प्रसार व प्रचार करीत आहेत.

हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी विजय ठाकरे, सौ. मुंगल, शिवलिंग लिंगे, ओमप्रकाश गुडेवार, गुलाबराव सूर्यवंशी, प्रेमदास जाधव, संतोष हानवते हे उत्तमरित्या मदत करत आहेत.

*****

 

सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळाला

राज्य शासनाचा उत्कृष्ट गणेश मंडळाचा सन्मान प्रदान

 




हिंगोली (जिमाका), दि. 19 : उत्कृष्ट गणेश मंडळाचा राज्य शासनाचा पुरस्कार सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळ एनटीसी हिंगोलीला मुबंई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत प्रदान करण्यात आला. 

            मुबंई येथील रवींद्र नाट्य मंदिर प्रभादेवी येथे राज्य शासनाच्या उत्कृष्ट सार्वजनिक गणेश मंडळ पुरस्कार 2022 पारितोषिक वितरण सोहळा मंगळवार दि. 18 ऑक्टोबर रोजी  सांस्कृतिक कार्य व वन मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते संपन्न झाला. यावेळी व्यासपीठावर सांकृतिक कार्य विभागाचे सचिव सौरभ विजय, सांकृतिक विभागाच्या उपसचिव श्रीमती वाघमारे, पु.ल. देशपांडे कला अकादमीचे प्रकल्प संचालक संतोष रोकडे यांची प्रमुख उपस्थिती होती. 

            हिंगोली येथील एनटीसी भागातील सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळाला राज्य शासनाचा जिल्हास्तरीय प्रथम पुरस्कार सांस्कृतिक कार्ये व वने मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्या हस्ते सन्मान चिन्ह, प्रशस्तीपत्र व धनादेश देऊन गौरविण्यात आले. यावेळी मंडळाचे अध्यक्ष कल्याण देशमुख, पदाधिकारी प्रा.नरेंद्र रायलवार, नागनाथ लोंखडे, संजय भुमरे यांची उपस्थिती होती.

बक्षीस वितरण सोहळ्यास राज्यातील गणेश मंडळाचे पदाधिकारी व समिती सदस्य, सांस्कृतिक विभागाचे वरिष्ठ अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिध्दीविनायक सार्वजनिक गणेश मंडळाच्या सामाजिक बांधिलकीची दखल राज्यस्तरीय उत्कृष्ट गणेश मंडळ बक्षीस वितरण सोहळ्यात घेण्यात आली. मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी सिद्धिविनायक सार्वजनिक गणेश मंडळाच्या पदाधिकारी यांचे विशेष कौतुक करुन शुभेच्छा दिल्या.

*****

18 October, 2022

 

जवाहर नवोदय विद्यालयात इयत्ता नववीच्या प्रवेशासाठी इमावच्या दोन जागा

निवड चाचणी परीक्षेसाठी 25 ऑक्टोबर पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 18 : जवाहर नवोदय विद्यालय, वसमतनगर, जि.हिंगोली येथे शैक्षणिक वर्ष 2023-24 साठी इयत्ता नववीच्या एकूण दोन जागासाठी निवड चाचणी परीक्षा ही शनिवार, दि. 11 फेब्रुवारी, 2023 रोजी सकाळी 10.00 वाजता घेण्यात येणार आहे. या जागा ग्रामीण भागातील इतर मागासवर्गीय प्रवर्गासाठी (OBC) आहेत.

            या परिक्षेस जे विद्यार्थी  हिंगोली जिल्ह्यांतर्गत शैक्षणिक वर्ष-2022-23 मध्ये इयत्ता आठवीमध्ये शिक्षण घेत असलेले पाहिजेत. त्यानांच या निवड परिक्षेस बसण्याची संधी मिळेल.

            या परिक्षेसाठी जवाहर नवोदय विद्यालय समिती, मुख्य कार्यालय, नोएडा यांच्या www.navodaya.gov.in या संकेतस्थळावर दि. 25 ऑक्टोबर, 2022 पर्यंत आवेदनपत्र भरता येतील.

            अधिक माहितीसाठी एस.एस.वाघमारे, प्राचार्य (मो.9511676209), व्ही. व्ही. गर्जे, टीजीटी मराठी (मो.9518962241), श्री. श्रीनिवास, कार्यालयीन अधीक्षक (मो.9182293280), राजू जोंधळे, लिपिक (मो.9921358358, 7020275149) यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन एस.एस.वाघमारे, प्राचार्य, जवाहर नवोदय विद्यालय, वसमतनगर, जि.हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.   

*****

 

ज्ञानसंपन्न समृध्द समाज घडविण्यासाठी ग्रंथालयांचा विकास होणे आवश्यक

- प्रा. जगदीश कदम




 

            हिंगोली (जिमाका), दि. 18 : ज्ञान संपन्न समृध्द समाज घडविण्यासाठी ग्रंथालयाचा विकास होणे आवश्यक आहे, असे प्रतिपादन ज्येष्ठ साहित्यिक प्रा. जगदीश कदम यांनी केले.

डॉ.ए.पी.जे.अब्दूल कलाम यांचा जन्मदिन 15ऑक्टोंबर हा दिवस "वाचन प्रेरणा दिन" म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. त्यानिमित्त येथील जिल्हा ग्रंथालयात दि. 15 ते 18 ऑक्टोंबर, 2022 या कालावधीत ग्रंथप्रदर्शनाचे आयोजन करण्यात आलेले होते. आज या ग्रंथ ग्रंथप्रदर्शनाच्या समारोपीय कार्यक्रमात जेष्ठ साहित्यिक प्रा.जगदीश कदम बोलत होते. यावेळी प्रा. अशोक अर्धापुरकर , प्राचार्य नागनाथ पाटील, कवी  श्रीनिवास मस्के, कवी शिवाजी कऱ्हाळे, जिल्हा ग्रंथालय अधिकारी आ.अ. ढोक, संगत प्रकाशन नांदेडचे प्रकाशक संजय सुरनर उपस्थित होते.

यावेळी वाचन संस्कृती व ग्रंथालयांचे महत्व विषद केले. तसेच मान्यवर कवी यांनी  साहित्याचे /वाचनाचे महत्व, सामाजिक विषयावर, कृषी, देशभक्तीपर कविता सादर केल्या. तसेच वाचनाचे व वाचनालयाचे महत्व सांगितले.

*****