07 November, 2022

 

जिल्हा ग्रंथालयात दिवाळी अंक प्रदर्शनाचे उद्घाटन

 



           हिंगोली (जिमाका), दि. 07 :  जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय हिंगोली येथे दि. 07 ते 09 नोंव्हेंबर या कालावधीत दिवाळी मध्ये प्रकाशित झालेल्या विविध दिवाळी अंकाच्या प्रदर्शनाचे आयोजन करण्यात आले होते. या प्रदर्शनाचे उद्घाटन समाज कल्याण सहायक आयुक्त शिवानंद मिनगरे हिंगोली यांच्या हस्ते करण्यात आले.

          या वेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, अशोक अर्धापुरकर, रामभाऊ पुनसे, वाचक व ग्रंथालय पदाधिकारी यांची प्रमुख उपस्थिती होती. या प्रदर्शनात सुमारे 125 पेक्षा अधिक दिवाळी अंक उपलब्ध असून जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालय, नेहरु नगर, रिसाला नाका हिंगोली येथे सर्वांसाठी खुले आहेत. या दिवाळी अंक प्रदर्शनाचा सर्वांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक यांनी केले आहे.

*****

 

भारत जोडो पदयात्रा दरम्यान 11 ते 15 नोव्हेंबर या कालावधीत

हिंगोली जिल्ह्यातील विविध वाहतूक मार्गात बदल

                                        - जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आदेश

 

हिंगोली (जिमाका), दि. 07 :  जिल्ह्यात दि. 11 नोव्हेंबर ते दि. 15 नोव्हेंबर, 2022 या दरम्यान राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे खासदार राहूल गांधी यांचा भारत जोडो पदयात्रा निमित्त हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम असून त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या कार्यक्रमास इतर राजकीय पक्षाचे वर्गीकृत, अवर्गीकृत व्यक्ती हजर राहण्याची शक्यता असून खासदार राहूल गांधी यांचे नांदेड येथून हिवरा पाटी मार्गे हिंगोली जिल्ह्यात आगमन होणार आहे. पुढे वारंगा फाटा-बाळापूर-कळमनुरी-हिंगोली-कनेरगाव (नाका) मार्गे वाशिम जिल्ह्यात जाणार आहेत.

दि. 11 नोव्हेंबर ते दि. 15 नोव्हेंबर, 2022 रोजी पर्यंत ही पदयात्रा हिवरा पाटी ते कनेरगाव नाका (हिंगोली सरहदपर्यंत) पायी प्रवास करणार आहेत. त्यादरम्यान खालील ठिकाणांची वाहतूक बंद करुन त्यांना पर्यायी मार्गाने वळविण्याचे आदेश दिले आहेत.

हिवरा पाटी ते दाती पाटी मार्ग : दि. 11 नोव्हेंबर रोजी अर्धापूर येथून बाळापूर-कळमनुरी-हिंगोलीकडे येणारी सर्व वाहतूक बंद, हदगाव ते वारंगा फाटा मार्ग बाळापूरकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद, कुर्तडी पाटी ते अर्धापूर कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद, बाळापूरकडून नांदेडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद, शेवाळा व त्या जवळील गावातील नांदेडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे. वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग नांदेडवरुन हिंगोलीकडे येणारी वाहतूक एच.एस.पी.टॅप अर्धापूर येऊन मालेगाव वसमत मार्गे हिंगोली जातील व नांदेडवरुन बाळापूर करिता जाणारी वाहने एच.एस.पी.टॅप अर्धापूर वरुन मालेगाव, कवठा पाटी मार्गे बाळापूर किंवा बोल्डा मार्गे कळमनुरी जातील. भोकरवरुन हिंगोली येणारी वाहतूक एच.एस.पी.टॅपवरुन मालेगाव, वसमत, औंढा नागनाथ मार्गे हिंगोली जातील. हिंगोली वरुन नांदेड जाणारी वाहतूक उमरा पाटी, बोल्डा, मालेगाव मार्गे नांदेड जातील. पुसद, मालेगाव येथून नांदेडकडे जाणारी वाहतूक कळमनुरी, उमरा पाटी, बोल्डा, मालेगाव मार्गे नांदेड जाईल किंवा मालेगाव, बाळापूर, कुर्तडी पाटी , गिरगाव, मालेगाव मार्गे नांदेड जाईल.

हिवरा पाटी ते दाती पाटी मार्ग हा व्हीआयपी महोदय हे रात्री विश्रांतीला गेल्यापासून त्यावेळची परिस्थिती पाहून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 3.30 वा. पर्यंत वाहतूक पूर्ववत सोडता येईल.

दाती पाटी ते सातव कॉलेज कळमनुरी : दि. 12 नोव्हेंबर रोजी अर्धापूर येथून बाळापूर-कळमनुरी-हिंगोली कडे येणारी सर्व वाहतूक बंद, अर्धापूर ते वारंगा फाटा मार्गे आखाडा बाळापूरकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद, कुर्तडी पाटी ते बाळापूर कडे येणारी वाहतूक बंद, बाळापूर कडून नांदेड कडे जाणारी सर्व प्रकारची वाहतूक बंद, शेवाळा व त्याजवळील गावातील नांदेडकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद, पुसद, शेंबाळ पिंपरी, मालेगाव मार्गे बाळापूर व कळमनुरी कडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद, उमरा पाटी येथून कळमनुरी कडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग नांदेड वरुन हिंगोलीकडे येणारी वाहतूक एच.एस.पी.टॅप येथून मालेगाव , वसमत , औंढा नागनाथ मार्गे हिंगोली जातील. भोकर वरुन हिंगोलीकडे येणारी वाहतूक एच.एस.पी.टॅप येथून मालेगाव, वसमत, औंढा नागनाथ मार्गे हिंगोली जातील. पुसद, शेंबाळ पिंपरी, मालेगाव येथून नांदेड कडे जाणारी वाहतूक उमरखेड, हदगाव मार्गे नांदेडकडे जातील. हिंगोली वरुन नांदेड कडे जाणारी वाहतूक उमरा पाटी, बोल्डा, मालेगाव मार्गे नांदेड जातील किंवा औंढा, शिरडशहापूर, मालेगाव मार्गे नांदेड जातील.

दाती पाटी ते सातव कॉलेज कळमनुरी मार्ग हा व्हीआयपी महोदय हे रात्री विश्रांतीला गेल्यापासून त्यावेळची परिस्थिती पाहून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 3.30 वा. पर्यंत वाहतूक पूर्ववत सोडता येईल.

सातव कॉलेज मुक्काम कळमनुरी : दि. 13 नोंव्हेंबर रोजी अर्धापूर येथून बाळापूर, कळमनुरी, हिंगोली कडे येणारी सर्व वाहतूक पूर्णपणे बंद. हदगाव ते वारंगा फाटा, बाळापूर मार्गे कळमनुरी, हिंगोली कडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद. बाळापूर वरुन हिंगोलीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद . पुसद, शेंबाळ पिंपरी, माळेगाव मार्गे कळमनुरी येणारी वाहतूक पूर्णपणे बंद. मसोड पाटी येथून कळमनुरी कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद, उमरा पाटी येथून कळमनुरीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग नांदेडवरुन हिंगोलीकडे येणारी वाहतूक एच.एस.पी.टॅप येथून मालेगाव, वसमत, औंढा नागनाथ मार्गे हिंगोली जातील. भोकर वरुन हिंगोलीकडे येणारी वाहतूक एच.एस.पी. टॅप येथून मालेगाव, वसमत, औंढा नागनाथ मार्गे हिंगोली जातील. पुसद, शेंबाळ पिंपरी, मालेगाव येथून हिंगोलीकडे जाण्यासाठी खंडाळा, सिरसम, माळहिवरा मार्गे हिंगोलीकडे येतील. हिंगोली वरुन नांदेड जाणारी वाहतूक उमरा पाटी, बोल्डा, माळेगाव मार्गे नांदेडकडे जातील किंवा औंढा, शिरडशहापूर मार्गे नांदेड कडे जातील.  

सातव कॉलेज मुक्काम कळमनुरी मार्ग हा व्हीआयपी महोदय हे रात्री विश्रांतीला गेल्यापासून त्यावेळची परिस्थिती पाहून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 3.30 वा. पर्यंत वाहतूक पूर्ववत सोडता येईल.

सातव कॉलेज कळमनुरी ते वडद पाटी : दि. 14 नोव्हेंबर रोजी नांदेड, बाळापूर येथून हिंगोलीकडे येणारी सर्व वाहतूक बंद, हदगाव-वारंगा फाटा मार्गे हिंगोलीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद. पुसद, शेंबाळ पिंपरी, माळेगाव मार्गे कळमनुरी व हिंगोली कडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद. सालेगाव, रुपूर येथून कळमनुरी मार्गे हिंगोलीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद. मसोड फाटा येथून कळमनुरीकडे व हिंगोलीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद. उमरा फाटा येथून कळमनुरीकडे व हिंगोलीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद, सावरखेडा गावातून तसेच सावरखेडा बायपास येथून हिंगोलीकडे व कळमनुरीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद. खटकाळी किंवा अकोला बायपास येथून कळमनुरीकडे जाणारी व हिंगोलीकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद . नरसी टी पाईंट येथून हिंगोलीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद. जवळा पळशी येथून हिंगोलीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद. बासंबा टी पाईंट येथून हिंगोलीकडे व कनेरगाव नाका कडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद. माळहिवरा  येथून हिंगोलीकडे किंवा कनेरगावकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद. सेनगाव, गोरेगाव मार्गे कनेरगाव वरुन हिंगोलीकडे येणारी वाहतूक राजगाव येथून कनेरगावकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद . वाशिम वरुन कनेरगाव कडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद  करण्यात आली आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग नांदेडवरुन हिंगोलीकडे येणारी वाहतूक एच.एस.पी.टॅप येथून मालेगाव, वसमत, औंढा नागनाथ मार्गे हिंगोली जातील. भोकर वरुन हिंगोली येणारी वाहतूक एच.एस.पी.टॅप येथून मालेगाव, वसमत, औंढा नागनाथ मार्गे हिंगोली जातील. पुसद, शेंबाळ पिंपरी, मालेगाव येथून कुर्तडी पाटी, बोल्डा औंढा मार्गे हिंगोली येतील आणि पुसद, अनसिंग, रिसोड, सेनगाव , नर्सी मार्गे हिंगोली जातील. हिंगोली वरुन नांदेड जाणारी वाहतूक पुसद, शेंबाळ पिंपरी, माळेगाव, बाळापूर मार्गे किंवा पुसद , उमरखेड मार्गे नांदेड जातील. वाशिम वरुन परभणी जाणारी किंवा हिंगोलीकडे जाणारी वाहतूक रिसोड, सेनगाव, नर्सी टी पाईंट मार्गे हिंगोलीकडे किंवा औंढा, परभणीकडे जातील.

सातव कॉलेज कळमनुरी ते वडद पाटी मार्ग हा व्हीआयपी महोदय हे रात्री विश्रांतीला गेल्यापासून त्यावेळची परिस्थिती पाहून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 3.30 वा. पर्यंत वाहतूक पूर्ववत सोडता येईल.

वडद पाटी ते राजगाव वाशिम जिल्हा हद्दीत प्रवेश : दि. 15 नोव्हेंबर, 2022 रोजी हिंगोली वरुन वाशिमकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद, माळहिवरा येथून कनेरगावकडे जाणारी वाहतूक पूर्णपणे बंद. सेनगाव, गोरेगाव मार्गे कन्हेरगाव वरुन हिंगोलीकडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद . राजगाव येथून कनेरगाव कडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद .  वाशिमवरुन कनेरगाव कडे येणारी वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली आहे.

वाहतुकीसाठी पर्यायी मार्ग हिंगोलीवरुन वाशिम जाण्यासाठी नर्सी टी पाईंट, सेनगाव, रिसोड मार्गे वाशिम जातील. वाशिम वरुन हिंगोली किंवा परभणी जाणारी वाहतूक रिसोड, सेनगाव, नर्सी टी पाईंट मार्गे हिंगोली किंवा औंढा , परभणी जातील. वाशिम वरुन नांदेड जाणारी वाहतूक पुसद, शेंबाळ पिंपरी, माळेगाव, बाळापूर मार्गे किंवा पुसद, उमरखेड मार्ग नांदेड जातील. माळहिवरा येथून वाशिम जाणारी वाहतूक अनसिंग मार्गे वाशिम जातील.

वडद पाटी ते राजगाव, वाशिम मार्गे हा व्हीआयपी महोदय हे रात्री विश्रांतीला गेल्यापासून त्यावेळची परिस्थिती पाहून ते दुसऱ्या दिवशी सकाळी 3.30 वा. पर्यंत वाहतूक पूर्ववत सोडता येईल.

जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 33 (1) (ख) अन्वये प्राप्त असलेल्या अधिकाराचा वापर करुन दि. 11 ते 15 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत वरीलप्रमाणे नमूद केल्यानुसार सदर मार्गाने वाहतूक वळविण्यात आले आहे.

या आदेशाची माहिती पोलीस अधिकारी वाहतूक यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे प्रसिध्द करावी व सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, नगर परिषद, पोलीस स्टेशन कार्यालयाचे नोटीस बोर्डावर डकवून प्रसिध्दी देण्यात यावी. तसेच स्थानिक वर्तमान पत्रात व्यापक प्रसिध्दी करावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्याविरुध्द नियमानुसार कार्यवाही करण्याचे जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आदेश दिले आहेत.

*****

 

भारत जोडो पदयात्रा संबंधित सोशल मिडियावर भडकावू भाषणे, पोस्ट प्रसारित केल्यास

दंडात्मक कारवाई करण्याचे जिल्हादंडाधिकारी यांचे आदेश

 

हिंगोली (जिमाका), दि. 07 :  जिल्ह्यात दि. 11 नोव्हेंबर ते दि. 15 नोव्हेंबर, 2022 या दरम्यान राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे खासदार राहूल गांधी यांचा भारत जोडो पदयात्रा निमित्त हिंगोली जिल्हा दौरा कार्यक्रम असून त्यांना झेड प्लस सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे. या कार्यक्रमास इतर राजकीय पक्षाचे वर्गीकृत, अवर्गीकृत व्यक्ती हजर राहण्याची शक्यता असून खासदार राहूल गांधी यांचे नांदेड येथून हिवरा पाटी मार्गे हिंगोली जिल्ह्यात आगमन होणार आहे. पुढे वारंगा फाटा-बाळापूर-कळमनुरी-हिंगोली-कनेरगाव (नाका) मार्गे वाशिम जिल्ह्यात जाणार आहेत.

या भारत जोडो पदयात्रा संबंधाने हिंगोली ते वाशिम दरम्यान मोठ्या प्रमाणावर जनसमुदाय सहभागी होण्याची दाट शक्यता आहे. या पदयात्रे संदर्भात भडकावू भाषणाची व्हिडिओ क्लीप, घोषणा, घोषवाक्य किंवा छायाचित्रे, व्यंगचित्रे इत्यादी सोशल मिडियावर प्रसारित होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

या भारत जोडा पदयात्रेच्या संपूर्ण कालावधी दरम्यान हिंगोली जिल्ह्यामध्ये कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी या दृष्टिकोनातून भडकावू भाषणाची व्हिडिओ क्लीप, घोषणा, घोषवाक्य किंवा छायाचित्रे, व्यंगचित्रे इत्यादी सोशल मिडियावर प्रसारित होण्यास प्रतिबंध होण्यासाठी आदेश देण्याचे जिल्हा पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी कळविले आहे.

हिंगोली जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहावी या दृष्टीने भारत जोडो पदयात्रा संबंधाने सोशल मिडियावर कोणत्याही प्रकारच्या पोष्ट, भडकावू भाषणे, आक्षेपार्ह इत्यादी बाबी प्रसारित करण्यास भारतीय दंड संहिता 1860 कलम 553 (अ), 116, 505 नुसार दंडनीय अपराध केला आहे, असे गृहीत धरुन कारवाई करण्याचे आदेश जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत.

 

*****

 भारत जोडो पदयात्रा निमित्त जिल्ह्यात कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्याठी

विशेष कार्यकारी दंडाधिकाऱ्यांची नियुक्ती

 

हिंगोली (जिमाका), दि. 07 :  राष्ट्रीय काँग्रेस पार्टीचे खासदार राहूल गांधी यांची भारत जोडो पदयात्रा दि. 11 नोव्हेंबर ते दि. 15 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत जिल्ह्यातून जाणार आहे. या भारत जोडो पदयात्रा कार्यक्रमादरम्यान राष्ट्रीय काँग्रेंस पार्टीचे खासदार राहूल गांधी यांना सुरक्षेच्या दृष्टीने झेड प्लस सुरक्षा वर्गवारी आहे. भारत जोडो पदयात्रानिमित्त जिल्ह्यात शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवण्याच्या दृष्टीने बंदोबस्त लावण्यात आला आहे. परंतु या काळात राजकीय कारणावरुन किंवा इतर शुल्लक कारणावरुन अशांतता निर्माण होऊन कायदा व सुव्यवस्थेची परिस्थिती अचानक निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. अशा अचानक उद्भवलेल्या कायदा व सुव्यवस्थेच्या परिस्थितीस तोंड देण्यासाठी बंदोबस्तातील अधिकाऱ्यासोबत विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची आवश्यकता असते.

त्यामुळे संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दि. 11 नोव्हेंबर, 2022 ते दि. 15 नोव्हेंबर, 2022 रोजी उद्भवणारा कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न हाताळण्यासाठी जिल्ह्यातील 06 पोलीस स्टेशनसाठी प्रत्येकी एक याप्रमाणे 06 विशेष कार्यकारी दंडाधिकारी यांची नियुक्ती जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी जितेंद्र पापळकर यानी फौजदारी प्रक्रिया संहिता 1973 अन्वये नियुक्ती केली आहे. 

हिंगोली शहर पोलीस स्टेशनसाठी उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी उमाकांत पारधी, कळमनुरी पोलीस स्टेशनसाठी कळमनुरीच्या तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी सुरेखा नांदे यांची, बाळापूर पोलीस स्टेशनसाठी कळमनुरी येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार पाठक यांची, हिंगोली ग्रामीण पोलीस स्टेशनसाठी हिंगोली तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी नवनाथ वगवाड, गोरेगाव पोलीस स्टेशनसाठी सेनगाव येथील महसूल विभागाचे नायब तहसीलदार डी. के. गायकवाड यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

वरील नियुक्ती केलेल्या दंडाधिकाऱ्यांनी त्यांच्या नावासमोर दर्शविलेल्या कार्यक्षेत्राच्या हद्दीत दि. 11 नोव्हेंबर, 2022 ते दि. 15 नोव्हेंबर, 2022 रोजी पर्यंत विशेष कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नेमणूक केली आहे. तसेच उपविभागीय अधिकारी तथा उपविभागीय दंडाधिकारी यांनी नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या उपविभागावर दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावे. तहसीलदार तथा तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांनी त्यांना नेमून दिलेल्या पोलीस स्टेशनशिवाय त्यांच्या तालुक्यात कार्यकारी दंडाधिकारी म्हणून नियंत्रण ठेवावेत, असे आदेश दिले आहेत.                                               

*****

 

हिंगोली ग्रंथोत्सव-2022 च्या अनुषंगाने समन्वय समितीची बैठक संपन्न

 



हिंगोली (जिमाका), दि. 07 :  हिंगोली ग्रंथोत्सव-2022 च्या अनुषंगाने समन्वय समितीची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकतीच संपन्न झाली.

यावेळी हिंगोली ग्रंथोत्सव दि.19 व 20 नोव्हेंबर, 2022 या कालावधीत कै. र. रा. बियाणी नूतन साहित्य मंदीर वाचनालय हिंगोली येथे होणार असल्याचे सांगितले. ग्रंथोत्सवास सर्व शाळा, महाविद्यालये, रसिक, वाचक मंडळी व सर्व जनतेने या ग्रंथोत्सवामध्ये उत्साहाने सहभागी होऊन लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

या समन्वय समितीच्या बैठकीस हिंगोली जिल्हा ग्रंथालय संघाचे अध्यक्ष खंडेराव सरनाईक, मसाप शाखा हिंगोलीचे अध्यक्ष जेष्ठ साहित्यिक अशोक अर्धापूरकर, जिल्हा माहिती अधिकारी यांचे प्रतिनिधी व माध्यमिक शिक्षणाधिकारी यांचे  प्रतिनिधी,  जिल्हा ग्रंथालय अधिकारी आशिष ढोक, मिलींद सोनकांबळे उपस्थित होते.

*****

 

बाल न्याय यंत्रणेच्या संगणकीय प्रणालीबाबत एक दिवशीय प्रशिक्षण संपन्न



 

हिंगोली (जिमाका), दि. 07 :  बाल न्याय (मुलांची काळजी व सरंक्षण) अनिधनियम, 2015 ची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी मा.उच्च न्यायालय बाल न्याय समितीने महिला व बाल विकास विभागास Juvenile Justice Information System Portal ही संगणकीय प्रणाली तयार करण्याचे आदेश होते. त्याअनुषंगाने महिला व बालविकास अधिकारी विठ्ठल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या अध्यक्षतेखाली बाल न्याय यंत्रणेची संगणकीय प्रणाली कार्यान्वित करण्यासाठी हिंगोली जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशन येथील कर्मचाऱ्यांना जिल्हा बाल संरक्षण कक्षातील जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी जरीबखान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, बाल न्याय मंडळाचे डाटा एंट्री ऑपरेटर नितीन तपासे इत्यादीने प्रशिक्षण दिले.

यामध्ये जिल्ह्यातील विधी संघर्षग्रस्त बालका संबंधित असलेली संपूर्ण माहिती Juvenile Justice Information System Portal वर कशा प्रकारे अचूक भरावी या संदर्भात प्रात्यक्षिकासहीत संपूर्ण माहिती देण्यात आली. हे प्रशिक्षा पोलीस अधीक्षक कार्यालय येथे आयोजित करण्यात आले होते.

जिल्ह्यातील सर्व पोलीस स्टेशनमधील अधिकारी, कर्मचारी या प्रशिक्षणास उपस्थित होते. सहायक पोलीस निरीक्षक विशाखा धुळे , महिला पोलीस हेड कॉन्स्टेबल सुनिता शिंदे, स्वाती डोलारे यांच्या सहकार्याने हे प्रशिक्षण यशस्वीरित्या संपन्न झाले.

****

01 November, 2022

 

निवृत्ती/कुटुंब निवृत्ती वेतनधारकांनी

हयातीचे प्रमाणपत्र सादर करण्याचे आवाहन

 

              हिंगोली (जिमाका), दि. 01 : महाराष्ट्र कोषागार नियम, 1968 च्या नियम 335 नुसार निवृत्ती/ कुटुंब निवृत्तीवेतन धारकांना दरवर्षी दि. 1 नोव्हेंबर रोजीचा हयातीचा दाखला सादर करावा लागतो. हा हयातीचा दाखला मुख्यत: संबंधित निवृत्ती/कुटुंब निवृत्तीवेतन धारक ज्या बँकेतून निवृत्ती वेतन घेतात, त्या बँकेमार्फत जिल्हा कोषागारात सादर केला जातो.

             निवृत्ती, कुटुंब निवृत्तीवेतन धारकांनी हयातीचा दाखला सादर करण्यासाठी संबंधितांच्या बँकेशी संपर्क करावा, असे आवाहन कोषागार अधिकारी, हिंगोली यांनी सर्व राज्य शासकीय निवृत्ती वेतनधारकांना केले आहे.

तसेच राज्य शासनाच्या धोरनानुसार अधिकाधिक निवृत्ती वेतन / कुटुंब निवृत्ती वेतनधारक यांनी ‘जिवणप्रमाणपत्र प्रणालीमार्फत’ डिजीटल लाईफ सर्टिफिकेट देण्यात यावे. डिजीटल लाईफ  सर्टिफिकेट देताना निवृत्ती वेतन/कुटुंब निवृत्ती धारक यांनी बँक खाते, पीपीओ क्रमांक व Sactioning Authority-State Government of Maharashtra, Disbursing Authority- Maharahstra state Tresury मध्ये हिंगोली या कोषागाराचे नाव अचुक निवडण्याचे आवाहनही प्रसिध्दीपत्रकान्वये करण्यात आले आहे.

 

*****