01 August, 2023

डीटीपी, टॅली या विषयावर मोफत प्रशिक्षणाचे आयोजन

5 ऑगस्ट पर्यंत नाव नोंदणी करण्याचे आवाहन

 

 

हिंगोली, (जिमाका) दि. 01  :  येथील जिल्हा उद्योग केंद्र व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राच्या वतीने औंढा नागनाथ तालुक्यातील अनुसूचित जमाती (एसटी) प्रवर्गातील युवक, युवती व महिलासाठी डीटीपी, टॅली या विषयावर मोफत प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

यासाठी उमेदवार हा किमान 10 वी पास असावा, वय 18 ते 45 वर्षे यादरम्यान असावे. तसेच जात प्रमाणपत्र, आधार कार्ड, पासपोर्ट फोटो, टीसी, गुणपत्रक, बँक पासबूक जमा करुन आपली नाव नोंदणी दि. 5 ऑगस्ट, 2023 पर्यंत करावेत. नाव नोंदणीसाठी व अधिक माहितीसाठी सिध्दार्थ थोरात (मो.9552183038), कार्यक्रम आयोजक महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, द्वारा जिल्हा उद्योग केंद्र, एस-12, प्रशासकीय इमारत, जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. के. कादरी व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्राचे प्रकल्प अधिकारी सुधीर आठवले यांनी केले आहे.    

***** 


 

आदिवासी लाभार्थ्यांनी त्रुटीची पूर्तता करण्यासाठी फोन लावत असल्यास

तात्काळ प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 :  न्युक्लिअस बजेट योजनेंतर्गत प्रकल्प कार्यालयाच्या स्तरावरुन राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांच्या त्रुटीच्या याद्या प्रसिध्द करण्यात आलेल्या होत्या. त्रुटीची माहिती लाभार्थ्याना व्यापक स्वरुपात व्हावी या उद्देशाने या त्रुटीच्या याद्या सोशल मिडियावर प्रसिध्द करण्यात आल्या होत्या.

काही ठिकाणावरुन लाभार्थ्यांना त्रुटीची पूर्तता करणे, निवड करुन देणे, जीएसटी बील देणे याबाबत कोणी फोन लावत असल्याचे निदर्शनास आले आहे. याबाबत कोणी फोन लावत असतील तर याबाबत तात्काळ प्रकल्प कार्यालयाशी संपर्क साधावा. लाभार्थ्यांनी या अमिषाला बळी पडू नये. जर आपण प्रकल्प कार्यालयाशी संपर्क न साधता परस्पर कोणताही व्यवहार केल्यास हे कार्यालय जबाबदार राहणार नाही, असे आवाहन प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी  विकास प्रकल्प, कळमनुरी जि. हिंगोली यांनी केले आहे.

****

 

पशुपालकांनी पावसाळ्यात पशुधनाची अशी घ्यावी काळजी

पशुधनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावे

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : नुकताच पाऊस पडून गेला आहे. सर्व शेतकऱ्यांची पेरणी झाली आहे. शेतामध्ये पेरणीसाठी आणलेल्या बियाणांच्या पाकिटामध्ये  असलेले बुरशीनाशक बरेच शेतकरी शेतामध्ये, बांधावर उघड्यावर फेकून देतात. शेतामध्ये तणनाशक फवारणी करतात. तसेच फवारणीचे औषधीची डब्बे काही शेतामध्ये पाण्याजवळ फेकून देतात. त्यामुळे बरेच वेळेस पशुधनाच्या जिवितास धोका निर्माण होऊ शकतो. त्यामुळे खालील उपाययोजना कराव्यात जेणे करुन पशुधनाची जिवित हानी टाळता येऊ शकेल.

काय करावे :

1) पशुधनाला वेळेवर व नियमित मान्सून पूर्व लसीकरण जसे की घटसर्प, फऱ्या, आंत्रविषार रोगाचे प्रतिबंधात्मक लसीकरण पशुवैद्यकीय दवाखान्यामार्फत करुन घ्यावे.

2) जनावरांना वेळोवेळी जंतनाशक औषधी पाजावी जेणेकरुन त्यांची रोग प्रतिकार क्षमता वाढण्यास मदत होईल.

3) बाह्य परोपजीवी जसे गोचीड व गोमाशा यांच्यापासून जनावरांचे संरक्षण करण्यासाठी गोठा कोरडा व स्वच्छ ठेवावा.

4) गोठ्यामध्ये करंज तेल, कापूर, निलगिरी तेल, कडूलिंब तेल साबनाचा फेस असलेल्या पाण्यात टाकून फवारणी केल्यास त्यांच्या वासाने बाह्य परोपजीवी जसे की गोमाशा, डास यांचा वावर कमी होवू शकतो.

5) जिल्हा आपती व्यवस्थापन, ग्रामपंचायत, तलाठी कार्यालय यांच्याकडून वेळोवेळी प्राप्त सुचनाचे पालन करुन हवामानाचा अंदाज अद्यावत ठेवावा. तसेच स्थानिक वर्तमानपत्र, रेडिओ, दूरचित्रवाणी यांच्याकडून सूचनाकडे लक्ष ठेवावे,

6) पावसाळ्यात अतिवृष्टीच्या काळात नदीपात्राच्या जवळ असलेले जनावरे तेथे न बांधता अशा वेळी शक्यतो उंचावर तात्पुरत्या निवारामध्ये जिथे पाणी पातळी वाढली तरी गोठ्यात पाणी येणार नाही अशा ठिकाणी बांधावीत.

7) अतिवृष्टीचा इशारा असल्यास जनावरे विशेषत: नदीपात्राजवळ चरण्यास सोडू नये.

8)  पशुखाद्य वैरणीची साठवणूक करुन ठेवावी, वैरण पावसाने भिजणार नाही अशा कोरड्या ठिकाणी सुरक्षित ठेवावे. साठविलेल्या पशुखाद्यास अथवा वरणीस बुरशी लागणार लागणार नाही याची खात्री करावी.

9) गोठ्यातील विद्युत उपकरणे, कडबा कुट्टी है सुरक्षित असल्याची खात्री करावी. कुठेही विद्युत तारा खुल्या नसल्याची खबरदारी घ्यावी. गोठ्यामध्ये जनावरे दाटीवाटीने बांधू नये.

10) नदीपात्रा लगतच्या रस्त्यावर पाणी धोकादायक पातळीवर असेल तर अशा रस्त्यावर बैलगाडी, जनावरे यांची वाहतूक करणे टाळावे.

11) जनावरांना नैसर्गिकरित्या पाण्यात पोहता येवू शकत असल्याने पूर परिस्थिती वाटल्यास गोठ्यातील जनावरांना दावणीस बांधून ठेवू नये. त्यांना गोठ्यात खुले सोडावे.

12) चांगले व स्वछ पाणी पशुधनास पिण्यास द्यावे. त्यामुळे पशुधनास कोणतेही आजार होणार नाहीत.

13) मृत जनावरांची विल्हेवाट लावताना ती जागा पाण्याचा स्त्रोत सार्वजनिक ठिकाणापासून दूर व संरक्षित असावी आणि तेथे यासंबंधीच्या आवश्यक माहितीचा फलक असावा. याबाबतीत स्थानिक प्रशासनाच्या निदेशाचे पालन करावे. आपत्कालीन परिस्थितीसाठी पूर्वतयारी करावी.

14) डासाच्या नियंत्रणासाठी रोज संध्याकाळी  कडू लिंबाच्या पानाचा धूर करावा जेणेकरुन डास पळून जातील . घरात व गोठ्यात डास येणार नाहीत. पशुधनाला पायातीत चिखल्या होऊ नये म्हणून यांना कोरड्या जागी  बांधावे. साप, विंचू चावल्यास तात्काळ पशुवैद्यकामार्फत उपचार करुन घ्यावेत,

काय करु नये :

1) पेरणी झाल्यावर शेतामध्ये बियाण्याच्या पाकिटांमधील बुरशीनाशक थायरमची पुडी उघड्यावर फेकू नये.

2) तणनाशक फवारणी झालेल्या शेतात शेळ्या मेंढ्या पशुधन चरण्यास नेऊ नयेत. फवारणी औषधाचे रिकामे डब्बे पाण्याच्या स्त्रोताजवळ ठेवू नयेत.

3) पावसामध्ये ओल्या ठिकाणी जनावरांना विद्युत खांबांना, डीपीजवळ चरावयास बांधू नये. पावसाने भिजलेली वैरण पशुखाद्य जनावरास देऊ नये.

            4) अतिवृष्टी पूर परिस्थितीमध्ये नदीपात्राजवळ जनावरे चरावयास सोडू नयेत. अतिवृष्टीच्या इशाराकडे दुर्लक्ष करु नये.

            5) मूत जनावरांची विल्हेवाट नियमित चराऊ कुरणाच्या ठिकाणी करु नये, ज्वारीचे लहान लहान फुटवे खाल्यामुळे विषबाधा होऊ शकते. त्यामुळे अशा ठिकाणी पशुधनाला चरावयास सोडू नये. गोचीड प्रतिबंधात्मक फवारणीचे औषध पशुधनाच्या जवळ ठेवू नये.

            6) हळदी मधील कोवळे नीळ फुली गवत पशुधनास खायला देवू नये,  जनावरांना पायातील चिखल्या व निमोनिया होवू नये म्हणून ओल्या ठिकाणी किंवा पाणी साचलेल्या ठिकाणी जनावरांना बांधू नये.

कोणत्याही पशुधनाच्या आपत्कालीन परिस्थितीमध्ये नजीकच्या पशुवैद्यकीय दवाखान्याशी संपर्क करावा, असे आवाहन पशुसंवर्धन विभाग हिंगोलीच्या वतीने जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. मधुसूदन रत्नपारखी व जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी डॉ. सखाराम खुने यांनी केले आहे.

*****

 गणेशोत्सवात उत्कृष्ट सार्वजनिक मंडळाना पुरस्कार देण्यासाठी स्पर्धेचे आयोजन

जिल्ह्यातील सर्व गणेश मंडळांनी स्पर्धेत सहभागी होण्यासाठी अर्ज करावेत

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : यावर्षी दि. 19 सप्टेंबर, 2023 पासून सुरु होणाऱ्या गणेशोत्सवात राज्यातील उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून पुरस्कार देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. या पुरस्काराची निवड करण्याची कार्यपध्दती पुढीलप्रमाणे आहे.

या स्पर्धेत धर्मादाय आयुक्त यांच्याकडे नोंदणी केलेल्या किंवा स्थानिक पोलिसांकडे परवानगी घेतलेल्या किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यांची परवानगी घेतलेल्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाना सहभागी होता येईल. दि. 4 जुलै, 2023 च्या शासन निर्णयात नमूद निकषांची पूर्तता करणाऱ्या, करु शकणाऱ्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने करावयाच्या अर्जाचा नमूना या शासन निर्णयासोबतच्या परिशिष्ट अ येथे आहे. सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, मुंबई यांच्या mahotsav.plda@gmail.com या ई-मेलवर दि. 5 सप्टेंबर, 2023 पूर्वी ऑनलाईन अर्ज करावेत. शासन निर्णयात नमूद निकषाची पूर्तता केलेल्या जिल्ह्यातून एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाची जिल्हास्तरीय समितीकडून शिफारस करण्यात येईल. राज्यातील पहिल्या तीन विजेत्या सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना राज्य शासनाकडून प्रथम 5 लाख रुपये, द्वितीय अडीच लाख रुपये आणि तृतीय क्रमांकास एक लाख रुपयाचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

राज्य समितीकडे जिल्हास्तरीय समितीने निवड केलेल्या वरीलप्रमाणे तीन विजेत्या गणेशोत्सव मंडळांना वगळून राज्यातील प्रत्येकी एका सार्वजनिक गणेशोत्सव मंडळास राज्य शासनाकडून प्रत्येकी 25 हजार रुपयांचे पारितोषिक व प्रमाणपत्र देऊन गौरव करण्यात येणार आहे.

हिंगोली जिल्ह्यातील सर्व सार्वजनिक गणेश मंडळांनी दि. 4 जुलै, 2023 च्या शासन निर्णयाचे अवलोकन करुन मोठ्या प्रमाणात स्पर्धेत सहभाग नोंदविण्याचे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे.

*****

 जिल्हा रुग्णालयात जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : राष्ट्रीय आरोग्य अभियांनातर्गत राष्ट्रीय व्हायरल हिपॅटायटीस नियंत्रण कार्यक्रम (NVHCP) महाराष्ट्रातील सर्व जिल्हयामध्ये सुरु करण्यात आलेला आहे. या कार्यक्रमांतर्गत राज्यात 4 आदर्श उपचार केंद्र (Model Treatment Center) व 32 उपचार केंद्र (Treatment Center) याची उभारणी करण्यात आलेली आहे. सदर केंद्रामार्फत Hepatitis रुग्णांची तपासणी व औषधोपचार उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.

हिपॅटायटीस या आजाराबददल समाजामध्ये जागरुकता निर्माण होण्यासाठी दरवर्षी 28 जुलै रोजी जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा केला जातो. या अनुषंगाने हिंगोली जिल्हा रुग्णालयात जागतिक हिपॅटायटीस दिन दि. 28 जुलै 2023 रोजी करण्यात आला.

यामध्ये जिल्हा रुग्णालयातील Health Care Worker (HCW) यांना Hepatitis B चे लसीकरण करण्यात आले आहे. गरोदार माता व इतर रुग्णांची Hepatitis B & C तपासणी करण्यात आली आहे, जागतिक हिपॅटायटीस दिनानिमित्त जनजागृती  रॅली काढण्यात आली. यामध्ये शासकीय नर्सिंग कॉलेजच्या सर्व प्रशिक्षणार्थीनी  सहभाग नोंदविला आहे. जागतिक हिपॅटायटीस दिन साजरा करण्यासाठी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी मोलाचे मार्गदर्शन केले.

या रॅलीस हिवरा झेंडा दाखविण्यासाठी अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दिपक मोरे, निवासी वैद्यकीय अधिकारी (बा.सं.) डॉ. विठ्ठल करपे, बालरोग तज्ञ डॉ गोपाल कदम, पॅथालॉजीस्ट डॉ. सुनिल पाटील, डिईआयसीचे  बालरोग तज्ञ डॉ. स्नेहल नगरे, अधिसेविका लतिफाबानो राठोडे , महा. अधिसेविका आशा क्षीरसागर, नर्सिंग कॉलेजच्या प्राचार्य कविता भालेराव, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, रक्त पेढी तंत्रज्ञ माधव मोहिते, संजय पवार, वर्षा खंदारे, कुलदिप कांबळे, अनिता चव्हाण, अनुराधा पथरोड, सुरेखा इंगोले, पुण्यरथा कांबळे यांच्या उपस्थितीत पूर्ण करण्यात आले. हे शिबीर यशस्वी करण्यासाठी गाभणे लक्ष्मण (NVHCP जिल्हा समन्वयक ), व्ही. एस. आंबटवार (प्रयोग शाळा तंत्र) डिईआयसी कार्यक्रमातील कार्यालयीन कर्मचारी व रुग्णालयीन अधिपरिचारीका इ. यांनी परिश्रम घेतले.

हिंगोली जिल्ह्यातील जनतेला या कार्यक्रमामार्फत दैनदिन जीवनात वावरतांना हिपॅटायटीस आजारासंदर्भात वेळोवेळी Hepatitis B & C रक्त तपासणी करावी व Hepatitis या आजाराचे लसीकरण करुन घ्यावे, असे आवाहन डॉ. नितीन तडस, जिल्हा शल्यचिकित्सक, जिल्हा रुग्णालय, हिंगोली यांचाकडून करण्यात आले आहे.

******

 

जिल्ह्यातील सर्व नवउद्योजकांनी निर्यातीमध्ये वृध्दी करुन

हिंगोली जिल्हा एक्सपोर्ट हब म्हणून विकसित करावा

- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे आवाहन



 

 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : जिल्ह्यातील सर्व नवउद्योजक, निर्यातदार, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी यांनी या कार्यशाळेचा लाभ घेऊन आपल्या निर्यातीमध्ये वृध्दी करावी व हिंगोली जिल्हा एक्सपोर्ट हब म्हणून विकसित करावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी समारोपीय भाषणात केले.

हिंगोली जिल्हयातील उद्योजक, निर्यातदार, फार्मर प्रोड्युसर कंपनी यांच्या निर्यात क्षमता वृध्दीसाठी वाणिज्य व उद्योग मंत्रालय भारत सरकार यांच्यामार्फत निर्यातबंधू योजनेअंतर्गत एकदिवशीय जिल्हास्तरीय कार्यशाळा  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षेतेखाली  व नागपूरच्या  विदेश व्यापार महानिदेशालयाच्या (DGFT ) सहाय्यक महासंचालक स्नेहल ढोके यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये दिनांक 31 जुलै, 2023  रोजी येथील जिल्हा नियोजन सभागृहात घेण्यात आली. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे, पोस्टाचे डाक अधीक्षक मोहम्मद खदीर, बँक ऑफ महाराष्ट्राचे रतन मंडल, हिमांशू सिंग, जिल्हा औद्योगिक संघटनेचे अध्यक्ष ज्ञानेश्वर मामडे, प्रवीण सोनी, जिल्हा ॲग्रणी बँकेचे अधिकारी धनाजी बोईले,  आयसीआयबीचे उपाध्यक्ष राजन ठक्कर, संस्थापक अध्यक्ष सौम्य अग्रवाल, नांदेड उपविभागीय अधिकारी कार्यालयाचे व्यवस्थापक जितेंद्र देशमुख आदी उपस्थित होते.

विदेश व्यापार निदेशालयाच्या सहायक महासंचालक स्नेहल ढोके यांनी DEH (DISTRICT EXPORT HUB) चे महत्व स्पष्ट केले. त्यांचे सादरीकरण सोपे आणि विशेषतः नवीन निर्यातदारासाठी केंद्रीत आहे. स्थानिक उद्योजकांना निर्यातीसाठी प्रोत्साहन देण्याचा हेतू आहे. यावेळी श्रीमती ढोके यांनी DGFT नागपूरच्या व्हीसी लिंक बद्दल देखील सांगितले. ज्याद्वारे निर्यातदार आणि नवीन येणाऱ्यांचे प्रश्न थेट DGFT द्वारे सोडविले जाऊ शकतात. स्थानिक निर्यातदारासमोरील आव्हानावर चर्चा करण्यात आली आणि भविष्यातही असे वर्कशॉप होणार आहेत, असे श्रीमती ढोके यांनी यावेळी सांगितले.

यावेळी पोस्ट खात्याचे परभणी विभागाचे अधीक्षक मोहम्मद खदीर यांनी पोस्ट खात्यामार्फत निर्यातदारांसाठी असणाऱ्या योजना बाबतच्या माहितीचे सादरीकरण केले. तसेच बँक ऑफ महाराष्ट्रचे एजीएम रतन मंडल व क्षेत्रीय अधिकारी हिमांशु सिंग यांनी निर्यातदारांसाठी बँकेकडून देण्यात येणाऱ्या योजनांची माहिती दिली.

या कार्यशाळेत IEC रजिस्ट्रेशन करण्याबाबतचे व्हिडीओ सादरीकरण, MSME च्या योजना Custom नियमावली, ROLE OF CHA (Customs House Agent), DGFT मार्फत निर्यातदारांना देण्यात येणाऱ्या योजना/ अनुदान, E-COMMERCE बाबत सविस्तर सादरीकरण केले.

कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी  DGFT नागपूरचे प्रतिक गजभिये,  जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक एस. ए. कादरी व सर्व अधिकारी कर्मचारी यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन DGFT च्या सोनाली मोराई यांनी केले. कार्यक्रमास जिल्ह्यातील सर्व उद्योजक, निर्यातदार, फार्मर प्रोड्युसर कंपनीचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

******

 

जिल्हाधिकारी कार्यालयात साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 01 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आज साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती साजरी करण्यात आली.  याप्रसंगी  जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन केले.

            यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी दिलीप कच्छवे, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपजिल्हाधिकारी संतोष राऊत, उपविभागीय अधिकारी सचिन खल्लाळ यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी-कर्मचारी यांनी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करुन अभिवादन केले.

******