04 June, 2026

जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक संपन्न

 


 

* एचआयव्ही संसर्ग प्रतिबंधासाठी तपासणी व उपचार सेवांवर भर : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता

 

 


हिंगोली (जिमाका), दि. 04 : जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाली. बैठकीत जिल्ह्यातील एचआयव्ही/एड्स प्रतिबंध, तपासणी व उपचार कार्यक्रमाच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेण्यात आला.

यावेळी प्रभारी जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नामदेव पवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, जिल्हा महिला व बाल संरक्षण अधिकारी श्रीमती कोरडे, समाज कल्याण विभागाच्या श्रीमती पी. पी. गीते, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठुळे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

या बैठकीत जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी राष्ट्रीय एड्स नियंत्रण कार्यक्रमांतर्गत निर्धारित पहिले 95 टक्के उद्दिष्ट साध्य करण्यासाठी अतिजोखीम गटातील व्यक्तींची एचआयव्ही तपासणी वाढविण्याच्या सूचना त्यांनी दिल्या. तसेच सर्व गर्भवती महिलांची एचआयव्ही, गुप्तरोग (सिफिलिस) व काविळ यांची नियमित तपासणी करण्याचे निर्देश दिले. खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांकडे एआरटी उपचार घेणाऱ्या रुग्णांची माहिती संकलित करण्याबाबतही त्यांनी सूचना केल्या. जिल्हा आरोग्य अधिकारी यांनी एचआयव्ही, सिफिलिस व काविळ तपासणीसाठी आवश्यक किट्स उपलब्ध करून देण्याबाबत कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.

जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही/एड्स कार्यक्रमाचा अहवाल सादर केला. त्यांनी सांगितले की, हिंगोली जिल्ह्यात सन 2002 पासून आतापर्यंत सामान्य गटातील 4 हजार 304 रुग्णांची व 288 गर्भवती महिलांची नोंद झाली आहे. एकूण 3 हजार 471 रुग्णांची एआरटी केंद्रात नोंदणी करण्यात आली असून त्यापैकी 2 हजार 25 रुग्णांवर सध्या औषधोपचार सुरू आहेत.

एप्रिल 2025 ते मार्च 2026 या कालावधीत 24 हजार 944 व्यक्तींची एचआयव्ही तपासणी करण्यात आली असून त्यामध्ये 75 व्यक्ती एचआयव्ही संसर्गित आढळून आल्या आहेत. तसेच 28 हजार 351 गर्भवती महिलांची तपासणी करण्यात आली असून त्यापैकी 7 नवीन तर 17 पूर्वीपासून एचआयव्ही संसर्गित असल्याचे निदर्शनास आले आहे.

 

एचआयव्ही संसर्गित मातांच्या 16 बालकांचे 18 महिन्यांनंतरचे तपासणी अहवाल निगेटिव्ह आले असून सन 2018-19 पासून आजपर्यंत तपासणी करण्यात आलेली सर्व 94 बालके एचआयव्ही निगेटिव्ह असल्याची माहितीही यावेळी देण्यात आली.

एचआयव्हीसह जीवन जगणाऱ्या व्यक्ती तसेच देहविक्रय करणाऱ्या महिलांना बाल संगोपन योजना, संजय गांधी निराधार योजना, रेशन कार्ड, बस पास, घरकुल योजना, मतदान ओळखपत्र आदी विविध शासकीय योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला जात असल्याची माहितीही बैठकीत देण्यात आली.

बैठकीचा समारोप उपस्थितांचे आभार मानून करण्यात आला.

******

अमृत पर्यटन उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रमाचा लाभ घ्या पर्यटन क्षेत्रातील उद्योजक व युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी

 


 

 

हिंगोली (जिमाका), दि. 04 : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था ‘महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी’ (अमृत) यांच्या वतीने राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत पर्यटन’ उपक्रमांतर्गत पर्यटन क्षेत्राशी संबंधित उद्योजक, व्यावसायिक व नवउद्योजकांसाठी उद्योजकता कौशल्य विकास कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पर्यटन क्षेत्राशी संबंधित सर्व उद्योजक, व्यावसायिक तसेच इच्छुक युवक-युवतींनी या उपक्रमाचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

महाराष्ट्रातील पर्यटन क्षेत्राला चालना देणे, स्थानिक रोजगार निर्मितीला प्रोत्साहन देणे तसेच पर्यटनाशी संबंधित उद्योजकांना सक्षम करणे या उद्देशाने ‘अमृत पर्यटन’ हा महत्त्वाकांक्षी उपक्रम राबविण्यात येत आहे. या उपक्रमाच्या माध्यमातून राज्यातील पर्यटन स्थळे, पर्यटन सेवा, स्थानिक उत्पादने आणि पर्यटन व्यवसायांना नव्या संधी उपलब्ध करून देण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे.

पर्यटन क्षेत्र हे देशातील सर्वाधिक वेगाने विकसित होणाऱ्या क्षेत्रांपैकी एक असून, व्यवसाय विस्तार, रोजगारनिर्मिती आणि आर्थिक विकासाच्या दृष्टीने या क्षेत्रात मोठ्या संधी उपलब्ध आहेत. या संधींचा लाभ अधिकाधिक उद्योजकांना मिळावा तसेच त्यांना आधुनिक व्यवसाय व्यवस्थापनाचे कौशल्य आत्मसात करता यावे, यासाठी या विशेष प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

या कार्यक्रमात टूर अँड ट्रॅव्हल्स व्यावसायिक, पर्यटक मार्गदर्शक (टुरिस्ट गाईड्स), कुक अँड केटरर्स, होमस्टे व रिसॉर्ट संचालक, पर्यटन सेवा पुरवठादार, धार्मिक व सांस्कृतिक पर्यटनाशी संबंधित उद्योजक तसेच पर्यटन क्षेत्रात नवीन व्यवसाय सुरू करू इच्छिणारे युवक-युवती सहभागी होऊ शकतात.

प्रशिक्षणादरम्यान व्यवसाय उभारणी व विस्तारासाठी आवश्यक मार्गदर्शन, प्रभावी व्यवसाय नियोजन, आधुनिक विपणन तंत्रज्ञान, डिजिटल मार्केटिंग, ग्राहक व्यवस्थापन, आर्थिक नियोजन, ब्रँडिंग, पर्यटन क्षेत्रातील नव्या व्यावसायिक संधी तसेच शासनाच्या विविध योजना व सहाय्य योजनांची सविस्तर माहिती देण्यात येणार आहे. याशिवाय पर्यटन क्षेत्रातील अनुभवी तज्ज्ञ आणि यशस्वी उद्योजकांकडून प्रत्यक्ष अनुभवाधारित मार्गदर्शनही उपलब्ध करून देण्यात येणार आहे.

‘अमृत पर्यटन’ उपक्रम हा पर्यटन क्षेत्रात स्वयंरोजगाराला प्रोत्साहन देणे, नवउद्योजकांना सक्षम करणे आणि पर्यटन व्यवसाय अधिक व्यापक स्वरूपात विकसित करणे या उद्देशाने राबविण्यात येत आहे. अधिक माहितीसाठी 7391065471 या संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

****** 

जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करा - जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे निर्देश

 



 

हिंगोली (जिमाका), दि. 4 : जिल्ह्यातील सर्व यंत्रणांनी जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत चालू आर्थिक वर्षातील कामांचे प्रस्ताव तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित जिल्हा नियोजन समितीच्या आढावा बैठकीत ते बोलत होते.

या बैठकीस जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा नियोजन अधिकारी अनिता लव्हारे, सहायक जिल्हा नियोजन अधिकारी ग. गो. चितळे, प्रदीप नळगीरकर, समाज कल्याणच्या सहायक आयुक्त गीता गुठ्ठे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. गुप्ता यांनी सांगितले की, सन 2026-27 च्या निधी मागणी प्रस्तावांसोबत युआयडी देणे बंधनकारक असून, काम सुरू करण्यापूर्वीचे जीओ-टॅग छायाचित्र अपलोड करणे आवश्यक आहे. त्यामुळे सर्व यंत्रणांनी त्यांच्या कामांचे युआयडी तयार करून प्रस्ताव सादर करावेत. तसेच चालू वर्षातील तांत्रिक मान्यतेचे प्रस्ताव तातडीने सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी दिल्या.

जनसुविधा व नागरी सुविधा योजनेंतर्गत स्मशानभूमीची कामे प्राधान्याने प्रस्तावित करावीत. शिक्षण विभागाने आदर्श शाळा योजनेसाठी पात्र शाळांची यादी तयार करून प्रस्ताव पाठवावेत. क्रीडा विभागाने व्यायामशाळा व क्रीडांगण विकासाची कामे दर्जेदार पद्धतीने पूर्ण करण्यासाठी ग्रामीण भागातील कामे जिल्हा परिषद बांधकाम विभागामार्फत तर नागरी भागातील कामे संबंधित मुख्याधिकाऱ्यांमार्फत करावीत, असे त्यांनी सांगितले.

सार्वजनिक आरोग्य विभागाने औषध खरेदी करताना उपलब्ध शिल्लक साठा, वापर आणि आवश्यकतेचा आढावा घेऊन सविस्तर प्रस्ताव सादर करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी दिले.

यावेळी सार्वजनिक बांधकाम, क्रीडा, शिक्षण, आरोग्य, नगर विकास, कौशल्य विकास, पशुसंवर्धन, मत्स्यविकास, ग्रामविकास आदी विभागांच्या कामांचा सविस्तर आढावा घेण्यात आला. तसेच संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना देण्यात आल्या.

राज्य शासनाने हिंगोली जिल्ह्याला आकांक्षित जिल्हा म्हणून घोषित केले असून, जिल्ह्यातील सर्व तालुक्यांचा नियमित आढावा घेऊन शासनाने निश्चित केलेल्या निर्देशांकानुसार प्रभावी कामे करावीत. संबंधित माहिती गुगल शीटवर अपलोड करून सर्व यंत्रणांनी समन्वयाने कार्यवाही करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.

********

03 June, 2026

"शेत वाचवा अभियान"चा हिंगोलीत प्रारंभ; संतुलित खत वापरावर भर

 


हिंगोली (जिमाका), दि. 03 : भारत सरकारच्या कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्रालयाच्या निर्देशानुसार तसेच भारतीय कृषी अनुसंधान परिषद (आयसीएआर) यांच्या समन्वयाने हिंगोली जिल्ह्यात दि. १ ते ३० जून २०२६ या कालावधीत "शेत वाचवा अभियान" राबविण्यात येत असून या अभियानाचा प्रारंभ करण्यात आला आहे. "सुदृढ मृदा – समृद्ध पीक – आनंदी शेतकरी" ही अभियानाची मुख्य संकल्पना असून कृषिविज्ञान केंद्र, हिंगोलीमार्फत जिल्ह्यातील सर्व तालुक्यांमध्ये विविध जनजागृती व प्रात्यक्षिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.


राष्ट्रीय मृदा विज्ञान संस्थेच्या (आयसीएआर-आयआयएसएस) अहवालानुसार हिंगोली जिल्ह्याचा समावेश देशातील उच्च खत वापर आणि मध्यम ते उच्च सुपीकता असलेल्या २४६ जिल्ह्यांमध्ये करण्यात आला आहे. मृदा आरोग्य पत्रिकेतील माहितीच्या विश्लेषणातून जिल्ह्यातील जमिनीत स्फुरदाचे प्रमाण समाधानकारक असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे शेतकऱ्यांनी डाळिंब, सोयाबीन, हळद तसेच इतर पिकांसाठी डीएपी खताचा अवाजवी वापर टाळून संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.


आयसीएआरच्या शिफारशीनुसार रासायनिक स्फुरद खतांच्या वापरात कपात करून पीएसबी (स्फुरद विरघळवणारे जिवाणू) तसेच प्रतिहेक्टरी ५ टन शेणखताचा वापर केल्यास जमिनीची सुपीकता अबाधित राहण्यास मदत होते आणि उत्पादनातही घट होत नाही.


अभियानांतर्गत जिल्ह्यात शेतकरी प्रशिक्षण व प्रात्यक्षिके, सेंद्रिय खते, नॅनो युरिया व नॅनो डीएपीचा वापर, हिरवळीच्या खतांचा प्रसार, नैसर्गिक शेती पद्धतींचे प्रोत्साहन, ग्रामपंचायत स्तरावर "शेत वाचवा समिती" स्थापन करणे, किसान क्रेडिट कार्ड (केसीसी) संपृक्तता मोहीम राबविणे आदी उपक्रम हाती घेण्यात येणार आहेत.


यासोबतच नैसर्गिक शेतीतील जिवामृत, बीजामृत, आच्छादन (मल्चिंग) यांसारख्या तंत्रज्ञानाचा प्रसार करण्यात येणार असून उत्पादन खर्च कमी करण्यासाठी आणि पर्यावरणपूरक शेतीला चालना देण्यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. ग्रामपंचायत स्तरावर सरपंच, प्रगतशील शेतकरी व कृषी अधिकारी यांच्या सहभागातून खतांच्या संतुलित वापराबाबत जनजागृती करण्यात येणार आहे.


हिंगोली जिल्ह्यातील मातीची सुपीकता टिकविणे, शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च कमी करणे आणि शाश्वत शेती पद्धतींचा प्रसार करणे हा या अभियानाचा मुख्य उद्देश आहे. शेतकऱ्यांनी मृदा आरोग्य पत्रिकेनुसार खतांचा वापर करावा तसेच खरीप हंगामाच्या पूर्वतयारीसाठी कृषिविज्ञान केंद्र व कृषी विभागाच्या मार्गदर्शनाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा समन्वयक व वरिष्ठ शास्त्रज्ञ, कृषिविज्ञान केंद्र, हिंगोली यांनी केले आहे.

********

खत-बियाणेच्या लिंकिंगला नाही म्हणा : शेतकऱ्यांनी तक्रारी तत्काळ नोंदवाव्यात

 



हिंगोली (जिमाका), दि. 03 : शेतकरी बांधवांना गुणवत्तापूर्ण व दर्जेदार कृषी निविष्ठा उपलब्ध व्हाव्यात यासाठी कृषी विभागाच्या गुणनियंत्रण विभागामार्फत जिल्ह्यात विशेष लक्ष ठेवण्यात येत आहे. खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांनी बियाणे, खते व कीडनाशके खरेदी करण्यास सुरुवात केली असून कृषी निविष्ठांच्या विक्रीत कोणत्याही प्रकारचे लिंकिंग होऊ नये, असे आवाहन कृषी विभागाने केले आहे.

जिल्ह्यातील कृषी निविष्ठा वितरकांच्या वेळोवेळी बैठका घेऊन खतासोबत इतर कोणत्याही उत्पादनांची किंवा निविष्ठांची सक्तीने विक्री करू नये, असे स्पष्ट निर्देश देण्यात आले आहेत. शेतकरी बांधवांनी देखील खते, बियाणे किंवा इतर निविष्ठा खरेदी करताना आपल्या मागणीनुसारच साहित्य घ्यावे. विक्रेत्यांकडून बळजबरीने इतर उत्पादने देण्याचा प्रयत्न होत असल्यास त्यास ठामपणे नकार द्यावा, असे कृषी विभागाने म्हटले आहे.


अशा प्रकारची घटना निदर्शनास आल्यास संबंधित तालुक्यातील गुणनियंत्रण निरीक्षकांशी संपर्क साधून तक्रार नोंदवावी. हिंगोली तालुक्यासाठी प्रविण मनवर (मो. 7588502060) व पंकज राठोड (मो. 9422815152), कळमनुरी तालुक्यासाठी समीर वाळके (मो. 7841882969) व रामेश्वर गवळी (मो. 7038847393), वसमत तालुक्यासाठी केशव भुक्तरे (मो. 7588522845) व रामेश्वर गवळी (मो. 7038847393), सेनगाव तालुक्यासाठी देवेंद्र देशमुख (मो. 9423129188) व पंकज राठोड (मो. 9422815152), तसेच औंढा नागनाथ तालुक्यासाठी किशोर शेळके (मो. 7798465075) व सुभाष पाचपुते (मो. 8850178461) यांच्याशी संपर्क साधता येईल.


याशिवाय कृषी विभागाच्या टोल फ्री क्रमांक 18002334000 तसेच 8275487400 या क्रमांकांवरही तक्रार नोंदविता येणार आहे. शेतकऱ्यांनी कोणत्याही प्रकारच्या लिंकिंगला बळी न पडता आपल्या हक्काची निविष्ठा मागणीप्रमाणेच खरेदी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.

*******

डीएपी खताला पर्यायी खतांचा वापर करावा - जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांचे आवाहन

 



हिंगोली (जिमाका), दि. 03 : यंदाच्या खरीप हंगामात एल-निनोच्या प्रभावामुळे सरासरीपेक्षा कमी पावसाचा अंदाज वर्तविण्यात आला आहे. त्यामुळे शेतकरी बांधवांनी पुरेसा पाऊस (किमान 100 मिमी) झाल्याशिवाय पेरणीची घाई करू नये, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.


कमी पाऊस अथवा पावसातील खंड यांचा विचार करून शेतकऱ्यांनी खरेदी केलेले बियाणे व खते वाया जाणार नाहीत याची दक्षता घ्यावी. तसेच खतांच्या वापराबाबत केवळ डी.ए.पी. (18:46:0) खतावर अवलंबून न राहता स्फुरदयुक्त पर्यायी खतांचा वापर करावा, असेही त्यांनी सांगितले.


बाजारात डी.ए.पी.ला पर्याय म्हणून विविध स्फुरदयुक्त खते उपलब्ध असून त्यांचा योग्य प्रमाणात वापर केल्यास पिकांना आवश्यक अन्नद्रव्यांचा पुरवठा होऊ शकतो. शेतकऱ्यांनी पिकांच्या गरजेनुसार व मृदा परीक्षणाच्या शिफारशीनुसार संतुलित खत व्यवस्थापन करावे. नत्र, स्फुरद, पालाश तसेच दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचा समावेश असलेल्या खतांचा वापर केल्यास उत्पादनवाढीस मदत होईल.


डी.ए.पी.ला पर्याय म्हणून टी.एस.पी. + युरिया तसेच एस.एस.पी. + युरिया यांचा वापर करता येऊ शकतो. याशिवाय 12:32:16 व 20:20:0:13 ही एन.पी.के. युक्त खतेही पर्यायी स्वरूपात उपलब्ध आहेत.


शेतकरी बांधवांनी उपलब्ध पर्यायी खतांचा वापर करून संतुलित खत व्यवस्थापनाचा अवलंब करावा व खरीप हंगामाची यशस्वी तयारी करावी, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी प्रदीप कच्छवे यांनी केले आहे.


*******

02 June, 2026

खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी भारत पशुधन प्रणालीवर नोंदणी करावी

 


 

·         'गोजातीय प्रजनन व नियमन' विषयावरील राज्यस्तरीय कार्यशाळा संपन्न

 

 

हिंगोली (जिमाका), दि. 2 : राज्यातील खासगी कृत्रिम रेतन  सेवादात्यांनी त्यांच्या कामाची नोंद भारत पशुधन प्रणालीवर करणे आवश्यक असून, या माध्यमातून राज्यातील पशुवैद्यकीय सेवांची संख्यात्मक व अद्ययावत माहिती उपलब्ध होण्यास मदत होणार आहे. परिणामी, पशुवैद्यकीय सेवांचा दर्जा आणि गुणवत्ता अधिक प्रभावीपणे वृद्धिंगत होईल, असे प्रतिपादन आयुक्त पशुसंवर्धन तथा अध्यक्ष, महाराष्ट्र गोजातीय प्रजनन व नियमन प्राधिकरण डॉ. किरण पाटील यांनी केले.

औंध येथील पशुसंवर्धन आयुक्तालयातील कामधेनू सभागृहात 'गोजातीय प्रजनन व नियमन' या विषयावर एकदिवसीय राज्यस्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. डॉ. किरण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या कार्यशाळेस विविध तज्ज्ञ अधिकारी, खासगी सेवा पुरवठादार व संस्थांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांची राज्यात प्रभावी अंमलबजावणी करणे हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. यासोबतच कृत्रिम रेतन सेवा, नॅशनल डिजिटल लाइव्हस्टॉक मिशन अंतर्गत डिजिटल ट्रॅकिंग, तांत्रिक एकत्रीकरण तसेच राज्य व केंद्र शासनाच्या भविष्यकालीन धोरणांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रमाच्या प्रारंभी पशुसंवर्धन विभागाचे सहआयुक्त व प्राधिकरणाचे सदस्य डॉ. देवेंद्र जाधव यांनी प्रास्ताविक केले.

यावेळी मार्गदर्शन करताना डॉ. किरण पाटील यांनी महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन कायदा व नियमांच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी कृत्रिम रेतन सेवा आणि एनडीएलएम आधारित डिजिटल ट्रॅकिंग अत्यावश्यक असल्याचे सांगितले. राज्यामध्ये उच्च उत्पादनक्षम पशुधनाची संख्या वाढविण्यासाठी कृत्रिम रेतन प्रक्रियेत अधिक पारदर्शकता निर्माण करणे गरजेचे असल्याचे त्यांनी नमूद केले. तसेच खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांनी पशुसंवर्धन विभागाच्या सहकार्याने काम करावे आणि विभाग त्यांना सर्वतोपरी मदत करेल, असे आश्वासनही त्यांनी दिले.

कार्यशाळेच्या उत्तरार्धात विविध संस्थांच्या तज्ज्ञांनी तांत्रिक सादरीकरणे केली. बायफ, पुणे येथील डॉ. जयंत खडसे यांनी गोजातीय पैदाशीत बायफच्या अनुभवांवर प्रकाश टाकला. चितळे-एबीएस जेनस प्रा. लि. चे डॉ. परिक्षित देशमुख यांनी 'जेनोमिक्स आणि सेक्स्ड सीमेन' या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून गोवंश उत्पादकता व पैदास सुधारण्याविषयी सविस्तर माहिती दिली.

भारत पशुधन प्रणालीची उपयोगिता व वापर याबाबत सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय डॉ. राजू कोलते यांनी उपस्थित खासगी कृत्रिम रेतन सेवादात्यांना मार्गदर्शन केले. तांत्रिक सत्रानंतर उपस्थित प्रतिनिधी व अधिकाऱ्यांमध्ये विविध विषयांवर चर्चा होऊन अभिप्राय घेण्यात आले.

कार्यक्रमाचा समारोप उपआयुक्त पशुसंवर्धन व दुग्धव्यवसाय तथा महाराष्ट्र गोजातीय प्रजनन नियमन प्राधिकरणाचे सदस्य सचिव डॉ. प्रशांत भड यांच्या आभार प्रदर्शनाने झाला.

******