16 August, 2018

कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री निलंगेकर यांचा हिंगोली जिल्हा दौरा


कौशल्य विकास व उद्योजकता मंत्री निलंगेकर यांचा हिंगोली जिल्हा दौरा

हिंगोली,दि.16: राज्याचे कौशल्य विकास व उद्योजकता, कामगार, भुकंप पुनर्वसन, माजी सैनिक कल्याण मंत्री तथा पालकमंत्री लातूर हे हिंगोली जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे आहे- गुरुवार दिनांक 16 ऑगस्ट 2018 रोजी रात्री 11.00 वाजता हिंगोली विश्रामगृह येथे आगमन व मुक्काम. दिनांक 17 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8.00 वाजता आमदार तान्हाजी मुटकुळे यांची सदिच्छा भेट, सकाळी 09.00 वाजता हिंगोली येथून शासकीय वाहनाने परभणीकडे प्रयाण.
0000

महिला व बाल विकास क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांना बाल न्याय अधिनियम-2015 अंतर्गत नवीन नोंदणी प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ


महिला व बाल विकास क्षेत्रातील स्वयंसेवी संस्थांना बाल न्याय अधिनियम-2015
अंतर्गत नवीन नोंदणी प्रमाणपत्रासाठी मुदतवाढ

        हिंगोली,दि.16: महिला व बाल विकास क्षेत्रात कार्य करणा-या सर्व स्वयंसेवी संस्थाना केंद्र शासनाने दिनांक 1 जानेवारी 2016 पासून बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 आणि या कायद्याच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र  शासनाने महाराष्ट्र राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नियम 2018 लागू केलेले आहेत. या कायद्याच्या कलम 41(1) अंतर्गत विधी संघर्षग्रस्त आणि काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या बालकासाठी कार्यरत व इच्छुक असणाऱ्या सर्व स्वयंसेवी संस्था यांनी महिला व बालविकास विभागा अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे. नोंदणी प्रमाणपत्राशिवाय ज्या संस्था बालकांच्या काळजी व संरक्षणासाठी कार्यरत राहतील अशा अवैध संस्थांवर कायद्यातील कलम 42 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात येणार आहे. सदर गुन्ह्यासाठी कमाल 1 वर्षापर्यत तुंरुगवास व रु.1 लाखापर्यत दंड अथवा दोन्ही शिक्षा देण्याची तरतूद अधिनियमात नमुद करण्यात आली आहे. बालकांच्या काळजी व सरंक्षणाकरिता कार्यरत ( निरीक्षणगृह, विशेषगृह, सुरक्षित जागा बालगृह, खुले निवारागृह ,विशेष दत्त्तक संस्था) तसेच इच्छुक सर्व संस्थांनी बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम 2015 मधील कलम 41 नुसार नोंदणी प्रमाणपत्राचे प्रस्ताव महाराष्ट् राज्य बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) नमुना 27 (नियम 22 (2) आणि 23 (2) नुसार विहित नमुन्यामध्ये अर्ज on-line पध्दतीने https://womenchild.maharashra.gov. in  या संकेतस्थळावर बातम्या आणि सूचना विभागाअंतर्गत दिंनाक 20 मे 2018 पर्यंत सादर करणे बाबत या अगोदर कळविण्यात आले होते .त्यानुसार प्राप्त झालेले Online प्रस्ताव छाननी करुन छाननी प्रपत्रासह प्रस्ताव शासनास सादर करण्यात आले आहेत. नविन प्रस्ताव सादर करण्यासाठी दि.30 ऑगस्ट 2018 पर्यंत  मुदतवाढ देण्यात आली आहे व यापुर्वी सादर करण्यात आलेल्या प्रस्तावामध्ये आढळून आलेल्या त्रुटींची पूर्तता करण्याबाबत सविस्तर सूचना वरील संकेतस्थळावर देण्यात आल्या आहेत.
आयुक्त स्तरावरुन करण्यात आलेल्या नोदणी प्रमाणपत्र प्रस्तावाच्या छाननी पत्राची प्रत महिला व बाल विकास विभागाच्या  www.womenchild.maharashtrah.gov.in  या संकेतस्थळावर बातम्या व सुचना या सदराखाली उपलब्ध करुन देण्यात येत आहेत.ज्या संस्थांनी यापुर्वी Online आणि Offline  नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केलेले आहेत अशा संस्थानी www.womenchild.maharashtrah.gov.in या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आलेल्या आपल्या संस्थेशी संबधित छाननी पत्रात नमुद त्रुटीची पूर्तता करुन अहवाल आयुक्त, महिला व बाल विकास,28 राणीचा बाग,पुणे-411001 यांचेकडे हस्त पोहोच किंवा पोस्टाने दिनांक 30 ऑगस्ट 2018 पर्यंत पाहोचतील या पध्दतीने सादर करावा. कोणत्याही संस्थांना त्रुटीबाबत स्वतंत्रपणे कळविण्यात येणार नाही आणि दिनांक 30 ऑगस्ट 2018 नंतर कोणत्याही संस्थेचा पुर्तता अहवाल स्विकारला जाणार नाही याबाबत नोंद घ्यावी.बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण ) अधिनियम 2015 अंतर्गत नोंदणी प्रमाणपत्र प्रस्ताव सादर करण्याबाबत मुदतवाढ देण्यात आलेली असून ज्या संस्थानी यापुर्वी प्रस्ताव सादर केलेले नाही अशा संस्था दिनांक 30ऑगस्ट 2018 पर्यंत online अर्ज सादर करु शकतील. सदरचा अर्ज शासनाच्या www.womenchild.maharashtrah.gov.in  या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आला आहे. तसेच यापूर्वी दिलेल्या सुचनानुसार नविन अर्ज केलेल्या संस्थांनी online अर्ज सादर केलेनंतर अर्जाची प्रत आवश्यक त्या कागदपत्रासह आयुक्तालयास दिनांक 3 सप्टेंबर 2018 पर्यंत सादर करण्यात यावी.ज्या संस्थांनी यापुर्वी Online आणि Offline नोंदणी प्रमाणपत्रासाठी अर्ज सादर केले होते त्या संस्थेच्या प्रस्तावाच्या छाननी पत्राची प्रत विभागाच्या संकेतस्थळावर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. त्यामध्ये आढळून आलेल्या त्रुटीचा पूर्तता अहवाल दिनांक 30 ऑगस्ट 2018 पर्यन्त आयुक्त महिला व बाल विकास पुणे येथे हस्ते पोहोच अथवा पोस्टामार्फत दिनांक 30 ऑगस्ट 2018 पूर्वी सादर करावा,असे आवाहन व्हि. जी.शिंदे,जिल्हा महिला बाल विकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे.
00000

जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 37.13 मि.मी. पावसाची नोंद


जिल्ह्यात गत 24 तासात सरासरी 37.13 मि.मी. पावसाची नोंद

हिंगोली,दि.16: जिल्ह्यात दिनांक 16 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात एकूण 37.13 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून जिल्ह्यात दिवसभरात सरासरी 55.40 मिलीमीटर पाऊस झाला आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत सरासरी 494.55 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्याच्या वार्षिक सरासरीच्या आज अखेर  55.40 टक्के इतकी पावसाची नोंद झाली आहे.
जिल्ह्यात दिनांक 16 ऑगस्ट 2018 रोजी सकाळी 8 वाजेपर्यंत मागील 24 तासात झालेला पाऊस मिलीमीटरमध्ये तालुकानिहाय पुढीलप्रमाणे (कंसात आतापर्यंतचा एकूण पाऊस):हिंगोली-31.14(500.52),वसमत-31.43(487.82), कळमनुरी-33.67(528.84), औंढानागनाथ-53.25(505.50), सेनगांव-36.17(450.07) आज अखेर पावसाची सरासरी 494.55 नोंद झाली असल्याचे जिल्हाधिकारी , हिंगोली यांनी कळविले आहे.
0000

15 August, 2018



पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते हिंगोली बसस्थानकाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन

        हिंगोली,दि.15: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ हिंगोली येथील बसस्थानकाच्या नवीन वास्तूचे भूमिपूजन आज जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते संपन्न झाले.
            यावेळी नगराध्यक्ष बाबाराव बांगर, आमदार तान्हाजी मुटकुळे, उप विभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी विभाग नियंत्रक जालींदर शिरसाठ यांची प्रमुख उपस्थिती होती.
            यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे म्हणाले की, एस.टी बस ही राज्याची मुख्य जीवनवाहीनी आहे. सर्वसामान्य नागरिकरांच्या गरजा भागविणारी महत्वाचा दूवा आहे. खाजगी प्रवासी वाहतुक बसेसच्या स्पर्धा करण्यासाठी एस.टी. महामंडळाने देखील अद्ययावत बसेसची सुरुवात केली आहे. एस.टी. महामंडळाचे अधिकारी-कर्मचारी हे अहोरात्र प्रवाशांच्या सेवेसाठी कार्य करत सदैव तत्पर असतात. हिंगोली येथे विभागीय नियंत्रक कार्यालय सुरु करण्याची मागणी आपण करणार असल्याचे ही पालकमंत्री श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
            प्रास्ताविकात विभाग नियंत्रक श्री. शिरसाठ म्हणाले की, हिंगोली येथील बसस्थानकाच्या पुनर्बांधनीकरीता 3 कोटी 80 लाख मंजूर झाले असून, सदर वास्तूचे काम दोन वर्षात पूर्ण होणार आहे. या बसस्थानकात अत्याधुनिक सोळा गाळे, प्रवाशांसाठी उपहारगृह, विश्रांतीगृह, हिरकणी कक्ष, स्वच्छता गृह, आरक्षण कक्ष, विविध वस्तु भांडार, एस.टी. महामंडळाच्या अधिकारी-कर्मचारीसाठी अद्ययावत विश्रामगृह आदी सुविधासह हे नवीन बसस्थानकाची वास्तू तयार होणार असल्याची त्यांनी यावेळी माहिती दिली.
            यावेळी आमदार श्री. मुटकुळे यांचे समयोचित भाषण झाले. प्रारंभी पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते भूमिपूजन करुन कोनशिलेचे अनावरण करण्यात आले. यावेळी कार्यक्रमास मोठ्या संख्येने नागरिकांची उपस्थिती होती.
****





पालकमंत्री दिलीप कांबळे यांची ‘लोकराज्य’ स्टॉलला भेट
        हिंगोली,दि.15: येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित मुख्य स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ स्टॉलला भेट देवून लोकराज्य मासिकाच्या अंकाची खरेदी केले. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित ‘महामानव’ हा ग्रंथ भेट दिला. शासनाच्या योजना, उपक्रम आणि शासनाच्या कार्याची माहिती होण्यासाठी जास्तीत-जास्त नागरिकांना लोकराज्य मासिकाचे वर्गणीदार होण्याचे आवाहन ही पालकमंत्री श्री. कांबळे यांनी यावेळी केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री श्री. कांबळे बोलत होते. यावेळी आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, पोलीस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, जिपचे अतीरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
           
****




पालकमंत्री दिलीप कांबळे यांच्या हस्ते ‘युवा माहिती दूत’ उपक्रमाचा शुभारंभ

        हिंगोली,दि.15: माहिती व जनसंपर्क महासंचालनालय उच्च व तंत्र शिक्षण विभाग आणि युनिसेफ यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यात ‘युवा माहिती दूत’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येणार आहे. आज येथील जिल्हाधिकारी कार्यालय परिसरात आयोजित मुख्य स्वातंत्र्य दिनाच्या ध्वजारोहण कार्यक्रमाप्रसंगी जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी ‘युवा माहिती दूत’ बोधचिन्हाचे अनावरण करुन या उपक्रमाचा शुभारंभ केला.
            शासनाच्या विकास योजनांची माहिती ग्रामीण आणि दूर्गम भागातील लाभार्थ्यांना मिळावी या उद्देशाने हा उपक्रम सुरू केला आहे. ‘युवा माहिती दूत’ त्यांच्या तालुक्यातील 50 कुटुंबांशी समक्ष संपर्क साधुन शासकीय योजनांची माहिती देणार आहेत. युवा माहिती दुतांची नोंदणी महासंचालनालयाने तयार केलेल्या ॲपवर ऑनलाईन होणार आहे. हे ॲप प्ले स्टोअरवर उपलब्ध होणार आहे. प्ले स्टोअर वरुन हे ॲप डाऊनलोड करुन ‘युवा माहिती दूत’ म्हणून नोंदणी करता येणार आहे. या युवा माहिती दूतांना विकास योजनांवरील व्हीडीओ क्लिप, शासकीय योजनांची माहिती असणाऱ्या पुस्तिका, घडीपत्रिका महासंचालनालयामार्फत पुरविण्यात येणार आहेत. 15 ऑगस्ट नंतर सहा महिन्याच्या कालावधीत माहिती दूतांनी 50 कुटूंबाशी समक्ष संपर्क साधून त्यांना विकास योजनांची माहिती द्यावयाची आहे. तसेच डाऊनलोड केलेल्या ॲपवर कुटूंबाशी भेट दिलेल्या बाबतची माहिती अपलोड करावयाची आहे. प्रत्येक तालुक्यात एक समन्वयक निवडला जाणार आहे. या उपक्रमा अंतर्गत राज्यातील 6 हजारापेक्षा जास्त महाविद्यालयातील सुमारे 23 लाख पेक्षा जास्त शिक्षण घेणाऱ्या युवक-युवती मार्फत शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यां पर्यंत पोहचविण्यात येणार आहे. जिल्हा माहिती अधिकारी, हिंगोली हे या उपक्रमाचे नोडल ऑफिसर म्हणून काम पाहणार आहेत.
            जिल्ह्यातील युवक-युवतीनी ‘युवा माहिती दूत’ म्हणून उपक्रमात सहभागी व्हावे असे आवाहन जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी केले आहे.

****




युवा माहिती दूतांनी शासनाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचावी
                                                                                          - पालकमंत्री दिलीप कांबळे

         हिंगोली,दि.15: माहिती व जनसंपर्क महासंचालनालया मार्फत राज्यात ‘युवा माहिती दूत’ हा अभिनव उपक्रम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी या ‘युवा माहिती दूत’ उपक्रमात सहभागी होवून शासनाच्या योजनांची माहिती लाभार्थ्यापर्यंत पोहचावी असे आवाहन जिल्ह्याचे पालकमंत्री दिलीप कांबळे यांनी केले.
            येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित स्वातंत्र्य दिनाच्या 70 व्या वर्धापन दिनानिमित्त ध्वजारोहणाच्या मुख्य शासकीय कार्यक्रमप्रसंगी पालकमंत्री श्री. कांबळे बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शिवराणीताई नरवाडे, आमदार तान्हाजी मुटकुळे, नगराध्यक्ष बाबाराव बांगर, जिल्हाधिकारी अनिल भंडारी, पोलीस अधिक्षक योगेश कुमार, अप्पर जिल्हाधिकारी जगदिश मिनियार, निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा पुरवठा अधिकारी लतीफ पठाण, जि.प.चे अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख यांची प्रमुख उपस्थिती होती.
            पुढे श्री. कांबळे म्हणाले की, शासनाच्या विविध कल्याणकारी योजना ग्रामीण वा दूर्गम भागातील अशिक्षित व अर्धशिक्षित लाभार्थ्यांपर्यंत त्यांच्यासाठी असलेल्या योजनांची माहिती पोहचविण्यासाठी, त्यांच्याशी प्रत्यक्ष भेटून संवाद साधणे हा एक प्रभावी मार्ग आहे. याकरीता महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत संपूर्ण राज्यात ‘युवा माहिती दूत’ उपक्रम राबविण्यात येणार आहे. या उपक्रमातंर्गत राज्यातील 6 हजारपेक्षा जास्त महाविद्यालयात सुमारे 23 लाख पेक्षा जास्त शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांमार्फत शासकीय योजनांची माहिती लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यात येणार असल्याचे सांगून यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी ‘युवा माहिती दूत’ उपक्रमांच्या बोधचिन्हाचे अनावरण करुन शुभारंभ केला.
            जिल्ह्यात वार्षिक सरासरीच्या 51 टक्के पाऊस झाला. परंतू मागील काही दिवसापासून पावसाने ओढ घेतल्याने जिल्ह्याला अद्यापही दमदार पावसाची प्रतीक्षा आहे. सन 2018-19 खरीप हंगामात जिल्ह्यात 3 लाख 83 हजार हेक्टर क्षेत्रावर खरीप पिकांची पेरणी झाली असून. बियाणे आणि खतांची उपलब्धता करण्यात आली आहे. जिल्ह्यातील 2 लाख 64 हजार शेतकरी प्रधानमंत्री पिक विमा योजनेत सहभागी झाल्याने ते संरक्षीत झाले आहे. तसेच श्री. छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजने अंतर्गत जिल्ह्यातील 66 हजाराहून अधिक शेतकऱ्यांना रु. 267 कोटी रुपयांची कर्जमाफी झाली आहे. जलयुक्त शिवार अभियाना अंतर्गत सन 2016 ते 2019 कालावधीत जिल्ह्यातील 409 गावांची निवड झाली असून, जलयुक्त मुळे 31 हजार टि.सी.एम. हून अधिक पाणीसाठा निर्माण झाल्याने 62 हजार हेक्टर हून अधिक संरक्षित सिंचन क्षेत्र निर्माण झाले आहे. तसेच माननीय राज्यपाल महोदयांनी हिंगोली जिल्ह्याचा सुमारे 15 हजार हेक्टर क्षेत्राचा सिंचन अनुशेष जाहिर केला असून, त्या अनुशेष अंतर्गत जिल्ह्यातील 5 सिंचन योजनांचा समावेश आहे. त्यापैकी नवलगव्हाण साठवण तलावाचे काम पूर्ण झाले असल्याचे सांगुन यावर्षी त्यात 100 टक्के पाणीसाठा झाला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 490 हेक्टर सिंचन क्षेत्रात वाढ झाली असल्याचे श्री. कांबळे यावेळी म्हणाले.
            ʿमागेल त्याला शेततळेʾ योजने अंतर्गत अडीच हजार शेततळ्यांची कामे पूर्ण करुन उद्दिष्टपूर्ती झाली आहे. तसेच 13 कोटी वृक्ष लागवड उपक्रम अंतर्गत जिल्ह्याने उल्लेखनीय कामगिरी केली असून, जिल्ह्यात 59 लाख म्हणजे 195 टक्के वृक्ष लागवड करुन उद्दिष्टपुर्ती झाली आहे. सशस्त्र सेना ध्वजदिन निधी संकलनाचे जिल्ह्याने चांगले काम केले असून, सन-2017 मध्ये जिल्ह्याने 134 टक्के ध्वजदिन निधी संकलीत केला असल्याचे पालकमंत्री म्हणाले.
            राज्य शासनाने जिल्ह्यातील सर्व नगर पालिका आणि नगर पंचायती हागणदारी मुक्त घोषित केल्या असून, या माहिन्यात ‘स्वच्छ ऑगस्ट क्रांती’ मोहिम राबविण्यात येणार असल्याचे सांगून वैशिष्ट्यपूर्ण योजने अंतर्गत हिंगोली नगर परिषदेस शासनाकडून नगर परिषद प्रशासन इमारत, हिंदू स्मशान भूमी विकसीत करणे, शिवाजीराव देशमुख सभागृह आणि नाट्यगृह या कामासाठी 24 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला आहे. तर विशेष रस्ता योजने अंतर्गत वसमत नगर
परिषदेस 2 कोटी आणि कळमनुरी नगर परिषदेस 1 कोटी रुपये प्राप्त झाले आहेत. तसेच सेनगाव नगर पंचायतीस मुख्य रस्त्यासाठी 5 कोटी तर औंढा नगर पंचायतीस विविध विकास कामासाठी 10 कोटी रुपयांचा निधी प्राप्त झाला असल्याची माहिती ही श्री. कांबळे यांनी यावेळी दिली.
            संपूर्ण राज्य तंबाखू मुक्त करण्याच्या उद्देशाने राज्यस्तरावर राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणीच्या अनुषंगाने श्री. कांबळे यांनी उपस्थितांना तंबाखू मुक्तीची शपथ देवून जनजागृती करण्याचे आवाहन केले.
            यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांच्या हस्ते जिल्हा उद्योग केंद्रामार्फत देण्यात येणारा सन 2016 चा प्रथम पुरस्कार मे. गुरूकृपा इंडस्ट्रिजचे उद्योजक श्री. अमित ओमप्रकाश हेडा यांना देण्यात आला. तर व्दितीय पुरस्कार मे. श्री. बालाजी इंडस्ट्रिजचे उद्योजक श्री. जनकराज ब्रीजलाल खुराणा आणि मे. ओंकार फॅब्रीक्स प्रा. लि. चे उद्योजक श्री. संतोष भगवानदास झंवर यांना विभागून देण्यात आला. तसेच शिक्षण विभागामार्फत घेण्यात आलेल्या पुर्व माध्यमिक शाळा शिष्यवृत्ती परीक्षेत राज्यात मेरीट मध्ये आलेली विद्यार्थी कु. प्रेरणा विलास मोरे आणि राष्ट्रीय प्रज्ञाशोध परीक्षेत इयत्ता 10 वी मधून राज्यातुन एस.टी. प्रवर्गातील प्रथम पारितोषिक कु. मंजिरी मनोज गुरुनवाड यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
            पालकमंत्री श्री. कांबळे यांनी यावेळी उपस्थित स्वातंत्र्य सैनिक यांच्यासह मान्यवरांच्या भेटी घेवून त्यांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या. तसेच यावेळी पालकमंत्री श्री. कांबळे यांनी महाराष्ट्र शासनाच्या मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ स्टॉलला भेट देवून अंकाची खरेदी ही केली. यावेळी जिल्हा माहिती अधिकारी अरुण सुर्यवंशी यांनी पालकमंत्री श्री. कांबळे यांना माहिती व जनसंपर्क महासंचालनालयामार्फत प्रकाशित ‘महामानव’ हा ग्रंथ भेट स्वरुपात दिला.
            यावेळी उपजिल्हाधिकारी (रोहयो) खुदाबक्ष तडवी, उपजिल्हा  निवडणूक अधिकारी  गोविंदरणवीरकर,  उपविभागीय अधिकारी अतुल चोरमारे, जिल्हा नियोजन अधिकारी विनोद कुलकर्णी, हिंगोली नगर परिषदेचे मुख्याधिकारी रामदास पाटील, विभागीय वन अधिकारी केशव वाबळे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी नितीन दाताळ आणि गणेश वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक श्रीवास, उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अशोक पवार, सहायक संचालक रेणुका तम्मलवार, डायटचे प्राचार्य गणेश शिंदे  यांच्यासह विविध विभागातील अधिकारी-कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, ज्येष्ठ नागरिक,  पत्रकार, विद्यार्थी-विद्यार्थींनी आणि नागरिकाची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

****