30 November, 2022

 



जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित व्यक्ती व देहविक्री करणाऱ्या महिलांना

शासकीय योजनांचे लाभ त्वरित द्यावेत

                                     -- जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

 

            हिंगोली (जिमाका), दि. 30: जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित व्यक्ती व देहविक्री करणाऱ्या महिलांना शासकीय योजनाचे लाभ तातडीने मिळवून द्यावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले.

येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची बैठक दि. 30 नोव्हेंबर रोजी घेण्यात आली. यावेळी प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे, जिल्हा आरोग्य अधिकारी यांचे प्रतिनिधी डॉ.कैलास शेळके, माता व बालसंगोपन अधिकारी डॉ.सचिन भायेकर, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. जी.एस. मिरदुडे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक आयुक्त, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, जिल्हा माहिती अधिकारी, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी यांचे प्रतिनिधी, जिल्हा कार्यक्रम अधिकारी व इतर विभागाचे सदस्य तसेच सेवाभावी संस्थेचे अधिकारी, कर्मचारी बैठकीस उपस्थित होते.

यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, जिल्ह्यातील एचआयव्ही संसर्गित व्यक्ती व देहविक्री करणाऱ्या महिलांना संजय गांधी निराधार योजना, बालसंगोपन योजना, आयुष्यमान भारत योजना, शिधापत्रिका यासह त्यांना देय असलेल्या विविध शासकीय योजनेचा लाभ तात्काळ देण्यात यावा. तसेच जिल्ह्यातील हॉटस्पॉट असलेल्या गावास स्वयंसेवी संस्थांनी भेटी देऊन बाधित रुग्णांचा शोध घेण्यात यावा, अशा सूचना दिल्या.

यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही, एडस् बाबत सुविधा पुरविणाऱ्या केंद्राची, जुलै ते सप्टेंबर या कालावधीत केलेले कार्यक्रम, अशासकीय संस्था विहान व लक्षगट हस्तक्षेप प्रकल्पाचा आढावा सादर केला. यावेळी त्यांनी गेल्या तिन वर्षात एचआयव्ही बाधीत महिला पासून एकही एच.आय.व्ही. बाधीत रुग्ण जन्माला आले नसल्याचे सांगितले. तसेच डापकू व एआरटी केंद्राच्या नवीन इमारतीच्या अपूर्ण कामासाठी निधी उपलब्ध करुन देण्याची मागणी केली. तसेच दि. 1 डिसेंबर रोजी जागतिक एड्स दिनाच्या कार्यक्रमास उपस्थित राहण्याचे आवाहन केले.

या बैठकीस उपस्थित असलेल्या अध्यक्षासह सर्व सदस्यांचे प्र. जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दीपक मोरे यांनी आभार मानून बैठक संपल्याचे जाहीर केले. 

*****

 

 

 

 

29 November, 2022

 


सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर

पत्रकाराची कार्यशाळा संपन्न

 

            हिंगोली (जिमाका), दि. 29 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ते 06 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कालावधीत "समता पर्व"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचाच एक भाग म्हणून आज दि. 29 नोव्हेंबर रोजी  शिवानंद मिनगीरे,सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण,हिंगोली यांच्या मार्गदर्शनाखाली डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन,हिंगोली येथे सामाजिक न्याय विभागाची नवी दिशा या विषयावर पत्रकारांची कार्यशाळा घेण्यात आली .

या पत्रकार कार्यशाळेच्या अध्यक्षस्थानी माहिती सहायक चंद्रकांत कारभारी हे होते. यावेळी जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, दैनिक सकाळचे राजेश दारवेकर, दैनिक सामनाचे सचिन कवडे, लोकमत समाचारचे दिलीप हळदे, आदर्श गावकरीचे मकरंद बांगर, लोकमतचे चंद्रमुनी बलखंडे, न्यूज एमकेएममराठीचं सुधाकर वाढवे, टी.व्ही.सेवनचे अरुण दिपके, गोदातीर समाचारचे बाबूराव ढोकणे, तेजस्वी लेखनीचे प्रा.उत्तम बलखंडे, तरुण भारचे विजय गुंडेकर, एफ.टी.नागरे इत्यादी पत्रकार उपस्थित होते.

यावेळी कार्यक्रमात आदर्श गावकरीचे मकरंद बांगर व सा.तेजस्वी लेखनीचे प्रा.उत्तम बलखंडे यांनी संविधान या विषयावर उपस्थितांना सखोल मार्गदर्शन केले. तसेच जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या सर्व योजनांची माहिती सांगून सामाजिक न्याय विभागाच्या योजना घरा-घरापर्यंत, लाभार्थ्यांपर्यंत पोहचविण्यासाठी पत्रकार बंधूना आवाहन केले. तसेच अध्यक्षीय समारोप कार्यक्रमात चंद्रकांत कारभारी यांनी संविधान व सामाजिक न्याय विभागाच्या योजना हिंगोली जिल्ह्यात घरोघरी पोहचविण्यासाठी माहिती कार्यालय व सर्व पत्रकार बंधू कटीबध्द असल्याचे सांगितले. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक बार्टीचे जिल्हा प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे यांनी  केले तर कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवर व पत्रकारांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी  शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. 

यावेळी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सत्यजीत नटवे, श्रीकांत कोरडे, आत्माराम वागतकर, एम.आर.राजुलवार, सुनिल वडकुते, आर.टी.ससाने, नितीन राठोड, भास्कर वाकळे, मोतीराम फड, सखाराम चव्हाण, बाळू पवार, नागनाथ नकाते, सुलोचना ढोणे, पल्लवी गिते, रोहिनी जोंधळे, विशाल इंगोले, सुरेश पठाडे, दिपक कांबळे, संदिप घनतोडे, राहुल भराडे, जयदिप देशपांडे, गयाबाई खंदारे, दत्ता कुंभार, बाळू नागरे, नरेश पौळकर, श्रावण खरोडे, हरिष पुंडगे, राहूल जाधव, संदिप पौळकर आदी मोठया संख्येने उपस्थित होते.

****

 


राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन व हळद महोत्सव यशस्वी करण्यासाठी

सर्वांचे सहकार्य आवश्यक

--- खा.हेमंत पाटील

            हिंगोली (जिमाका), दि. 29 :  राज्यस्तरीय कृषि प्रदर्शन व हळद महोत्सवाचे डिसेंबर महिन्यात आयोजित करण्यात येणार आहे. आपल्या शहराचे, जिल्ह्याचे नाव लौकिक  वाढविण्यासाठी हे कृषि प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याची गरज आहे, असे प्रतिपादन खासदार हेमंत पाटील यांनी केले .

            येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात आज राज्यस्तरीय कृषी प्रदर्शन व हळद महोत्सवाच्या आयोजनाच्या पूर्वतयारीबाबत विविध विभागाच्या अधिकाऱ्यांची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी शिवराज घोरपडे, आत्माचे प्रकल्प संचालक युवराज शहारे यांची व्यासपीठावर प्रमुख उपस्थिती होती.

            यावेळी पुढे बोलताना खा. हेमंत पाटील म्हणाले, आपला जिल्हा हळदीचा जिल्हा आहे. याचा भारतभर प्रचार व प्रसार झाला पाहिजे यासाठी डिसेंबर महिन्यात आयोजित कृषी प्रदर्शनात विविध कार्यक्रम व चर्चासत्राचे आयोजन करण्यात येणार आहे. या प्रदर्शनात नामांकित कंपन्या, उत्पादक सहभागी होणार आहेत. हळद उत्पादनाबाबत हिंगोलीचे नाव आपल्या देशात  झळकण्यासाठी आपल्या सर्वांचा सहभाग असणे आवश्यक आहे. तसेच सर्व शासकीय विभागानी आपल्या कार्यालयाशी संबंधित योजनेचे स्टॉल उभारावेत. यासाठी प्रत्येक विभागानी कामाचे नियोजन करुन कामकाज करावेत. तसेच प्रदर्शनाच्या ठिकाणी वीज, पाणी, फिरते शौचालय, वाहन पार्कींग यासह आवश्यक त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात यावेत, अशा सूचना सर्व संबंधित अधिकाऱ्यांना यावेळी दिल्या. तसेच यावेळी प्रदर्शनामध्ये कोणकोणत्या विषयाचे प्रदर्शन मांडता येईल याविषयी अधिकाऱ्यांशी चर्चा केली .

            यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधित अधिकाऱ्यांना कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सव यशस्वी करण्यासाठी सर्वांनी कार्यवाही करावी, अशा सूचना केल्या.

            जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी शिवराज घोरपडे यांनी नियोजित कृषि प्रदर्शन व राज्यस्तरीय हळद महोत्सवाच्या आयोजनाची माहिती प्रास्ताविकात दिली.

            यावेळी विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी बैठकीस उपस्थित राहून चर्चेत सहभाग नोंदवला .

****

28 November, 2022

 

निदेशक पदासाठी अर्ज करण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 28 :  वसमत येथील औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील प्रशिक्षणानार्थ्यांना ‘एम्प्लॉयबिलिटी स्कील’ या विषयाची तासिका घेण्यासाठी निव्वळ तात्पुरत्या स्वरुपात 11 महिने कालावधीसाठी मानधन तत्वावर निदेशकाची नेमणूक करावयाची असल्याने पात्र उमेदवाराकडून अर्ज मागविण्यात येत आहेत.

पात्र उमेदवारांनी दिनांक 10 डिसेंबर, 2022 पर्यंत आपला बायोडाटा किंवा अर्ज मूळ शैक्षणिक कागदपत्रासह औद्योगिक प्रशिक्षण संस्था, वसमत  जि. हिंगोली येथे सादर करावेत. शैक्षणिक पात्रता व इतर अधिक माहितीसाठी  www.dgt.gov.in  या संकेतस्थळाला भेट द्यावी, असे आवाहन प्राचार्य,औद्योगिक प्रशिक्षण संस्था,वसमत जि.हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे.

*****

 

समता पर्वानिमित्त आयोजित मार्जीन मनी कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन

 

            हिंगोली (जिमाका), दि. 28 : केंद्र शासनाने सन 2015 मध्ये स्टँड अप ही योजना घोषित केली आहे. या योजनेअंतर्गत महाराष्ट्र राज्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द समाजाच्या घटकातील नव उद्योजक लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नवउद्योजक लाभार्थ्यांना एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थी हिस्स्यामधील 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना सुरु करण्यात आलेली आहे.

            सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागामार्फत दि. 26 नोव्हेंबर संविधान दिन ते डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन दि. 6 डिसेंबर, 2022 पर्यंत समता पर्व साजरा करण्यात येत आहे. त्याअनुषंगाने दि. 1 डिसेंबर, 2022 रोजी युवा गटाची मार्जीन मनी योजनेविषयीची कार्यशाळा डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनाचे सभागृह, दर्गा रोड, रिसाला बाजार, हिंगोली येथे सकाळी 11.00 ते दुपारी 1.00 वा. आयोजित करण्यात आलेली आहे.

            हिंगोली जिल्ह्यातील अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील नवउद्योजकांनी या कार्यशाळेस उपस्थित राहण्याचे आवाहन शिवानंद मिनगीरे, सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे.

****

 

संविधान समता पर्वानिमित्त आदर्श महाविद्यालयात

संविधान विषयावर ॲड.साहेबराव शिरसाट यांचे सखोल मार्गदर्शन

 



            हिंगोली (जिमाका), दि. 28 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या वतीने जिल्ह्यात            दि. 26 नोव्हेंबर भारतीय संविधान दिन ते 06 डिसेंबर डॉ.बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन कालावधीत "समता पर्व"  कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून आज दि. 28 नोव्हेंबर रोजी समाज कल्याण सहाय्यक आयुक्त शिवानंद मिनगीरे यांच्या मार्गदर्शनाखाली  आदर्श महाविद्यालयात  संविधान विषयावर जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांच्या अध्यक्षतेखाली सखोल मार्गदर्शन कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी ॲड.साहेबराव शिरसाठ यांनी संविधान (अधिकार व कर्तव्य) या विषयावर उपस्थितांना सखोल असे मार्गदर्शन केले. या व्याख्यानमालेमध्ये 720 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतलेला आहे.

            यावेळी महाविद्यालयाचे प्रभारी प्राचार्य प्रा.डॉ. प्रदीप अचोले, उपप्राचार्य प्रा. रमेश दळवी, कार्यालय अधीक्षक सत्यजित नटवे, पर्यवेक्षक प्रा.अनिल शास्त्री, प्रा.डॉ.टी.आर.हाफगुंडे, प्रा.डॉ.मस्के, प्रा.डॉ.सुरेश वराड, प्रा.डॉ.शत्रुघन जाधव, अशोक घुगे, जीवन मोरे, सुनिल वडकुते, बालाजी टेंभुर्णे, राजू ससाने, सिंधू राठोड, सुरेश पठाडे, प्रफुल पट्टेबहादूर, श्रद्धा तडकसे, श्रावण खरोडे, सिध्दार्थ गोवंदे, अशोक इंगोले, बाळू पवार, नागनाथ नकाते, रोहिणी जोंधळे, सुलोचना ढोणे, बाळू नागरे इत्यादी मान्यवर उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला मान्यवरांच्या हस्ते महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी  शाहू महाराज, डॉ.बाबासाहेब आंबेडकर या महापुरुषांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करुन अभिवादन करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक सिध्दार्थ गोवंदे यांनी  केले, तर कार्यक्रमाचे  सूत्रसंचालन अशोक इंगोले यांनी केले.

यावेळी कार्यक्रमास महाविद्यालयातील प्राध्यापक कर्मचारी व विद्यार्थी मोठया संख्येने उपस्थित होते.

****

26 November, 2022

 

जिल्हाधिकारी कार्यालयात संविधान उद्देशिकेचे सामूहिक वाचन



 

            हिंगोली (जिमाका), दि. 26 : भारतीय संविधान दिनानिमित्त येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज निवासी उपजिल्हाधिकारी चंद्रकांत सुर्यवंशी यांच्या उपस्थितीत भारतीय संविधानाच्या उद्देशिकेचे सामूहिक वाचन करण्यात आले.

            यावेळी   जिल्हाधिकारी यांचे स्वीय सहायक नागेश बोलके, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, माहिती सहायक चंद्रकांत कारभारी यांच्यासह विविध विभागातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

*****