05 March, 2024

हिंगोली येथे होणाऱ्या 'शासन आपल्या दारी' कार्यक्रमाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांकडून आढावा

• मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, पालकमंत्री यांच्या उपस्थितीत रामलीला मैदानावर कार्यक्रमाचे आयोजन • जिल्हा प्रशासनाच्या सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवावा – जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर हिंगोली (जिमाका), दि 05 : राज्य शासनाच्या सर्व योजना लोकाभिमुख करुन त्यांची योग्य अंमलबजावणी गतिमान करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत हिंगोली येथील रामलीला मैदानावर रविवार दि.10 मार्च रोजी ‘शासन आपल्या दारी’ या जिल्हास्तरीय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. राज्य शासनाच्या या लोकाभिमुख कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सर्व यंत्रणांनी योग्य समन्वय ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज विभागप्रमुखांना दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित पूर्वतयारी आढावा बैठकीत ते बोलत होते. यावेळी खासदार हेमंत पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी संजय दैने, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उपजिल्हाधिकारी स्वप्नील मोरे, उपविभागीय अधिकारी उमाकांत पारधी, श्रीमती क्रांती डोंबे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांच्यासह जिल्ह्यातील विकास यंत्रणेचे सर्व विभागप्रमुख उपस्थित होते. ‘शासन आपल्या दारी’ कार्यक्रमाच्या माध्यमातून नागरिकांना शासकीय योजनांशी निगडीत कार्यालयाचे विविध दस्तावेज, कागदपत्रे उपलब्ध करुन देणारे अधिकारी व कर्मचारी यांना एकाच छताखाली आणून विविध योजनांचे लाभ देण्यात येणार आहेत. या उपक्रमातून जिल्ह्यातील लाभार्थ्यांना एकाच छताखाली सर्व शासकीय यंत्रणा आणून त्यांना लाभ देण्यात येणार असल्याची माहिती जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिली आहे. या कार्यक्रमाच्या पूर्वतयारीच्या अनुषंगाने त्यांच्या प्रमुख उपस्थितीत जिल्हाधिकारी कार्यालयात वेळोवेळी बैठकांद्वारे पूर्वतयारी आढावा घेण्यात आला आहे. तसेच या कार्यक्रमात विविध सेवा व योजनांचा लाभ देण्यासाठी लाभार्थ्यांकडून आवश्यक कागदपत्रांची पूर्तताही स्थानिक पातळीवर करण्यात येत आहे. या कार्यक्रमाला जिल्ह्यातील लाभार्थ्यांना निमंत्रण देण्यात येणार असून, कार्यक्रमस्थळी राज्य शासनाच्या विविध विभागांच्या योजनांची माहिती देणारी दालने उभारण्यात येणार आहेत. यात महसूल, जिल्हा परिषद, पोलीस, कृषी, समाज कल्याण, आरोग्य विभाग आदीसह महिला बचत गटांनी तयार केलेल्या उत्पादनांचेही दालन असणार असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. यावेळी खासदार हेमंत पाटील यांनीही लाभार्थ्यांच्या जेवणाची व्यवस्था, पाणी, स्वच्छतागृह, प्रवासाची व्यवस्था, पार्कींग यासह योग्य ते नियोजन करुन कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सहकार्य करावे, अशा सूचना केल्या. ******

हिंगोली येथे 7 मार्च रोजी नवीन गुंतवणूकदारांचे संमेलन औद्योगिक संघटना व नवीन गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 05 : येथील जिल्हा उद्योग केंद्रामार्फत दि. 7 मार्च, 2024 रोजी हिंगोली जिल्ह्यांतर्गत नवीन गुंतवणुकदारांचे संमेलन आयोजित करण्यात आले आहे. या संमेलनाच्या अध्यक्षस्थानी हिंगोली जिल्ह्याचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे राहणार आहेत. तसेच यावेळी खासदार हेमंत पाटील, आमदार प्रज्ञाताई सातव, विप्लव बाजोरिया, आमदार तान्हाजी मुटकुळे, आमदार संतोष बांगर, आमदार राजू नवघरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची उपस्थिती राहणार आहे. या संमेलनात हिंगोली जिल्ह्यातील नवीन गुंतवणुकदारांचे 400 कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात येणार आहेत. तसेच या कार्यक्रमात विभागीय कार्यालयाचे उद्योग सहसंचालक बी. टी. यशवंते, उपविभागीय कार्यालयातील अधीक्षकीय उद्योग अधिकारी श्रीमती करुणा खरात यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभणार आहे. तर शासनाकडून उद्योजकांसाठी पुरविण्यात येणाऱ्या परवान्याबाबत अंमलात आलेल्या नवीन कायद्याविषयी मैत्री पोर्टलचे नोडल अधिकारी पी. बी. हजारे यांनी तर हिंगोली जिल्ह्यातील नवीन उद्योजकांना आयात निर्यातीबाबत जालना येथील निर्यात सल्लागार सत्यकुमार राठी हे सविस्तर मार्गदर्शन करणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील सर्व औद्योगिक संघटना व नवीन गुंतवणूक करणाऱ्या उद्योजकांनी मोठ्या संख्येने संमेलनास उपस्थित राहावेत, असे आवाहन जिल्हा उद्योग केंद्राचे महाव्यवस्थापक शोएब कादरी यांनी केले आहे. ******

महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कारासाठी प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 05 : वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक, आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक, समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या कलावंत, साहित्यिक, समाज प्रबोधन आणि समाज सेवकांना तसेच समाजासाठी कार्य करणाऱ्या संस्थांना प्रतिवर्षी वैशाख शुध्द (अक्षय तृतीया) या दिवशी एक व्यक्ती व एका संस्थेला महात्मा बसवेश्वर सामाजिक समता शिवा पुरस्कार देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व वीरशैव लिंगायत समाजाच्या सामाजिक, शैक्षणिक , आर्थिक विकास होण्यासाठी कलात्मक , समाज प्रबोधन व साहित्यिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्ती व त्या समाजाच्या उत्थानासाठी कार्य करणाऱ्या संस्थांनी दि. 21 मार्च, 2024 पर्यंत विहित नमुन्यातील प्रस्ताव तीन प्रतीत सहायक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली या कार्यालयात सादर करावेत, असे आवाहन इतर मागास बहुजन कल्याणचे सहाय्यक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे. ******

01 March, 2024

जिल्ह्यात 3 मार्चला पल्स पोलिओ लसीकरण मोहीम • शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्याचे जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 01 : राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेंतर्गत 3 मार्चला जिल्ह्यातील शून्य ते पाच वर्षे वयोगटातील बालकांना पोलिओ डोस देण्यात येणार आहे. यासाठी पोलिओ बूथची व्यवस्था करण्यात आली जिल्ह्यातील सर्व पालकांनी रविवार, दि. 3 मार्च, 2024 रोजी आपल्या घरातील बालकांना नजीकच्या पोलिओ बुथवर जाऊन पोलिओचा डोस द्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. जिल्ह्यात 2 लाख 51 हजार 369 पात्र लाभार्थीना पोलिओ डोस दिला जाणार आहे. यासाठी जिल्ह्यात 1160 बुथ तयार करण्यात आले आहेत. जिल्हा व तालुकास्तर 62 अधिकारी, पर्यवेक्षक नेमण्यात आले आहेत. जिल्हास्तर जिल्हास्तरीय पर्यवेक्षकाची नेमणूक करण्यात आली आहे. तसेच राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेसाठी जनजागृती साहित्य, मायकिंग अहवाल नमुने, मार्कर पेन्स, चौका चौकात होर्डिंग उभा करण्यात आले आहे. तसेच सर्व प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये लस पूरवठा करण्यात आला आहे. ज्या मुलांचे पोलिओ डोस काही कारणास्तव राहून जातील त्यांना 5 ते 9 मार्चदरम्यान आयपीपीआयअंतर्गत आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत घरोघरी जाऊन पोलिओ डोस दिला जाईल. ग्रामीण भागात तीन दिवस व शहरी भागात पाच दिवस ही मोहिम राबविण्यात येणार आहे. या विशेष पोलिओ लसीकरण मोहिमेचा सर्व लाभार्थ्यांनी लाभ घ्यावा व यशस्वी करण्यासाठी आरोग्य विभागास सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे येथे मिळणार पोलिओ डोस जिल्ह्यातील सर्व शासकीय दवाखान्यांमध्ये, आपल्या घराजवळील पोलिओ बुथवर, बसस्थानक, रेल्वेस्थानक, यात्रेचे ठिकाण, मोबाईल बुथ आदी भागांमध्ये पोलिओ लसीकरण बूथचे नियोजन करण्यात आले आहे. ******

हिंगोली जिल्ह्यासाठी 635 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर

हिंगोली (जिमाका), दि. 01 : सार्वजनिक वितरण व्‍यवस्‍थेअंतर्गत जिल्‍हयातील अंत्‍योदय शिधापत्रिका धारकांसाठी शासनाने माहे ऑक्टोबर, नोव्हेंबर व डिसेंबर-2023 या तीन महिन्यांसाठी नियमित नियतन साखर प्रति शिधापत्रिका एक किलो याप्रमाणे मंजूर केले आहे. या तीन महिन्‍याचे जिल्‍ह्यासाठी 635 क्विंटलचे नियतन शासनाकडून प्राप्‍त झाले आहे. या नियतनाची उचल करुन प्रत्‍यक्ष शिधापत्रिकाधारकांस संबंधित स्‍वस्‍त धान्‍य दुकानामार्फत वितरण करण्‍यात येणार आहे. तालुकानिहाय नियतन पुढील प्रमाणे देण्‍यात आले आहे. हिंगोली-195.61 क्विंटल, औंढा ना.- 23 क्विंटल, सेनगाव- 121.79 क्विंटल, कळमनुरी- 142.84 क्विंटल, वसमत-151.76 क्विंटल असे जिल्ह्यासाठी एकूण 635 क्विंटल साखरेचे नियतन मंजूर झाले आहे. सर्व अंत्‍योदय शिधापत्रिकाधारकांनी स्‍वस्‍त धान्‍य दुकानातून साखरेची उचल करावी, असे आवाहन जिल्हा पुरवठा अधिकारी , हिंगोली यांनी केले आहे. *****

प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 01 : भारताला सौर ऊर्जेमध्ये आत्मनिर्भर बनविण्यासाठी प्रधानमंत्री सूर्य घर मुफ्त बिजली योजना जाहीर केली आहे. या योजनेनुसार देशातील एक कोटी घरांना सौर ऊर्जेद्वारे विद्युत पुरवठा करुन वीज शून्य करण्याचे लक्ष साधण्याचा शासनाचा मानस आहे. या योजनेच्या सर्वेक्षणाची जबाबदारी डाक विभागाला देण्यात आली आहे. याअनुषंगाने परभणी डाक विभागामार्फत असणाऱ्या परभणी व हिंगोली जिल्ह्यातील 388 डाक घरामार्फत व सातशे कर्मचाऱ्यांमार्फत सर्वेची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार आहे. या योजनेच्या संदर्भातील माहिती देण्यासाठी व नोंदणी करण्यासाठी गावागावात पोस्ट खात्याचे सर्व कर्मचारी जाऊन सर्वेक्षण करणार आहेत. हिंगोली जिल्ह्यातील नागरिकांनी नजीकच्या डाक घर (पोस्ट कार्यालयाशी) व कर्मचाऱ्यांशी संपर्क साधून या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. ******

29 February, 2024

मुख्यमंत्री वयोश्री योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 29 : राज्यातील 65 वर्षे वय असलेली व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे योणाऱ्या अंपगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने / उपकरणे खरेदी करण्यासाठी राज्य शासनाने "मुख्यमंत्री वयोश्री योजना" सुरु केलेली आहे. या योजनेंतर्गत चष्मा, श्रवणयंत्र, ट्रायपॉड, स्टीक व्हिल चेअर, फोल्डींग वॉकर, कमोड खुर्ची, नि-ब्रेस, लंबर बेल्ट, सर्वाइकल कॉलर इत्यादी आवश्यक सहाय्य साधने, उपकरणे खरेदीसाठी 3 हजार रुपयापर्यंतची रक्कम महाडिबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी दि. 4 मार्च ते 15 मार्च, 2024 या कालावधीत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली येथे अर्ज सादर करावेत. अर्जासोबत सादर करावयाची कागदपत्रे, अटी व शर्ती पुढीलप्रमाणे आहेत. लाभार्थी हा दि. 31 डिसेंबर, 2023 अखेर पर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेला असावा. आधार कार्ड, मतदान कार्ड जोडणे आवश्यक आहे. तसेच राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृध्दापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य, केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृध्दापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा किंवा तहसीलदार किंवा तत्सम सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक आहे. आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेतील बचत बँकखात्याचे बँक पासबूक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे दोन फोटो, उत्पन्नाचे प्रमाणपत्र (लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न दोन लाख रुपयाच्या आत असावे.), स्वयं-घोषणापत्र -सीपीएसयुद्वारे लाभार्थ्यांकडून सदरील प्राप्त रक्कम नेमून दिलेल्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येईल, असे स्वयंघोषणापत्र प्राप्त करुन घ्यावे. तसेच राष्ट्रीय योजनेचा / केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा मागील तीन वर्षात लाभ घेतला नसल्याचे स्वयंघोषणापत्र देखील नमूद करण्यात यावे. उपरोक्त पैकी कोणते साहित्य खरेदी करणार याची माहिती अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. वरील कागदपत्राची पूर्तता करणाऱ्या लाभार्थ्यांनी दि. 4 मार्च ते 15 मार्च, 2024 पर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली येथे परिपूर्ण अर्ज सादर करावेत, असे आवाहन समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड यांनी केले आहे. ******