16 October, 2026

विधानपरिषद निवडणुकीत मतदान करताना नियमांचे पालन करा प्रथम पसंतीच्या उमेदवारासमोर ‘1’ हा अंक लिहिणे अनिवार्य



हिंगोली (जिमाका), दि. 16 : महाराष्ट्र विधानपरिषदेच्या ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या द्विवार्षिक निवडणूक २०२६ मध्ये मतदान करताना मतदारांनी निर्धारित नियमांचे पालन करावे, असे आवाहन करण्यात आले आहे.


मतदानासाठी मतपत्रिकेसोबत पुरविण्यात आलेल्या जांभळ्या रंगाच्या स्केच पेनचाच वापर करावा. अन्य कोणतेही पेन, पेन्सिल किंवा बॉलपेन वापरू नये. मतदाराने प्रथम पसंती दिलेल्या उमेदवाराच्या नावासमोरील ‘पसंतीक्रम’ या स्तंभात ‘1’ हा अंक लिहिणे आवश्यक आहे. निवडून द्यावयाच्या उमेदवारांची संख्या एकापेक्षा जास्त असली, तरी केवळ एका उमेदवाराच्या नावासमोरच ‘1’ हा अंक लिहावा.


मतदारांना निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या एकूण संख्येइतके पसंतीक्रम नोंदविता येतील. उर्वरित उमेदवारांसाठी आपल्या पसंतीनुसार ‘२’, ‘३’, ‘४’ इत्यादी अंक लिहिता येतील. कोणत्याही उमेदवाराच्या नावासमोर केवळ एकच अंक लिहावा आणि एकच पसंतीक्रम एकापेक्षा अधिक उमेदवारांच्या नावासमोर लिहू नये. पसंतीक्रम शब्दांमध्ये न लिहिता अंकांमध्ये दर्शवावेत. यासाठी आंतरराष्ट्रीय स्वरूपातील भारतीय अंक 1,2,3 इ. रोमन अंक I,II,III इ. किंवा भारतीय संविधानाच्या आठव्या अनुसूचीमध्ये मान्यता प्राप्त असलेल्या कोणत्याही भारतीय भाषेतील अंक वापरता येतील.


मतपत्रिकेवर स्वाक्षरी, आद्याक्षरे, स्वतःचे नाव किंवा अन्य कोणतेही शब्द लिहू नयेत. तसेच अंगठ्याचा ठसा उमटवू नये अथवा पसंती दर्शविण्यासाठी ‘टिक’ (√) किंवा ‘क्रॉस’ (X) अशी खूण करू नये. मतपत्रिका वैध ठरण्यासाठी कोणत्याही एका उमेदवाराच्या नावासमोर ‘1’ हा अंक लिहून प्रथम पसंती नोंदविणे अनिवार्य आहे. अन्य पसंतीक्रम नोंदविणे ऐच्छिक आहे. त्यामुळे मतदारांनी मतदान करताना या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

00000

No comments: