16 October, 2026

पशुधनासाठी कुटार राखीव; औद्योगिक वापरावर बंदी सोयाबीन, तूर व अन्य पिकांच्या कुटारापासून बायोमास ब्रिकेट्स निर्मितीस मनाई; जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे आदेश


हिंगोली, दि. १६ ऑक्टोबर (जिमाका) : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चाऱ्याची उपलब्धता सुनिश्चित करण्यासाठी सोयाबीन, तूर व अन्य पिकांपासून उपलब्ध होणारे कुटार (वैरण) जनावरांच्या चाऱ्यासाठी राखीव ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष राहुल गुप्ता यांनी दिले आहेत. कुटाराचा वापर बायोमास ब्रिकेट्स (गट्टू) व पेलेट्स निर्मितीसाठी करण्यास तसेच त्यासाठी अवैध साठेबाजी करण्यास प्रतिबंध घालण्यात आला आहे.


सन २०२६ च्या खरीप हंगामात पावसाची मोठी तूट निर्माण झाल्यामुळे जिल्ह्यात दुष्काळसदृश परिस्थिती आहे. त्यामुळे आगामी काळात जनावरांसाठी हिरव्या व सुक्या चाऱ्याची टंचाई निर्माण होण्याची शक्यता पशुसंवर्धन विभागाने व्यक्त केली आहे. सध्या सोयाबीन पिकाची काढणी व मळणी सुरू असून, सोयाबीन तसेच तूर पिकापासून उपलब्ध होणारे कुटार हे दुष्काळी परिस्थितीत पशुधनाच्या संगोपनासाठी महत्त्वाचे आहे. या कुटाराचा औद्योगिक इंधनासाठी वापर झाल्यास स्थानिक पातळीवर चाऱ्याची कृत्रिम टंचाई निर्माण होण्याची शक्यता असल्याने प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे.


*अवैध साठेबाजी व वाहतुकीवर नियंत्रण*


कुटाराची खरेदी करून त्याचा औद्योगिक वापरासाठी साठा करणे, तसेच गट्टू निर्मिती उद्योगांना पुरवठा करण्याच्या उद्देशाने अवैध साठेबाजी करणे यावर प्रतिबंध घालण्यात आला आहे. शेतकऱ्यांकडून खरेदी केलेले कुटार स्थानिक पशुपालक, शेतकरी, मान्यताप्राप्त गोशाळा व गौरक्षण संस्थांव्यतिरिक्त इतर घटकांना औद्योगिक वापरासाठी पुरविण्यास मनाई करण्यात आली आहे.


*विशेष परवानगीनेच जिल्ह्याबाहेर वाहतूक*


हिंगोली जिल्ह्याबाहेर कुटाराची वाहतूक करण्यासाठी संबंधित उपविभागीय अधिकारी किंवा तहसीलदार यांची पूर्वपरवानगी घेणे बंधनकारक राहील. अधिकृत गोशाळा, गौरक्षण संस्था अथवा दुष्काळग्रस्त भागातील पशुपालकांच्या जनावरांसाठी कुटाराची वाहतूक करताना संबंधित परवानगी आणि वाहतूक पशुखाद्यासाठीच असल्याचे प्रमाणपत्र सोबत ठेवणे आवश्यक राहील.


*संयुक्त भरारी पथकांमार्फत तपासणी*


कुटाराची अवैध वाहतूक रोखण्यासाठी तसेच बायोमास ब्रिकेट्स निर्मिती उद्योगांची तपासणी करण्यासाठी तालुकास्तरावर संयुक्त भरारी पथके स्थापन करण्यात येणार आहेत. या पथकांमध्ये तहसीलदार तथा तालुका दंडाधिकारी, स्थानिक पोलीस अधिकारी, तालुका कृषी अधिकारी, जिल्हा उद्योग केंद्राचे प्रतिनिधी आणि तालुका पशुसंवर्धन अधिकारी यांचा समावेश असेल. ही पथके उद्योगांची तपासणी करून महामार्गांवरील कुटार वाहतुकीवरही लक्ष ठेवतील.


*उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई*


आदेशाचे उल्लंघन करून कुटाराचा औद्योगिक वापर किंवा अनधिकृत वाहतूक केल्याचे आढळल्यास संबंधित वाहन, यंत्रसामग्री आणि कुटाराचा साठा जप्त करण्याची कारवाई करण्यात येईल. तसेच संबंधित व्यक्ती, कारखानदार व व्यापाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन कायदा 2005 चे कलम 51 ते 60 जीवनावश्यक वस्तु कायदा 1955 आणि भारतीय न्याय संहितेच्या कलमान्वये  कारवाई करण्यात येणार आहे. हा आदेश १२ ऑक्टोबर 2026 पासून संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात पुढील आदेश होईपर्यंत लागू राहणार आहे.

00000

No comments: