16 October, 2026

ऊस तोडणी यंत्राऐवजी मजुरांमार्फत करा; ३० टक्के ऊस चाऱ्यासाठी राखीव ठेवा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांचे साखर कारखान्यांना निर्देश


हिंगोली, दि. १६ ऑक्टोबर (जिमाका) : जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर पशुधनासाठी चारा उपलब्ध व्हावा, यासाठी साखर कारखान्यांनी ऊस तोडणी यंत्राऐवजी मजुरांमार्फत करावी. तसेच, कारखान्यांच्या कार्यक्षेत्रातील ३० टक्के ऊस चाऱ्यासाठी राखीव ठेवावा, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.


जिल्ह्यातील पाचही तालुक्यांत दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. या परिस्थितीत जनावरांसाठी चारा उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रशासनाकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. ऊस आणि ऊसाचे वाढे हे जनावरांसाठी उपयुक्त चारा असून, साखर कारखान्यांकडून ऊस तोडणी यंत्राद्वारे केल्यामुळे ऊसाचे वाढे शेतातच पडून वाया जातात. त्यामुळे ऊस तोडणी मजुरांमार्फत केल्यास हे वाढे पशुधनासाठी उपलब्ध होऊ शकतील.


या अनुषंगाने जिल्ह्यातील साखर कारखान्यांनी आपल्या कार्यक्षेत्रात ऊस तोडणी मजुरांमार्फत करावी. तसेच, कार्यक्षेत्रातील ३० टक्के ऊस चाऱ्यासाठी राखीव ठेवावा, जेणेकरून दुष्काळी परिस्थितीत पशुधनासाठी चारा उपलब्ध होण्यास मदत होईल आणि चारा टंचाईवर मात करता येईल, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले आहेत.

                                                                                   00000

No comments: