16 October, 2026

पदवीधर निवडणुकीसाठी यंत्रणा सज्ज : जिल्हाधिकारी राहुल गुप्ता मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांचे दुसरे प्रशिक्षण संपन्न; मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधांची व्यवस्था







हिंगोली, दि. १६ ऑक्टोबर (जिमाका) : ०५-औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यातील संपूर्ण यंत्रणा सज्ज झाली असून, जिल्ह्यातील ३६ मतदान केंद्रांवर आवश्यक व्यवस्था करण्यात आली आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिली.


जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन सभागृहात आयोजित मतदान अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या दुसऱ्या प्रशिक्षण सत्रात ते बोलत होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) प्रगती चौंडेकर, उपविभागीय अधिकारी विकास माने, समाधान घुटुकडे, प्रतिक्षा भुते ,तहसीलदार अश्विनकुमार माने यांच्यासह प्रशिक्षणार्थी अधिकारी-कर्मचारी उपस्थित होते.


औरंगाबाद विभाग पदवीधर मतदारसंघासाठी २३ ऑक्टोबर २०२६ रोजी मतदान होणार आहे. या निवडणुकीच्या अनुषंगाने जिल्हा प्रशासनातर्फे मतदान प्रक्रियेचे दुसरे प्रशिक्षण आयोजित करण्यात आले होते. यावेळी अपर जिल्हाधिकारी महेंद्रकुमार कांबळे , उपजिल्हा निवडणूक अधिकारी प्रगती चोंडेकर आणि तहसीलदार अश्विनकुमार माने यांनी निवडणूक प्रक्रियेबाबत अधिकारी-कर्मचाऱ्यांना मार्गदर्शन केले.


निवडणुकीशी संबंधित सर्व कामे जबाबदारीने व काटेकोरपणे पार पाडावीत. प्रशिक्षणादरम्यान दिलेल्या सूचनांचे पालन करून निवडणूक प्रक्रियेची संपूर्ण माहिती गांभीर्याने समजून घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले.


मतदान केंद्रांवर आवश्यक सुविधांची व्यवस्था


मतदारांना मतदान करताना कोणतीही गैरसोय होऊ नये, यासाठी जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रांवर पिण्याचे पाणी, दिव्यांग मतदारांसाठी उतारमार्ग (रॅम्प), प्रकाशव्यवस्था आणि स्वच्छतागृहांसह आवश्यक किमान भौतिक सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.


अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण


या निवडणुकीसाठी हिंगोली जिल्ह्यात क्षेत्रीय अधिकारी, मतदान केंद्राध्यक्ष, मतदान अधिकारी-कर्मचारी आणि सूक्ष्म निरीक्षकांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणूक प्रक्रिया सुरळीत, पारदर्शक आणि नियमानुसार पार पाडण्यासाठी या सर्व अधिकारी-कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण देण्यात आले.

No comments: