हिंगोली, दि. १६ ऑक्टोबर (जिमाका) : जिल्ह्यातील प्राथमिक आरोग्य केंद्रे, आरोग्य उपकेंद्रे आणि ग्रामीण रुग्णालयांनी राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकन (एनक्वॉस) प्राप्त करण्यासाठी आवश्यक पायाभूत सुविधा, उपकरणे/ साहित्याची उपलब्धता, औषध साठा याबाबतची मागणी व उपलब्धतता खात्रीशीर नोंदवावी. तसेच आरोग्य सेवांचा दर्जा आणि रुग्णाभिमुख कार्यपद्धती यामध्ये सुधारणा करून सर्व कामे तातडीने पूर्ण करावीत. या कामात हलगर्जीपणा किंवा दिरंगाई करणाऱ्या अधिकारी व कर्मचाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल, असा इशारा जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिला.
जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्य विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. रवींद्र पुरी, बालरोग तज्ज्ञ डॉ गोपाल कदम, डॉ. विशाल पवार, जिल्हा लेखा व्यवस्थापक श्रीपाद गारुडी, जिल्हा कार्यक्रम समन्वयक डॉ. प्रशांत पुठावार, वैद्यकीय अधीक्षक, सर्व तालुका आरोग्य अधिकारी यांच्यासह वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
साहित्याची मागणी अचूक नोंदवा
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनासाठी आवश्यक असलेल्या साहित्याची उपलब्धता सुनिश्चित करण्याबरोबरच, संबंधित आरोग्य संस्थांनी आवश्यक साहित्याची मागणी विहित नमुन्यात अचूकपणे नोंदवावी. अनावश्यक साहित्याची मागणी करू नये. आवश्यक पायाभूत सुविधा आणि साहित्य उपलब्ध करून देण्यावर भर देण्यात येत असून, आवश्यक साहित्य येत्या दोन दिवसांत पुरविण्यात येईल, अशी माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक गायकवाड यांनी दिली. आरोग्य संस्थांमधील कामांचा दर्जा तपासण्यासाठी जिल्हाधिकारी व मुख्य कार्यकारी अधिकारी स्वतः अचानक भेटी देऊन पाहणी करणार आहेत. पुढील महिन्यात सर्व तालुक्यांतील आरोग्य उपकेंद्रांचीही तपासणी करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगितले.
रुग्णांना दर्जेदार सेवा देण्यावर भर
राष्ट्रीय गुणवत्ता आश्वासन मानांकनासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेने निर्धारित निकषांनुसार 100 टक्के मूल्यांकनाचे उद्दिष्ट साध्य करण्यासाठी प्रयत्न करावेत. आरोग्य उपकेंद्रांमध्ये आलेल्या रुग्णांना विनाकारण अन्यत्र पाठवू नये, तर उपलब्ध सुविधांनुसार प्राथमिक उपचार करावेत, असे निर्देशही जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांनी दिले. आरोग्य संस्थांमधील सेवा अधिक गुणवत्तापूर्ण, पारदर्शक व रुग्णकेंद्री करण्यासाठी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नियोजनबद्ध पद्धतीने आणि परस्पर समन्वयाने काम करावे. रुग्णांना वेळेत दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी आवश्यक सुधारणा तातडीने पूर्ण कराव्यात, असेही त्यांनी स्पष्ट केले.


No comments:
Post a Comment