25 June, 2024

मधमाशा पालनासाठी 50 टक्के अनुदान ; 20 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित

हिंगोली (जिमाका), दि. 25 : महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळामार्फत मध केंद्र योजना (मधमाशी पालन) संपूर्ण राज्यात कार्यान्वित झालेली आहे. या योजनेद्वारे मध उद्योगाचे मोफत प्रशिक्षण, साहित्य स्वरुपात 50 टक्के अनुदान, शासनाच्या हमी भावाने मध खरेदी, विशेष (छंद) प्रशिक्षणाची सुविधा, मधमाशा संरक्षण व संवर्धनाची जनजागृती आदी सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत. यासाठी पात्र व्यक्ती व संस्थाकडून अर्ज मागविण्यात येत आहेत. यासाठी जास्तीत जास्त शेतकरी, कातकरी, सुशिक्षित बेरोजगारांनी दि. 20 जुलै, 2024 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. या योजनेतील प्रमुख घटक आणि पात्रता पुढीलप्रमाणे आहेत. 1. वैयक्तिक मधपाळ योजना : या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्जदार साक्षर असावा. स्वत:ची शेती असल्यास प्राधान्य, वय 18 वर्षापेक्षा जास्त असावे. 2. केंद्र चालक प्रगतीशील मधपाळ योजना : या योजनेचा लाभ घेण्यासाठी व्यक्ती वैयक्तिक केंद्र चालक असावा. शैक्षणिक पात्रता किमान 10 वी पास असावी, वय 21 वर्षापेक्षा जास्त असावे. अशा व्यक्तींच्या नावे अथवा त्या व्यक्तीच्या कुटूंबातील कोणत्याही व्यक्तींच्या नावे किमान एक एकर शेत जमीन किंवा भाडे तत्वावर घेतलेली शेत जमीन, लाभार्थीकडे मधमाशापालन, प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता व सुविधा असावी. 3. केंद्र चालक संस्था : योजनेचा लाभ घेण्यासाठी संस्था नोंदणीकृत असावी. संस्थेच्या नावे मालकीची किंवा 10 वर्षासाठी भाडेतत्वावर घेतलेली किमान एक एकर शेत जमीन, संस्थेच्या नावे अथवा भाडे तत्वावर घेतलेली किमान एक हजार चौरस फूट सुयोग्य इमारत असावी. संस्थेकडे मधमाशीपालन प्रजनन व मध उत्पादनाबाबतीत लोकांना प्रशिक्षण देण्याची क्षमता असलेली संस्था असावी. वरील योजनेसाठी लाभार्थी निवड प्रक्रियेनंतर प्रशिक्षणापूर्वी मध व्यवसाय सुरु करण्यासंबंधी मंडळास बंधपत्र लिहून देणे तसेच निश्चित ठिकाणी प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे. अधिक माहितीसाठी जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी यांचे कार्यालय, प्रशासकीय इमारत, हॉल नं एस-11, नांदेड रोड, हिंगोली मो.नं. 9860404917, 9822528534, ई-मेल पत्ता- dviohingoli@rediffmail.com आणि संचालक, मध संचालनालय, महाराष्ट्र राज्य खादी व ग्रामोद्योग मंडळ, सरकारी बंगला नं. 5 महाबळेश्वर, जि. सातारा पिन-412806 (दूरध्वनी – 02168-260264) यांच्याशी संपर्क साधून या योजनेचा जास्तीत जास्त शेतकरी, सुशिक्षित बेरोजगारांनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा ग्रामोद्योग अधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. *******

गोदाम बांधकाम अनुदानासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 25 : विविध केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान (कडधान्य) व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षात 250 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकाम या बाबीसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. ही बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छूक शेतकरी उत्पादक संघ, कंपनीनी अर्ज सादर करावेत. यासाठी वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषानुसार डिझाईन, स्पेसिफिकेशन, खर्चाचे अंदाज पत्रकाप्रमाणे बांधकाम या आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक आहे. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषि माल साठवणुकीसाठी त्यांना योग्य व माफक दर आकारुन करावा. याबाबत शंभर रुपयाच्या स्टँप पेपरवर नोटराईज्ड हमीपत्र आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा, आधारकार्ड , बँक खात्याचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि. 31 जुलै, 2024 पूर्वी सादर करावेत. पूर्वसंमती देण्यात आलेल्या कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येईल. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक संघ, कंपन्यांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. *******

महिला आर्थिक विकास महामंडळाच्या क्रेडिट प्लॅन कार्यशाळेचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते उद्धाटन

• यावर्षी 793 बचत गटांना 26 कोटींचे कर्ज वाटप होणार ! • उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बचतगटांचा पुरस्काराने गौरव हिंगोली (जिमाका), दि. 25 : महिला आर्थिक विकास महामंडळाची क्रेडिट प्लॅन कार्यशाळा आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात घेण्यात आली. या कार्यशाळेचे उद्घाटन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यशाळेत महिला विकास महामंडळाचे विभागीय सल्लागार केशव पवार यांनी महिला आर्थिक विकास महामंडळाच्या कार्याबद्दल माहिती दिली. महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वय अधिकारी विलास जगताप यांनी जिल्ह्याचे सादरीकरण करताना महिला बचत गटांच्या प्रतिनिधींना बँकेच्या कर्जाची माहिती दिली. तसेच महामंडळाच्या जिल्हा कार्यालयाच्या वतीने कर्ज वितरणाचा अहवाल सादर केला. तसेच यंदाच्या आर्थिक वर्षात महामंडळाकडून 793 बचत गटांना 26 कोटी 50 लाख रुपयांचे वितरण करण्यात येणार आहे. मागील वर्षी महिला आर्थिक विकास महामंडळाकडून हिंगोली जिल्ह्यातील 630 बचत गटांना 25 कोटी 50 लाखांचे कर्ज वितरित करण्यात आले असल्याचे सांगितले. या कार्यशाळेत मागील वर्षी उल्लेखनीय कार्य करणाऱ्या बचत गटांचा पुरस्कारांने गौरव करण्यात आला. यामध्ये हिंगोली येथील लोकसंचलित साधन केंद्र, औंढा नागनाथ येथील रोशनी लोकसंचलित साधन केंद्र, जवळा बाजार येथील स्वप्नपूर्ती लोकसंचलित साधन केंद्र, सेनगाव व वसमत येथील लोकसंचलित साधन केंद्रातील महिलांचा समावेश आहे. यावेळी जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक पंकज बोरकर, मौलाना आझाद महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक एस. एन. सरकटे, बँक ऑफ महाराष्ट्राचे शाखा प्रबंधक एस. के. कुमरे, कॅनरा बँकेचे भागवत बरसाले, आयसीआयसीआय बँकेचे अनिल इंगोले, पंजाब नॅशनल बँकेचे विष्णू गणेश गरक्क, आयडीबीआय बँकेच्या विनिता मेश्राम, स्मार्ट प्रकल्पाचे शेख मोहिब, जिल्हा उद्योग केंद्राच्या वर्षा बोरकर, एचडीएफसी बँकेचे संजय ठाकरे यांची उपस्थिती होती. कार्यशाळेचे सूत्रसंचालन विलास पंडित यांनी केले, तर सुनील चव्हाण यांनी आभार मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रोशन अढाऊ, संकेत महाजन, प्रसाद मानेकर, संतोष ठाकूर, सय्यद रफिक यांनी परिश्रम घेतले. ********

वसतिगृह प्रवेशासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 25 : इतर मागास बहुजन कल्याण विभागांतर्गत सहाय्य संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या अधिनस्त येथील अंतुरे नगर येथील मुलींचे शासकीय वसतिगृह तसेच अकोला बायपास रोड बळसोंड येथील मुलांचे वसतीगृहात सन 2024-25 या शैक्षणिक सत्रात व्यावसायकि व बिगर व्यावसायिक शिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन प्रवेश प्रक्रियेसंदर्भत अर्ज वाटप व स्वीकार करण्याचे काम सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण विभाग, शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे दर्गा रोड हिंगोली येथे सुरु झाले आहे. या वसतिगृहात प्रवेशासाठी इतर मागास वर्ग, विमुक्त जाती, भटक्या जमाती, विशेष मागास प्रवर्गातील व्यावसायिक व बिगर व्यावसायिक प्रवर्गातील शिक्षण घेणाऱ्या जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे. *****

अनुसया विद्या मंदिर येथे बाल कायद्यांची जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 25 : येथील खटकाळी परिसरातील अनुसया विद्या मंदिरामध्ये जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत बाल कायद्यांची जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी चाईलड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी बालकामगार विरोधी दिन व मोबाईलचे दुष्परिणाम उदाहरणाद्वारे शाळेतील विद्यार्थ्यांना समजावून सांगितले. जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे यांनी बालकाचे हक्क, चांगला -वाईट स्पर्श, त्याचबरोबर बालविवाह कायदा 2006 नुसार बालविवाह होण्याची कारणे व दुष्परिणाम, जिल्ह्यात बालकांसाठी कार्यरत असणाऱ्या यंत्रणा तसेच संकटकाळी बालकांना मदतीची गरज असल्यास कशा प्रकारे मदत करता येईल, याबाबत तसेच बालकांना चाईल्ड हेल्पलाईन 1098 विषयी माहिती दिली. याप्रसंगी चाईल्ड हेल्पलाईनचे केस वर्कर सूरज इंगळे, अनुसया विद्या मंदिरच्या मुख्याध्यापिका श्रीमती फडणीस, शिक्षक श्री. राठोड, श्री. वानखेडे, श्री. मोघरगे, श्रीमती जगताप, श्रीमती मुळे तसेच बालक, पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. *****

माळधामणी येथील गांधी विद्यालयात चाईल्ड हेल्पलाईन व बाल कायद्यांची जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 25: जिल्ह्यातील बालकांच्या विविध प्रकारच्या समस्या लक्षात घेऊन हिंगोली तालुक्यातील माळधामणी येथील गांधी विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत चाईल्ड हेल्पलाईन व बाल कायद्यांची जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी हिंगोली चाइल्ड हेल्पलाईनचे पर्यवेक्षक विकास लोणकर यांनी जागतिक बाल कामगार विरोधी दिन व बालविवाह कायदा-2006 विषयी मार्गदर्शन केले. बाल कामगार कायदा 1986 मध्ये 14 वर्षाखालील बालकास वीट भट्टी, शेतातील अवजड कामे, कारखान्यावर मोळी वाहने, दगड उचलणे व फोडणे अशा प्रकारची अवजड कामे करणे बाल कामगार विरोधी कायद्याने गुन्हा आहे. त्याला अशा प्रकारच्या जोखमीचे काम सांगणाऱ्यावरही गुन्हा दाखल होऊन शिक्षाही होऊ शकते. बालकास इजा होईल अथवा जीवित हानी होईल असे काम सांगू नये, असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले. तसेच जिल्ह्यात बालविवाहाचे वाढते प्रमाण लक्षात घेता बालविवाह कायदा 2006 नुसार बालविवाह होण्याची कारणे, त्याचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच 18 वर्षाखालील मुलीचे व 21 वर्षाखालील मुलाचे विवाह करणे हे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे असे बालविवाह होऊ नये यासाठी मार्गदर्शन केले. तसेच आपल्या क्षेत्रामध्ये काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बालक निदर्शनास आल्यास चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले. यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिंदे, शिक्षक, गावातील नागरिक, विद्यार्थी व विद्यार्थिंनी उपस्थित होत्या. *****

24 June, 2024

निवडणूक खर्चाची अंतिम लेखे अचूक सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समितीच्या पथक प्रमुखाकडून सादरीकरण

हिंगोली (जिमाका), दि. 24 : भारत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार लोकसभा निवडणुकीचे अंतिम लेखे अचूक सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समितीचे प्रथक प्रमुख माधव झुंजारे यांनी सादरीकरणाद्वारे सर्व पथक प्रमुख, उमेदवार व त्यांच्या प्रतिनिधीना माहिती दिली. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीचे अंतिम लेखे अचूक सादर करण्यासाठी जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समितीच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हास्तरीय खर्च नियंत्रण समितीचे पथक प्रमुख माधव झुंजारे, दिगंबर माडे, निवडणूक खर्च निरीक्षक यांचे संपर्क अधिकारी गणेश वाघ आदी उपस्थित होते. राजकीय पक्षाचे सनियंत्रण करण्यासाठी विविध समिती व भरारी पथकाची नेमणूक करण्यात आली आहे. यामध्ये व्हिडिओ सनियंत्रण समिती (व्हीएसटी), व्हिडीओ पाहणारा चमू (व्हीव्हीटी), स्थिर संनियंत्रण चमू (एसएसटी), लेखांकन करणारा चमू, भरारी पथक, माध्यम प्रमाणीकरण आणि संनियत्रण समितीच्या पथक प्रमुखांनी खर्चाच्या नोंदी अचूक सादर कराव्यात. उमेदवाराने घेतलेल्या खर्चाचा ताळमेळ नोंदी व पथकप्रमुखाच्या नोंदी अचूक असल्याची बाब जाणीवपूर्वक तपासून घ्यावी. लोकसभा मतदार संघ व विधानसभा मतदार संघनिहाय सहायक निवडणूक खर्च निरीक्षकांनी दैनंदिन नोंदी अभिरुप ताळमेळ नोंदवहीत अचूकपणे नोंदवून अंतिम लेखे सादर करावेत. तसेच निवडणूक आयोगाने दिलेल्या विहित नमुन्यात सर्व उमेदवारांनी निवडणुकीचे अंतिम खर्च लेखे अद्ययावत तात्काळ सादर करावेत, अशा सूचना पथक प्रमुख माधव झुंजारे व दिगंबर माडे यांनी यावेळी उपस्थितांना दिल्या. ******

आरोग्याची वारी ! पंढरीच्या दारी !! संत गजानन महाराज पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांना आरोग्य सेवा देण्यासाठी आरोग्य विभाग सज्ज

• संत गजानन महाराज पालखी हिंगोली जिल्ह्यात तीन ठिकाणी मुक्कामी • सेनगाव, डिग्रस कऱ्हाळे आणि जवळा बाजार या ठिकाणी पूर्वनियोजित मुक्काम हिंगोली (जिमाका), दि. 24 : जिल्ह्यातून संत गजानन महाराज यांची पालखी जात असताना सार्वजनिक आरोग्य विभागाच्या घोषवाक्य प्रमाणे ‘आरोग्याची वारी ! पंढरीच्या दारी !!’नुसार पालखीतील वारकऱ्यांना आरोग्य सेवा तप्तर देण्यासाठी पालखी मार्गावर आरोग्य दूत, मुक्कामाच्या ठिकाणी आरोग्य पथक, स्त्रीरोग तज्ज्ञ, हिरकणी कक्ष, 102, 108 रुग्णवाहिका सोबत राहणार आहे. कोणताही साथरोग उद्भवणार नाही, याची खास दक्षता घेण्यात आली असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. जिल्ह्यात संत गजानन महाराज पालखी ही दिनांक 23 जुलै रोजी दुपारी पानकनेरगाव येथे तर रात्री सेनगाव येथे मुक्काम, दुसऱ्या दिवशी 24 जुलै रोजी दुपारी नर्सी नामदेव महाराज संस्थान येथे तर रात्री डिग्रस कऱ्हाले येथे मुक्कामी आणि तिसऱ्या दिवशी 25 जुलै 2024 रोजी दुपारी औंढा नागनाथ येथे तर रात्री जवळा बाजार येथे मुक्कामी राहणार असून, पुढे प्रस्थान करत आडगाव रंजेबुवा येथे व दुपारनंतर परभणीकडे रवाना होणार आहे. मुक्कामाच्या ठिकाणी धूर फवारणी, ओटी टेस्ट, पाणी शुद्धीकरण करण्यात येत आहे. यासाठी 21 आरोग्य दूत, 6 आरोग्य पथक, 3 हिरकणी कक्ष, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी, नर्स व इतर तांत्रिक कर्मचारी असे एकूण 53 अधिकारी कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली आहे. सेनगाव येथे 127 वारकऱ्यांवर किरकोळ उपचार श्री संत गजानन महाराज पालखी सोहळ्यामध्ये आलेल्या 800 वारकऱ्यांना आरोग्य पथक उत्तम आरोग्य सेवा देत आहेत. सेनगाव येथे किरकोळ आजारी असलेल्या 127 वारकऱ्यांना उपचार देण्यात आला. शुद्ध पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करण्यात आली असल्याची खात्री आरोग्य पथकामार्फत करण्यात आली. तसेच पाच आयसीयू बेड, ईसीजीसह अत्यावश्यक सेवा, स्त्रीरोग तज्ज्ञ, दोन आरोग्य पथक, आरोग्य दूत यांची निर्मिती करण्यात आली होती. येथील आरोग्य पथकाची जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस यांनी पाहणी केली. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. सचिन राठोड, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल व ग्रामीण रुग्णालय सेनगाव येथील कर्मचारी स्टाफ व प्राथमिक आरोग्य केंद्र साखरा येथील कर्मचारी व जिल्हास्तरीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. नर्सी नामदेव येथे वाकऱ्यांची तपासणी हिंगोली तालुक्यातील नर्सी नामदेव महाराज संस्थान येथे झाले असता पालखी सोहळ्यामध्ये आलेल्या वारकऱ्यांची तपासणी आरोग्य पथकामार्फत करण्यात आली. यावेळी जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी येथील आरोग्य पथकाला भेट देऊन पाहणी केली. पालखी सोहळ्यातील वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करताना तालुका आरोग्य अधिकारी डॉ. गणेश जोगदंड, जिल्हा साथरोग वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, वैद्यकीय अधिकारी डॉ. अंकुश खुडे व इतर अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. ******

जिल्हास्तरीय लोकशाही दिन 1 जुलै रोजी

हिंगोली (जिमाका), दि. 24 : शासनाच्या आदेशानुसार डिसेंबर 2007 पासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. जुलै महिन्याचे जिल्हास्तरीय लोकशाही दिन दि. 1 जुलै, 2024 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे. या लोकशाही दिनास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि, जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी उपस्थित राहणार आहेत. लोकशाही दिनासाठी अर्ज स्वीकृतीचे निकष अर्ज विहित नमुन्यात व विहित वेळेमध्ये असावा. तक्रार, निवदेन वैयक्तीक स्वरुपाची असावी. अर्जदाराने विहित नमुन्यात तक्रार जिल्हाधिकारी यांच्या नावे लोकशाही दिनाच्या १५ दिवस अगोदर दोन प्रतीमध्ये पाठविणे आवश्यक राहील. त्या अर्जावर लोकशाही दिन अर्ज असे ठळक नमूद करावे. जिल्हाधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर विभागाशी संबंधित तक्रार असल्यास तालुका लोकशाही दिनानंतर १ महिन्याने जिल्हाधिकारी लोकशाही दिनांत अर्ज करता येईल. यापुढे प्रत्येक लोकशाही दिना दिवशी प्रत्यक्ष, थेट अर्ज स्वीकारला जाणार नाही. खालील बाबींचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपील, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे, देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाची नसेल तर तसेच वरीलप्रमाणे जे अर्ज लोकशाही दिनासाठी स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत असे अर्ज संबंधित विभागाकडे आठ दिवसात पाठविण्यात येतील व त्याची प्रत अर्जदारास देण्यात येईल. निवडणूक आचारसंहिता लागू असलेल्या कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नाही. तसेच संबंधित विभागाने अर्जदाराला अंतिम उत्तर लोकशाही दिनानंतर शक्य तितक्या लवकर एक महिन्याच्या आत देणे आवश्यक राहील, असे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. ******

तारण मालमत्ता ताब्यात घेण्याचे आदेश पारित करण्यासाठी न्यायालयीन प्रकरण दाखल अथवा प्रलंबित नसल्याचे प्रमाणपत्र बंधनकारक

हिंगोली (जिमाका), दि. 24 : सेक्युरिटायझेशन अँड रिकंस्ट्रक्शन ऑफ फायनान्स असेट्स अँड इन्फोर्समेंट ऑफ सेक्युरिटी इंटरेस्ट ॲक्ट 2002 चे कलम 14 नुसार गहाण मालमत्तेचा ताबा मिळणे, तसेच महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम 1960 व नियम 1961 मधील नियम 107 अन्वये थकित कर्जदारांनी कर्जाची रक्कम फेड न केल्यामुळे बँककडे तारण असलेल्या मालमत्ता ताब्यात घेण्यासाठी आदेश पारीत करण्यात येतात. त्यामुळे सर्व बँकेचे विभाग प्रमुखांनी आपल्या अधिनस्त प्राधिकृत करण्यात आलेले बँकेचे अधिकारी यांच्यामार्फत दाखल करण्यात आलेल्या ताबा प्रकरणात, तारण मालमत्तेतील भूखंड तसेच इतर तारण स्थावर मालमत्तेबाबत कोणत्याही न्यायालयात प्रकरण दाखल अथवा प्रलंबित नाही याबाबतचे प्रमाणपत्र सादर करण्याच्या सूचना देण्यात याव्यात. तसेच प्रकरण संचिकेसोबत सदर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील, अशा सूचना जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी परिपत्रकाद्वारे दिल्या आहेत. ******

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल पुरविण्यासाठी पात्र लाभार्थ्यांकडून 25 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित

हिंगोली (जिमाका), दि. 24 : गटई कामगारांना गटई काम करण्यासाठी ग्रामपंचायत, नगरपालिका, नगर पंचायत क्षेत्रात गटई स्टॉल देण्याची योजना राबविण्यात येत आहे. हिंगोली जिल्ह्यातील सर्व इच्छूक पात्र लाभार्थ्यांनी http://samajkalyanhingoli.in या संकेतस्थळाला भेट देऊन दि. 25 जुलै, 2024 पर्यंत सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली यांच्याकडे प्रस्ताव सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त यांनी केले आहे. या योजनेचा लाभ घेण्यासाठी सक्षम प्राधिकाऱ्यांने दिलेले अर्जदाराचे उत्पन्नाचे प्रमाणपत्र (ग्रामीण भागासाठी 40 हजार व शहरी भागासाठी 50 हजारापेक्षा जास्त नसावे.), रेशन कार्डाची छायांकित प्रत, गटई काम करीत असल्याबाबतचे प्रमाणपत्र (शहरी भागासाठी नगरसेवक, ग्रामीण भागासाठी ग्रामसेवक), यापूर्वी या योजनेचा लाभ घेतले नसल्याचे स्वयंघोषणापत्र, सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले जातीचे प्रमाणपत्र, जागेचा दाखला किंवा ग्रामपंचायत, नगरपालिका यांच्या मालकीची जागा असल्यास त्यांचे नाहरकत प्रमाणपत्र, वयाचा पुरावा (कमीत कमी 18 वर्षे पूर्ण व जास्तीत जास्त 60 वर्षे), सक्षम प्राधिकारी यांनी दिलेले महाराष्ट्र राज्याचे अधिवास प्रमाणपत्र आदी कागदपत्रे व अटीची पूर्तता करणे आवश्यक आहे. ******

वसमत आयटीआयमध्ये छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मार्गदर्शन

हिंगोली (जिमाका), दि. 24 : वसमतनगर औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने दि. 21 जून, 2024 रोजी येथील प्रसाद गार्डन मंगल कार्यालयात विद्यार्थी, पालकांसाठी मोफत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या करिअर मेळाव्याचे उद्घाटन आमदार राजू नवघरे यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेत राबविण्यात येणाऱ्या विविध कोर्स प्रास्ताविकातून माहिती देताना आयटीआयचे शिक्षण घेतलेला कोणताही विद्यार्थी बेरोजगार राहत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी आयटीआयचे महत्त्व जाणून पाल्यांचे या संस्थेत प्रवेश करावेत, असे आवाहन प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी केले. यावेळी समुपदेशक टी. एम. मुंगरे यांनी विद्यार्थ्यांना दहावी व बारावीनंतर पुढील शिक्षणाचे महत्व सांगितले. समुपदेशक शिवदास पोटे यांनी नोकरी देणारे तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. एन. डी. टोनपे यांनी विद्यार्थ्यांची कलमापन चाचणी घेऊन विद्यार्थ्यांना मुलाखतीची तयारी करण्याबाबत मार्गदर्शन केले. संगीता देशमुख यांनी व्यक्तीमत्व विकास या विषयावर मार्गदर्शन केले. बहिर्जी विद्यालयाचे वाघमारे यांनी अद्यावत तंत्रज्ञानावर आधारित माहिती दिली. या मेळाव्याचे सूत्रसंचालन संस्थेतील निदेशक गणेश येमेवार यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेतील गट निदेशक टी. जे. झाड, निदेशक डी. के. बुंदेले, आर. जी. कौरवार, आर. एन. कानगुले, सहायक अधिव्याख्याता डी. ए. पोतदार, पी. व्ही. वानखेडे, एन. एस. सबनवार, सचिन पडघन, निदेशिका एल.टी. हनमंतकर, वरिष्ठ लिपिक आर. जी. शहारे, अब्दुल अजीम, कनिष्ठ लिपिक विशाल दळवी, तासिका निदेशक वाहेवळ, साळवे, सोळंके, भालेराव यांनी यांनी परिश्रम घेतले. *******

जिल्हा बाल संरक्षण कक्षाच्या त्रैमासिक कामकाजाचा जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडून आढावा

हिंगोली (जिमाका), दि.24 : बाल न्याय (मुलांची काळजी व संरक्षण) अधिनियम, 2015 च्या कलम 106 नुसार जिल्हा बाल संरक्षण कक्षाची जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली नुकताच आढावा घेण्यात आला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ, जिल्हा समाज कल्याण अधिकारी आर. एच. एडके, नगर परिषदेचे उप मुख्याधिकारी उमेश हेबाडे, सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालयाचे आ. ना. वागतकर, जिल्हा सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके, माध्यमिक विभागाचे शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, आरोग्य विभागाचे वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, महेश राऊत, पोलीस अधीक्षक यांचे प्रतिनिधी एस. पी. डोंगरे, जिल्हा शल्य चिकित्सक यांचे प्रतिनिधी डॉ. बालाजी भाकरे, बाल न्याय मंडळ यांचे प्रतिनिधी अशोक खुपसे, महिला आर्थिक विकास महामंडळाचे जिल्हा समन्वयक विलास जगताप, नेहरु युवा केंद्राचे समन्वयक आशिष पंत, एनएसएस जिल्हा समन्वयक डॉ. सचिन हाटकर, युनिसेफ SBC३ चे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक विकास कांबळे, प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर, बाल कल्याण समिती अध्यक्ष सुधाकर इंगोले, बाल कल्याण समिती सदस्य परसराम हेबाडे, चंद्रकांत पाईकराव, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) पठाण, कायदा व परीविक्षा अधिकारी अँड. अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थाबाह्य) गणेश मोरे, जरीब खान, सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, रेश्मा पठाण, अनिरुध्द घनसावंत, चाईल्ड लाईन केंद्राचे समन्वयक संदिप कोल्हे उपस्थित होते. या बैठकीमध्ये कक्षाने राबविलेले विविध जन जागृती कार्यक्रम, जिल्हा महिला व बाल विकास विभाग व मिरंकल फाऊंडेशन यांच्या समन्वयाने बालगृहातील बालकांसाठी समर कॅम्पचे आयोजन, वैयक्तिक स्वच्छतेचे सत्र, मनोरंजनात्मक खेळ, कोविड काळात एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या बालकांच्या गृहभेटी, मिशन वात्सल्य पोर्टल, NCPCR पोर्टल, घर पोर्टल, PM Care पोर्टल, गती शक्ती पोर्टल व Caring पॉर्टल या सर्व पोर्टलवर भरण्यात येणाऱ्या माहितीबाबत, कोविड-19 मध्ये एक किंवा दोन्ही पालक गमावलेल्या नव्याने 1 बालक आढळून आल्याबाबत, प्रतिपालकत्व आणि प्रायोजकत्व या योजनेबाबत तसेच जिल्ह्यातील बालविवाह समूळ नष्ट करण्यासंदर्भात आखलेल्या नवीन योजनांची माहिती, बाल संगोपन योजनेसाठी आलेल्या लाभार्थ्यांचे करण्यात आलेले सामाजिक तपासणी अहवाल, बाल कामगार शोध मोहिम धाडसत्र, सीआयएसएस बालकांची शोध मोहीम आदी माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी तथा सदस्य सचिव आर. आर. मगर यांनी दिली. ******

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी पात्र लाभार्थ्यांनी तातडीने कागदपत्रे सादर करावीत

हिंगोली (जिमाका), दि.24 : महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाकडून अनुसूचित जाती व नवबौध्द घटकांतील शासकीय वसतिगृहांसाठी पात्र परंतु, वसतिगृहात प्रवेश न मिळालेल्या, प्रवेश न घेतलेल्या विद्यार्थ्यांसाठी भोजन, निवास, शैक्षणिक सुविधा या विद्यार्थ्यांना स्वतः उपलब्ध करून घेण्यासाठी भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजता राबविण्यात येत आहे. त्यानुसार सन 2024-25 या शैक्षणिक वर्षात स्वाधार योजनेच्या पात्र लाभार्थ्यांची मंजूर रक्कम ही आभासी वैयक्तीक ठेव लेखा (VPDA) पोर्टलमार्फत थेट लाभार्थ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यावर जमा होणार आहे. हिंगोली नगरपालिका हद्दीपासून 5 कि.मी. च्या परिसरातील महाविद्यालयात प्रवेश घेतलेल्या स्वाधार योजनेसाठी अर्ज भरलेल्या पात्र लाभार्थ्यांनी राष्ट्रीयकृत बँक खात्याची छायांकित रंगीत प्रत, पॅन कार्ड, आधार कार्डची छायांकीत प्रत, बँकेचा रद्द केलेला (Cancelled) चेक इत्यादी कागदपत्रे तातडीने सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या पाठीमागे, दर्गा रोड, हिंगोली येथे सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे. *******

धनगर समाजातील महिलांसाठी मार्जिन मनी योजना • नवउद्योजक महिला लाभार्थ्यांनी अर्ज करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि.24 : जिल्ह्यातील धनगर समाजातील सवलतीस पात्र नवउद्योजक महिला लाभार्थ्यांची मार्जिन मनी भरण्याची क्षमता नसल्यामुळे या नवउद्योजक महिला लाभार्थ्यांना केंद्र शासनाच्या 'स्टँड अप इंडिया' योजनेअंतर्गत एकूण प्रकल्प किंमतीच्या लाभार्थ्यांच्या हिश्श्यातील 25 टक्केमधील जास्तीत जास्त 15 टक्के मार्जिन मनी उपलब्ध करुन देण्याची योजना शासनाने सुरु केली आहे. या योजने अंतर्गत महाराष्ट्र राज्यातील धनगर समाजातील सवलतीस पात्र नवउद्योजक महिला यांनी 10 टक्के स्वहिस्सा भरणा केल्यानंतर व बँकेने अर्जदारास स्टँड अप इंडिया या योजने अंतर्गत 75 टक्के कर्ज मंजूर केल्यानंतर उर्वरित फ्रंट एंड सबसिडी 15 टक्के राज्य शासनामार्फत देण्यात येईल. याचा लाभ योजने अंतर्गत पात्र ठरलेल्या लाभार्थ्यांना देण्यात येईल. त्यासाठी धनगर समाजातील महिला लाभार्थ्यांनी सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली यांच्याकडे उद्योग आधार नोंदणी पत्र, जात प्रमाणपत्र व बँकेचे कर्ज मंजुरीचे पत्र जोडून अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे. *******

21 June, 2024

भरारी पथकांमार्फत कृषि केंद्रांची तपासणी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करा - पालकमंत्री अब्दुल सत्तार

• जिल्ह्यात अखंड वीजपुरवठा करण्याच्या महावितरणला सूचना • पीककर्ज, विमा 100 टक्के वितरीत करण्याला प्राधान्य देण्याचे बँकांना निर्देश हिंगोली (जिमाका), दि.21 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रासायनिक खते, बि-बियाणे आणि इतर कृषि निविष्ठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात. कृषि केंद्र विक्रेत्यांकडून खताचा तुटवडा भासवून अडवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषि विभागाने भरारी पथकांमार्फत अशा कृषि केंद्रांची तपासणी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित यंत्रणेला आज येथे दिले. येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन समिती, खरीप हंगाम, पाणीटंचाई, पर्जन्यमान, दुष्काळाबाबतची आढावा बैठक अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सर्वश्री. विप्लव बाजोरिया, तानाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू नवघरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती. पालकमंत्र्यांकडून जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2023-2024 चा निधी शंभर टक्के खर्च केल्याबद्दल पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. सन 2024-2025 साठी प्राप्त झालेला निधी शंभर टक्के खर्च होईल याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र, वीज पुरवठा, ट्रान्सफॉर्मर, ग्रामीण रस्ते दुरुस्तीची कामे प्राधान्याने झाले पाहिजेत. निधी खर्च करताना सर्व छोटे छोटे गावांचाही समावेश असावा. यासाठी लोकप्रतिनिधीच्या सूचना लक्षात घेऊन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. डोंगरी विकास योजनेत वंचित राहिलेल्या गावांचाही समावेश करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. सत्तार यांनी दिल्या. यावेळी जिल्ह्यातील चार ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा नव्याने समावेश करण्याबाबत आढावा घेण्यात आला. रासायनिक खत पुरवठ्यासाठी पाठपुरावा करा हिंगोली जिल्ह्यात कमी पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील 30 मंडळापैकी केवळ 9 मंडळातच समाधानकारक पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 32.30 टक्केच पेरण्या झालेल्या आहेत. पावसाचा खंड जास्त असल्यामुळे पुरेसा पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असेही आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात सध्या केवळ 52 टक्केच खताचा पुरवठा शासनाकडून झालेला आहे. उर्वरित 48 टक्के खताच्या मागणीचा प्रस्ताव तात्काळ द्यावा. शेतकऱ्यांना कुठल्याही खत, बियाण्याचा तुटवडा भासणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. सत्तार यांनी दिले. शेतकऱ्यांना 100 टक्के पीककर्ज, विमा मिळावा कमी पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व भविष्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना सन 2023-24 चा पीक विमा शंभर टक्के मिळाला पाहिजे. त्यामुळे प्रलंबित राहण्याची कारणे शोधून पिक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून द्यावा. कृषि विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. हिंगोली जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन या पिकांची आधारभूत किंमत वाढविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचा ठराव घेऊन प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्व बँकांनी खरीप पिक कर्जाचे शंभर टक्के वाटप करावे. शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन न देणाऱ्यां बँकांवर कारवाई करावी, अशा सूचना केल्या. तसेच शालेय विद्यार्थ्यांना एसटी बस सुविधा, शाळा दुरुस्तीची कामे झाले पाहिजेत. कळमनुरी व वसमत येथील रुग्णालयामध्ये सीटीस्कॅन, डायलेसीसची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करावी. 102 व 108 वाहनावर आरोग्य विभागाने नियंत्रण ठेवावेत. तसेच सर्व लोकप्रतिनिधीनी सुचविलेली कामे वेळेत करुन त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्या. शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा व ट्रॉन्सफार्मरबाबत अडवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. शेतकऱ्यांना 72 तासात ट्रान्सफार्मर उपलब्ध करुन द्यावेत. ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी शेतकऱ्यांना वीज बिलाच्या वसुलीची सक्ती करु नये. जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांना तात्काळ ट्रान्सफार्मर उपलब्ध करुन द्यावा. तसेच जलजीवन मिशनच्या कामाचे कार्यारंभ आदेश देऊन कंत्राटदार वेळेत कामे करत नसल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे. जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या पूर्ण झालेल्या कामांची माहिती दहा दिवसाच्या आत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेत सन 2023-24 मध्ये झालेल्या खर्चाची व सन 2024-25 साठी मंजूर अनुदानाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तहसीलदारांना चारचाकी वाहनांचे वितरण सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव आणि वसमत या तीन तहसील कार्यालयांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते चारचाकी वाहनांच्या चाव्या देऊन त्याचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू नवघरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक आदी उपस्थित होते. **********

यंत्रणांनी पुढाकार घेत ‘बाल विवाहमुक्त हिंगोली'कडे वाटचाल करावी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यातील प्रत्येक गावात ग्राम बाल संरक्षण समिती सक्षमीकरण करण्यासाठी प्रयत्न करावेत. प्रत्येक विभागाने पुढाकार घेऊन बालविवाह निर्मूलनासाठी आपल्या जबाबदाऱ्या ओळखून बाल विवाहमुक्त हिंगोलीकडे वाटचाल करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. नुकतीच जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली बालविवाह निर्मूलन जिल्हा कृती दलाची आढावा बैठक पार पडली. या बैठकीस उपमुख्य कार्यकारी अधिकारी (पंचायत) अनंत कुंभार, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) गणेश वाघ, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, उपशिक्षणाधिकारी प्राथमिक नितीन नेटके, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, उपमुख्याधिकारी नगर परिषद उमेश हेंबाडे, जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक सचिन हटकर, जिल्हा कौशल्य विकास प्रतिनिधी महेश राऊत, पोलीस निरीक्षक एस. पी. डोंगरे, समाज कल्याण सहाय्यक आयुक्त आ. ना. वागतकर, सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, डॉ. प्रकाश जाधव, सहायक माहिती अधिकारी चंद्रकांत कारभारी, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी आर. आर. मगर, जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, एसबीसी-3 आणि 'यूनिसेफ'चे वरिष्ठ प्रकल्प समन्वयक विकास कांबळे उपस्थित होते. जिल्ह्यातील निवडक 125 शाळांमध्ये वर्ग 6 ते 10 वीच्या विद्यार्थी व पालकांचे बालविवाह निर्मूलन जनजागृती सत्र महिला व बालविकास विभागाच्या सहकार्याने व युनिसेफ आणि एसबीसी 3 यांच्या आर्थिक सहकार्याने उज्वल शिक्षण प्रसारक मंडळ हिंगोली संस्थेने नियुक्त केलेल्या 40 स्वयंसेविकांच्या माध्यमातून 1 जुलैपासून घेण्यात येणार आहे. हे सत्र जिल्ह्यातील इतर शाळेत सुद्धा शिक्षण विभागाने घ्यावे. प्रत्येक शाळेत दर सोमवारी बालविवाह प्रतिबंधक प्रतिज्ञा द्यावी. राष्ट्रीय सेवा योजना विद्यार्थ्यांना बालविवाह जनजागृतीसाठी प्रशिक्षण देवून राष्ट्रीय सेवा योजनेच्या विद्यार्थ्यांकडून ग्रामीण भागात तसेच जिल्हास्तरावर मोठ्या प्रमाणात लोकसंख्येत सक्षम युवा शक्ती कार्यक्रमाचे आयोजन करावे, असेही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सांगितले. प्रकल्प समन्वयक मोनाली धुर्वे, बाल कल्याण समिती अध्यक्ष सुधाकर इंगोले, बाल कल्याण समिती सदस्य परसराम हेंबाडे, जिल्हा शल्य चिकित्सक प्रतिनिधी बालाजी भाकरे, प्रकल्प समन्वयक, चाईल्ड लाईन 1098 संदीप कोल्हे, बाल संरक्षण अधिकारी (संस्थात्मक) गणेश मोरे, बाल संरक्षण अधिकारी जरिबखान पठाण, कायदा तथा परीविक्षा अधिकारी अनुराधा पंडित, समुपदेशक सचिन पठाडे, सामाजिक कार्यकर्ता रेशमा पठाण, रामप्रसाद मुडे, अनिरुद्ध घनसावंत, तथागत इंगळे, राजरत्न पाईकराव इत्यादी उपस्थित होते. *****

वर्षभर दररोज योग करण्याचा संकल्प करावा -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर • हिंगोली येथे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

हिंगोली (जिमाका), दि.21 : राष्ट्राची सेवा करण्यासाठी आपले शरीर आणि मन तंदुरुस्त राहण्यासाठी योग हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे. गुरूच्या माध्यमातून दररोज योग करण्याचा योग यावा असा संकल्प करावा, असे प्रतिपादन केले. येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर आयोजित दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते. जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र, स्काऊट गाईड, योग विद्याधाम, पतंजली योग समिती, हरिओम योगा फाऊंडेशन, विविध सामाजिक संस्था, मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, संदीप सोनटक्के, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, तहसीलदार नवनाथ वगवाड, योग शिक्षक रत्नाकर महाजन, विठ्ठल सोळंके आदींची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पुढे म्हणाले की, आज दि. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. माणसाला निरोगी राहण्यासाठी योग हा घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या मनात पोहोचविण्याचा संकल्प केला पाहिजे, असे सांगून सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. आज संपूर्ण जगभर हा दिन साजरा केला जात आहे. याचे सर्व श्रेय भारत देशाला, देशाच्या प्रधानमंत्र्यांना आहे. योग हा आपल्या जीवनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यामुळे सर्वांनी योग करुन निरोगी रहावे, असे सांगून आमदार तानाजी मुटकुळे यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या. योगगुरु रत्नाकर महाजन व विठ्ठल सोळंके यांनी योग दिनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाने आपले मित्र व कुटुंबीयांना योगाचे महत्त्व समजावून सांगावे. तसेच योगाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन केले. तसेच योग दिनानिमित्त त्यांनी उपस्थितांकडून योगविद्येची विविध आसने करुन घेतली. योगाची शपथ तसेच प्रार्थना आणि संकल्प करत, शांती पठनाने योग दिनाची सांगता झाली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन योग शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. या शिबिरास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, योगाभ्यासी मंडळाचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. **********

20 June, 2024

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत सहभाग नोंदवावा - जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम

हिंगोली (जिमाका), दि. 20 : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना सन 2024-25 मृग बहारमध्ये संत्रा, मोसंबी व आंबिया बहारमध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, केळी (प्रायोगिक तत्वावर) या 4 फळ पिकासाठी शासन निर्णयातील अटी व शर्ती, अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोके निकषानुसार जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर शेतकऱ्यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतकऱ्यांना मृग बहार सन 2024-25 या हंगामासाठी योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने, भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. आंबिया बहारातील गारपीट या हवामान धोक्यासाठी अतिरिक्त विमा संरक्षण देण्यात येते. त्यासाठी अतिरिक्त विमा हप्ता शेतकऱ्यांना देय आहे. जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागानांच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. त्यासाठी संत्रा व मोसंबी या फळपिकांचे उत्पादनक्षम वय 3 वर्षे आहे. ही योजना सन 2024-25 मृग बहार मध्ये हिंगोली जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-400023, ई-मेल : pikvima@aicofindia.com या विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. मृग बहार सन 2024-25 मध्ये फळ पिकनिहाय योजनेमध्ये शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था, बँक, आपले सरकार सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे. शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संत्रा या फळ पिकासाठी 25 जून, 2024 ही अंतिम मुदत आहे, तर मोसंबी या फळ पिकासाठी 30 जून, 2024 ही अंतिम मुदत आहे. मृग बहार सन 2024-25 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी खालीलप्रमाणे निर्धारित करण्यात आले आहेत. सदरचे निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत देय होईल. संत्रा या फळ पिकासाठी कमी पाऊस या धोक्यासाठी विमा संरक्षण कालावधी 15 जून ते 15 जुलै, 2024 असा आहे, तर पावसाचा खंड या धोक्यासाठी विमा संरक्षण कालावधी 16 जुलै ते 15 ऑगस्ट, 2024 असा आहे. यासाठी प्रती हेक्टरी शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम 5 हजार रुपये आहे. तर विमा संरक्षित रक्कम 1 लाख रुपये आहे. मोसंबी या फळ पिकासाठी कमी पाऊस या धोक्यासाठी विमा संरक्षण कालावधी 1 जुलै ते 31 जुलै, 2024 असा आहे, तर पावसाचा खंड या धोक्यासाठी विमा संरक्षण कालावधी 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2024 असा आहे. यासाठी प्रती हेक्टरी शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम 5 हजार रुपये आहे. तर विमा संरक्षित रक्कम 1 लाख रुपये आहे. मृग बहारातील अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या सविस्तर माहितीसाठी कृषि विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in वर पहावे. तसेच ई-सेवा केंद्र व बँक स्तरावरही ही माहिती उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबंधित सहभागी विमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिसूचित फळ पिकांच्या हवामान धोक्यांची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजीकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक, वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ********

वसमतनगर आयटीआय येथे आज छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबीर

हिंगोली (जिमाका), दि. 20 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था वसमतनगर अंतर्गत वसमतनगर येथील प्रसाद गार्डन मंगल कार्यालयात दि. 21 जून, 2024 रोजी सकाळी 10.30 वाजता वसमत तालुका व परिसरातील विद्यार्थी व पालकांसाठी मोफत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या करिअर मार्गदर्शन शिबिरामध्ये इयत्ता 10 वी व 12 वी नंतर काय, भविष्यातील शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी, कौशल्य शिक्षणाचे महत्त्व, अद्यायवत तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, नोकरीसाठी मुलाखतीची तयारी करणे, व्यक्तिमत्त्व विकास व बायोडाटा तयार करणे इत्यादी विविध विषयावर तज्ञ वक्त्यामार्फत मार्गदर्शन होणार आहे. विद्यार्थी व पालकांनी या समुपदेशन मेळाव्यामध्ये हजर राहून लाभ घ्यावा, असे आवाहन वसमतनगर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी केले आहे. ******

प्रधानमंत्री पिक विमा योजनेत एक रुपया भरुन शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात सहभागी व्हावे - जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम

हिंगोली (जिमाका), दि. 20 : नैसर्गिक आपत्तींमुळे पिकाच्या होणाऱ्या नुकसानीपासून शेतकऱ्यास आर्थिक स्थैर्य अबाधित राखण्याच्या दृष्टिकोनातून प्रधानमंत्री पीक विमा योजना राबविण्यात येत आहे. खरीप-2024 हंगामात पेरण्या सुरु झाल्या असून शेतकऱ्यांना विमा योजनेत सहभाग घेण्यासाठी केंद्र शासनाच्या पिक विमा पोर्टल (www.pmfby.gov.in) सुरु करण्यात आले आहे. त्यामुळे जास्तीत जास्त शेतकऱ्यांनी 15 जुलै, 2024 पर्यंत एक रुपयात पिके संरक्षित करावीत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. प्रधानमंत्री पिक विमा योजनेत शेतकऱ्यांना एक रुपया विमा हप्ता भरून सहभागी करून घेण्याचा निर्णय राज्य शासनाने 2023 मध्ये घेतला आहे. गत वर्षी खरीप-2023 मध्ये राज्यातील विक्रमी असे 1 कोटी 70 लाख विमा अर्जाद्वारे शेतकऱ्यांनी याचा मोठ्या प्रमाणात लाभ घेतला. या योजने अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 5 लाख 12 हजार 439 शेतकऱ्यांनी खरीप हंगाम-2023 मध्ये सहभाग नोंदविला होता. विमा योजनेत समाविष्ट पिके खरीप ज्वारी, तूर, मूग, उडीद, सोयाबीन, कापूस या 6 पिकांसाठी अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांचा विमा शेतकऱ्यांना भरता येईल. त्यामुळे सर्व शेतकरी या योजनेत सहभाग नोंदवू शकतात. कर्जदार आणि बिगर कर्जदार शेतकऱ्यांना योजनेतील सहभाग ऐच्छिक राहील. भाडेपट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांना पीक विमा पोर्टलवर नोंदणीकृत भाडेकरार अपलोड करणे आवश्यक आहे. प्रत्यक्ष लागवड केलेले व ई-पिक पाहणीमध्ये नोंद केलेले पिक विमा संरक्षित करावे. शासकीय जमीन, अकृषक जमीन, कंपनी, संस्थामंदिर, मस्जिद यांची जमीन वर विमा काढल्यास शासन निर्णयानुसार रितसर फौजदारी कारवाई करण्यात येईल. विमा संरक्षीत केलेले पिक पाहणीमध्ये न आढळल्यास शेतकरी लाभापासून वंचित राहू शकतात. हिंगोली जिल्ह्यात कापूस, सोयाबीन पिकांमध्ये महसूल मंडळामधील पिकाचे सरासरी उत्पादन नोंदवताना रीमोट सेसिंग तंत्रज्ञानाचा वापर करून येणाऱ्या उत्पादनास 40 टक्के आणि पिक कापणी प्रयोगद्वारे आलेल्या उत्पादनास 60 टक्के भारांकन देऊन येणारे उत्पादनानुसार महसूल मंडळाचे सरासरी उत्पादन निश्चित केले जाणार आहे. अर्ज करण्यासाठी आधार क्रमांक आवश्यक आहे. पिक विम्यातील अर्ज हा आधारवरील नावाप्रमाणेच असावा. पिक विम्यातील नुकसान भरपाई ही केंद्र शासनाच्या विमा पोर्टलद्वारे आधार संलग्न बँक खात्यामध्ये करण्यात येते. यासाठी आपले बँक खाते आधार संलग्न पेमेंट मिळण्यासाठी अधिकृत असणे आवश्यक आहे. याकरिता बँक मॅनेजर माहिती देऊ शकतो. आधार कार्ड वरील नाव व बँक खात्यावरील नाव सारखे असावे. विमा अर्ज भरण्यासाठी प्रति शेतकरी सीएससी केंद्रास रुपये 40 मानधन केंद्र शासनाने निर्धारित करून दिलेले आहे. ते संबंधित विमा कंपनीमार्फत सीएससी केंद्रास दिले जाते. त्यामुळे शेतकऱ्यांनी प्रति अर्ज एक रुपया प्रमाणे रक्कम सीएससी चालकांना देऊन अर्ज करावा. अतिरिक्त रक्कमेची मागणी केल्यास तालुका कृषि अधिकारी यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन करण्यात आले आहे. विमा संरक्षणाच्या बाबी : पिक पेरणीपासून काढणी पर्यंतच्या कालावधीत पिकांच्या उत्पादनात येणारी घट, पिक पेरणीपूर्व लावणीपूर्व नुकसान, हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे नुकसान, काढणी पश्चात पिकाचे नुकसान, स्थानिक नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान या बाबी समाविष्ट आहेत. पीक विमा योजनेत सहभागी व्हा अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकासाठी पिक कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यास देखील या विमा योजनेत सहभाग बंधनकारक नाही. त्यासाठी अंतिम दिनांकाच्या 7 दिवस अगोदर कर्ज घेतलेल्या बँकेमध्ये अर्ज देणे आवश्यक (अनिवार्य) आहे. इतर बिगर कर्जदार शेतकऱ्याने आपला सातबाराचा उतारा, बँक पासबुक, आधारकार्ड, पिकपेराचे स्वयं घोषणापत्र व आवश्यक ठिकाणी नोंदणीकृत भाडेपत्रक, करारनामा आपलोड करावा. योजनेत सहभागी होण्यासाठी प्राधिकृत बँक, कॉमन सर्विस सेंटर अथवा www.pmfby.gov.in या पोर्टलचे सहाय्य घेता येईल. सर्वसाधारण पिकनिहाय विमा संरक्षित रक्कमेत जिल्हानिहाय फरक संभवतो. ज्वारी या पिकासाठी विमा संरक्षित रक्कम प्रती हेक्टरी 30 हजार रुपये, तूर पिकासाठी 36 हजार 802, मूग पिकासाठी 22 हजार, उडीद पिकासाठी 22 हजार, सोयाबीन व कापूस पिकासाठी प्रत्येकी 55 हजार रुपये विमा संरक्षित रक्कम आहे. योजनेच्या अधिक माहितीसाठी केंद्र शासनाचे कृषि रक्षक पोर्टल हेल्पलाईन 14447 संबंधित विमा कंपनी, स्थानिक कृषि विभाग कार्यालयाशी संपर्क साधावा. शेतकऱ्यांनी अधिसूचित पिकांची माहिती घेऊन विहित मुदतीमध्ये नजीकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक, वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. *******

डीएलएड प्रवेशासाठी 25 जूनपर्यंत मुदतवाढ • इच्छुकांनी अर्ज करण्याचे प्रवेश निवड समितीचे आवाहन

हिंगोली, दि. 20 (जिमाका): राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, पुणे यांच्यामार्फत शैक्षणिक वर्ष 2024-25 डी.एल.एड.-प्रथम वर्ष प्रवेशासाठी ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी 25 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली असल्याचे राज्यस्तरीय डी. एल. एड. प्रवेश निवड समितीचे अध्यक्ष राहुल रेखावार यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. प्रथम वर्ष प्रवेशासाठी 18 जून ही अंतिम मुदत देण्यात आली होती. मात्र, राज्यातील अनेक संस्था, लोकप्रतिनिधी व संघटनांनी मागणी केल्यामुळे हे अर्ज भरण्यासाठी आता 25 जूनपर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. याबाबतच्या सर्व सूचना, प्रवेशपात्रता इ. बाबी राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्या www.maa.ac.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहेत. तसेच ऑनलाईन अर्ज भरल्यानंतरचे फेरीनिहाय सविस्तर सुधारित वेळापत्रक संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी उमेदवार व शैक्षणिक संस्थांनी वेळोवेळी संकेतस्थळ पाहण्याची दक्षता घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ******

पालकमंत्री अब्दुल सत्तार आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

हिंगोली (जिमाका), दि. 20 : राज्याचे अल्पसंख्याक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार हे उद्या शुक्रवार (दि. 20) रोजी हिंगोली दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. शुक्रवार, दि. 21 जून, 2024 रोजी सकाळी 11.45 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथून वाहनाने जिल्हाधिकारी कार्यालयाकडे प्रयाण. दुपारी 12 वाजता जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हा नियोजन समिती सभेस उपस्थिती. दुपारी 1 वाजता खरीप हंगाम, पाणी टंचाई, पर्जन्यमान, दुष्काळाबाबतच्या बैठकीस उपस्थिती. दुपारी 2 वाजता शासकीय विश्रामगृह, हिंगोली येथे राखीव. सोयीनुसार हिंगोली येथून वाहनाने सिल्लोडकडे प्रयाण करतील. ******

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज आमंत्रित

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजनेसाठी अर्ज आमंत्रित हिंगोली (जिमाका), दि. 20 : इतर मागास बहुजन कल्याण विभागाच्या 13 डिसेंबर 2023 शासन निर्णयान्वये ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले आधार योजना सुरु करण्यात आली आहे. तरी गरजू व पात्र विद्यार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज सादर करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. हिंगोली जिल्ह्याच्या ठिकाणी, तालुक्याच्या ठिकाणी शिक्षण घेणाऱ्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण व व्यावसाईक शिक्षण घेण्यासाठी शासकीय वसतिगृहात प्रवेशास पात्र असणाऱ्या व वसतिगृहात प्रवेश न मिळणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी वार्षिक शैक्षणिक खर्च भागविण्यासाठी वसतिगृहाप्रमाणे निवास, भोजन व अन्य सुविधाअभावी पुढील शिक्षण घेऊ शकत नाहीत, अशा विद्यार्थ्यांना इयत्ता 12 वी नंतरच्या व्यावसायिक तसेच बिगर व्यावसायिक अभ्यासक्रमामध्ये प्रवेशित विद्यार्थ्यांना सुविधा स्वतः उपलब्ध करुन घेण्यासाठी आवश्यक रक्कम विद्यार्थ्यांच्या आधार सलग्न बँक खात्यात थेट रक्कम या योजनेतून जमा करण्यात येते. या योजनेंतर्गत सन 2024-25 या शैक्षणिक वर्षासाठी जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी दिनांक 01 जुलै ते 31 ऑगस्ट 2024 पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक श्री. गायकवाड यांनी केले आहे. योजनेचे निकष : विद्यार्थी शासकीय वसतिगृहास प्रवेश घेण्यास पात्र तसेच महाराष्ट्राचा रहिवासी असावा. शासकीय वसतिगृह प्रवेशासाठी पात्र असलेल्या अभ्यासक्रमास विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थी हा इतर मागासवर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागासवर्ग प्रवर्गातील असावा. विद्यार्थ्यांने जात प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक असेल. या योजनेसाठी इतर मागास बहूजन कल्याण विभाग शासकीय वसतिगृहात प्रवेशासाठी अर्ज केलेल्या व प्रवेश न मिळालेल्या इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास वर्ग विद्यार्थ्यांचा या योजनेच्या निवडीसाठी प्राधान्याने विचार करण्यात येईल. विद्यार्थ्याने स्वतःचा आधार क्रमांक राष्ट्रीयकृत शेड्यूल्ड बँक खात्याशी संलग्न करणे बंधनकारक आहे. त्यासाठी त्याच्या पालकाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थी स्थानिक रहिवाशी नसावा. नगर पालिकेच्या हद्दीपासून 5 कि.मी. परिसरात असलेल्या महाविद्यालय, शैक्षणिक संस्थेत शिकत असलेले विद्यार्थी या योजनेचा लाभ घेण्यास पात्र असतील. इयत्ता 12 वीमध्ये किमान 60 टक्के गुण असणाऱ्यांना पदवी, पदव्युत्तर शिक्षणासाठी लाभ घेता येईल. व्यावसायिक शिक्षण प्रथम, व्दितीय, तृतीय, चतुर्थ वर्षात किंवा पदवी शिक्षणासाठी प्रवेश घेतलेले विद्यार्थीच या योजनेसाठी पात्र आहेत. या योजनेमध्ये दिव्यांग (इतर मागास वर्ग, विमुक्त जाती व भटक्या जमाती आणि विशेष मागास वर्ग घटकातील) विद्याथ्यांना 3 टक्के आरक्षण असेल, त्यांना गुणवत्तेची टक्केवारी 50 टक्के इतकी राहील. या योजनेसाठी खास बाब सवलत लागू राहणार नाही. अर्ज करण्यासाठी आवश्यक कागदपत्रे : जातीचा दाखला, महाराष्ट्राचा रहिवाशी असल्याचा पुरावा, आधार कार्ड, बँक पासबूक सत्यप्रत, उत्पनाचे प्रमाणपत्र 2.50 लाखाच्या आत व फॉर्म नंबर 16, विद्यार्थी दिव्यांग असल्याबाबतचे प्रमाणपत्र, भाड्याने राहत असल्याबाबत भाडे चिठ्ठी व भाडे करारपत्र व स्थानिक रहिवासी नसल्याचे प्रतिज्ञापत्र नोटरी केलेले, स्वयंघोषणापत्र, इयत्ता 12 वी व पदवी परीक्षेचे गुणपत्रक, महाविद्यालयाचे बोनाफाईट, विद्यार्थिनी विवाहीत असल्यास पतीचा उत्पनाचा पुरावा, बँक खाते आधार क्रमांकाशी संलग्न असल्याचा पुरावा, विद्यार्थ्याने कोणत्याही शासकीय वसतिगृहात प्रवेश घेतला नसल्याबाबतचे शपथपत्र जोडावे. स्थानिक रहिवाशी नसल्याबाबतचे प्रमाणपत्र, विद्यार्थी राहत असल्याचा पुरावा (भाडेकरारनामा), महाविद्यालयाचे उपस्थिती प्रमाणपत्र, सत्र परीक्षेच्या निकालाची सत्यप्रत, विद्यार्थ्यांनी शासकीय वसतिगृहास प्रवेशासाठी अर्ज सादर केलेला असावा व शासकीय वसतिगृहात प्रवेश मिळालेला नसावा. अर्जाचा विहीत नमुना सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण कार्यालय, हिंगोली या कार्यालयात उपलब्ध करुन देण्यात आलेला असून, गरजू विद्यार्थ्यांनी याचा लाभ घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ******

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी तात्काळ अर्ज सादर करण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 20 : जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेशित धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या लाभार्थी निवडीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत. विद्यार्थी धनगर समाजातील असावा. इयत्ता बारावीमध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील. योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांने इयत्ता बारावी नंतर मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी रहिवाशी नसावा. हिंगोली शहरातील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा असावा. एका विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त पाच वर्षे योजनेचा लाभ घेता येईल. विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी प्रवेश घेतलेला विद्यार्थी योजनेंतर्गत लाभास पात्र असेल. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी लाभास पात्र असेल तथापि, योजनेंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा. निवड केलेला लाभार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील, मात्र विद्यार्थ्यांस प्रत्येक वर्षी त्या-त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. धनगर समाजातील अपंग विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ प्राधान्याने देय राहील. वरील निकषानुसार पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांस ऑफलाईन पध्दतीने सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली यांच्याकडे तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे. *******

कळमनुरी आयटीआयमध्ये छत्रपती शाहू महाराज युवा शक्ती करिअर मार्गदर्शन

हिंगोली (जिमाका), दि. 20 : कळमनुरी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेच्या वतीने आज येथील तोष्णीवाल मंगल कार्यालयात विद्यार्थी, पालकांसाठी मोफत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या करिअर मेळाव्याचे उद्घाटन आमदार संतोष बांगर यांच्या हस्ते करण्यात आले. संस्थेत राबविण्यात येणाऱ्या विविध कोर्स प्रास्ताविकातून माहिती देताना आयटीआयचे शिक्षण घेतलेला कोणताही विद्यार्थी बेरोजगार राहत नाही. त्यामुळे विद्यार्थी व पालकांनी आयटीआयचे महत्त्व जाणून पाल्यांचे या संस्थेत प्रवेश करावेत, असे आवाहन प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी केले. यावेळी समुपदेशक स. ना. भालेराव यांनी विद्यार्थ्यांना दहावी व बारावीनंतर पुढील शिक्षणाचे महत्व सांगितले. समुपदेशक कच्छवे यांनी नोकरी देणारे तयार व्हावेत, अशी अपेक्षा व्यक्त केली. श्री. टोम्पे यांनी विद्यार्थ्यांना मुलाखतीची तयारी करण्याबाबत मार्गदर्शन केले. या कार्यक्रमामध्ये राज्य शासनाच्या सर्व महामंडळाचे प्रतिनिधी उपस्थित होते. या मेळाव्याचे सूत्रसंचालन संस्थेतील निदेशक एस. जी. सोनटक्के यांनी केले. तर कार्यक्रम यशस्वीतेसाठी संस्थेतील कनिष्ठ लिपिक डी. जे. गायकवाड, निदेशिका श्रीमती हुलसुरे, वरिष्ठ लिपिक श्रीमती सोरगे, निदेशक चैतन्य कुदळे, सहायक भांडारपाल सुर्यंवशी, साखरवाड, गजानन गायकवाड, शेरु, संस्थेतील मेस्को कर्मचारी लुटे, नईम, मुधोळ, रणवीर यांनी परिश्रम घेतले. *******

19 June, 2024

जिल्ह्यातील नागरिकांनी सिकलसेल आजाराची तपासणी करुन घ्यावी - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके • जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थेत 'जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन' साजरा

हिंगोली (जिमाका), दि.19 : जिल्ह्यातील सर्व सिकलसेल संशयित रुग्णांनी आरोग्य तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले आहे. हा कार्यक्रम हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील कर्मचारी यशस्वीरित्या राबवित आहेत. यावेळी लाभार्थीची सिकलसेल चाचणी करून त्यांना समुपदेशन कऱण्यात आले व तसेच रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आली. जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री- रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य पथक, आरोग्य वर्धिनी केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या सर्व आरोग्य संस्थेत साजरा करण्यात आला. सिकलसेल हा लाल रक्त पेशींमध्ये होणारा आजार आहे. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरातील लाल रक्त पेशींचा आकार हा गोल असतो. पण सिकलसेल आजारामध्ये या पेशींचा आकार ऑक्सिजन न मिळाल्यामुळे विळ्यासारखा होतो. सिकल म्हणजे विळा व सेल म्हणजे पेशींना सिकलसेल म्हणतात. सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाचे उद्दिष्टे : सिकलसेल आजार हा अनुवंशिक आहे. यात आई आणि वडील दोघेही ग्रस्त किंवा वाहक असल्यास यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक व ग्रस्त व्यक्ती शोधून त्याचे आपापसात होणारे विवाह टाळावेत. या आजाराचे जनतेमधील प्रमाण शोधून काढणे. जास्तीत-जास्त लोकांनी सिकलसेल आजाराची तपासणी करण्यासाठी त्यांना प्रवृत करणे. सिकलसेल वाहक व पीडित व्यक्तींनी दुसऱ्या वाहक व पीडित व्यक्तीशी विवाह टाळावा यासाठी समुपदेशन करणे. यापूर्वी विवाह झालेल्या सिकलसेल वाहक, पीडित-पीडित, वाहक-पीडित अशा जोडप्यांना ओळखून त्यांना यापुढे सिकलसेल आजारग्रस्त बालक जन्माला येऊ नये यासाठी गरोदरपणी गर्भजल चाचणी व गर्भपातासाठी समुपदेशन या सेवा उपलब्ध करून देणे. सिकलसेल रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालय स्तरावर परिणामकारक व नियमित उपचार करून देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. सिकलसेल आजारचे मुख्य प्रकार दोन : 1) आजारी व्यक्ती ( सिकलसेल सफर किंवा पीडित व्यक्ती ) : पीडित व्यक्तीला वारंवार जंतू संसर्ग होतो व लवकर बरा होत नाही. रक्त पेशी लवकर नष्ट होतात. पीडिताला खूप वेदना होतात. सांधे सुजणे, वेदना होणे, भूख न लागणे तसेच पोटात डाव्या बाजूला वेदना होणे. 2) सिकलसेल वाहक व्यक्ती : वेदना किंवा त्रास न होणारी व्यक्ती पुढील पिढीला हा आजार देऊ शकते. अशा व्यक्तीस सिकलसेल वाहक म्हणतात. सिकलसेल आजाराची सर्वसाधारण लक्षणे : रक्ताक्षय, हातापायवर सूज येणे, कावीळ, असह्य वेदना, पक्षाघात, पित्ताशय, मूत्रपिंड, न भरून येणाऱ्या जखमा, डोळ्यावर परिणाम होणे, शारीरिक, मानसिक त्रास,जंतुसंसर्ग इत्यादी लक्षणे आहेत. उपचार : सर्व सिकलसेल रुग्णांना फॉलिक अँसिड गोळ्या देणे. रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनानाशक औषधे देणे. जंतुसंसर्ग झाल्यास अँटीबायोटिक देऊन उपचार करणे. गुंतागुंतीच्या रुग्णांना वैद्यकीय महविद्यालयात हलविणे. रक्त संक्रमणाची गरज असणाऱ्या रुग्णांना रक्त संक्रमणाची सोय करणे. दक्षता : सिकलसेल हा अनुवांशिक आहे. त्यामुळे लग्न ठरवण्यापूर्वी मुलगा व मुलगी दोघांचीही रक्ताची चाचणी करून घ्यावी. तसेच दोघेही वाहक असतील तर, एक वाहक व एक ग्रस्त असेल तर व दोघेही ग्रस्त असतील तर विवाह टाळावा. हिंगोली जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर २०१२ पासून सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमा अंतर्गत १ ते ४० वयोगटातील व्यक्तीची सोल्युबिलिटी चाचणी करण्यात येते. नोव्हेंबर २०१२ पासून जून २०२४ पर्यंत सिकलसेल सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आल्या. यामध्ये एकूण १०९ रुग्ण आढळून आले आहेत, तर ९५८ वाहक आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयात सिकलसेल रुग्णासाठी डे-केअर सेंटरची व्यवस्था केली आहे. यामध्ये रुग्णांना मोफत उपचार, वैद्यकीय सल्ला व समुपदेशन करण्यात येते. हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री-रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इत्यादी सर्व स्तरावर सिकलसेल तपासणी मोफत करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन सिकलसेलची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभामार्फत करण्यात आले आहे. ******

मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्र ज्येष्ठ नागरिकांकडून 25 जुलैपर्यंत अर्ज आमंत्रित

हिंगोली (जिमाका), दि. 19 : राज्यातील 65 व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी तसेच आवश्यक गरजांसाठी राज्य शासनाने 'मुख्यमंत्री वयोश्री योजना' सुरु केली आहे. यासाठी पात्र ज्येष्ठ नागरिकांना 3 हजार रुपये पर्यंतची रक्कम साहित्य खरेदीसाठी महाडिबीटीद्वारे त्यांच्या बँक खात्यात जमा करण्यात येणार आहे. या योजनेचा लाभ मिळण्यासाठी दिनांक 25 जुलैपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली येथे अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहायक आयुक्त, समाज कल्याण, हिंगोली यांनी केले आहे. अर्जदार हा 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे पूर्ण केलेला असावा. अर्जासोबत आधार कार्ड, मतदान कार्ड, राष्ट्रीय सामाजिक सहाय्य कार्यक्रमांतर्गत इंदिरा गांधी, राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन योजनेअंतर्गत किंवा राज्य, केंद्रशासित सरकारच्या इतर कोणत्याही पेन्शन योजनेअंतर्गत वृद्धापकाळ निवृत्ती वेतन मिळाल्याचा पुरावा किंवा तहसीलदार किंवा तत्सम सक्षम अधिकारी यांनी निर्गमित केलेले ज्येष्ठ नागरिक प्रमाणपत्र जोडणे आवश्यक, आधार संलग्न राष्ट्रीयकृत बँकेतील बचत बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स, पासपोर्ट आकाराचे २ छायाचित्रे, उत्पन्नाचे प्रमाणपत्र. (लाभार्थ्याचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 2 लाख रुपयंच्या आत असावे.), स्वयं-घोषणापत्र - CPSU द्वारे लाभार्थ्यांकडून सदरील प्राप्त रक्कम नेमून दिलेल्या प्रयोजनाकरिता वापरण्यात येईल, असे स्वयंघोषणापत्र प्राप्त करुन घ्यावे तसेच राष्ट्रीय योजनेचा, केंद्र पुरस्कृत समकक्ष योजनेचा मागील 3 वर्षात लाभ घेतला नसल्याचे देखील स्वयंघोषणापत्र नमूद करण्यात यावे. तसेच वरीलपैकी कोणते साहित्य खरेदी करणार याची माहिती अर्जात नमूद करणे आवश्यक आहे. वरील कागदपत्रे पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यांनी 25 जुलैपर्यंत सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या पूर्व बाजूस, दर्गा रोड, हिंगोली येथे परिपूर्ण अर्ज सादर करावेत. ******

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिराचे आयोजन • योग शिबिराचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि.19 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, योग विद्याधाम, पतंजली योग समिती, जिल्हा योगा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जून, 2024 रोजी सकाळी 6 ते 7 वाजे दरम्यान योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योग शिबिराचा सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व जनतेनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाची पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तर समितीची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके, गट शिक्षणाधिकारी बिरमवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, योग शिक्षक रत्नाकर महाजन, विठ्ठल सोळंके, विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान महोदयांनी 2014 च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने दि. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असणारी योगविद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योगविद्या सहाय्यभूत आहे. तसेच केंद्र शासनाने दि. 21 जून, 2024 हा दिवस दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. योगा दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण योग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे. दि. 21 जून, 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करुन जनतेमध्ये आरोग्य आणि भावनिक निरोगीपणा सुधारणा, एक लक्षणीय मालमत्ता म्हणून त्यांचे महत्व आणि योगदान यावर प्रकाश टाकून योगाचा सराव सुरु ठेवण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे तसेच योगासने नागरिकांचा एक अविभाज्य भाग बनविणे आणि त्याद्वारे सर्वांसाठी आरोग्यदायी जीवन जगणे हे योग दिनाद्वारे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगून या योग दिनासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक, योग साधक, खेळाडू, विद्यार्थी यांनी उपस्थित राहून योगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले आहे. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिरासाठी सर्वांनी समन्वय ठेवून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच विद्यार्थ्यांची रॅली काढून घोषवाक्याच्या माध्यमातून योग दिनाचे महत्व सांगून योग शिबिरासाठी जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहण्यासाठी आवाहन करावेत, अशा सूचना केल्या. *******

राज्य राखीव पोलीस बलाच्या आस्थापनेवरील पोलीस भरती प्रक्रिया कालावधीत वाहतूक मार्गात बदल

हिंगोली (जिमाका), दि. 19 : येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 यांच्या आस्थापनेवरील 222 सशस्त्र पोलीस शिपाई पदांकरिता पोलीस भरती प्रक्रिया दि. 19 जून ते 20 जुलै, 2024 या कालावधीत 28 दिवस घेण्याचे नियोजित आहे. या भरती प्रक्रियेसाठी 21 हजार 307 उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केलेले आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये 5 कि.मी. धावणे हा प्रकार असल्याने व कॅम्पमधील अंतर्गत रस्ते खराब झाले असल्याने धावणे प्रकारासाठी कॅम्पच्या बाहेरील जुना बायपास रोड (राणी सती मंदीर ते गारमाळ गाव) येथे घेण्याचे नियोजित आहे. त्यामुळे हा रस्ता रहदारीचा असल्याने पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांना वाहतुकीचा त्रास होऊ शकतो. तसेच सामान्य लोकांना सुध्दा या भरती प्रक्रियेचा त्रास होऊ शकतो. त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेसाठी जुना बायपास रोड (राणी सती मंदीर ते गारमाळ गाव) वापरण्याची परवानगी दिली आहे. पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जुना बायपास रोडवरील (राणी सती मंदीर ते गारमाळ गाव वाहतूक ही सकाळी 6 ते 8 वाजता व दुपारी 4 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे. पोलीस भरती प्रक्रियेसाठी हिंगोली शहरातील वाहतुकीस अडथळा होऊ नये. तसेच कोणतेही अनुचित प्रकार होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दि. 19 जून, 2024 पासून ते पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राणी सती मंदीर ते गारमाळ गाव या मार्गाने जाणारी वाहतूक सकाळी 6 ते 8 व दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहील. या मार्गाने जाणारी वाहतूक ही खटकाळी बायपास ते बस स्टँड, जुना अकोला रोड, तहसील, जुना रेल्वे ओव्हर ब्रीज, रिसाला बाजार ते अकोला बायपास रोडने वळविण्यात आले आहे. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द नियमानुसार कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधितांना दिले आहेत. *****

संशयित डेंग्यू व हिवतापाचा रुग्ण शासकीय यंत्रणेस कळविणे बंधनकारक - जिल्हा हिवताप अधिकारी

हिंगोली (जिमाका), दि. 19 : किटकजन्य आजारांमध्ये डेंग्यू व हिवताप या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या आजाराचे निश्चित निदान वेळेत होऊन उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. डेंग्यू व हिवताप हे दोन्ही आजार अधिसूचित (Notifiable) म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे आरोग्य सेवा देणाऱ्या प्रत्येक खाजगी रुग्णालयांनी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी संशयित किंवा निदान झालेल्या डेंग्यू व हिवताप रुग्णाची माहिती संबंधितांना देणे बंधनकारक आहे. भारत सरकारने 2024 पर्यंत हिवताप दुरीकरणाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. भारत सरकाने तयार केलेल्या आराखड्यानुसार 2027 पर्यंत हिवताप प्रवण क्षेत्रामध्ये हिवतापाचे रुग्ण शून्य करणे व 2030 पर्यंत हिवताप दुरीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. याचप्रमाणे डेंग्यू आजाराचे सुध्दा लवकर निदान करुन वेळेत उपचार करणे गरजेचे आहे. परंतु खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व रुग्णालये डेंग्यू व हिवतापाच्या रुग्णांसंबधी माहिती शासकीय यंत्रणेला कळवत नाहीत, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 9 जून, 2016 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार डेंग्यू या आजाराला अधिसूचित आजार म्हणून घोषित केले आहे. तसेच हिवताप हा आजार सुध्दा 21 डिसेंबर, 2021 रोजी अधिसूचित आजार म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे संबंधित संशयित रुग्णाची माहिती न दिल्यास साथरोग अधिनियम 1897 (1897 चा 3) कलम 2 नुसार संबंधितावर कार्यवाही होऊ शकते. त्यामुळे सर्व खाजगी रुग्णालये, सुश्रुषालये, वैद्यकीय संस्था यांनी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यांना डेंग्यू व हिवताप रुग्णाविषयी त्वरित माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे. *******

हिंगोली लोकसभा मतदार संघातील उमेदवारांनी निवडणुकीचे अंतिम लेखे सादर करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 19 : लोकप्रतिनिधीत्व अधिनियम-1951 चे कलम 78 नुसार निवडणूक लढविणाऱ्या प्रत्येक उमेदवारांने त्यांचे निवडणूक कालावधीमध्ये केलेल्या सर्व खर्चाचे लोकप्रतिनिधीत्व अधिनियमातील कलम 77 नुसार अचूक व परिपूर्ण लेखे निवडणूक निकाल जाहीर झाल्यापासून 30 दिवसाच्या आत जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांच्याकडे सादर करणे बंधनकारक आहे. त्यामुळे हिंगोली लोकसभा निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी अचूक व परिपूर्ण लेखे तात्काळ सादर करावेत, असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. अचूक व परिपूर्ण लेखे सादर न करणाऱ्या उमेदवारांना भारत निवडणूक आयोग यांच्याकडून नोटीस बजावून लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 कलम 10 (अ) नुसार संसदेच्या दोन्ही सभागृहाचे तसेच राज्य विधिमंडळाच्या सभागृहाचे सदस्य म्हणून निवडणूक लढविण्यास 3 वर्षासाठी अपात्र केले जाऊ शकते. त्यामुळे निवडणूक लढविलेल्या सर्व उमेदवारांनी निवडणूक खर्चाचे अंतिम लेखे व आवश्यक कागदपत्रे विहित कालावधीमध्ये सादर करावीत, असे निर्देश जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी यांनी पत्राद्वारे दिले आहेत. *******

18 June, 2024

कळमनुरी आयटीआय येथे आज छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबीर

हिंगोली (जिमाका), दि. 18 : औद्योगिक प्रशिक्षण संस्था कळमनुरी अंतर्गत कळमनुरी येथील तोष्णीवाल मंगल कार्यालयात दि. 19 जून, 2024 रोजी कळमनुरी तालुका व परिसरातील विद्यार्थी व पालकांसाठी मोफत छत्रपती शाहू महाराज युवाशक्ती करिअर मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या करिअर मार्गदर्शन शिबिरामध्ये इयत्ता 10 वी व 12 वी नंतर काय, भविष्यातील शिक्षणाच्या व रोजगाराच्या संधी, कौशल्य शिक्षणाचे महत्त्व, अद्यायवत तंत्रज्ञानावर आधारित शिक्षण, नोकरीसाठी मुलाखतीची तयारी करणे, व्यक्तिमत्त्व विकास व बायोडाटा तयार करणे इत्यादी विविध विषयावर तज्ञ वक्त्यामार्फत मार्गदर्शन होणार आहे. विद्यार्थी व पालकांनी या समुपदेशन मेळाव्यामध्ये हजर राहून लाभ घ्यावा, असे आवाहन कळमनुरी येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य एस. एल. कोंडावार यांनी केले आहे. **

जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू

हिंगोली (जिमाका), दि. 18 : जून महिन्यात विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि महापुरुषांच्या जयंती, सभा, बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी दिले आहेत. दि. 23 जून ते 26 जून, 2024 पर्यंत श्री गजानन महाराज संस्थान शेगाव यांची दिंडी, संत नामदेव महाराज संस्थान नसी नामदेव व इतर लहान मोठ्या संस्थानच्या दिंड्या हिंगोली जिल्ह्यातून जाणार आहेत. तसेच सध्या घडणाऱ्या राजकीय, सामाजिक घडामोडी, नागरिक, विविध संघटना, पक्ष यांच्या मागण्यासंदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दिनांक 14 जून, 2024 रोजी मध्यरात्रीपासून ते दिनांक 29 जून, 2024 रोजी मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे. त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तूजवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटकद्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल, अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील, या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. *******

ग्रामीण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधीसाठी सर्व सुविधा पुरविण्याचा प्रयत्न - केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे

हिंगोली (जिमाका), दि. 18 : ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हास्तरावर आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आढावा बैठकीत केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी क्रीडा व नेहरु युवा केंद्राचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत उपस्थित होते. जिल्हास्थित क्रीडा विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सुविधा, आवश्यक सुविधा यांची माहिती त्यांनी घेतली. तसेच सध्या सुरु असलेली कामे गुणवत्तापूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. याप्रसंगी त्यांनी विविध क्रीडा संघटनेच्या प्रतिनिधींची चर्चा करुन क्रीडा व नेहरु युवा केंद्रातील रिक्त पदे, विविध खेळांसाठी आवश्यक त्या सुविधांचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. भारतातील युवकांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलबध करुन देण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नरत आहे. यासाठी सर्व क्रीडा प्रेमी संघटनांनी तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी समन्वयाने लोकांचा सहभाग वाढवून जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्र सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नेहरु युवा केंद्रांनीही जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून युवकांना प्रोत्साहन द्यावे, अशा सूचनाही केल्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार आणि नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, कामांची माहिती सादर केली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीस विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, नेहरु युवा केंद्राचे संघटक उपस्थित होते. *******

17 June, 2024

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आज हिंगोली जिल्हा दौ-यावर

केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे आज हिंगोली जिल्हा दौ-यावर हिंगोली (जिमाका), दि. १७ : केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे या उद्या, मंगळवार (दि. १८) रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा दौरा कार्यक्रमाचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. मंगळवार, दि. १८ जून, २०२४ रोजी सकाळी ७ वाजता छत्रपती संभाजीनगर येथून शासकीय वाहनाने हिंगोलीकडे प्रयाण. सकाळी ११ वाजता कृषी विज्ञान केंद्र, तोंडापूर जि. हिंगोली येथे प्रधानमंत्री यांच्या हस्ते किसान सन्मान योजना हप्ता वितरण कार्यक्रमास उपस्थिती. सायंकाळी १८.३० वाजता शासकीय वाहनाने छत्रपती संभाजीनगरकडे त्यांचे प्रयाण होईल. ***

14 June, 2024

महिला लोकशाही दिनाचे 18 जून रोजी आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 14 : राज्यघटनेने प्रत्येक नागरिकाला समान हक्क व समान संधी असा मुलभूत हक्क दिलेला आहे. त्याअंतर्गत समस्याग्रस्त व पिडित महिलांना त्यांचे प्रश्न मांडण्यासाठी व्यासपीठ मिळावे. तसेच त्यांच्या तक्रारी, अडचणी यांची शासकीय यंत्रणेकडून सोडवणूक करण्यासाठी एक प्रभावी उपाययोजना म्हणून जिल्हास्तरावर दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी किंवा तिसऱ्या सोमवारी सार्वजनिक सुट्टी असल्यास त्यानंतर येणाऱ्या कामकाजाच्या दिवशी जिल्हास्तरीय महिला लोकशाही दिन राबविण्यात येतो. माहे जून, 2024 च्या तिसऱ्या सोमवारी ईदची सुट्टी येत असल्याने महिला लोकशाही दिनाचे आयोजन मंगळवार,दिनांक 18 जून, 2024 रोजी सकाळी 11.00 वाजता जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात करण्यात आले आहे. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी त्यांच्या अडचणी मांडण्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, मध्यवर्ती प्रशासकीय इमारत, दुसरा मजला, कक्ष क्र. एस-7, हिंगोली यांच्या कार्यालयात सादर करावेत. यामध्ये न्याय प्रविष्ठ प्रकरणे, विहित नमुन्यात नसणारे व आवश्यक ती कागदपत्रे न जोडलेले, सेवा विषयक, आस्थापना विषयक बाबी, तक्रार निवेदन वैयक्तिक स्वरुपाची नसेल असे अर्ज स्विकारले जाणार नाहीत. समस्याग्रस्त व पिडीत महिलांनी शासनाने उपलब्ध करुन दिलेल्या व्यासपीठाचा उपयोग आपल्या अडचणी सोडविण्यासाठी करावा, असे आवाहन राजाभाऊ मगर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी, हिंगोली यांनी केले आहे. *******

13 June, 2024

मुबलक पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

• ट्रॅक्टर पेरणी करताना शक्यतो दिवसाच पेरणी करा - राजेंद्र कदम हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्ह्यात आज अखेर सरासरी 63.10 मि.मी. पाऊस झाला आहे. पेरणीसाठी साधारणपणे 100 मि.मी. पावसाची आवश्यकता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य तसेच मुबलक पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज कृषि विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, कृषि विकास अधिकारी उत्तम वाघमारे, तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अनिल ओळंबे, जिल्हा अग्रणी बँकेचे अमित नाकाडे, निखील पांडे, कृषि विभागाचे नितीन घुगे, जिनिंग इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी, बियाणे उत्पादक विक्री संघटनेचे प्रतिनिधी, किटकनाशक उत्पादक विक्री संघटनेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी सांगितले. आगामी हंगामातील कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणाच्या अनुषंगाने कापूस जिनिंग व प्रेसिंग मिल्समधील उपायोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. आगामी हंगामात कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणाच्या अनुषंगाने कापूस जिनिंग व प्रेसिंग मिल्सनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा बैठकीत दिले. आगामी हंगामात कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध संकरीत वाणांची लागवड न करता गावनिहाय एकाच वाणाची व एकाच वेळी लागवड करणे. शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी कापूस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यानंतर पेरणी करणे. किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे, कपाशीच्या सभोवती नॉन बीटी (रेफ्यूजी) कपाशीची लागवड करणे. नत्र खताचा वापर जास्त झाल्यास पिकाची कायिक वाढ होऊन गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर न करता मृद परिक्षण करुन त्याच्या आधारावर मात्रेचा अवलंब करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतात कापूस पिकात विविध ठिकाणी प्रकाश सापळे व कामगंध सापळे लावून त्यात अडकलेले पतंग नष्ट करावेत. सरकीतील अळ्या व कोष नष्ट कराव्यात, फेरोमन सापळ्यातील ल्यूर्स वेळचेवेळी बदलणे व कापसापासून निर्माण झालेला कचरा नष्ट करुन परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. वरीलप्रमाणे कार्यवाही होत असल्याची खात्री करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिनिंग व प्रेसिंग मिल्स व कापूस साठवणूक गोडाऊन करिता कृषि विभागातील मंडळ कृषि अधिकारी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी यांचे पथक करुन त्यांना जबाबदारी सोपवावी. तसेच गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्व माध्यमांव्दारे व्यापक प्रसिध्दी करून शेतकऱ्यांमध्ये सातत्याने जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या. पुरेशा प्रकाशात, शक्यतो दिवसाच पेरणी करावी - राजेंद्र कदम जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी ट्रॅक्टरने पेरणी करताना शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी पेरणी करण्याचे टाळावे. शक्यतो पेरणी ही दिवसाच आणि पुरेशा प्रकाशात करण्याचे आवाहन केले. जेणेकरून रात्री बियाणे जमिनीत किती खोल जात आहे, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे बियाणे खोलवर गेल्यास त्याची उगवणक्षमता घटते आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, असे श्री. कदम यांनी सांगितले. *****

जादा दराने कापूस बियाणे विक्री करणाऱ्या कृषि केंद्राचा परवाना निलंबित

हिंगोली (जिमाका), दि. 13 : पावसाचे वेळेवर आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून खते, बी, बियाणे खरेदी सुरु आहे. कृषि केंद्रधारकाकडून कापूस बियाणे विक्री करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना कृषि विभागाकडून संपर्क करुन कापूस बियाण्याच्या विक्री किमतीबाबत शहानिशा करण्यात येत आहे. याच दरम्यान कळमनुरी पंचायत समितीचे कृषि अधिकारी एस. ए. तोटावाड यांनी काही शेतकऱ्यांना संपर्क करुन कापूस बियाणे विक्री किमतीबाबत शहानिशा केली असता काही कृषि केंद्रांकडून कापूस बियाण्याच्या मागणी असलेल्या काही वाणाची जादा दराने विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले. या अनुषंगाने भरारी पथकातील जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी उत्तम वाघमारे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितीन घुगे, कृषि अधिकारी एस. ए. तोटावाड यांनी आखाडा बाळापूर येथील साईकृपा कृषि केंद्राची तपासणी केली. तपासणी दरम्यान कापूस बियाणे विक्री बिलाची तपासणी करुन कापूस बियाणे खरेदी केलेल्या काही शेतकऱ्यांशी संपर्क करुन पडताळणी करण्यात आली. यामध्ये संबंधित कृषि केंद्र धारकाने जादा दराने कापूस बियाणे विक्री केल्याचे निदर्शनास आले. या प्रकरणाची रितसर सुनावणी घेऊन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी साईकृपा कृषि केंद्र आखाडा बाळापूर यांचा कापूस बियाणे विक्रीचा परवाना सात दिवसासाठी निलंबित केले आहे. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठांच्या गुणवत्ता तसेच उपलब्धतेबाबत काही तक्रार, अडचण असल्यास तात्काळ कृषि विभागाच्या भरारी पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ********

जागतिक बाल कामगार विरोधी दिनानिमित्त जनजागृती

हिंगोली (जिमाका), दि. 13 : जागतिक बाल कामगार दिनानिमित्त येथील आनंद नगर येथील जिल्हा परिषद शाळा व विवेकानंद नगर येथील इन्स्पायर कोचिंग क्लासेस येथे जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला. यावेळी बालकांच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बाल कामगार कायदा, बाल हक्क व संरक्षण, बालविवाह कायदा याबाबत जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, दुकाने निरीक्षक अधिकारी एन. एस. भिसे, बाल संरक्षण अधिकारी जरीब खान पठाण, कायदा व परिविक्षा अधिकारी ॲड. अनुराधा पंडित यांनी बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा 2012 बाबत माहिती दिली. सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे, चाईल्ड हेल्पलाईनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी बालकांच्या काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून आपणास गर्दीच्या ठिकाणी किवा इतर ठिकाणी बाल कामगार आढळल्यास किंवा बालकासंबंधी जे काही अडचणी, समस्या उद्भवल्यास किंवा मदत लागल्यास, जेव्हा एखादे बालक हरवलेले आहे किंवा घरातून निघून गेलेले आहे, बालविवाह होत असल्यास, बालकाला बालमजुरीने काम करून घेणे, एखाद्या बालकाला वैद्यकीय मदत लागल्यास, रस्त्यालगत भीक मागणारे बालके, निराधार बालके, निवाऱ्याची गरज असणारी बालके, एखाद्या बालकास समुपदेशनाची गरज असल्यास किंवा बालकास शैक्षणिक मदत लागल्यास आपण चाईल्ड हेल्पलाईन 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधून संबंधित बालकांची मदत करता येईल. टोल फ्री क्रमांकावर मिळालेली माहिती ही पूर्णत: गोपनीय असते. त्यामुळे अडचणीत असणाऱ्या बालकांची मदत करावी, याबाबत मार्गदर्शन करण्यात आले. यावेळी कामगार विभागाचे कर्मचारी पंकज ढगे, गजानन पवार, चंद्रकांत मुंडे, गोविंद दहिफळे, बालाजी साळवे, राजरत्न पाईकराव, सूरज इंगळे, तथागत इंगळे, सुमित सरोदे, गोपाल भोस, हार्दिक घुमनर तसेच विद्यार्थी उपस्थित होते. ******

दिव्यांगाना प्राधान्याने शासकीय योजनांचा लाभ द्यावा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 13 : या बैठकीत दिव्यांगांचे जीवन सुलभ व आनंदी होण्यासाठी दिव्यांगांना सर्व शासकीय योजनांचा लाभ प्राधान्याने द्यावा, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आयोजित बैठकीत सर्व संबंधित यंत्रणेला दिले. दिव्यांगांच्या विविध मागण्या संदर्भात दिनांक 12 जून 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयात सर्व शासकीय विभागांची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. मंगेश टेहरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, दिव्यांग बांधव उपस्थित होते. दिव्यांगांना आवश्यक असणारी विविध प्रमाणपत्रे उपलब्ध करून द्यावेत. तसेच शासकीय योजनेत मोठ्या प्रमाणात सहभाग करून घ्यावा. स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद व नगरपालिका यांनी त्यांच्या स्व-उत्पन्नातून पाच टक्के दिव्यांग कल्याण निधी राखून ठेवावा व तो नियमानुसार दिव्यांगासाठी खर्च करावा. याबाबत जे अधिकारी कार्यवाही करणार नाहीत त्यांच्याविरुद्ध कारवाई करण्यात येईल, अशा सूचनाही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी दिल्या. ******

तृतीय पंथीयासाठीच्या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्याचे निवारण करणे तसेच त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य तृतीय पंथीयासाठीचे धोरण-2024 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली तृतीयपंथीयाच्या समस्या, तक्रारीचे जलदगतीने निवारण करण्यासाठी दि. 12 जून रोजी जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. मंगेश टेहरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, सर्व महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, कामगार कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. हिंगोली जिल्ह्यातील तृतीयपंथीय यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ, रेशन कार्ड, आरोग्य तपासणी, सेतु सुविधा केंद्र, विविध कर्ज योजना इत्यादी लाभ मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेनी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. या बैठकीत तृतीय पंथियाचे हक्काचे संरक्षण व कल्याणाबाबत आढावा घेण्यात आला. तसेच तृतीय पंथियासाठी काम करणाऱ्या नामवंत संस्थातील तृतीय पंथी व्यक्ती विनोद माधवराव खरटमोल यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यासाठी बैठकीत मान्यता देण्यात आली. *******

12 June, 2024

जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांसाठी आजपासून अमरावती, नागपूर येथे ऑनलाईन परीक्षा

• प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे आवाहन हिंगोली (जिमाका), दि. 12 : येथील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी 13 ते 21 जून, 2024 या कालावधीत अमरावती व नागपूर येथे ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली असून, उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी केले आहे. या पदाची जाहिरात क्र. 01/2023, दि. 5 ऑगस्ट, 2023 अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या आरोग्य सेवक (पुरुष) 50 टक्के रिक्त पद भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा दि. 13 ते 15 जून, 2024 या कालावधीत होणार आहे. आरोग्य सेवक (महिला) या पदाची ऑनलाइन परीक्षा 16 जून रोजी, ग्रामसेवक पदाची दि. 16 ते 21 जून 2024 (दि. 17 जून वगळून) रोजी होणार आहे. ही परीक्षा हिंगोली जिल्ह्यात घेण्यात येणार नसल्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. हिंगोली परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारासाठी अमरावती व नागपूर हे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी प्रवेश पत्रानुसार परीक्षेचे वेळापत्रक, पद व परीक्षा केंद्राचे ठिकाण इत्यादीची माहिती घेऊनच परीक्षा केंद्रावर दर्शविलेल्या वेळेत उपस्थित रहावे. वरील पदाच्या ऑनलाईन परीक्षेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन लिंक जिल्हा परिषद हिंगोलीच्या www.zphingoli.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन परीक्षेकरिता उमेदवारांनी रिपोर्टींग वेळेच्या अर्धा तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहावे. उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे. उपरोक्त सर्व नमूद बाबींची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषद हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी केले आहे. ******

'बकरी ईद' दिवशी गोवंशाची कत्तल होणार नाही, यासाठी उपाययोजना करा- जिल्हाधिकारी

हिंगोली (जिमाका), दि. 12 : जिल्ह्यात बकरी ईद सणाच्या दिवशी (दि. 17) जिल्ह्यात कोठेही गायीची (गोवंशाची) कत्तल होणार नाही यासाठी जिल्हांतर्गत येणाऱ्या सर्व ग्रामपंचायत, नगर परिषद हद्दीतील सर्व यात्रा, धार्मिक स्थळी प्राण्यांना क्रूरतेने वागवण्यास तसेच धार्मिकतेच्या नावावर पशुबळी देण्यास प्रतिबंध व योग्य ते समुचित उपाययोजना कराव्यात. तसेच आपल्या अखत्यारीत असलेल्या परिक्षेत्रात सुरु असलेल्या बेकायदेशीर व अवैध धार्मिक यात्रेतील पशुबळी कायमस्वरुपी बंद करावेत, असे आदेश जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी महाराष्ट्र प्राणी संरक्षण अधिनियम 1976 व महाराष्ट्र प्राणी (सुधारण) रक्षण अधिनियम 1995 च्या कलम 5 अन्वये संबंधित यंत्रणेला दिले आहेत. *****

हिंगोली जिल्ह्यात सरासरी 28.70 मिमी पाऊस

* हिंगोली तालुक्यात सर्वाधिक 57.80 मि.मी. पाऊस हिंगोली (जिमाका), दि. 12 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 28.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, हिंगोली तालुक्यात सर्वाधिक 57.80 आणि सेनगांव तालुक्यात सर्वात कमी 13.70 मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 57.80(62.40), कळमनुरी 17.30 (55.10), वसमत 20.50 (35.80), औंढा नागनाथ 31.50 (80.50) आणि सेनगांव तालुक्यात 13.70 (47.00) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहेत. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2024 ते 12 जून 2024 पर्यत सरासरी 62.40 मिलीमीटर पाऊस पडला आहे. छत्रपती संभाजीनगर विभागात गेल्या 24 तासात सरासरी 8.9 मि.मी. (102.1) पावसाची नोंद झाली आहे. *******

10 June, 2024

सर्व शाळांमध्ये 15 जूनपासून 'हात धुवा' कार्यक्रम राबवा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 10 : शाळांमध्ये येत्या शुक्रवारपासून (दि. 15) हात धुवा प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवावा. याबाबत विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बैठकीत दिल्या. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा, 18 वर्षावरील प्रौढांना बीसीजी लसीकरण व नियमित लसीकरणाबाबत जिल्हा सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली . त्यावेळी ते बोलत होते. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. कुप्पास्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. वाय. करपे, डॉ. महेश विसपुते, डॉ. गजानन हरणे, डॉ. जी. व्ही. काळे, महिला व बाल विकास अधिकारी व्ही. आर. वाकडे, आर. एस. धापसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. अनुराधा गोरे, डॉ. डी. व्ही. सावंत, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी मारोतराव पोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे, डॉ. पांचाळ, डॉ.शारदा मेश्राम, शिक्षण विभागाचे नितीन नेटके आदी सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा, प्रौढ बीसीजी लसीकरण व नियमित लसीकरण कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबरच महिला व बाल विकास विभाग, शिक्षण व पाणीपुरवठा विभागानेही समन्वयाने कामे करावीत. अतिसाराची लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ल्याने उपचार करून घ्यावे. तसेच नियमित लसीकरण व 18 वर्षावरील पात्र नागरिकांनी बीसीजी लसीकरणासाठी कर्मचाऱ्याकडे पूर्व नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले. विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा दि. 6 ते 21 जून, 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्यात जिल्ह्यात एक लाख 32 हजार 873 बालकांना ओआरएस, झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. अर्भक मृत्यू व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात 5 वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारणांपैकी एक असून 5 ते 7 टक्के बालकांचा अतिसारामुळे मृत्यू होतो. या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळा व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यात 6 ते 21 जूनदरम्यान विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली. विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रमांतर्गत पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरांमध्ये ओआरएस व झिंक गोळ्याचा वापर व उपलब्धता वाढवणे, अतिसारासह जल शुष्कता असलेल्या बाल रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे आणि शहरी झोपडपट्टया, पूरग्रस्त भाग, भटक्या जमाती, वीट भट्टी, कामगार, स्थलांतरित मजूर व बेघर मुले इ. सारख्या जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणे आणि मागील दोन वर्षात अतिसारातील साथ असलेले क्षेत्र, पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असल्याचे क्षेत्र, यावर विशेष लक्ष देणे हे विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रमाचे धोरण आहे. त्यासाठी अति जोखमीच्या क्षेत्राची नियोजनाद्वारे सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. अतिसारामध्ये ओआरएस आणि झिंक गोळ्याचे महत्व, स्तनपानाचे महत्त्व, अतिसाराच्या प्रतिबंधासाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व आणि शौचाची विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयाचा वापर इत्यादी महत्त्वाचे संदेश देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख यांनी दिली . अतिसाराच्या उपचारासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेत, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्रात ओ.आर.एस. कॉर्नर तयार करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील पात्र नागरिकांना बीसीजीचे लसीकरण करण्यात येणार आहे. बीसीजी ही लस अत्यंत सुरक्षित असून भारतात ही लस इ. स. 1978 पासून बालकांचे लसीकरण करण्यासाठीं वापरात आहे. बीसीजी लस कोणाला द्यायची पूर्वी टीबीचा उपचार घेतलेला असा क्षय रुग्ण, क्षय रुग्णाच्या सहवासात राहिलेली व्यक्ती तथा सध्या क्षय रुग्णाच्या सहवासात राहत असलेली व्यक्ती, 60 वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती व त्यापुढील ज्येष्ठ नागरिक, मधुमेहाचा पूर्व इतिहास असलेली व्यक्ती, ज्या व्यक्तींना धूम्रपणाचा पूर्वेतिहास आहे, ज्या व्यक्तींचा बॉडी माक्स इंडेक्स 18 पेक्षा कमी आहे, अशा व्यक्तींना बीसीजी लसीकरण द्यावे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत बांगर यांनी दिली. *****