21 June, 2024
भरारी पथकांमार्फत कृषि केंद्रांची तपासणी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करा - पालकमंत्री अब्दुल सत्तार
• जिल्ह्यात अखंड वीजपुरवठा करण्याच्या महावितरणला सूचना
• पीककर्ज, विमा 100 टक्के वितरीत करण्याला प्राधान्य देण्याचे बँकांना निर्देश
हिंगोली (जिमाका), दि.21 : जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या मागणीनुसार रासायनिक खते, बि-बियाणे आणि इतर कृषि निविष्ठा मुबलक प्रमाणात उपलब्ध करून द्याव्यात. कृषि केंद्र विक्रेत्यांकडून खताचा तुटवडा भासवून अडवणूक केल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासन व कृषि विभागाने भरारी पथकांमार्फत अशा कृषि केंद्रांची तपासणी करून दोषींवर तात्काळ कार्यवाही करण्याचे निर्देश अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी संबंधित यंत्रणेला आज येथे दिले.
येथील जिल्हा नियोजन समितीच्या सभागृहात जिल्हा नियोजन समिती, खरीप हंगाम, पाणीटंचाई, पर्जन्यमान, दुष्काळाबाबतची आढावा बैठक अल्पसंख्यांक विकास व औकाफ, पणन मंत्री तथा हिंगोलीचे पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी खासदार नागेश पाटील आष्टीकर, आमदार सर्वश्री. विप्लव बाजोरिया, तानाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू नवघरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्र्यांकडून जिल्हा प्रशासनाचे अभिनंदन
जिल्हा वार्षिक योजनेचा सन 2023-2024 चा निधी शंभर टक्के खर्च केल्याबद्दल पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी प्रशासनाचे अभिनंदन केले. सन 2024-2025 साठी प्राप्त झालेला निधी शंभर टक्के खर्च होईल याची दक्षता घ्यावी. जिल्ह्यातील मोडकळीस आलेल्या शाळेच्या इमारती, प्राथमिक आरोग्य केंद्र, वीज पुरवठा, ट्रान्सफॉर्मर, ग्रामीण रस्ते दुरुस्तीची कामे प्राधान्याने झाले पाहिजेत. निधी खर्च करताना सर्व छोटे छोटे गावांचाही समावेश असावा. यासाठी लोकप्रतिनिधीच्या सूचना लक्षात घेऊन योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. डोंगरी विकास योजनेत वंचित राहिलेल्या गावांचाही समावेश करण्याच्या सूचना पालकमंत्री श्री. सत्तार यांनी दिल्या. यावेळी जिल्ह्यातील चार ‘क’ वर्ग तीर्थक्षेत्रांचा नव्याने समावेश करण्याबाबत आढावा घेण्यात आला.
रासायनिक खत पुरवठ्यासाठी पाठपुरावा करा
हिंगोली जिल्ह्यात कमी पाऊस झालेला आहे. जिल्ह्यातील 30 मंडळापैकी केवळ 9 मंडळातच समाधानकारक पाऊस झालेला आहे. त्यामुळे जिल्ह्यात 32.30 टक्केच पेरण्या झालेल्या आहेत. पावसाचा खंड जास्त असल्यामुळे पुरेसा पाऊस पडेपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करु नये, असेही आवाहन त्यांनी केले. जिल्ह्यात सध्या केवळ 52 टक्केच खताचा पुरवठा शासनाकडून झालेला आहे. उर्वरित 48 टक्के खताच्या मागणीचा प्रस्ताव तात्काळ द्यावा. शेतकऱ्यांना कुठल्याही खत, बियाण्याचा तुटवडा भासणार नाही, याची दक्षता घेण्याचे निर्देश पालकमंत्री श्री. सत्तार यांनी दिले.
शेतकऱ्यांना 100 टक्के पीककर्ज, विमा मिळावा
कमी पावसामुळे पेरणी केलेल्या शेतकऱ्यांचे झालेले नुकसान व भविष्यात येणाऱ्या अडचणी सोडविण्यासाठी व शासनाकडून मदत मिळवून देण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात. शेतकऱ्यांना सन 2023-24 चा पीक विमा शंभर टक्के मिळाला पाहिजे. त्यामुळे प्रलंबित राहण्याची कारणे शोधून पिक विम्यापासून वंचित शेतकऱ्यांना पिक विमा मिळवून द्यावा. कृषि विभागाच्या योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी झाली पाहिजे. हिंगोली जिल्ह्यातील कापूस व सोयाबीन या पिकांची आधारभूत किंमत वाढविण्यासाठी प्रस्ताव पाठविण्याचा ठराव घेऊन प्रस्ताव पाठविण्याच्या सूचना केल्या.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सर्व बँकांनी खरीप पिक कर्जाचे शंभर टक्के वाटप करावे. शेतकऱ्यांना पीक कर्ज उपलब्ध करुन न देणाऱ्यां बँकांवर कारवाई करावी, अशा सूचना केल्या. तसेच शालेय विद्यार्थ्यांना एसटी बस सुविधा, शाळा दुरुस्तीची कामे झाले पाहिजेत. कळमनुरी व वसमत येथील रुग्णालयामध्ये सीटीस्कॅन, डायलेसीसची सुविधा उपलब्ध करून द्यावी तसेच जिल्ह्यातील बोगस डॉक्टरांवर कार्यवाही करावी. 102 व 108 वाहनावर आरोग्य विभागाने नियंत्रण ठेवावेत. तसेच सर्व लोकप्रतिनिधीनी सुचविलेली कामे वेळेत करुन त्याचा अहवाल सादर करावा, अशा सूचना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांनी केल्या.
शेतकऱ्यांच्या वीज पुरवठा व ट्रॉन्सफार्मरबाबत अडवणूक होत असल्याच्या तक्रारी येत आहेत. शेतकऱ्यांना 72 तासात ट्रान्सफार्मर उपलब्ध करुन द्यावेत. ट्रान्सफार्मर बसविण्यासाठी शेतकऱ्यांना वीज बिलाच्या वसुलीची सक्ती करु नये. जलजीवन मिशन अंतर्गत झालेल्या कामांना तात्काळ ट्रान्सफार्मर उपलब्ध करुन द्यावा. तसेच जलजीवन मिशनच्या कामाचे कार्यारंभ आदेश देऊन कंत्राटदार वेळेत कामे करत नसल्यास त्याला काळ्या यादीत टाकावे. जिल्ह्यात जलजीवन मिशनच्या पूर्ण झालेल्या कामांची माहिती दहा दिवसाच्या आत सादर करण्याचे निर्देश त्यांनी दिले.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी जिल्हा वार्षिक योजनेत सन 2023-24 मध्ये झालेल्या खर्चाची व सन 2024-25 साठी मंजूर अनुदानाची माहिती सादरीकरणाद्वारे दिली. यावेळी बैठकीस जिल्हा नियोजन समितीचे सदस्य, विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते तहसीलदारांना चारचाकी वाहनांचे वितरण
सर्वसाधारण जिल्हा वार्षिक योजनेतून गतिमान प्रशासन तथा आपत्कालीन व्यवस्थेचे बळकटीकरण करण्यासाठी जिल्ह्यातील हिंगोली, सेनगाव आणि वसमत या तीन तहसील कार्यालयांना पालकमंत्री अब्दुल सत्तार यांच्या हस्ते चारचाकी वाहनांच्या चाव्या देऊन त्याचे वितरण करण्यात आले. यावेळी सर्वश्री आमदार तान्हाजी मुटकुळे, संतोष बांगर, राजू नवघरे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक आदी उपस्थित होते.
**********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment