12 June, 2024
जिल्हा परिषदेच्या रिक्त पदांसाठी आजपासून अमरावती, नागपूर येथे ऑनलाईन परीक्षा
• प्रवेशपत्र डाऊनलोड करुन घेण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 12 : येथील जिल्हा परिषदेच्या आस्थापनेवरील गट-क संवर्गामधील रिक्त पदे सरळसेवेने भरण्यासाठी 13 ते 21 जून, 2024 या कालावधीत अमरावती व नागपूर येथे ऑनलाईन परीक्षा आयोजित करण्यात आली असून, उमेदवारांनी त्यांचे प्रवेश पत्र संकेतस्थळावरून डाऊनलोड करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर व मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी केले आहे.
या पदाची जाहिरात क्र. 01/2023, दि. 5 ऑगस्ट, 2023 अन्वये प्रसिध्द करण्यात आली होती. या जाहिरातीमध्ये दर्शविलेल्या आरोग्य सेवक (पुरुष) 50 टक्के रिक्त पद भरतीसाठी ऑनलाईन परीक्षा दि. 13 ते 15 जून, 2024 या कालावधीत होणार आहे. आरोग्य सेवक (महिला) या पदाची ऑनलाइन परीक्षा 16 जून रोजी, ग्रामसेवक पदाची दि. 16 ते 21 जून 2024 (दि. 17 जून वगळून) रोजी होणार आहे.
ही परीक्षा हिंगोली जिल्ह्यात घेण्यात येणार नसल्याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. हिंगोली परीक्षा केंद्र निवडलेल्या उमेदवारासाठी अमरावती व नागपूर हे परीक्षा केंद्र देण्यात आले आहे. संबंधित उमेदवारांनी प्रवेश पत्रानुसार परीक्षेचे वेळापत्रक, पद व परीक्षा केंद्राचे ठिकाण इत्यादीची माहिती घेऊनच परीक्षा केंद्रावर दर्शविलेल्या वेळेत उपस्थित रहावे.
वरील पदाच्या ऑनलाईन परीक्षेकरिता अर्ज केलेल्या उमेदवारांना प्रवेशपत्र डाऊनलोड करण्यासाठी ऑनलाईन लिंक जिल्हा परिषद हिंगोलीच्या www.zphingoli.in या संकेतस्थळावर देण्यात आली आहे. तसेच ऑनलाईन परीक्षेकरिता उमेदवारांनी रिपोर्टींग वेळेच्या अर्धा तास अगोदर केंद्रावर उपस्थित राहावे. उमेदवारांनी त्यांच्या प्रवेशपत्रामध्ये दिलेल्या सूचनांचे पालन करणे आवश्यक आहे.
उपरोक्त सर्व नमूद बाबींची सर्व संबंधित उमेदवारांनी नोंद घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवड समितीचे अध्यक्ष जितेंद्र पापळकर व जिल्हा परिषद हिंगोलीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment