19 June, 2024

जिल्ह्यातील नागरिकांनी सिकलसेल आजाराची तपासणी करुन घ्यावी - जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके • जिल्ह्यात सर्व आरोग्य संस्थेत 'जागतिक सिकलसेल आजार नियंत्रण दिन' साजरा

हिंगोली (जिमाका), दि.19 : जिल्ह्यातील सर्व सिकलसेल संशयित रुग्णांनी आरोग्य तपासणी करुन घेण्याचे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले आहे. हा कार्यक्रम हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य विभागातील कर्मचारी यशस्वीरित्या राबवित आहेत. यावेळी लाभार्थीची सिकलसेल चाचणी करून त्यांना समुपदेशन कऱण्यात आले व तसेच रुग्णांना मोफत औषधी वाटप करण्यात आली. जिल्ह्यातील जिल्हा सामान्य रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री- रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, प्राथमिक आरोग्य पथक, आरोग्य वर्धिनी केंद्र, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या सर्व आरोग्य संस्थेत साजरा करण्यात आला. सिकलसेल हा लाल रक्त पेशींमध्ये होणारा आजार आहे. सर्वसाधारण व्यक्तीच्या शरीरातील लाल रक्त पेशींचा आकार हा गोल असतो. पण सिकलसेल आजारामध्ये या पेशींचा आकार ऑक्सिजन न मिळाल्यामुळे विळ्यासारखा होतो. सिकल म्हणजे विळा व सेल म्हणजे पेशींना सिकलसेल म्हणतात. सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रमाचे उद्दिष्टे : सिकलसेल आजार हा अनुवंशिक आहे. यात आई आणि वडील दोघेही ग्रस्त किंवा वाहक असल्यास यांच्या अपत्यांना हा आजार होऊ शकतो. त्यामुळे समाजातील सिकलसेल वाहक व ग्रस्त व्यक्ती शोधून त्याचे आपापसात होणारे विवाह टाळावेत. या आजाराचे जनतेमधील प्रमाण शोधून काढणे. जास्तीत-जास्त लोकांनी सिकलसेल आजाराची तपासणी करण्यासाठी त्यांना प्रवृत करणे. सिकलसेल वाहक व पीडित व्यक्तींनी दुसऱ्या वाहक व पीडित व्यक्तीशी विवाह टाळावा यासाठी समुपदेशन करणे. यापूर्वी विवाह झालेल्या सिकलसेल वाहक, पीडित-पीडित, वाहक-पीडित अशा जोडप्यांना ओळखून त्यांना यापुढे सिकलसेल आजारग्रस्त बालक जन्माला येऊ नये यासाठी गरोदरपणी गर्भजल चाचणी व गर्भपातासाठी समुपदेशन या सेवा उपलब्ध करून देणे. सिकलसेल रुग्णांना प्राथमिक आरोग्य केंद्र व ग्रामीण, उपजिल्हा, जिल्हा रुग्णालय स्तरावर परिणामकारक व नियमित उपचार करून देणे हे या कार्यक्रमाचे उद्दिष्ट आहे. सिकलसेल आजारचे मुख्य प्रकार दोन : 1) आजारी व्यक्ती ( सिकलसेल सफर किंवा पीडित व्यक्ती ) : पीडित व्यक्तीला वारंवार जंतू संसर्ग होतो व लवकर बरा होत नाही. रक्त पेशी लवकर नष्ट होतात. पीडिताला खूप वेदना होतात. सांधे सुजणे, वेदना होणे, भूख न लागणे तसेच पोटात डाव्या बाजूला वेदना होणे. 2) सिकलसेल वाहक व्यक्ती : वेदना किंवा त्रास न होणारी व्यक्ती पुढील पिढीला हा आजार देऊ शकते. अशा व्यक्तीस सिकलसेल वाहक म्हणतात. सिकलसेल आजाराची सर्वसाधारण लक्षणे : रक्ताक्षय, हातापायवर सूज येणे, कावीळ, असह्य वेदना, पक्षाघात, पित्ताशय, मूत्रपिंड, न भरून येणाऱ्या जखमा, डोळ्यावर परिणाम होणे, शारीरिक, मानसिक त्रास,जंतुसंसर्ग इत्यादी लक्षणे आहेत. उपचार : सर्व सिकलसेल रुग्णांना फॉलिक अँसिड गोळ्या देणे. रुग्णांना डॉक्टरांच्या सल्ल्याने वेदनानाशक औषधे देणे. जंतुसंसर्ग झाल्यास अँटीबायोटिक देऊन उपचार करणे. गुंतागुंतीच्या रुग्णांना वैद्यकीय महविद्यालयात हलविणे. रक्त संक्रमणाची गरज असणाऱ्या रुग्णांना रक्त संक्रमणाची सोय करणे. दक्षता : सिकलसेल हा अनुवांशिक आहे. त्यामुळे लग्न ठरवण्यापूर्वी मुलगा व मुलगी दोघांचीही रक्ताची चाचणी करून घ्यावी. तसेच दोघेही वाहक असतील तर, एक वाहक व एक ग्रस्त असेल तर व दोघेही ग्रस्त असतील तर विवाह टाळावा. हिंगोली जिल्ह्यामध्ये नोव्हेंबर २०१२ पासून सिकलसेल आजार नियंत्रण कार्यक्रम सुरू झाला. या कार्यक्रमा अंतर्गत १ ते ४० वयोगटातील व्यक्तीची सोल्युबिलिटी चाचणी करण्यात येते. नोव्हेंबर २०१२ पासून जून २०२४ पर्यंत सिकलसेल सोल्युबिलिटी तपासणी करण्यात आल्या. यामध्ये एकूण १०९ रुग्ण आढळून आले आहेत, तर ९५८ वाहक आढळून आले आहेत. जिल्हा रुग्णालयात सिकलसेल रुग्णासाठी डे-केअर सेंटरची व्यवस्था केली आहे. यामध्ये रुग्णांना मोफत उपचार, वैद्यकीय सल्ला व समुपदेशन करण्यात येते. हिंगोली जिल्ह्यामध्ये जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री-रुग्णालय, ग्रामीण रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, उपकेंद्र इत्यादी सर्व स्तरावर सिकलसेल तपासणी मोफत करण्यात येत आहे. सर्व नागरिकांनी आपल्या जवळच्या आरोग्य केंद्रामध्ये जाऊन सिकलसेलची तपासणी करून घ्यावी, असे आवाहन आरोग्य विभामार्फत करण्यात आले आहे. ******

No comments: