13 June, 2024

मुबलक पाऊस झाल्यावरच शेतकऱ्यांनी पेरणी करावी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

• ट्रॅक्टर पेरणी करताना शक्यतो दिवसाच पेरणी करा - राजेंद्र कदम हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्ह्यात आज अखेर सरासरी 63.10 मि.मी. पाऊस झाला आहे. पेरणीसाठी साधारणपणे 100 मि.मी. पावसाची आवश्यकता असते. त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरणीयोग्य तसेच मुबलक पाऊस झाल्यावरच पेरणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आज येथे केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली आज कृषि विभागाची आढावा बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, कृषि विकास अधिकारी उत्तम वाघमारे, तोंडापूर कृषि विज्ञान केंद्राचे शास्त्रज्ञ अनिल ओळंबे, जिल्हा अग्रणी बँकेचे अमित नाकाडे, निखील पांडे, कृषि विभागाचे नितीन घुगे, जिनिंग इंडस्ट्रीजचे प्रतिनिधी, बियाणे उत्पादक विक्री संघटनेचे प्रतिनिधी, किटकनाशक उत्पादक विक्री संघटनेचे प्रतिनिधी आदी उपस्थित होते. जिल्ह्यात यंदा पावसाचे प्रमाण समाधानकारक राहणार असल्याचा हवामान विभागाने अंदाज वर्तवला असल्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी सांगितले. आगामी हंगामातील कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणाच्या अनुषंगाने कापूस जिनिंग व प्रेसिंग मिल्समधील उपायोजनांचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तरीय सनियंत्रण समितीची बैठक घेण्यात आली. आगामी हंगामात कापूस पिकावरील गुलाबी बोंडअळी नियंत्रणाच्या अनुषंगाने कापूस जिनिंग व प्रेसिंग मिल्सनी आवश्यक त्या उपाययोजना कराव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी आढावा बैठकीत दिले. आगामी हंगामात कापूस पिकावरील गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी विविध संकरीत वाणांची लागवड न करता गावनिहाय एकाच वाणाची व एकाच वेळी लागवड करणे. शिफारस केलेल्या कमी कालावधीत पक्व होणाऱ्या बीटी कापूस अथवा सरळ वाणांची वेळेतच म्हणजे जून महिन्यात जमिनीत पुरेसा ओलावा झाल्यानंतर पेरणी करणे. किडीच्या जीवनक्रमात अडथळा निर्माण करण्यासाठी पिकांची फेरपालट करणे, कपाशीच्या सभोवती नॉन बीटी (रेफ्यूजी) कपाशीची लागवड करणे. नत्र खताचा वापर जास्त झाल्यास पिकाची कायिक वाढ होऊन गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भाव वाढतो. म्हणून जास्तीच्या नत्र खताचा वापर न करता मृद परिक्षण करुन त्याच्या आधारावर मात्रेचा अवलंब करावा, अशा सूचना त्यांनी केल्या. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी शेतात कापूस पिकात विविध ठिकाणी प्रकाश सापळे व कामगंध सापळे लावून त्यात अडकलेले पतंग नष्ट करावेत. सरकीतील अळ्या व कोष नष्ट कराव्यात, फेरोमन सापळ्यातील ल्यूर्स वेळचेवेळी बदलणे व कापसापासून निर्माण झालेला कचरा नष्ट करुन परिसर स्वच्छ ठेवण्याचे आवाहन केले. वरीलप्रमाणे कार्यवाही होत असल्याची खात्री करण्याच्या दृष्टीने प्रत्येक जिनिंग व प्रेसिंग मिल्स व कापूस साठवणूक गोडाऊन करिता कृषि विभागातील मंडळ कृषि अधिकारी, महसूल विभागाचे मंडळ अधिकारी यांचे पथक करुन त्यांना जबाबदारी सोपवावी. तसेच गुलाबी बोंडअळी व्यवस्थापनाच्या दृष्टीने सर्व माध्यमांव्दारे व्यापक प्रसिध्दी करून शेतकऱ्यांमध्ये सातत्याने जनजागृती करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी यावेळी दिल्या. पुरेशा प्रकाशात, शक्यतो दिवसाच पेरणी करावी - राजेंद्र कदम जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी ट्रॅक्टरने पेरणी करताना शेतकऱ्यांनी रात्रीच्या वेळी पेरणी करण्याचे टाळावे. शक्यतो पेरणी ही दिवसाच आणि पुरेशा प्रकाशात करण्याचे आवाहन केले. जेणेकरून रात्री बियाणे जमिनीत किती खोल जात आहे, याचा अंदाज येत नाही. त्यामुळे बियाणे खोलवर गेल्यास त्याची उगवणक्षमता घटते आणि शेतकऱ्यांचे नुकसान होऊ शकते, असे श्री. कदम यांनी सांगितले. *****

No comments: