10 June, 2024
सर्व शाळांमध्ये 15 जूनपासून 'हात धुवा' कार्यक्रम राबवा - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर
हिंगोली (जिमाका), दि. 10 : शाळांमध्ये येत्या शुक्रवारपासून (दि. 15) हात धुवा प्रात्यक्षिक कार्यक्रम राबवावा. याबाबत विद्यार्थी व नागरिकांमध्ये जनजागृती करावी, अशा सूचना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी बैठकीत दिल्या.
जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा, 18 वर्षावरील प्रौढांना बीसीजी लसीकरण व नियमित लसीकरणाबाबत जिल्हा सुकाणू समितीची बैठक घेण्यात आली . त्यावेळी ते बोलत होते.
यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. एस. कुप्पास्वामी, वैद्यकीय अधीक्षक डॉ. व्ही. वाय. करपे, डॉ. महेश विसपुते, डॉ. गजानन हरणे, डॉ. जी. व्ही. काळे, महिला व बाल विकास अधिकारी व्ही. आर. वाकडे, आर. एस. धापसे, जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक शंकर तावडे, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सतीश रुणवाल, डॉ. गणेश जोगदंड, डॉ. अनुराधा गोरे, डॉ. डी. व्ही. सावंत, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, जिल्हा विस्तार व माध्यम अधिकारी मारोतराव पोले, वैद्यकीय अधिकारी डॉ. बालाजी भाकरे, डॉ. पांचाळ, डॉ.शारदा मेश्राम, शिक्षण विभागाचे नितीन नेटके आदी सर्व विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा, प्रौढ बीसीजी लसीकरण व नियमित लसीकरण कार्यक्रम यशस्वीरित्या राबविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबरच महिला व बाल विकास विभाग, शिक्षण व पाणीपुरवठा विभागानेही समन्वयाने कामे करावीत. अतिसाराची लक्षणे आढळून आल्यास नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ल्याने उपचार करून घ्यावे. तसेच नियमित लसीकरण व 18 वर्षावरील पात्र नागरिकांनी बीसीजी लसीकरणासाठी कर्मचाऱ्याकडे पूर्व नोंदणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले.
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा दि. 6 ते 21 जून, 2024 या कालावधीत राबविण्यात येत आहे. या पंधरवाड्यात जिल्ह्यात एक लाख 32 हजार 873 बालकांना ओआरएस, झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे. अर्भक मृत्यू व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात 5 वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारणांपैकी एक असून 5 ते 7 टक्के बालकांचा अतिसारामुळे मृत्यू होतो. या बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळा व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यात 6 ते 21 जूनदरम्यान विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येत असल्याची माहिती जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी दिली.
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रमांतर्गत पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरांमध्ये ओआरएस व झिंक गोळ्याचा वापर व उपलब्धता वाढवणे, अतिसारासह जल शुष्कता असलेल्या बाल रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे आणि शहरी झोपडपट्टया, पूरग्रस्त भाग, भटक्या जमाती, वीट भट्टी, कामगार, स्थलांतरित मजूर व बेघर मुले इ. सारख्या जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणे आणि मागील दोन वर्षात अतिसारातील साथ असलेले क्षेत्र, पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असल्याचे क्षेत्र, यावर विशेष लक्ष देणे हे विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रमाचे धोरण आहे. त्यासाठी अति जोखमीच्या क्षेत्राची नियोजनाद्वारे सूक्ष्म कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. अतिसारामध्ये ओआरएस आणि झिंक गोळ्याचे महत्व, स्तनपानाचे महत्त्व, अतिसाराच्या प्रतिबंधासाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व आणि शौचाची विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयाचा वापर इत्यादी महत्त्वाचे संदेश देण्यात येत असल्याची माहिती जिल्हा माता बाल संगोपन अधिकारी डॉ. सुनील देशमुख यांनी दिली .
अतिसाराच्या उपचारासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेत, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्रात ओ.आर.एस. कॉर्नर तयार करण्यात आले आहे. तसेच शासनाच्या मार्गदर्शक सूचनेनुसार जिल्ह्यामध्ये 18 वर्षावरील पात्र नागरिकांना बीसीजीचे लसीकरण करण्यात येणार आहे. बीसीजी ही लस अत्यंत सुरक्षित असून भारतात ही लस इ. स. 1978 पासून बालकांचे लसीकरण करण्यासाठीं वापरात आहे.
बीसीजी लस कोणाला द्यायची
पूर्वी टीबीचा उपचार घेतलेला असा क्षय रुग्ण, क्षय रुग्णाच्या सहवासात राहिलेली व्यक्ती तथा सध्या क्षय रुग्णाच्या सहवासात राहत असलेली व्यक्ती, 60 वर्ष पूर्ण केलेली व्यक्ती व त्यापुढील ज्येष्ठ नागरिक, मधुमेहाचा पूर्व इतिहास असलेली व्यक्ती, ज्या व्यक्तींना धूम्रपणाचा पूर्वेतिहास आहे, ज्या व्यक्तींचा बॉडी माक्स इंडेक्स 18 पेक्षा कमी आहे, अशा व्यक्तींना बीसीजी लसीकरण द्यावे, अशी माहिती जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत बांगर यांनी दिली.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment