20 June, 2024
पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजनेसाठी तात्काळ अर्ज सादर करण्याचे आवाहन
हिंगोली (जिमाका), दि. 20 : जिल्ह्यातील सर्व मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमात प्रवेशित धनगर समाजाच्या विद्यार्थ्यांना सन 2019-20 या शैक्षणिक वर्षापासून इयत्ता 12 वी नंतरच्या मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेल्या परंतु शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश न मिळालेल्या विद्यार्थ्यांना भोजन, निवास व शैक्षणिक साहित्यासाठी त्यांच्या आधारसंलग्न बँक खात्यामध्ये थेट रक्कम वितरीत करण्यासाठी पंडित दिनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना सुरु करण्यात आलेली आहे. या योजनेच्या लाभार्थी निवडीचे निकष पुढीलप्रमाणे आहेत.
विद्यार्थी धनगर समाजातील असावा. इयत्ता बारावीमध्ये किमान 60 टक्के गुण मिळालेले विद्यार्थी या योजनेस पात्र राहतील. योजनेंतर्गत लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांने इयत्ता बारावी नंतर मान्यता प्राप्त तंत्र शिक्षण तसेच व्यवसाय शिक्षण अभ्यासक्रमांच्या महाविद्यालयामध्ये केंद्रीभूत प्रवेश प्रक्रियेद्वारे प्रवेश घेतलेला असावा. विद्यार्थ्यांने अर्जासोबत जात वैधता प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक राहील. विद्यार्थ्यांच्या पालकाचे उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसावे. विद्यार्थ्यांने प्रवेश घेतलेली शैक्षणिक संस्था ज्या शहराच्या ठिकाणी आहे, अशा शहरातील विद्यार्थी रहिवाशी नसावा. हिंगोली शहरातील महाविद्यालयामध्ये शिक्षण घेणारा असावा. एका विद्यार्थ्यांस जास्तीत जास्त पाच वर्षे योजनेचा लाभ घेता येईल. विद्यार्थ्यांचे कमाल वय 28 वर्षापेक्षा अधिक नसावे. अभ्यासक्रमाच्या मध्यावधी प्रवेश घेतलेला विद्यार्थी योजनेंतर्गत लाभास पात्र असेल. शिक्षणात खंड पडलेला विद्यार्थी लाभास पात्र असेल तथापि, योजनेंतर्गत निश्चित केलेल्या वयोमर्यादेपेक्षा अधिक वयाचा नसावा. निवड केलेला लाभार्थी संबंधित अभ्यासक्रम पूर्ण होईपर्यंत लाभास पात्र राहील, मात्र विद्यार्थ्यांस प्रत्येक वर्षी त्या-त्या अभ्यासक्रमाच्या परीक्षेत उत्तीर्ण होणे अनिवार्य राहील. धनगर समाजातील अपंग विद्यार्थ्यांना योजनेचा लाभ प्राधान्याने देय राहील.
वरील निकषानुसार पात्र लाभार्थ्यांनी योजनेचा लाभ घेण्यासाठी संबंधित विद्यार्थ्यांस ऑफलाईन पध्दतीने सहाय्यक संचालक, इतर मागास बहुजन कल्याण, हिंगोली यांच्याकडे तात्काळ अर्ज सादर करावेत, असे आवाहन सहाय्यक संचालक यादव गायकवाड यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment