21 June, 2024
वर्षभर दररोज योग करण्याचा संकल्प करावा -जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर • हिंगोली येथे दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा
हिंगोली (जिमाका), दि.21 : राष्ट्राची सेवा करण्यासाठी आपले शरीर आणि मन तंदुरुस्त राहण्यासाठी योग हा प्रत्येक घरापर्यंत पोहोचला पाहिजे. गुरूच्या माध्यमातून दररोज योग करण्याचा योग यावा असा संकल्प करावा, असे प्रतिपादन केले. येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर आयोजित दहाव्या आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमात जिल्हाधिकारी श्री. पापळकर बोलत होते.
जिल्हा प्रशासन, पोलीस प्रशासन, क्रीडा विभाग, शिक्षण विभाग, नेहरू युवा केंद्र, स्काऊट गाईड, योग विद्याधाम, पतंजली योग समिती, हरिओम योगा फाऊंडेशन, विविध सामाजिक संस्था, मंडळे यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. यावेळी आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, संदीप सोनटक्के, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, तहसीलदार नवनाथ वगवाड, योग शिक्षक रत्नाकर महाजन, विठ्ठल सोळंके आदींची प्रमुख उपस्थिती होती.
यावेळी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर पुढे म्हणाले की, आज दि. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिवस म्हणून साजरा केला जातो. माणसाला निरोगी राहण्यासाठी योग हा घराघरापर्यंत, प्रत्येकाच्या मनात पोहोचविण्याचा संकल्प केला पाहिजे, असे सांगून सर्वांना आंतरराष्ट्रीय योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
आज संपूर्ण जगभर हा दिन साजरा केला जात आहे. याचे सर्व श्रेय भारत देशाला, देशाच्या प्रधानमंत्र्यांना आहे. योग हा आपल्या जीवनातला अत्यंत महत्वाचा भाग आहे. त्यामुळे सर्वांनी योग करुन निरोगी रहावे, असे सांगून आमदार तानाजी मुटकुळे यांनी सर्वांना योग दिनाच्या शुभेच्छा दिल्या.
योगगुरु रत्नाकर महाजन व विठ्ठल सोळंके यांनी योग दिनामध्ये सहभागी झालेल्या प्रत्येकाने आपले मित्र व कुटुंबीयांना योगाचे महत्त्व समजावून सांगावे. तसेच योगाचा प्रसार करण्यासाठी प्रत्येकाने योगदान द्यावे, असे आवाहन केले. तसेच योग दिनानिमित्त त्यांनी उपस्थितांकडून योगविद्येची विविध आसने करुन घेतली. योगाची शपथ तसेच प्रार्थना आणि संकल्प करत, शांती पठनाने योग दिनाची सांगता झाली.
कार्यक्रमाच्या सुरुवातीला आमदार तानाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करुन योग शिबिराचा प्रारंभ करण्यात आला. या शिबिरास विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी, योगाभ्यासी मंडळाचे सदस्य, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
**********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment