24 June, 2024
जिल्हास्तरीय लोकशाही दिन 1 जुलै रोजी
हिंगोली (जिमाका), दि. 24 : शासनाच्या आदेशानुसार डिसेंबर 2007 पासून प्रत्येक महिन्याच्या पहिल्या सोमवारी सकाळी 10 ते 12 या वेळेत जिल्हाधिकारी यांच्या नियंत्रणाखाली जिल्हास्तरीय लोकशाही दिनाचे आयोजन केले जाते. जुलै महिन्याचे जिल्हास्तरीय लोकशाही दिन दि. 1 जुलै, 2024 रोजी सकाळी 10 ते 12 या वेळेत जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे आयोजित करण्यात आले आहे.
या लोकशाही दिनास जिल्हाधिकारी, पोलीस अधीक्षक, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, पाटबंधारे, बांधकाम, परिवहन, सहकार, कृषि, जिल्हा पाणी पुरवठा समन्वय अधिकारी उपस्थित राहणार आहेत.
लोकशाही दिनासाठी अर्ज स्वीकृतीचे निकष
अर्ज विहित नमुन्यात व विहित वेळेमध्ये असावा. तक्रार, निवदेन वैयक्तीक स्वरुपाची असावी. अर्जदाराने विहित नमुन्यात तक्रार जिल्हाधिकारी यांच्या नावे लोकशाही दिनाच्या १५ दिवस अगोदर दोन प्रतीमध्ये पाठविणे आवश्यक राहील. त्या अर्जावर लोकशाही दिन अर्ज असे ठळक नमूद करावे. जिल्हाधिकारी यांच्या व्यतिरिक्त इतर विभागाशी संबंधित तक्रार असल्यास तालुका लोकशाही दिनानंतर १ महिन्याने जिल्हाधिकारी लोकशाही दिनांत अर्ज करता येईल. यापुढे प्रत्येक लोकशाही दिना दिवशी प्रत्यक्ष, थेट अर्ज स्वीकारला जाणार नाही.
खालील बाबींचे अर्ज स्वीकारले जाणार नाहीत
न्यायप्रविष्ट प्रकरणे, राजस्व, अपील, सेवा, आस्थापनाविषयक बाबी, विहित नमुन्यात नसणारे व त्यासोबत आवश्यक त्या कागदपत्रांच्या प्रती न जोडलेले अर्ज, अंतिम उत्तर दिलेले आहे, देण्यात येणार आहे अशा प्रकरणी पुन्हा त्याच विषयासंदर्भात केलेले अर्ज, तक्रार, निवेदन वैयक्तीक स्वरुपाची नसेल तर तसेच वरीलप्रमाणे जे अर्ज लोकशाही दिनासाठी स्वीकृत करता येऊ शकणार नाहीत असे अर्ज संबंधित विभागाकडे आठ दिवसात पाठविण्यात येतील व त्याची प्रत अर्जदारास देण्यात येईल.
निवडणूक आचारसंहिता लागू असलेल्या कालावधीत लोकशाही दिनाचे आयोजन केले जाणार नाही. तसेच संबंधित विभागाने अर्जदाराला अंतिम उत्तर लोकशाही दिनानंतर शक्य तितक्या लवकर एक महिन्याच्या आत देणे आवश्यक राहील, असे जिल्हाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment