30 June, 2024

जिल्हा सांख्यिकी कार्यालयात राष्ट्रीय सांख्यिकी दिन उत्साहात साजरा

हिंगोली (जिमाका), दि. ३० : येथील जिल्हा सांख्यिकी कार्यालयात १८ वा सांख्यिकी दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा सांख्यिकी कार्यालयाचे उपसंचालक एस.एम. रचावाड हे होते. भारतीय संख्याशात्राचे जनक पी. सी. महालनोबिस यांच्या सन्मानार्थ भारत सरकार द्वारा वर्ष 2007 पासून त्यांच्या जन्मदिनी 29 जून रोजी दरवर्षी राष्ट्रीय सांख्यिकी दिन साजरा करण्यात येतो. जिल्हा सांख्यिकी कार्यालयाच्या वतीने यावर्षीही सांख्यिकी दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. भारत सरकारच्या सांख्यिकी व कार्यक्रम अंमलबजावणी मंत्रालयाद्वारे या वर्षीच्या सांख्यिकी दिनी 'Use of data for decision making' ही संकल्पना(थीम) निश्चित करण्यात आली आहे. यावेळी जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांनी सांख्यिकी दिनाचे महत्त्व आणि शासकीय निर्णय प्रक्रियेमध्ये डेटाचे महत्व याविषयी माहिती सांगितली. अध्यक्षीय भाषणात एस.एम. रचावाड यांनी जागतिक सांख्यिकी दिन व सांख्यिकी माहितीचे महत्व याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व मान्यवरांच्या हस्ते पी. सी. महालनोबिस यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आला. जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील कर्मचारी श्रीमती नवले आणि श्रीमती लोणसने यांनी पी. सी. महालनोबीस यांच्या जीवनावर आधारित माहितीचे सादरीकरण केले. श्री. लोथे यांनी अर्थ व सांख्यिकी संचालनलयाच्या कार्यपद्धतीची माहिती सादरीकरणाद्वारे स्पष्ट केली. सांख्यिकी दिनीच्या निमित्ताने निश्चित झालेल्या Use of data for decision making' ही संकल्पना(थीम) वर आधारित माहितीचे सादरीकरण कार्यालयातील कर्मचारी श्री वाडोकर यांनी केले. कार्यक्रमासाठी जिल्हा सांख्यिकी कार्यालय व जिल्हा नियोजन विभागातील अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. जिल्हा सांख्यिकी कार्यालयातील श्री.लोथे, सांख्यिकी सहाय्यक यांनी सूत्रसंचालन केले तर सहाय्यक संशोधन अधिकारी श्री.करेवार, यांनी कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन केले. ********

No comments: