19 June, 2024
राज्य राखीव पोलीस बलाच्या आस्थापनेवरील पोलीस भरती प्रक्रिया कालावधीत वाहतूक मार्गात बदल
हिंगोली (जिमाका), दि. 19 : येथील राज्य राखीव पोलीस बल गट क्रमांक 12 यांच्या आस्थापनेवरील 222 सशस्त्र पोलीस शिपाई पदांकरिता पोलीस भरती प्रक्रिया दि. 19 जून ते 20 जुलै, 2024 या कालावधीत 28 दिवस घेण्याचे नियोजित आहे. या भरती प्रक्रियेसाठी 21 हजार 307 उमेदवारांनी आवेदन अर्ज सादर केलेले आहेत. या भरती प्रक्रियेमध्ये 5 कि.मी. धावणे हा प्रकार असल्याने व कॅम्पमधील अंतर्गत रस्ते खराब झाले असल्याने धावणे प्रकारासाठी कॅम्पच्या बाहेरील जुना बायपास रोड (राणी सती मंदीर ते गारमाळ गाव) येथे घेण्याचे नियोजित आहे. त्यामुळे हा रस्ता रहदारीचा असल्याने पोलीस भरती प्रक्रियेमधील उमेदवारांना वाहतुकीचा त्रास होऊ शकतो. तसेच सामान्य लोकांना सुध्दा या भरती प्रक्रियेचा त्रास होऊ शकतो.
त्यामुळे पोलीस भरती प्रक्रियेसाठी जुना बायपास रोड (राणी सती मंदीर ते गारमाळ गाव) वापरण्याची परवानगी दिली आहे. पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत जुना बायपास रोडवरील (राणी सती मंदीर ते गारमाळ गाव वाहतूक ही सकाळी 6 ते 8 वाजता व दुपारी 4 ते सांयकाळी 7 वाजेपर्यंत पर्यायी मार्गाने वळविण्यात येत आहे.
पोलीस भरती प्रक्रियेसाठी हिंगोली शहरातील वाहतुकीस अडथळा होऊ नये. तसेच कोणतेही अनुचित प्रकार होऊन कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये यासाठी दि. 19 जून, 2024 पासून ते पोलीस भरती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत राणी सती मंदीर ते गारमाळ गाव या मार्गाने जाणारी वाहतूक सकाळी 6 ते 8 व दुपारी 4 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत बंद राहील. या मार्गाने जाणारी वाहतूक ही खटकाळी बायपास ते बस स्टँड, जुना अकोला रोड, तहसील, जुना रेल्वे ओव्हर ब्रीज, रिसाला बाजार ते अकोला बायपास रोडने वळविण्यात आले आहे.
या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द नियमानुसार कार्यवाही करावी, असे आदेश जिल्हा दंडाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी सर्व संबंधितांना दिले आहेत.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment