02 June, 2024
हिंगोली लोकसभा निवडणुकीच्या मतमोजणीसाठी प्रशासनाची तयारी अंतिम टप्यात
• हिंगोली लोकसभा मतदारसंघाची ९४ टेबलवर होणार मतमोजणी
* सकाळी ८ वाजता मतमोजणीला प्रारंभ
* श्रीमती एम. एस. अर्चना व एम. पी. मारोती विशेष मतमोजणी निरीक्षक
* ६३.५४ टक्के मतदान
हिंगोली दि.०२(जिमाका) : हिंगोली लोकसभा मतदार संघाची मंगळवारी होणाऱ्या मतमोजणीसाठी जिल्हा प्रशासनाची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे. शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालय, लिंबाळा मक्ता येथील परिसरात सर्व मतयंत्र स्ट्रॉंगरूममध्ये सुरक्षित ठेवण्यात आले असून याच ठिकाणी मतमोजणी सकाळी आठ वाजतापासून सुरू होणार आहे.
जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी जितेंद्र पापळकर व त्यांच्या अधिनस्त वरिष्ठ अधिकारी यासंदर्भात दररोज आढावा बैठका, प्रशिक्षण घेत असून सोमवारी दुपारपर्यंत सर्व पायाभूत सुविधा या ठिकाणी पूर्णतः कार्यरत होणार आहेत.
मतमोजणी करताना आवश्यक असणारा राजकीय पक्षांच्या प्रतिनिधींचा सहभाग, माध्यमांचा सहभाग, निवडणूक निरीक्षक आणि भारत निवडणूक आयोगाला तातडीने देण्यात येणारी माहिती, यासाठी आवश्यक पूरक तांत्रिक व भौतिक यंत्रणा या परिसरात उभारण्यात येत आहे.
सध्या शासकीय तंत्रनिकेतन, महाविद्यालय, लिंबाळा मक्ता येथे असणाऱ्या स्ट्रॉंग रूमसाठी तीन स्तरीय सुरक्षा यंत्रणा तैनात आहे. प्रवेशिका व तपासणी प्रक्रियेशिवाय या ठिकाणी कोणालाही प्रवेश नाही. दर्शनी भागात सर्व स्ट्रॉंग रूममधील सीसीटीव्ही कॅमेरे २४ तास सुरू असून, मतदान झाल्याच्या दुसऱ्या दिवसापासून या ठिकाणी सील लावण्यात आले आहे. स्ट्रॉंग रूममध्ये कोणालाही प्रवेश नसतो. तसेच २४ तास कॅमेऱ्याच्या माध्यमातून निगराणी केली जाते.
आवश्यक मनुष्यबळ नियुक्त
मतदान प्रक्रियेच्या तुलनेत मतमोजणी प्रक्रियेसाठी कमी कर्मचारी लागतात. त्यामुळे आवश्यक तेवढे मनुष्यबळ या सर्व प्रक्रियेमध्ये सहभागी असेल. तेवढेच पोलीस अधिकारी-कर्मचारी सुरक्षा यंत्रणेसंदर्भात काम करणार आहेत.
८ वाजता मतमोजणीला प्रारंभ
सकाळी आठ वाजता मतमोजणीला प्रारंभ होईल. प्रथम पोस्टल बॅलेट पेपर व या वर्षी घरी जाऊन घेण्यात आलेल्या दिव्यांग व ८५ वर्षावरील ज्येष्ठांच्या मतदानाची मोजणी होणार आहे; त्यानंतर एकाच वेळी सहा मतदारसंघातील मतमोजणीला प्रारंभ होईल.
मतमोजणी संदर्भातील प्रक्रिया ही निवडणूक आयोगाच्या निर्देशित सूत्रानुसार व सूचनेनुसार चालते, यासाठी निवडणूक विभागाकडून नेमणूक करण्यात आलेले विशेष मतमोजणी निरीक्षक श्रीमती एम. एस. अर्चना आणि एम. पी. मारोती, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर व त्रिस्तरीय सुरक्षा यंत्रणेत निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार मतमोजणी प्रक्रिया पार पाडली जाणार आहे. मंगळवारी ४ जूनच्या सायंकाळपर्यंत सर्व फेऱ्यांची मतमोजणी पार पडण्याची शक्यता आहे.
९४ टेबलवर होणार मतमोजणी
हिंगोली जिल्ह्यातील वसमत, कळमनुरी व हिंगोली, यवतमाळ जिल्ह्यातील उमरखेड आणि नांदेड जिल्ह्यातील किनवट व हदगाव असे एकूण सहा विधानसभा क्षेत्र या लोकसभा मतदारसंघात आहेत. एका विधानसभा मतदारसंघासाठी १४ टेबल असे एकूण ८४ टेबलवर मतमोजणी होणार आहे. याशिवाय पोस्टल बॅलेटसाठी ८ आणि ईटीपीबीएससाठी २ टेबल आहेत. थोडक्यात हिंगोली लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी ९४ टेबलवर होणार आहे.
हे कर्मचारी करतात मतमोजणी
प्रत्येक टेबलवर चार कर्मचारी असतात. यामध्ये मायक्रो ऑब्झर्व्हर म्हणजे सूक्ष्म निरीक्षक, दुसरे सुपरवायझर म्हणजे मतमोजणी पर्यवेक्षक, तिसरा काउंटिंग असिस्टंट म्हणजे मतमोजणी सहाय्यक आणि चौथा असतो एक शिपाई सहाय्य करण्यासाठी.
यामधील सूक्ष्म निरीक्षक हे बँकेचे कर्मचारी असतात. सुपरवायझर हे साधारणतः अभियंते असतात. हिशेब ठेवण्यासाठी लागणारे मतमोजणी सहाय्यक महसूल विभागाचे तलाठी असतात व यांना पेट्या आणून देण्यासाठी प्रत्येक टेबलवर एक शिपाई तैनात असतो.
मतदार व प्रत्यक्षात झालेले मतदान
हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे मतदान हे दुस-या टप्प्यात २६ एप्रिल २०२४ रोजी २००८ मतदान केंद्रांवर पार पडले. या मतदारसंघामध्ये १८ लाख १७ हजार ७३४ मतदार आहेत. त्यापैकी ९ लाख ४६ हजार ६७४ पुरुष, ८ लाख ७१ हजार ०३५ महिला तर २५ तृतीयपंथीय मतदारांचा समावेश आहे. या एकूण मतदारांपैकी ६ लक्ष २८ हजार ३०२ पुरुष, ५ लक्ष २६ हजार ६४४ महिला तर ९ तृतीयपंथीय अशा एकूण ११ लक्ष ५४ हजार ९५५ मतदारांनी मतदानाचा हक्क बजावला आहे. यामध्ये पुरुष ६६.३७, महिला ६०.४६ आणि ३६ टक्के तृतीयपंथीय मतदारांची टक्केवारी राहिली आहे. १५ - हिंगोली लोकसभा मतदारसंघात ६३.५४ टक्के मतदान पार पडले आहे.
विधानसभा निहाय मतमोजणी फेरी
१५- हिंगोली लोकसभा मतदारसंघातील विधानसभा मतदार संघनिहाय मतमोजणीच्या फे-या वेगवेगळ्या राहणार आहेत. यामध्ये उमरखेड २५, किनवट २४, हदगाव विधानसभा मतदार संघासाठी मतमोजणीच्या २३ फे-या होतील. तर वसमत २४, आणि कळमनुरी व हिंगोली विधानसभा मतदार संघासाठी प्रत्येकी २५ फे-यांमध्ये मतमोजणी होणार आहे.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment