27 June, 2024

मतदार यादीचा विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर

• आजपासून बीएलओ घरोघरी भेटी देवून करणार पडताळणी • 25 जुलै रोजी प्रसिद्ध होणार एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी • 25 जुलै ते 9 ऑगस्टपर्यंत मतदार यादीत नाव नोंदविता येणार • मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी 20 ऑगस्टला होणार हिंगोली (जिमाका), दि. 27 : भारत निवडणूक आयोगाने 1 जुलै 2024 या अर्हता दिनाकांवर आधारित छायाचित्र मतदार यादीचा (दुसरा) विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार 25 जून 2024 ते 24 जुलै 2024 या कालावधीत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी (बीएलओ) यांच्याद्वारे घरोघरी भेटी देवून तपासणी, पडताळणी, योग्य प्रकारे फोटो तसेच मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण करण्यात येणार आहे. मतदार यादी विशेष संक्षिप्त पुनरीक्षण कार्यक्रमानुसार एकत्रिकृत प्रारूप मतदार यादी गुरुवार, दि. 25 जुलै 2024 रोजी प्रसिद्ध केली जाईल. तसेच गुरुवार, दि. 25 जुलै ते शुक्रवार, दि. 9 ऑगस्ट 2024 या कालावधीत दावे व हरकती स्वीकारल्या जाणार आहेत. या काळातील शनिवार, रविवारी दावे व हरकती स्वीकारण्यासाठी विशेष मोहीम राबवली जाणार आहे. दावे व हरकती निकाली काढण्याची मुदत सोमवार, दि. 19 ऑगस्ट 2024 पर्यंत राहणार असून मंगळवार, दि. 20 ऑगस्ट 2024 रोजी मतदार यादीची अंतिम प्रसिद्धी केली जाणार आहे. त्यानुसार सर्व उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी, सर्व तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या स्तरावरुन दि. 25 जून, 2024 ते दि. 4 जुलै, 2024 या कालावधी दरम्यान मतदान केंद्रस्तरीय अधिकारी यांच्याद्वारे घरोघरी भेटी देऊन तपासणी, पडताळणी करणे, तसेच दि. 10 जुलै, 2024 ते दि. 12 जुलै, 2024 या कालावधीत मतदान केंद्राचे सुसूत्रीकरण व प्रमाणिकरण करुन प्रस्ताव सादर करण्यात येणार आहे. दि. 1 जुलै, 2024 या अर्हता दिनांकावर आधारित प्रारुप मतदार यादी दि. 25 जुलै, 2024 रोजी प्रसिध्द करण्यात येणार आहे. या कामी यादीत नवीन नाव नोंदणीसाठी नमुना नं. 6, मतदार यादीतील नोंदी दुरुस्तीसाठी नमुना नं. 8 आणि त्याच विधानसभा मतदारसंघात नाव स्थलांतरीत मधील दावे आणि मतदार यादीतून नाव वगळण्यासाठी नमुना नं. 7 मधील दावे व हरकती सर्व संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी तसेच तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांच्या कार्यालयातील मतदार मदत कक्ष (VHC) मार्फत स्वीकारण्यात येतील. भारत निवडणूक आयोगाची मान्यता प्राप्त असलेल्या राजकीय पक्षांनी प्रत्येक मतदान केंद्रासाठी एक याप्रमाणे मतदान केंद्रस्तरीय अभिकर्त्यांच्या नेमणुका करुन त्यांची विहित नमुन्यातील यादी संबंधित मतदान केंद्रस्तरीय अधिकारी, उपविभागीय अधिकारी तथा मतदार नोंदणी अधिकारी तसेच तहसीलदार तथा सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी यांना उपलब्ध करुन द्यावी. मतदार केंद्रस्तरीय अधिकारी यांच्या मदतीने मतदार याद्या अधिक अचूक व परिपूर्ण करण्यासाठी सहकार्य करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. ******

No comments: