25 June, 2024
गोदाम बांधकाम अनुदानासाठी शेतकरी उत्पादक कंपन्यांनी अर्ज करावेत
हिंगोली (जिमाका), दि. 25 : विविध केंद्र पुरस्कृत योजनेंतर्गत राष्ट्रीय अन्न व पोषण अभियान (कडधान्य) व राष्ट्रीय खाद्यतेल अभियानांतर्गत सन 2024-25 या आर्थिक वर्षात 250 मेट्रिक टन क्षमतेचे गोदाम बांधकाम या बाबीसाठी प्रत्यक्ष खर्चाच्या 50 टक्के किंवा 12 लाख 50 हजार रुपये यापैकी जे कमी असेल ते अनुदान अनुज्ञेय आहे. ही बाब बँक कर्जाशी निगडीत असून इच्छूक शेतकरी उत्पादक संघ, कंपनीनी अर्ज सादर करावेत.
यासाठी वखार महामंडळाच्या तांत्रिक निकषानुसार डिझाईन, स्पेसिफिकेशन, खर्चाचे अंदाज पत्रकाप्रमाणे बांधकाम या आर्थिक वर्षात पूर्ण करणे बंधनकारक आहे. गोदामाचा वापर शेतकऱ्यांनी उत्पादित केलेला कृषि माल साठवणुकीसाठी त्यांना योग्य व माफक दर आकारुन करावा. याबाबत शंभर रुपयाच्या स्टँप पेपरवर नोटराईज्ड हमीपत्र आवश्यक आहे. यासाठी शेतकऱ्यांनी सातबारा, आधारकार्ड , बँक खात्याचा तपशील इत्यादी कागदपत्रे संबंधित तालुका कृषि अधिकारी, मंडळ कृषि अधिकारी कार्यालयाकडे दि. 31 जुलै, 2024 पूर्वी सादर करावेत.
पूर्वसंमती देण्यात आलेल्या कंपन्यांनी बांधकाम पूर्ण केल्यानंतर त्यांना अनुज्ञेय असलेले अनुदान शेतकरी उत्पादक कंपनी, संघ यांच्या खात्यावर थेट लाभ हस्तांतर पध्दतीने वर्ग करण्यात येईल. या योजनेचा जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकरी उत्पादक संघ, कंपन्यांनी घ्यावा. अधिक माहितीसाठी कृषि विभागाच्या कार्यालयास संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment