29 June, 2024

लोकसभा निवडणूक निरीक्षकांकडून उमेदवारांच्या खर्चाची तपासणी

हिंगोली, दि. २९ (जिमाका): नुकत्याच पार पडलेल्या लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीमध्ये हिंगोली लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांनी आपापला निवडणुकीदरम्यान झालेला खर्च तात्काळ सादर करण्याचे निर्देश निवडणूक खर्च निरीक्षक अन्वर अली यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आयोजित खर्च निरीक्षक अन्वर अली यांनी उमेदवारांच्या खर्चाचा आज आढावा घेतला. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा कोषागार अधिकारी तथा खर्च पथक प्रमुख माधव झुंजारे, उप मुख्य कार्यकारी अधिकारी तथा निवडणूक खर्च निरीक्षकांचे संपर्क अधिकारी गणेश वाघ आदी प्रामुख्याने यावेळी उपस्थित होते. या बैठकीत उमेदवारांच्या खर्चाचा ताळमेळ तपासण्यासाठी आज निवडणूक निरीक्षकांच्या प्रमुख उपस्थितीत सामंजस्य बैठक घेण्यात आली. यावेळी सर्व उमेदवारांच्या सर्व खर्च नोंदवही व खर्च समितीकडील खर्चाचा ताळमेळ बरोबर असल्याबाबतची सर्व उमेदवारांकडून खात्री करून घेण्यात आली. हा सर्व ताळमेळ सर्व उमेदवारांनी ३० दिवसांच्या आत तपासून घेणे आवश्यक आहे. हा खर्च तपशील मतमोजणीनंतर ३० दिवसांच्या आत सादर करणे बंधनकारक असल्यामुळे आज ही बैठक घेण्यात आली. उमेदवारांच्या खर्चाबाबतची सर्व माहिती बरोबर असल्यास‌ उमेदवारांनी आजच सादर करण्याच्या सूचना खर्च निरीक्षक श्री. अली यांनी दिल्या. ****

No comments: