06 June, 2024
विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा 6 ते 21 जून या कालावधीत राबविण्यात येणार, • एक लाख 32 हजार 873 बालकांना ओआरएस, झिंक गोळ्यांचे जिल्ह्यात होणार वाटप
हिंगोली (जिमाका), दि. 06 : अर्भक मृत्यू व बाल मृत्यूदर कमी करणे हे राष्ट्रीय आरोग्य अभियानाचे एक महत्त्वाचे उद्दिष्ट आहे. देशात 5 वर्षांपर्यंतच्या बालकांच्या मृत्यूमागे अतिसार हे प्रमुख कारणांपैकी एक असून 5 ते 7 टक्के बालके अतिसारामुळे दगावतात. बालमृत्यूचे प्रमाण उन्हाळ्यात व पावसाळ्यात जास्त असते. अतिसारामुळे होणारे बालमृत्यू शून्य करणे हे उद्दिष्ट समोर ठेवून राज्यात 6 जून ते 21 जून 2024 या कालावधीत विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा राबविण्यात येणार आहे.
या कार्यक्रमांतर्गत पाच वर्षापेक्षा कमी वय असलेल्या बालकांच्या घरांमध्ये ओआरएस व झिंक गोळ्याचा वापर व उपलब्धता वाढवणे, अतिसारासह जल शुष्कता असलेल्या बाल रुग्णांचे व्यवस्थापन करण्यासाठी आरोग्य संस्थांचे बळकटीकरण करणे आणि शहरी झोपडपट्ट्या, पूरग्रस्त भाग, भटक्या जमाती, वीट भट्टी, कामगार, स्थलांतरित मजूर व बेघर मुले इ. सारख्या जोखीमग्रस्त घटकांवर विशेष लक्ष देणे आणि मागील दोन वर्षात अतिसारातील साथ असलेले क्षेत्र, पाणीपुरवठा व स्वच्छतेचा अभाव असल्याचे क्षेत्र यावर विशेष लक्ष देणे हे विशेष अतिसार नियंत्रण पंधरवडा कार्यक्रमाचे धोरण आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्ह्यात एक लाख 32 हजार 873 बालकांना ओआरएस व झिंक गोळ्यांचे वाटप करण्यात येणार आहे.
त्यासाठी अति जोखमीच्या क्षेत्राची नियोजनाद्वारे सूक्ष्मकृती आराखडा तयार करण्यात आला आहे. अतिसारामध्ये ओआरएस आणि झिंकचे महत्व, स्तनपानाचे महत्त्व, अतीसाराच्या प्रतिबंधासाठी हातांच्या स्वच्छतेचे महत्त्व आणि शौचाची विल्हेवाट लावण्यासाठी शौचालयाचा वापर इत्यादी महत्त्वाचे संदेश यामध्ये देण्यात येतात. सर्व शाळांमध्ये हात धुण्याचे प्रात्यक्षिक दाखवण्यात येऊन जनजागृती करण्यात येत आहे. या कार्यक्रमामध्ये सार्वजनिक आरोग्य विभागाबरोबरच महिला व बाल विकास विभाग, शिक्षण व पाणीपुरवठा विभागानेही समन्वयाने कार्य करण्याबाबत सूचित केले आहे.
या मोहिमेदरम्यान अतिसार नियंत्रण पंधरवड्यात 5 वर्षांखालील बालके असलेल्या प्रत्येक घरी आशासेविका भेटी देऊन ओ.आर.एस. पाकीट वापरण्याबाबतचे महत्त्व सांगतील. जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कैलास शेळके यांनी अतिसाराच्या उपचारासाठी प्रत्येक आरोग्य संस्थेत, जिल्हा रुग्णालय, प्राथमिक आरोग्य केंद्रे, उपकेंद्र, आरोग्यवर्धिनी केंद्रात ओ.आर.एस. कॉर्नर तयार करण्याबाबत सर्व आरोग्य संस्थांना सूचित केले. त्यानुसार कॉर्नर तयार करण्यात आल्याचेही त्यांनी सांगितले.
डॉक्टरांच्या सल्ल्यानेच उपचार करा
अतिसाराची लक्षणे आढळून आल्यास आपल्या नजीकच्या आरोग्य केंद्राशी संपर्क साधून वैद्यकीय सल्ल्याने उपचार करून घ्यावे, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगूलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, माता बाल संगोपन अधिकारी डॉ.सुनील देशमुख यांनी केले.
अतिसाराची लक्षणे
सौम्य किंवा गंभीर जलसृष्टीची लक्षणे, अस्वस्थपणा, चिडचिडेपणा, डोळे खोल जाणे, घटाघटा पाणी पिणे, त्वचेला चिमटा घेतला असता त्वचा हळूहळू पूर्ववत होणे, स्तनपान न करू शकणे, एका दिवसामध्ये तीन पेक्षा जास्त वेळा जुलाब होणे यासारखी लक्षणे जाणवल्यास त्वरित शेजारील शासकीय आरोग्य संस्थेत संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले आहे.
******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment