26 June, 2024
राजर्षी शाहु महाराज यांच्या जयंतीनिमित्त सामाजिक न्याय दिन समता रॅली
हिंगोली (जिमाका), दि. 26 : राजर्षी शाहु महाराज यांच्या 150 व्या जयंतीनिमित्त दि.26 जून हा दिवस दरवर्षी सामाजिक न्याय दिन म्हणून साजरा करण्यात येतो. त्याअनुषंगाने आज सकाळी 10 वाजता येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन या ठिकाणापर्यंत समता रॅलीचे आयोजन करण्यात आले होते.
रॅली सुरु करण्यापूर्वी राजर्षी शाहू महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करुन समता रॅलीस हिरवी झेंडी दाखवून प्रारंभ करण्यात आला. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश सोनवणे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजु एडके, समाज कल्याणचे सहाय्यक आयुक्त यादव गायकवाड उपस्थित होते. या रॅलीमध्ये हिंगोली येथील मुलींचे वसतिगृहात प्रवेशित मुली व प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
राजर्षी शाहू महाराज यांच्या जीवनावर दिले व्याख्यान
डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन येथील मुलीचे शासकीय वसतिगृहात राजर्षी शाहु महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समितीचे अध्यक्ष सुनिल महेन्द्रकर व आदर्श शिक्षिका मिरा कदम यांनी राजर्षी शाहु महाराज यांच्या जीवनावर आधारित व्याख्यान दिले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर उपस्थित होते.
याप्रसंगी अनुसूचित जाती मुलीची शासकीय निवासी शाळा, कळमनुरी येथील शाळेतून प्रथम, व्दितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थिनींना जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते राजर्षी शाहु महाराज गुणवत्ता पुरस्कार प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देवून गौरविण्यात आले.
या कार्यक्रमात श्रीकांत कोरडे, आत्माराम वागतकर, एम. व्ही. कौठेकर, विजयकुमार सोनटक्के, सिध्दार्थ गोवंदे, सुनिल वडकुते, अशोक इंगोले, सुरेश पठाडे, श्रीमती. एस. डी. घुगे, श्रीमती. एस. व्हि.ढोणे, नागनाथ नकाते, मोतीराम फड, नितीन राठोड, राजु ससाणे आदी अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
*******
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment