18 June, 2024

ग्रामीण खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावरील संधीसाठी सर्व सुविधा पुरविण्याचा प्रयत्न - केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे

हिंगोली (जिमाका), दि. 18 : ग्रामीण भागातील खेळाडूंना आंतरराष्ट्रीय संधी उपलब्ध करुन देण्यासाठी त्यांना केंद्र व राज्य शासनाच्या माध्यमातून जिल्हास्तरावर आवश्यक त्या सर्व सुविधा पुरविण्यासाठी प्रयत्न करण्यात येईल, असे प्रतिपादन केंद्रीय क्रीडा व युवक कल्याण राज्यमंत्री रक्षा खडसे यांनी आढावा बैठकीत केले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात केंद्रीय राज्यमंत्री श्रीमती खडसे यांनी क्रीडा व नेहरु युवा केंद्राचा आढावा घेतला. त्यावेळी त्या बोलत होत्या. आमदार तान्हाजी मुटकुळे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर, अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत उपस्थित होते. जिल्हास्थित क्रीडा विभागामार्फत उपलब्ध करुन देण्यात येणाऱ्या सुविधा, आवश्यक सुविधा यांची माहिती त्यांनी घेतली. तसेच सध्या सुरु असलेली कामे गुणवत्तापूर्ण होतील याकडे लक्ष द्यावे, अशा सूचनाही त्यांनी केल्या. याप्रसंगी त्यांनी विविध क्रीडा संघटनेच्या प्रतिनिधींची चर्चा करुन क्रीडा व नेहरु युवा केंद्रातील रिक्त पदे, विविध खेळांसाठी आवश्यक त्या सुविधांचा आढावा घेऊन मार्गदर्शन केले. भारतातील युवकांना क्रीडा क्षेत्रात संधी उपलब्ध करुन देण्यासाठी आवश्यक त्या सर्व सुविधा उपलबध करुन देण्यासाठी केंद्र शासन प्रयत्नरत आहे. यासाठी सर्व क्रीडा प्रेमी संघटनांनी तसेच सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या स्वयंसेवकांनी समन्वयाने लोकांचा सहभाग वाढवून जिल्ह्यातील क्रीडा क्षेत्र सक्षम करण्यासाठी प्रयत्न करावेत. तसेच नेहरु युवा केंद्रांनीही जिल्ह्यात विविध उपक्रम राबवून युवकांना प्रोत्साहन द्यावे, अशा सूचनाही केल्या. यावेळी जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार आणि नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत यांनी जिल्ह्यात राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रम, कामांची माहिती सादर केली. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थितांचे आभार मानले. या बैठकीस विविध क्रीडा संघटनांचे प्रतिनिधी, नेहरु युवा केंद्राचे संघटक उपस्थित होते. *******

No comments: