13 June, 2024

तृतीय पंथीयासाठीच्या धोरणाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी - जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर

हिंगोली (जिमाका), दि. 13 : जिल्ह्यातील तृतीयपंथीयांच्या समस्याचे निवारण करणे तसेच त्यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र राज्य तृतीय पंथीयासाठीचे धोरण-2024 ची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले. येथील जिल्हाधिकारी कार्यालयात जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली तृतीयपंथीयाच्या समस्या, तक्रारीचे जलदगतीने निवारण करण्यासाठी दि. 12 जून रोजी जिल्हा तक्रार निवारण समितीची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके, जिल्हा शल्य चिकित्सक कार्यालयाचे डॉ. मंगेश टेहरे, समाज कल्याणचे सहायक आयुक्त यादव गायकवाड, जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके, सर्व महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक, कामगार कार्यालयाचे प्रतिनिधी उपस्थित होते. हिंगोली जिल्ह्यातील तृतीयपंथीय यांना शासनाच्या विविध कल्याणकारी योजनांचा लाभ, रेशन कार्ड, आरोग्य तपासणी, सेतु सुविधा केंद्र, विविध कर्ज योजना इत्यादी लाभ मिळवून देण्यासाठी सर्व संबंधित यंत्रणेनी समन्वय अधिकाऱ्यांची नियुक्ती करावी, असे निर्देशही जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी दिले आहेत. या बैठकीत तृतीय पंथियाचे हक्काचे संरक्षण व कल्याणाबाबत आढावा घेण्यात आला. तसेच तृतीय पंथियासाठी काम करणाऱ्या नामवंत संस्थातील तृतीय पंथी व्यक्ती विनोद माधवराव खरटमोल यांची सदस्यपदी नियुक्ती करण्यासाठी बैठकीत मान्यता देण्यात आली. *******

No comments: