19 June, 2024

संशयित डेंग्यू व हिवतापाचा रुग्ण शासकीय यंत्रणेस कळविणे बंधनकारक - जिल्हा हिवताप अधिकारी

हिंगोली (जिमाका), दि. 19 : किटकजन्य आजारांमध्ये डेंग्यू व हिवताप या आजारांचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. या आजाराचे निश्चित निदान वेळेत होऊन उपचार न मिळाल्यास रुग्ण दगावण्याची शक्यता असते. डेंग्यू व हिवताप हे दोन्ही आजार अधिसूचित (Notifiable) म्हणून घोषित केले आहे. त्यामुळे आरोग्य सेवा देणाऱ्या प्रत्येक खाजगी रुग्णालयांनी आजाराचा प्रसार रोखण्यासाठी संशयित किंवा निदान झालेल्या डेंग्यू व हिवताप रुग्णाची माहिती संबंधितांना देणे बंधनकारक आहे. भारत सरकारने 2024 पर्यंत हिवताप दुरीकरणाचे उद्दिष्ट निश्चित केले आहे. भारत सरकाने तयार केलेल्या आराखड्यानुसार 2027 पर्यंत हिवताप प्रवण क्षेत्रामध्ये हिवतापाचे रुग्ण शून्य करणे व 2030 पर्यंत हिवताप दुरीकरण करण्याचे उद्दिष्ट आहे. याचप्रमाणे डेंग्यू आजाराचे सुध्दा लवकर निदान करुन वेळेत उपचार करणे गरजेचे आहे. परंतु खाजगी वैद्यकीय व्यवसायिक व रुग्णालये डेंग्यू व हिवतापाच्या रुग्णांसंबधी माहिती शासकीय यंत्रणेला कळवत नाहीत, असे शासनाच्या निदर्शनास आले आहे. त्यामुळे भारत सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयाने 9 जून, 2016 रोजी काढलेल्या अधिसूचनेनुसार डेंग्यू या आजाराला अधिसूचित आजार म्हणून घोषित केले आहे. तसेच हिवताप हा आजार सुध्दा 21 डिसेंबर, 2021 रोजी अधिसूचित आजार म्हणून घोषित केला आहे. त्यामुळे संबंधित संशयित रुग्णाची माहिती न दिल्यास साथरोग अधिनियम 1897 (1897 चा 3) कलम 2 नुसार संबंधितावर कार्यवाही होऊ शकते. त्यामुळे सर्व खाजगी रुग्णालये, सुश्रुषालये, वैद्यकीय संस्था यांनी संबंधित प्राथमिक आरोग्य केंद्र, ग्रामीण रुग्णालय, उपजिल्हा रुग्णालय, स्त्री रुग्णालय, जिल्हा रुग्णालय यांना डेंग्यू व हिवताप रुग्णाविषयी त्वरित माहिती कळवावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे. *******

No comments: