13 June, 2024
जादा दराने कापूस बियाणे विक्री करणाऱ्या कृषि केंद्राचा परवाना निलंबित
हिंगोली (जिमाका), दि. 13 : पावसाचे वेळेवर आगमन झाल्यामुळे शेतकऱ्यांकडून खते, बी, बियाणे खरेदी सुरु आहे. कृषि केंद्रधारकाकडून कापूस बियाणे विक्री करण्यात आलेल्या शेतकऱ्यांना कृषि विभागाकडून संपर्क करुन कापूस बियाण्याच्या विक्री किमतीबाबत शहानिशा करण्यात येत आहे. याच दरम्यान कळमनुरी पंचायत समितीचे कृषि अधिकारी एस. ए. तोटावाड यांनी काही शेतकऱ्यांना संपर्क करुन कापूस बियाणे विक्री किमतीबाबत शहानिशा केली असता काही कृषि केंद्रांकडून कापूस बियाण्याच्या मागणी असलेल्या काही वाणाची जादा दराने विक्री केली जात असल्याचे निदर्शनास आले.
या अनुषंगाने भरारी पथकातील जिल्हा परिषदेचे कृषि विकास अधिकारी उत्तम वाघमारे, जिल्हा गुणवत्ता नियंत्रण निरीक्षक नितीन घुगे, कृषि अधिकारी एस. ए. तोटावाड यांनी आखाडा बाळापूर येथील साईकृपा कृषि केंद्राची तपासणी केली. तपासणी दरम्यान कापूस बियाणे विक्री बिलाची तपासणी करुन कापूस बियाणे खरेदी केलेल्या काही शेतकऱ्यांशी संपर्क करुन पडताळणी करण्यात आली. यामध्ये संबंधित कृषि केंद्र धारकाने जादा दराने कापूस बियाणे विक्री केल्याचे निदर्शनास आले.
या प्रकरणाची रितसर सुनावणी घेऊन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी साईकृपा कृषि केंद्र आखाडा बाळापूर यांचा कापूस बियाणे विक्रीचा परवाना सात दिवसासाठी निलंबित केले आहे.
जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी कृषि निविष्ठांच्या गुणवत्ता तसेच उपलब्धतेबाबत काही तक्रार, अडचण असल्यास तात्काळ कृषि विभागाच्या भरारी पथकाशी संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे.
********
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment