19 June, 2024

आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त शिबिराचे आयोजन • योग शिबिराचा लाभ घेण्यासाठी सर्वांनी उपस्थित राहण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि.19 : आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त येथील संत नामदेव पोलीस कवायत मैदानावर जिल्हा प्रशासन, क्रीडा विभाग, योग विद्याधाम, पतंजली योग समिती, जिल्हा योगा संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने दि. 21 जून, 2024 रोजी सकाळी 6 ते 7 वाजे दरम्यान योग शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या योग शिबिराचा सर्व लोकप्रतिनिधी, सर्व अधिकारी, कर्मचारी, विद्यार्थी व जनतेनी लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनातर्फे जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी केले आहे. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाची पूर्वतयारीचा आढावा घेण्यासाठी जिल्हास्तर समितीची बैठक जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडिक, जिल्हा क्रीडा अधिकारी राजेश्वर मारावार, नेहरु युवा केंद्राचे जिल्हा युवा अधिकारी आशिष पंत, उपशिक्षणाधिकारी नितीन नेटके, गट शिक्षणाधिकारी बिरमवार, तालुका आरोग्य अधिकारी डॉ. नामदेव कोरडे, योग शिक्षक रत्नाकर महाजन, विठ्ठल सोळंके, विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते. पंतप्रधान महोदयांनी 2014 च्या राष्ट्रीय महासभेत दिनांक 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून दरवर्षी साजरा करण्याचा निर्णय घेतला आहे. तसेच संयुक्त राष्ट्रसंघाने 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे. त्याअनुषंगाने दि. 21 जून हा दिवस आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून साजरा करण्यात येतो. हा दिवस जगभरात साजरा करण्यात येतो. पाच हजार वर्षाहून अधिक परंपरा असणारी योगविद्या ही भारताने जगाला दिलेली देणगी आहे. व्यक्तीच्या शारीरिक आणि आत्मिक विकासासाठी योगविद्या सहाय्यभूत आहे. तसेच केंद्र शासनाने दि. 21 जून, 2024 हा दिवस दहावा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून आयोजित करण्याचे निर्देश दिलेले आहेत. योगा दिनाच्या निमित्ताने जगभरात योगासनाची परंपरा स्वीकारणे व ती करणे ही आपल्या देशासाठी अभिमानाची बाब आहे. कारण योग हा आपल्या भारताच्या सांस्कृतिक वारसाचा अविभाज्य भाग आहे. दि. 21 जून, 2024 रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन साजरा करुन जनतेमध्ये आरोग्य आणि भावनिक निरोगीपणा सुधारणा, एक लक्षणीय मालमत्ता म्हणून त्यांचे महत्व आणि योगदान यावर प्रकाश टाकून योगाचा सराव सुरु ठेवण्यासाठी लोकांना प्रेरणा देणे तसेच योगासने नागरिकांचा एक अविभाज्य भाग बनविणे आणि त्याद्वारे सर्वांसाठी आरोग्यदायी जीवन जगणे हे योग दिनाद्वारे सरकारचे उद्दिष्ट असल्याचे सांगून या योग दिनासाठी जिल्ह्यातील सर्व अधिकारी, कर्मचारी, नागरिक, योग साधक, खेळाडू, विद्यार्थी यांनी उपस्थित राहून योगाचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले आहे. यावेळी बोलताना जिल्हाधिकारी श्री. पापळकर म्हणाले, आंतरराष्ट्रीय योग दिनानिमित्त आयोजित योग शिबिरासाठी सर्वांनी समन्वय ठेवून आवश्यक त्या सर्व सुविधा उपलब्ध करुन द्याव्यात. तसेच विद्यार्थ्यांची रॅली काढून घोषवाक्याच्या माध्यमातून योग दिनाचे महत्व सांगून योग शिबिरासाठी जास्तीत जास्त नागरिक उपस्थित राहण्यासाठी आवाहन करावेत, अशा सूचना केल्या. *******

No comments: