26 June, 2024

फिरते वैद्यकीय कक्ष वाहनाला जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या हस्ते हिरवी झेंडा दाखवून योजनेचा प्रारंभ • तपासणी ते उपचार योजनेचा लाभ जिल्ह्यातील नोंदीत बांधकाम कामगारांनी घ्यावा-जिल्हाधिकारी

हिंगोली (जिमाका), दि. 26 : येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात हिंगोली जिल्ह्यातील इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळातील नोंदीत बांधकाम कामगारांना तपासणी ते उपचार आरोग्य योजनेचा शुभारंभ जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या प्रमुख उपस्थितीत आज फिरते वैद्यकीय कक्ष वाहनाला हिरवा झेंडा दाखवून करण्यात आला. या कार्यक्रमास सरकारी कामगार अधिकारी टी. ई. कराड, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, सरकारी कामगार कार्यालयातील कर्मचारी व आरोग्य तपासणी करणारे कर्मचारी यांची उपस्थिती होती. सरकारी कामगार अधिकारी कार्यालयांतर्गत येणाऱ्या महाराष्ट्र इमारत्त व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ स्थापित करण्यात आले आहे. या मंडळाने नियुक्त केलेल्या हिंद लंब या कंपनीमार्फत तपासणी ते उपचार आरोग्य योजनेंतर्गत अत्याधुनिक जीवन समर्थन प्रणालीयुक्त फिरते वैद्यकीय कक्ष (Mobile Medical Unit Van ) कार्यरत करण्यात आले आहे. या योजने अंतर्गत बांधकाम कामगार व त्यांच्या कुटुंबातील पती अथवा पत्नी व 10 वर्षावरील प्रथम दोन अपत्ये लाभार्थी म्हणून राहतील. बांधकाम कामगार हा नोंदणी कालावधीमध्ये वर्षातून एकदा योजनेच्या लाभासाठी पात्र राहील. नोंदीत बांधकाम कामगारांची प्राथमिक आरोग्य तपासणी, चाचणी केल्यानंतर कामगारास जीवितास धोका निर्माण करणारा आजार असेल तर त्या आजारावर आवश्यक उपचार तपासणी ते उपचार या योजनेअंतर्गत करण्यात येणार आहेत. या योजनेचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत-जास्त नोंदीत बांधकाम कामगारांनी घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी यावेळी केले. *******

No comments: