25 June, 2024
माळधामणी येथील गांधी विद्यालयात चाईल्ड हेल्पलाईन व बाल कायद्यांची जनजागृती
हिंगोली (जिमाका), दि. 25: जिल्ह्यातील बालकांच्या विविध प्रकारच्या समस्या लक्षात घेऊन हिंगोली तालुक्यातील माळधामणी येथील गांधी विद्यामंदिर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात जिल्हा महिला व बाल विकास कार्यालयामार्फत चाईल्ड हेल्पलाईन व बाल कायद्यांची जनजागृती कार्यक्रम घेण्यात आला.
यावेळी हिंगोली चाइल्ड हेल्पलाईनचे पर्यवेक्षक विकास लोणकर यांनी जागतिक बाल कामगार विरोधी दिन व बालविवाह कायदा-2006 विषयी मार्गदर्शन केले. बाल कामगार कायदा 1986 मध्ये 14 वर्षाखालील बालकास वीट भट्टी, शेतातील अवजड कामे, कारखान्यावर मोळी वाहने, दगड उचलणे व फोडणे अशा प्रकारची अवजड कामे करणे बाल कामगार विरोधी कायद्याने गुन्हा आहे. त्याला अशा प्रकारच्या जोखमीचे काम सांगणाऱ्यावरही गुन्हा दाखल होऊन शिक्षाही होऊ शकते. बालकास इजा होईल अथवा जीवित हानी होईल असे काम सांगू नये, असे त्यांनी मार्गदर्शनात सांगितले.
तसेच जिल्ह्यात बालविवाहाचे वाढते प्रमाण लक्षात घेता बालविवाह कायदा 2006 नुसार बालविवाह होण्याची कारणे, त्याचे दुष्परिणाम समजावून सांगण्यात आले. तसेच 18 वर्षाखालील मुलीचे व 21 वर्षाखालील मुलाचे विवाह करणे हे कायद्याने गुन्हा आहे. त्यामुळे असे बालविवाह होऊ नये यासाठी मार्गदर्शन केले. तसेच आपल्या क्षेत्रामध्ये काळजी व संरक्षणाच्या दृष्टिकोनातून बालक निदर्शनास आल्यास चाइल्ड हेल्पलाईन क्रमांक 1098 या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले.
यावेळी शाळेचे मुख्याध्यापक श्री. शिंदे, शिक्षक, गावातील नागरिक, विद्यार्थी व विद्यार्थिंनी उपस्थित होत्या.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment