05 June, 2024

उन्हाळी शिबिरामध्ये श्री स्वामी समर्थ बालगृहातील बालिकांना मार्गदर्शन

हिंगोली (जिमाका), दि. 05 : जिल्हा महिला बालविकास अधिकारी कार्यालय अंतर्गत जिल्हा बाल संरक्षण कक्ष आणि मिरॅकल फाउंडेशन इंडियाच्या संयुक्त विद्यमाने हिंगोली तालुक्यातील खानापूर चित्ता येथील श्री.स्वामी समर्थ बालगृहात प्रवेशित बालिकांसाठी दिनांक 03 जून 2024 रोजी उन्हाळी शिबिराचेआयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये बालगृहातील बालिकांना मार्गदर्शन करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर हे होते, तर प्रमुख पाहुणे म्हणून पी. पी. मुळे, गायत्री मुळे, डॉ. मुरलीधर जायभाये उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रमुख मार्गदर्शक डॉ.मुरलीधर जायभाये यांनी करियर म्हणजे काय या विषयावर सखोल मार्गदर्शन करताना करिअर निवडताना आपली आवड, कौशल्य, आपल्याला कोणत्या क्षेत्रात करिअर करावयाचे आहे याबाबत योग्य अभ्यास करूनच सावधपणे करिअरची निवड केली पाहिजे, असे उदाहरणासह स्पष्ट केले. बालकल्याण समितीचे सदस्य परसराम हेंबाडे यांनी बालकांना जीवन जगत असताना त्यांच्या आयुष्यात कोणत्याही प्रकारच्या आलेल्या अडचणींना सामोरे जात असताना काय करावे आणि काय करू नये याबाबत मार्गदर्शन केले. तसेच जीवनात यशस्वी होण्यासाठी जिद्द व मेहनत असेल तर यश मिळवणे सोपे असल्याचे स्पष्ट केले. जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांनी उन्हाळी शिबिराच्या माध्यमातून बालिकांना त्यांच्या सुप्त कलागुणांना वाव देण्यासाठी एक नवीन संधी उपलब्ध होणार आहे, असे सांगून उन्हाळी शिबिरातील बालिकांना तसेच इयत्ता दहावीमध्ये उत्तीर्ण झालेल्या सर्व बालिकांना शुभेच्छा दिल्या. श्री. पी.पी.मुळे यांनी उन्हाळी शिबिरामध्ये आयोजित कार्यक्रमास शुभेच्छा दिल्या. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा बाल संरक्षण अधिकारी संस्था गणेश मोरे यांनी बालकांसाठी उन्हाळी शिबिर का महत्त्वाचे आहे, उन्हाळी शिबिरामध्ये घेण्यात येणारे उपक्रम व कार्यक्रमाची रूपरेषा याबाबत माहिती दिली. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जिल्हा बाल संरक्षण कक्षातील सामाजिक कार्यकर्ता रामप्रसाद मुडे व चाइल्ड हेल्पलाइनचे प्रकल्प समन्वयक संदीप कोल्हे यांनी केले. कार्यक्रमाची सुरुवात सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून करण्यात आले. या कार्यक्रमासाठी जिल्हा बाल संरक्षण अधिकारी सरस्वती कोरडे, बालकल्याण समिती सदस्या किरण करडेकर, संगीता दुबे, बाली भोसले, बाल न्याय मंडळ सदस्या ॲड. सत्यशीला तांगडे, जिल्हा बाल संरक्षण कक्षातील बाल संरक्षण अधिकारी संस्थाबाह्य जरीबखान पठाण, सरस्वती मुलींचे निरीक्षण गृह व बालगृहातील अधिक्षिका रेखा भुरके, शिक्षक शंकर घ्यार, खाकी बाबा मेमोरियल इंग्लीश स्कूलचे सुभाष नानवटे, नंदकिशोर अहिरे, सचिन पठाडे, अंकूर पाटोडे, बाल गृह अधीक्षक रमेश पवार, बालगृहातील बालकांचे पालक व सर्व प्रवेशित बालके उपस्थित होते. *******

No comments: