20 June, 2024

प्रधानमंत्री पिक विमा योजनेंतर्गत पुनर्रचित हवामान आधारित फळ पिक विमा योजनेत सहभाग नोंदवावा - जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम

हिंगोली (जिमाका), दि. 20 : पुनर्रचित हवामान आधारित फळ पीक विमा योजना सन 2024-25 मृग बहारमध्ये संत्रा, मोसंबी व आंबिया बहारमध्ये संत्रा, मोसंबी, डाळींब, केळी (प्रायोगिक तत्वावर) या 4 फळ पिकासाठी शासन निर्णयातील अटी व शर्ती, अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोके निकषानुसार जिल्ह्यामध्ये राबविण्यात येणार आहे. पुनर्रचित हवामान आधारित फळपीक विमा योजना कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकऱ्यांना अधिसूचित क्षेत्रातील अधिसूचित पिकांसाठी ऐच्छिक आहे. कर्जदार शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी न होण्याबाबत घोषणापत्र योजनेत सहभागी होण्याच्या अंतिम मुदतीच्या 7 दिवस अगोदर शेतकऱ्यांचे घोषणापत्र प्राप्त झाल्यास कर्जदार शेतकऱ्यांना मृग बहार सन 2024-25 या हंगामासाठी योजनेच्या सहभागातून वगळण्यात येईल. अधिसूचित क्षेत्रात अधिसूचित फळपिके घेणारे (कुळाने, भाडे पट्टीने शेती करणाऱ्या शेतकऱ्यांसह सर्व शेतकरी) या योजनेत भाग घेण्यास पात्र आहेत. आंबिया बहारातील गारपीट या हवामान धोक्यासाठी अतिरिक्त विमा संरक्षण देण्यात येते. त्यासाठी अतिरिक्त विमा हप्ता शेतकऱ्यांना देय आहे. जमीन भूधारणेच्या मर्यादेत एका शेतकऱ्यास अधिसूचित फळपिकासाठी 4 हेक्टर क्षेत्र मर्यादेपर्यंत विमा नोंदणी करण्याची मुभा आहे. केवळ उत्पादनक्षम फळबागानांच विमा संरक्षणाचे कवच लागू राहणार आहे. यापेक्षा कमी वयाच्या फळबागा लागवडीस विमा संरक्षणाची नोंद झाल्याचे पडताळणीत निदर्शनास आल्यास विमा संरक्षण संपुष्टात येईल. त्यासाठी संत्रा व मोसंबी या फळपिकांचे उत्पादनक्षम वय 3 वर्षे आहे. ही योजना सन 2024-25 मृग बहार मध्ये हिंगोली जिल्ह्यासाठी भारतीय कृषि विमा कंपनी लिमिटेड, मुंबई क्षेत्रीय कार्यालय, स्टॉक एक्सचेंज टॉवर्स, 20 वा मजला, दलाल स्ट्रीट, फोर्ट, मुंबई-400023, ई-मेल : pikvima@aicofindia.com या विमा कंपनीमार्फत राबविण्यात येत आहे. मृग बहार सन 2024-25 मध्ये फळ पिकनिहाय योजनेमध्ये शेतकऱ्यांनी (कर्जदार व बिगर कर्जदार) योजनेतील सहभागाचा अर्ज सादर करणे, विमा हप्त्याची रक्कम कर्जदार किंवा बिगर कर्जदार शेतकऱ्यांच्या बँक खात्यामधून प्राथमिक सहकारी संस्था, बँक, आपले सरकार सेवा केंद्र, विमा प्रतिनिधी यांनी कपात करणे. शेतकऱ्यांनी सहभागी होण्यासाठी ऑनलाईन अर्ज करण्यासाठी संत्रा या फळ पिकासाठी 25 जून, 2024 ही अंतिम मुदत आहे, तर मोसंबी या फळ पिकासाठी 30 जून, 2024 ही अंतिम मुदत आहे. मृग बहार सन 2024-25 या वर्षासाठी अधिसूचित फळ पिके, समाविष्ट हवामान धोके व विमा संरक्षण कालावधी खालीलप्रमाणे निर्धारित करण्यात आले आहेत. सदरचे निर्धारित केलेले हवामान धोके लागू झाल्यास विमा धारक शेतकऱ्यांना नुकसान भरपाई विमा कंपनी मार्फत देय होईल. संत्रा या फळ पिकासाठी कमी पाऊस या धोक्यासाठी विमा संरक्षण कालावधी 15 जून ते 15 जुलै, 2024 असा आहे, तर पावसाचा खंड या धोक्यासाठी विमा संरक्षण कालावधी 16 जुलै ते 15 ऑगस्ट, 2024 असा आहे. यासाठी प्रती हेक्टरी शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम 5 हजार रुपये आहे. तर विमा संरक्षित रक्कम 1 लाख रुपये आहे. मोसंबी या फळ पिकासाठी कमी पाऊस या धोक्यासाठी विमा संरक्षण कालावधी 1 जुलै ते 31 जुलै, 2024 असा आहे, तर पावसाचा खंड या धोक्यासाठी विमा संरक्षण कालावधी 1 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2024 असा आहे. यासाठी प्रती हेक्टरी शेतकऱ्यांनी भरावयाच्या विमा हप्त्याची रक्कम 5 हजार रुपये आहे. तर विमा संरक्षित रक्कम 1 लाख रुपये आहे. मृग बहारातील अधिसूचित फळपिकांच्या हवामान धोक्यांच्या सविस्तर माहितीसाठी कृषि विभागाचे संकेतस्थळ www.krishi.maharashtra.gov.in वर पहावे. तसेच ई-सेवा केंद्र व बँक स्तरावरही ही माहिती उपलब्ध करुन देण्याच्या सूचना संबंधित सहभागी विमा कंपन्यांना देण्यात आल्या आहेत. हिंगोली जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अधिसूचित फळ पिकांच्या हवामान धोक्यांची माहिती करुन घेऊन विहित मुदतीमध्ये नजीकच्या ई-सेवा केंद्र किंवा बँक, वित्तीय संस्था यांच्याशी संपर्क साधून आपला सहभाग नोंदवावा, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ********

No comments: