30 August, 2024

केवळ संशयातून तलाठी पवार यांचा खून तहसीलदार शारदा दळवी यांची माहिती

हिंगोली (जिमाका),दि. ३० : वसमत तहसील कार्यालयातील आडगांव रंजे तलाठी सजाचे तलाठी संतोष देवराव पवार यांच्यावर दि.२८ ऑगस्ट, २०२४ रोजी प्रताप जगन्नाथ कऱ्हाळेने तलाठी कार्यालयात जावून प्राणघातक हल्ला केला. या हल्ल्यामध्ये संतोष देवराव पवार यांचा मृत्यू झाला आहे. "प्रलंबित फेरफारमुळे तलाठी यांचा खून" अशा आशयाची बातमी प्रसारमाध्यमांमध्ये प्रसिध्द झालेली आहे. ही बाब अत्यंत चुकीची असून हल्लेखोर आरोपी यांचा जमिनीविषयक कोणताही फेरफार संबंधित तलाठी यांच्याकडे प्रलंबित नव्हता. केवळ संशयामुळे संबंधित तलाठी यांच्यावर प्राणघातक हल्ला होवून त्यात मृत्यू झाला आहे, अशी माहिती तहसीलदार शारदा दळवी यांनी दिली आहे. *****

पोळा सणाच्या कर निमित्त वाई गोरखनाथ मार्गावरील वसमत-औंढा रोडवरील वाहतूक मार्गात बदल

हिंगोली (जिमाका), दि. 30 : प्रतिवर्षाप्रमाणे दि. 2 सप्टेंबर, 2024 रोजी पोळा हा सण साजरा करण्यात येणार असून दि. 3 सप्टेंबर, 2024 रोजी कर हा सण साजरा करण्यात येत आहे. या कर सणानिमित्ताने कुरुंदा पोलीस स्टेशन हद्दीतील मौजे वाई येथील गोरखनाथ मंदिरास हिंगोली, लातूर, परभणी व नांदेड जिल्ह्यातील जवळपास 15 हजार ते 20 हजार बैलजोड्या दर्शनास व प्रदक्षिणा मारण्यासाठी बैलाचे मालक घेऊन येतात. त्यामुळे वसमत-औंढा रोडवर बैलांची व बैल फिरविण्यासाठी आणणाऱ्या लोकांची बरीच गर्दी होते. हा रस्ता राज्य महामार्ग असल्याने सदर रोडवर वाहतूक मोठ्या प्रमाणावर चालू असते व या दिवशी वाहतूक चालू राहिल्यास अपघात होऊन कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता असल्याने वसमत टी पॉईंट ते नागेशवाडी पर्यंत रहदारीचा रस्ता हा दि. 2 सप्टेंबर, 2024 च्या मध्यरात्रीपासून ते दि. 3 सप्टेंबर, 2024 रोजीच्या मध्यरात्रीपर्यंत बंद करण्यात येऊन नांदेडकडून येणारी वाहतूक वसमत, झिरो फाटा, हट्टा जवळा बाजार मार्गे नागेशवाडी असे पर्यायी मार्गाने औरंगाबादकडे व औरंगाबादकडून नांदेडकडे जाणारी वाहतूक ही नागेशवाडी, जवळा बाजार हट्टा, झिरो फाटा मार्गे वसमत ते नांदेडकडे वळविण्यासाठी आदेश जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी दिले आहेत. या आदेशाची माहिती पोलीस अधिकारी वाहतूक यांनी ध्वनीक्षेपकाद्वारे प्रसिध्द करावी व सर्व उपविभागीय दंडाधिकारी, तहसीलदार, नगर परिषद, पोलीस स्टेशन कार्यालयाचे नोटीस बोर्डावर डकवून प्रसिध्दी देण्यात यावी. या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या विरुध्द नियमानुसार कार्यवाही करावी, असे आदेशही जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी दिले आहेत. *******

जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू

हिंगोली (जिमाका), दि. 30 : सप्टेंबर महिन्यात विविध सण-उत्सव, स्पर्धा आणि महापुरुषांच्या जयंती, सभा, बैठका, धरणे आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था अबाधित राहण्याच्या दृष्टीने जिल्ह्यात शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्याचे आदेश अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी दिले आहेत. दि. 2 सप्टेंबर, 2024 रोजी पोळा, दि. 3 सप्टेंबर रोजी पोळ्याची कर, दि. 6 सप्टेंबर रोजी हरितालिका, दि. 7 सप्टेंबर रोजी गणेश चतुर्थी, दि. 10 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी आवाहन, दि. 11 सप्टेंबर रोजी ज्येष्ठा गौरी पूजन, दि. 12 सप्टेंबर रोजी ज्येठा गौरी विसर्जन हे सण साजरे होणार आहेत. तसेच सध्या चालू असलेल्या महिला व बाल अत्याचाराच्या निषेधार्थ व मराठा आरक्षण व इतर समाजाचे आरक्षण संबंधाने चालू असलेले आंदोलने व सध्या घडणाऱ्या राजकीय घडामोडी, नागरिक, विविध संघटना, पक्ष यांच्या मागण्यासंदर्भात मोर्चे, धरणे, आंदोलने, रास्ता रोको, उपोषणे करीत असतात. अशा विविध घटनांमुळे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असे विविध प्रश्न हाताळण्यासाठी तसेच कायदा व सुव्यवस्था आबाधित राखण्यासाठी संपूर्ण हिंगोली जिल्ह्यात दिनांक 29 ऑगस्ट, 2024 रोजी मध्यरात्रीपासून ते दिनांक 12 सप्टेंबर, 2024 रोजी मध्यरात्रीपर्यंत मुंबई पोलीस अधिनियम 1951 चे कलम 37 (1)(3) अन्वये शस्त्र व जमावबंदी आदेश लागू करण्यात येत असल्याचे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी यांनी कळविले आहे. त्यानुसार शासकीय कर्तव्य पार पाडणाऱ्या कर्मचाऱ्या व्यतिरिक्त कोणतीही व्यक्ती सार्वजनिक ठिकाणी त्यांच्याजवळ शस्त्र, काठी, तलवार, बंदुका बाळगणार नाहीत. लाठ्या किंवा काठ्या, शारीरिक इजा होण्यास त्या कारणीभूत ठरतील, सहज हाताळता येतील अशा वस्तूजवळ बाळगणार नाहीत. कोणतेही क्षारक पदार्थ, स्फोटकद्रव्ये जवळ बाळगणार नाहीत. दगड, क्षेपणीक उपकरणे, किंवा सर्व प्रवर्तक द्रव्य गोळा करुन ठेवणार नाही, किंवा जवळ बाळगणार नाहीत. आवेशी भांडणे अंगविक्षेप, विटंबनात्मक नकला करणार नाही. सभ्यता, नितिमत्ता यास बाधा येईल किंवा अराजक माजेल, अशी चिन्हे निशाणी, घोषणा फलक किंवा अशी कोणतीही वस्तू जवळ बाळगणार नाही किंवा ठेवणार नाहीत. व्यक्ती किंवा समूहाच्या भावना जाणून बुजून दुखावतील, या उद्देशाने वाद्य वाजणार नाहीत किंवा असभ्य वर्तन करणार नाहीत. पाच किंवा पाचपेक्षा अधिक व्यक्तीं रस्त्यावर जमण्यास सक्त मनाई करण्यात आले आहे. हा आदेश कामावरील कोणतेही पोलीस अधिकारी, शासकीय कर्मचारी, विवाह, अंत्ययात्रा, धार्मिक कार्यक्रम, यात्रा व इतर सक्षम अधिकारी यांनी विशेषरित्या परवानगी दिलेल्या मिरवणुकांना लागू होणार नाही, असे अतिरिक्त जिल्हादंडाधिकारी, हिंगोली यांनी प्रसिध्दी पत्रकाद्वारे कळविले आहे. ********

डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट सार्वजनिक ग्रंथालय, डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कारासाठी अर्ज सादर करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 30 : महाराष्ट्र शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागांतर्गत ग्रंथालय संचालनालयाकडून राज्यातील शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांचा गुणात्मक विकास व्हावा, ग्रंथालयांकडून जनतेला अधिक चांगल्या ग्रंथालय सेवा उपलब्ध करुन द्याव्यात, वाचन संस्कृती वृध्दींगत करण्यासाठी प्रोत्साहन मिळावे या उद्देशाने "डॉ. बाबासाहेब आंबेडकर उत्कृष्ट ग्रंथालय पुरस्कार" तसेच, ग्रंथालय चळवळीतील कार्यकर्ते व सेवक यांना भारतीय ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ. शियाली रामामृत रंगनाथन यांच्या नावाने "डॉ. एस. आर. रंगनाथन उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व सेवक (ग्रंथमित्र) पुरस्कार" देण्यात येतो. राज्यातील शहरी व ग्रामीण विभागातील "अ" "ब" "क" "ड" वर्गातील उत्कृष्ट शासनमान्य सार्वजनिक ग्रंथालयांना अनुक्रमे रुपये 1 लाख रुपये, 75 हजार रुपये, 50 हजार रुपये, 25 हजार रुपये सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. राज्यातील एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व एक राज्यस्तरीय उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये 50 हजार तसेच राज्यातील प्रत्येक महसुली विभागातील प्रत्येकी एक उत्कृष्ट ग्रंथालय कार्यकर्ता व उत्कृष्ट ग्रंथालय सेवक यांना प्रत्येकी रुपये 25 हजार, सन्मान चिन्ह, प्रमाणपत्र, ग्रंथभेट आणि रोख रक्कम देऊन गौरविण्यात येते. सन 2023-24 या वर्षीच्या पुरस्कारासाठी इच्छुक असणारी ग्रंथालये, कार्यकर्ते व सेवक यांनी आपले विहित नमुन्यातील अर्ज आवश्यक त्या कागदपत्रांसह दिनांक 26 ऑगस्ट, 2024 ते 25 सप्टेंबर, 2024 पर्यंत तीन प्रतीत आपल्या जिल्ह्यातील जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयांकडे पाठवावेत, असे आवाहन अशोक मा. गाडेकर, प्र. ग्रंथालय संचालक, ग्रंथालय संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांनी केले आहे . ********

हिंगोलीच्या जिल्हाधिकारीपदी अभिनव गोयल रुजू

हिंगोली (जिमाका), दि. 30 : हिंगोलीच्या जिल्हाधिकारी पदी अभिनव गोयल गुरुवारी (दि. 29) रोजी रुजू झाले आहेत. त्यांनी प्रभारी तथा अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा कार्यभार स्वीकारला. जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आयआयटी कानपूर येथून सिव्हील इंजिनिअरची पदवी घेतली आहे. ते सन 2016 च्या बॅचचे आयएएस अधिकारी आहेत. त्यांनी यापूर्वी नांदेड जिल्ह्यातील किनवट येथे आदिवासी विकास प्रकल्प विभागात सहायक जिल्हाधिकारी तथा प्रकल्प अधिकारी म्हणून काम केले आहे. तसेच त्यांनी लातूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी, धुळ्याचे जिल्हाधिकारी म्हणून काम केले आहे. *****

शासनाच्या सर्व महत्त्वाकांक्षी योजनांच्या प्रगतीबाबत दरमहा घेणार आढावा - नूतन जिल्हाधिकारी अभिनव गोयल • कामाच्या पहिल्याच दिवशी जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी घेतला विविध विभागांचा आढावा

हिंगोली (जिमाका), दि. 30 : शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या सर्व महत्त्वाकांक्षी योजनांच्या प्रगतीबाबत प्रत्येक महिन्याला सर्व विभाग प्रमुखांचा आढावा घेण्यात येणार आहे, अशा सूचना जिल्ह्याचे नूतन जिल्हाधिकारी अभिनव गोयल यांनी आज आढावा बैठकीत दिल्या. येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुखाची आढावा बैठक आज जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी घेतली. यावेळी अपर जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, गणेश वाघ, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. नितीन तडस, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांच्यासह सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गोयल म्हणाले, दरमहा घेण्यात येणाऱ्या कामकाजाच्या आढाव्याबरोबरच जिल्हा कृती आराखड्याच्या अनुषंगाने करावयाच्या कामाचा आढावा घेण्यात येणार आहे. तसेच शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजना यामध्ये मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण यासह महत्त्वाच्या विविध योजनांची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी. सर्व कार्यालय प्रमुखांनी आपल्या कार्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची सद्यस्थिती, कामाचा तपशील याची थोडक्यात पीपीटी सादर करावी. याबाबत दरमहा आढावा घेण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. शासनाच्या महत्त्वपूर्ण योजनेतील मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे प्राप्त अर्ज काळजीपूर्वक तपासून मंजुरी द्यावी. तसेच आधार लिंक करण्यासाठी पात्र लाभार्थी महिलांचे खाते तात्काळ लिंक करुन घ्यावेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत सर्व कार्यालयांनी बेरोजगार पात्र युवक-युवतींच्या राहिलेल्या नियुक्या तात्काळ कराव्यात व तसा अहवाल जिल्हा प्रशासनाकडे सादर करण्याचे आदेश दिले. यावेळी जिल्हाधिकारी श्री. गोयल यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज सवलत योजना, मुलींना मोफत उच्च शिक्षण यासह आदिवासी विकास, जलजीवन, गाळमुक्त धरण, कृषि विभागाच्या योजना, लेक लाडकी योजना, विश्वकर्मा योजना यासह विविध योजनांचा आढावा घेऊन सूचना केल्या आणि सर्व विभाग प्रमुख यांच्याकडून चांगले काम होईल, अशी अपेक्षा व्यक्त केली. ******

29 August, 2024

“एक पेड मा के नाम" अभियानांतर्गत वृक्षारोपण * तोंडापूर कृषी विज्ञान केंद्र व आडा गावात कार्यक्रमाचे आयोजन

हिंगोली (जिमाका), दि. 29 : प्रधानमंत्रा नरेंद्र मोदी यांनी 5 जून 2024 रोजी जागतिक पर्यावरण दिनाचे औचित्य साधून आईच्या नावाने “एक पेड मॉ के नाम ग्लोबल कॅम्पेन सुरू केली आहे . जागतिक अभियानाचा एक भाग म्हणून कृषी विज्ञान केंद्र तोंडापूर व आडा येथे वृक्षारोपण कार्यक्रम राबविण्यात आला. या कार्यक्रमात शिवाजी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या कार्यक्रमाला कृषी विज्ञान केंद्र तोंडापूरचे वरिष्ठ शास्त्रज्ञ तथा प्रमुख डॉ. पी. पी. शेळके, राजेश भालेराव, अनिल ओळंबे, अजयकुमार सुगावे, साईनाथ खरात, मनीषा मुघल, राघोजी नरवाडे, गुलाबराव सूर्यवंशी, संतोष हनवते, आकाश जाधव व शिवाजी विद्यालयाचे शिक्षक श्री लकडे व श्री जाधव आणि विद्यार्थी सुमित थोरात, गणराज कदम, निकुंज जाधव, वेदांत पत्रे, प्रतीक थोरात, नदीम शेख, सक्षम नरवाडे, लक्ष्मण खरवडे, विष्णू राठोड, प्रणव शेंबेटवाड, विशाल वानोळे, स्वप्निल गुहाडे इत्यादी उपस्थित होते. ******

तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रात रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण यशस्वी

हिंगोली (जिमाका), दि. 29 : तोंडापूर कृषी विज्ञान केंद्रात दि. 20 ते 24 ऑगस्ट या दरम्यान पाच दिवसीय रोपवाटिका व्यवस्थापन प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या प्रशिक्षणाचे उद्घाटन वरिष्ठ शास्त्रज्ञ व कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांच्या हस्ते करण्यात आले. या प्रशिक्षणात परिसरातील शेतकरी, उद्योजक, आणि रोपवाटिका व्यवस्थापनात रुची असलेल्या युवकांनी मोठ्या संख्येने सहभाग घेतला. या प्रशिक्षणामध्ये कृषी महाविद्यालय तोंडापूर येथील विद्यार्थ्यांनी सुद्धा सहभाग नोंदविला. त्यांना प्रत्यक्ष अनुभव घेण्याची संधी मिळाली. यावेळी वरिष्ठ शास्त्रज्ञ व कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख डॉ. पी. पी. शेळके यांनी आपल्या भाषणात रोपवाटिका व्यवस्थापनाचे महत्त्व स्पष्ट केले व त्याच्या माध्यमातून शेतकऱ्यांना होणारे आर्थिक फायदे सांगितले. मुख्य प्रशिक्षक प्रा.अनिल ओळंबे (उद्यानविद्या तज्ञ) यांनी रोपवाटिका उभारणी, मीडियाची निवड, विविध कलमांच्या पद्धती याबाबत विद्यार्थ्यांना प्रात्यक्षिकासह माहिती दिली. त्याचबरोबर बागकामाची हत्यारे आणि अवजारांच्या उपयोगासह, रोपवाटिका व्यवस्थापनावर सखोल मार्गदर्शन केले. प्रा. राजेश भालेराव यांनी गांडूळ खत निर्मिती, सेंद्रिय शेती व लागवड याविषयी मार्गदर्शन केले. प्रशिक्षणादरम्यान शेतकऱ्यांसाठी प्रक्षेत्र भेट आयोजित करण्यात आली होती. या भेटीत सहभागी शेतकऱ्यांनी बनाना रायपणींग चेंबर, डोंगरकडा आणि हिरकणी बायोटेक टिशू कल्चर प्रयोगशाळा पार्डी येथे भेट दिली. प्रशिक्षणार्थ्यांनी बनाना रायपणींग चेंबरमध्ये विविध प्रक्रिया आणि व्यवस्थापनाच्या तंत्रांची माहिती घेतली, तर हिरकणी बायोटेकमध्ये जी-9 जातीच्या केळीच्या रोपांची निर्मिती कशी केली जाते याचा अभ्यास केला. प्रशिक्षणाचा समारोप व प्रमाणपत्र वितरण समारंभ माजी खासदार ॲड. शिवाजी माने यांच्या उपस्थितीत पार पडला. या समारोप कार्यक्रमात प्रा. राजेश भालेराव यांनी आभार प्रदर्शन केले. हे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी कृषी विज्ञान केंद्रातील सर्व कर्मचारी वृंदांचे सहकार्य लाभले. *****

क्षयरोगमुक्त ग्राम पंचायत अभियानासाठी एकत्रित प्रयत्नांची गरज - जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

• क्षयरोगमुक्त ग्राम पंचायत जिल्हास्तरीय गौरव सोहळा हिंगोली (जिमाका), दि. 29 : क्षयरोगापासून आपले गाव, आपला तालुका तसेच आपला जिल्हा मुक्त करण्यासाठी गाव पातळीपासून सर्वांनी एकत्रित प्रयत्न करण्याची गरज असल्याचे प्रतिपादन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमा अंतर्गत क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत कार्यक्रमा अंतर्गत हिंगोली जिल्ह्यातील 41 ग्राम पंचायतीना क्षयरोगमुक्त ग्रामपंचायत म्हणून घो्षित करण्यात आले आहे. या सर्व ग्रामपंचायतींचा आज जिल्हा नियोजन सभागृहात गौरव करण्यात आला. या कार्यक्रमासाठी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस, डॉ. कौस्तुभ दासगुप्ता, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये, डॉ. अभिजीत बांगर, सर्व गट विकास अधिकारी, सर्व तालुका आरोग्य अधिकारी, वैद्यकीय अधिकारी, समुदाय आरोग्य अधिकारी यांच्यासह ग्रामपंचायतीचे सरपंच तसेच आशाताई उपस्थित होत्या. यावेळी जिल्हाधिकारी श्री. परदेशी पुढे बोलताना म्हणाले, आपला भाग टीबीमुक्त करण्याची प्रत्येकाची जबाबदारी आहे. केवळ सार्वजनिक आरोग्य विभागावर अवलंबुू न राहता आपण आपल्या परिसरातील नागरिकांना उत्तम आरोग्य सेवा प्रदान केल्या पाहिजेत, सर्वात चांगल्या आणि दर्जेदार आरोग्य सेवा प्रदान केल्यामुळेच आज आपण या ग्राम पंचायत टीबी मुक्त करु शकलो आहोत. हिंगोली जिल्ह्यातील टीबी विभाग हा सर्व आधुनिक यंत्रणांनी संपन्न असल्याने सर्व तपासण्या आणि औषधोपचार देखील मोफत केले जातात. याचा सर्व नागरीकांनी लाभ घेतला पाहिजे. हिंगोली जिल्ह्यात येत्या सप्टेंबर महिन्यापासून टीबी मुक्तीसाठी लसीकरण कार्यक्रमाची सुरुवात होणार आहे. सर्वांनी ही लस घेतली पाहिजे आणि आपला जिल्हा टीबी मुक्त म्हणून राज्य पातळीवर आला पाहिजे. यासाठी कोणतीही शंका असेल तर टीबी विभागाशी संपर्क करून आपण ही लस घेतली पाहिजे. जेणे करून भविष्यात आपल्याला टीबी होणार नाही याची दक्षता आरोग्य विभाग घेणार आहे. परंतु यासाठी सर्व नागरिकांनी विभागाला सहकार्य करणे गरजेचे आहे. टीबी आजाराबाबत जास्तीत जास्त जनजागृती करुन आपला जिल्हा टीबीमुक्त करण्याासाठी एकत्रित प्रयत्नाची गरज आहे. हिंगोली जिल्हा राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाच्या अंमलबजावणीत राज्यात दुस-या क्रमांकावर आहे. तसेच हिंगली जिल्हा एसएनसी उपक्रमात कास्यपदकासाठी पात्र ठरला आहे. हिंगोली जिल्ह्याची कामगिरी पाहता यावेळी जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी राष्ट्रीय क्षयरोग दुरीकरण कार्यक्रमाबद्दल समाधान व्यक्त केले तसेच यावेळी जिल्हा क्षयरोग कार्यक्रमासाठी एक्सरे मोबाईल व्हॅनची मागणी केली असता जिल्हाधिकाऱ्यांनी सदर मागणी पूर्ण करणार असल्याचे यावेळी सांगितले. यावेळी जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. देवेंद्र जायभाये यांनी देखील मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ.अभिजीत बांगर यांनी केले. यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते हिंगोली तालुक्यातील खरबी, खांबाळा, चोरजवळा, बोराळा, चिंचोली, वसमत तालुक्यातील कळंबा, सुकळी, लहान, रेणकापूर, बोरगाव खु. , रोडगा फाटा, बोरगाव बु., चोंढी तांडा, चोंढी बहिरोबा, औंढा तालुक्यातील पांगरा, टेंभुरदरा, सोनवडी, कोंडशी, हिवरखेडा, उमरा, सुरवाडी, नंदगाव, रांजाळा, लांडाळा, कळमनुरी तालुक्यातील नवखा, गुंडलवाडी, रेडगाव, जटाळवाडी, तेलंगवाडी, चाफनाथ आणि सेनगाव तालुक्यातील तपोवन, गारखेडा, माहेरखेडा, किरखेडा, धोतरा, उमरदरा, लिंगी, खडकी, खुटाडी, सालेगाव, व्होलगीरा, गोंडाळा या टीबी मुक्त ग्रामपंचायतीचा गौरव करण्यात आला. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जिल्हा क्षयरोग विभागाच्या सर्व कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले. ******

28 August, 2024

छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तिमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमाचा लाभ घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 28 : छत्रपती शाहू महाराज संशोधन, प्रशिक्षण व मानव विकास संस्था (सारथी), पुणे ही संस्था मराठा, कुणबी-मराठा व मराठा-कुणबी या लक्ष्यित गटातील समाजाच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक विकासासाठी राज्य शासनाच्या नियोजन विभागांतर्गत काम करते. सारथी संस्थेंअंतर्गत कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात झाली असून प्रशिक्षणाच्या माध्यमातून लक्ष्यित गटाचा विकासात सहभाग वाढीसाठी तसेच या प्रशिक्षणाद्वारे तरुणांना आत्मनिर्भर करण्यासाठी सारथी संस्था कार्य करीत आहे. सारथीमार्फत राबविण्यात येणाऱ्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी शासनाने निवासी उपजिल्हाधिकारी यांना सारथीचे जिल्हा समन्वयक अधिकारी व तहसीलदार यांना सारथीचे तालुका समन्वयक अधिकारी म्हणून घोषित केले आहे. ग्रामीण भागातील 10 वी उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांना संगणक कौशल्य, इंग्रजी भाषा कौशल्य व संवाद कौशल्य विकसित करुन त्यांना रोजगार अथवा स्वयंरोजगारासाठी तयार करण्याच्या उद्देशाने छत्रपती संभाजी महाराज सारथी युवा व्यक्तीमत्व विकास व संगणक कौशल्य विकास प्रशिक्षण कार्यक्रम दि. 1 फेब्रुवारी, 2023 पासून सुरु करण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून दरवर्षी 40 हजार विद्यार्थ्यांना अर्थात दोन वर्षात 80 हजार विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे उद्दिष्ट आहे. या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत मागील दोन वर्षात (दि. 29 जुलै, 2024 पर्यंत) एकूण 54 हजार 321 उमेदवारांचे प्रशिक्षण सुरु झाले आहे. या योजनेंतर्गत दि. 31 ऑगस्ट, 2024 पूर्वी सदर प्रशिक्षणास अजून 25 हजार 679 उमेदवारांचे प्रवेश होणे अपेक्षित आहे. गावपातळीवर संगणक साक्षरतेचा अभाव आहे. त्यामुळे गावातील सारथी लक्ष्यित गटातील लोकांची संगणकाचे ज्ञान व कौशल्यामुळे कार्यक्षमता वाढेल व त्यांना रोजगाराची संधी निर्माण होईल, यासाठी तहसीलदार, तलाठी यांच्यामार्फत योजनेचा प्रचार व प्रसार करण्यात येत आहे. तहसीलदार व तलाठी हे तालुका व गाव पातळीवरील कामकाज करणारे प्रमुख अधिकारी आहेत. त्यांचा प्रभाव गावामध्ये मोठ्या प्रमाणात असल्याने त्यांच्यामार्फत कोर्सची माहिती द्यावी. त्यामुळे प्रशिक्षणास सहभागी होण्यासाठी अधिकाधिक लोकांपर्यत सारथीच्या योजंनाचा प्रचार, प्रसार करण्यात येत आहे. त्यासाठी एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक व केंद्र समन्वयक यांची बैठक घेण्यात यावी. या बैठकीस उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना निमंत्रित करावेत. तर तहसीलदार यांनी दर महिन्याच्या तलाठी आढावा बैठकीत एमकेसीएलच्या तालुकास्तरीय केंद्र समन्वयक यांना निमंत्रित करावे व सारथीच्या योजनांना अधिकाधिक लाभार्थी मिळतील यादृष्टीने आढावा घ्यावा. तहसीलदार यांनी त्यांच्या स्तरावर दर महिन्याच्या तलाठी आढावा बैठकीत, सारथीच्या सर्व योजनांची माहिती द्यावी व केलेला प्रचार प्रसिध्दीचा आढावा घ्यावा. तहसीलदारांनी गटविकास अधिकारी यांच्यासोबत समन्वय साधून दर महिन्याच्या ग्रामसेवकांच्या आढावा बैठकीत सारथीच्या योजनांची माहिती द्यावी. सारथीच्या योजनेची माहिती जिल्ह्यातंर्गत असलेल्या महाविद्यालयातील नोटीस बोर्डावर लावावी. तहसीलदार यांनी तलाठी व ग्रामसेवक यांच्या माध्यमातून गावपातळीपर्यंतच्या योजनेची माहिती ग्रामस्थांना देण्याबाबत सूचना देण्यात याव्यात. तसेच एमकेसीएलचे जिल्हा समन्वयक व तालुकास्तरीय संस्थाचालकाची बैठक घेऊन जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना प्रशिक्षण देण्याचे नियोजन करावे, अशा सूचना जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिल्या आहेत. या प्रशिक्षणाचा जास्तीत जास्त पात्र उमेदवारांनी लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. ******

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत 2 लाख 78 हजार 568 महिलांचे अर्ज पात्र

• या योजनेत आतापर्यंत 2 लाख 86 हजार 415 अर्ज प्राप्त, अर्जाच्या छाननीला गती 97 टक्के काम पूर्ण हिंगोली (जिमाका), दि. 28 : राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 86 हजार 415 लाभार्थी महिलांनी अर्ज भरले होते. या प्राप्त अर्जाच्या छाननीमध्ये 2 लाख 78 हजार 568 लाभार्थी महिलांचे अर्ज पात्र ठरले आहेत. छाननीच्या कामाला गती आली असून हिंगोली जिल्ह्याचे 97 टक्के काम पूर्ण झाले आहे, अशी माहिती जिल्हा प्रशासनाने दिली आहे. जिल्ह्यात दि. 27 ऑगस्ट, 2024 पर्यंत ॲपवर 1 लाख 79 हजार 212 अर्ज व पोर्टलवर 1 लाख 7 हजार 203 अर्ज प्राप्त झाले आहेत. ॲपवर प्राप्त झालेल्या 1 लाख 79 हजार 212 प्राप्त अर्जापैकी 1 लाख 77 हजार 572 अर्ज पात्र ठरले आहेत. तर 1089 अर्ज तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आलेल्या आहेत. 99 टक्के अर्ज ठरले आहेत. तर पोर्टलवर प्राप्त झालेल्या 1 लाख 7 हजार 203 अर्जापैकी 1 लाख 996 अर्ज पात्र ठरले आहेत, तर 3 हजार 886 अर्ज तात्पुरते रद्द करण्यात आले आहेत. पोर्टलवरील पात्र अर्जांची टक्केवारी 94 अशी आहे. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचे राज्य शासनाने लाभार्थी निवडीचे दिलेले उद्दिष्ट 100 टक्के पूर्ण करण्याचे जिल्हा प्रशासनाचे लक्ष्य आहे. त्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व विभागांचे अधिकारी, कर्मचारी, शासकीय, निमशासकीय कार्यालये, संस्था व नागरिक परिश्रम घेत आहेत. त्यामुळे चांगले काम करण्यास प्रशासनास मदत होत आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून अर्ज भरावेत. "मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ दि.1 ऑगस्ट पासून सुरु करण्यात आले आहे, "नारी शक्ती दूत" ॲपवर अर्ज भरलेल्या अर्जदारांना पुन्हा पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही. ज्या पात्र इच्छुक महिला लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्यांनी www.ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरावेत, असे आवाहनही जिल्हा प्रशासनाने केले आहे. *******

मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना जिल्ह्यातील शेतक-यांचे अंदाजे 46 कोटी रुपये होणार वीजबील माफ

हिंगोली (जिमाका), दि. 28 : मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना लागू करण्यात आली असून, जिल्ह्यातील कृषि पंप ग्राहकांचे अंदाजे 46 कोटी रुपयांचे वीज बील माफ करण्यात येणार आहे. हिंगोली मंडळांतर्गत हिंगोली, वसमत, कळमनुरी, औंढा नागनाथ आणि सेनगाव अशा एकूण पाच तालुक्याचा समावेश आहे. हिंगोली जिल्ह्यात महावितरणमध्ये 30 जून, 2024 अखेर 7.5 एचपी पर्यंत 76 हजार 566 एवढे कृषीपंप ग्राहक आहेत. यामध्ये औंढा नागनाथ तालुक्यातील 12 हजार 359, वसमत तालुक्यातील 21 हजार 292, हिंगोली 12 हजार 720, कळमनुरी 14 हजार 201 आणि सेनगाव तालुक्यातील 15 हजार 994 कृषि पंपाचा समावेश आहे. वरील सर्व 7.5 एचपीपर्यंत कृषीपंप ग्राहकांना महावितरण कंपनीकडून दर तीन महिन्याला वीज बिल देण्यात येतात. वर्ष 2023-2024 मध्ये 7.5 एचपी पर्यंत कृषी पंप ग्राहकांना देण्यात आलेल्या वीज देयकाचा तपशील खालीलप्रमाणे आहे. औंढा नागनाथ तालुक्यातील 12 हजार 359 कृषि पंप ग्राहकांचे 24.74 कोटी रुपये, वसमत तालुक्यातील 21 हजार 292 कृषि पंप ग्राहकांचे 48.16 कोटी रुपये, हिंगोली तालुक्यातील 12 हजार 720 कृषि पंप ग्राहकाचे 27.76 कोटी रुपये, कळमनुरी तालुक्यातील 14 हजार 201 कृषि पंप ग्राहकांचे 36.58 कोटी रुपये आणि सेनगाव तालुक्यातील 15 हजार 994 कृषि पंप ग्राहकांचे 34.08 कोटी असे एकूण जिल्ह्यातील 76 हजार 566 कृषि पंप ग्राहकांचे 171.32 कोटी रुपये आहे. राज्य शासनाच्या दि. 25 जुलै, 2024 च्या शासन निर्णयानुसार मुख्यमंत्री बळीराजा वीज सवलत योजना-2024 राबविण्यात येत आहे. त्यानुसार 7.5 अश्वशक्तीपर्यंत शेतकऱ्यांच्या कृषि पंपांना मोफत वीज पुरवठा करण्याचे धोरण ठरविले आहे. ही योजना एप्रिल, 2024 ते मार्च, 2029 या 5 वर्षासाठी राबविण्यास मान्यता दिली आहे. या योजनेंतर्गत माहे एप्रिल ते जून, 2024 पर्यंत हिंगोली जिल्ह्यातील 7.5 एचपीपर्यंतच्या शेतीपंप ग्राहकांचे अंदाजे 46 कोटी माफ करण्यात येणार असल्याची माहिती अधीक्षक अभियंता, महावितरण मंडळ, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे कळविले आहे. *******

27 August, 2024

उपमुख्यमंत्री अजित पवार आज हिंगोली जिल्हा दौऱ्यावर

हिंगोली (जिमाका), दि. 27 : राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार हे उद्या बुधवार दि. 28 ऑगस्ट रोजी हिंगोली जिल्हा दौऱ्यावर येत असून, त्यांचा दौरा पुढीलप्रमाणे आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार हे बुधवार, दि. 28 ऑगस्ट, 2024 रोजी दुपारी 4.30 वाजता नांदेड विमानतळ येथून मोटारीने प्रयाण करुन सायं. 5.00 वाजता गिरगाव फाटा, नांदेड वसमत रोड, वसमत जि. हिंगोली येथे आगमन करुन स्वागत रॅलीला सुरुवात करतील. नंतर मोटारीने प्रयाण करुन 5.40 वाजता मयूर मंगल कार्यालय, पूर्णा सहकारी साखर कारखाना रोड, वसमत जि. हिंगोली येथे आयोजित जनसन्मान यात्रा-शेतकरी मेळाव्यास उपस्थित राहतील. नंतर मोटारीने प्रयाण करुन सायं. 7.00 वाजता शमीम सिद्दीकी यांचे निवासस्थान, कारखाना रोड, वसमत जि.हिंगोली येथे आगमन व राखीव. नंतर मोटारीने प्रयाण करुन रात्री 8.10 वाजता आ.श्री. राजू नवघरे यांचे निवासस्थान, शास्त्रीनगर, वसमत जि.हिंगोली येथे आगमन करुन भाजप व शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्त्यांशी चर्चा करतील. नंतर मोटारीने नांदेडकडे प्रयाण करतील. *******

कपाशीवरील किडींचे एकात्मिक व्यवस्थापन

हिंगोली (जिमाका), दि. 27 : सद्यस्थितीत कपाशीचे पीक पाते, फुले व बोंडे धरण्याच्या अवस्थेत असून काही ठिकाणी रस शोषक किडी प्रामुख्याने तुडतुडे, फुलकिडे तसेच गुलाबी बोंडअळीचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. कपाशीच्या पिकांमध्ये डोमकळ्या ( पूर्णपणे न उमलेल्या कळ्या) दिसून येत आहेत. अशा डोंमकळ्यामध्ये गुलाबी बोंडअळीच्या दुसऱ्या अवस्थेतील अळ्या असतात. त्यामुळे शेतकरी बांधवांनी कपाशी पिकाचे लगेच सर्वेक्षण करुन या रस शोषक किडी तसेच गुलाबी बोंडअळीच्या व्यवस्थापनासाठी खालीलप्रमाणे उपाययोजना करणे गरजेचे आहे. रस शोषण करणाऱ्या किडी : मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी इत्यादी. बोंडअळी : गुलाबी बोंडअळी . आर्थिक नुकसान पातळी : मावा 15 ते 20 टक्के प्रादुर्भावग्रस्त झाडे किंवा 10 मावा प्रती पान, तुडतुडे दोन ते तीन पिल्ले प्रती पान, 10 फुलकिडे प्रती पान, पांढरी माशी 8 ते 10 प्रौढ माशा प्रती पान, गुलाबी बोंडअळी 5 ते 10 टक्के कळ्या, फुले, बोंडाचे नुकसान किंवा 8 ते 10 पतंग सापळा सलग तीन दिवस. एकात्मिक व्यवस्थापन : शेताच्या कडेने तसेच पडीक जमिनीतील किडींच्या पर्यायी वनस्पती नष्ट कराव्यात. शेतीची कोळपणी व खुरपणी करुन शेत तण विरहीत ठेवावे. रस शोषण करणाऱ्या किडी व बोंडअळीचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नत्र खताचा संतुलित वापर करावा. पांढऱ्या माशांना आकर्षित करण्यासाठी शेतामध्ये 12 ते 15 पिवळे चिकट सापळे प्रती हेक्टरी लावावेत. मित्र कीटकांचे संवर्धन करावे. रस शोषक किडीच्या नियंत्रणासाठी लिकॅनीसिलियम (व्हर्टिसिलियम) लिकॅनी 1.15 टक्के, डब्ल्यूपी 50 ग्रॅम या जैविक कीटकनाशकाची प्रती 10 लिटर पाणी या प्रमाणात फवारणी घ्यावी. गुलाबी बोंडअळीच्या सर्वेक्षणासाठी 4 ते 5 कामगंध सापळे व मोठ्या प्रमाणात नर पतंग पकडण्यासाठी प्रति हेक्टरी 25 सापळे लावावेत. पक्षांना बसण्यासाठी 25 पक्षी थांबे प्रती हेक्टरी लावावेत. त्यामुळे पक्षी त्यावर बसून शेतातील किडी टीपून खातील. प्रादुर्भावग्रस्त व गळलेली पाते, बोंडे जमा करुन नष्ट करावी. गुलाबी बोंडअळीग्रस्त डोमकळ्या तोडून आतील अळीसह नष्ट कराव्यात. गुलाबी बोंडअळीसाठी ट्रायकोग्रामाटायडिया बॅक्ट्री या परोपजीवी गांधील माशीच्या अंड्याचे कार्ड (1.5 लाख अंडी प्रती हेक्टर) पिकावर लावावेत. 5 टक्के लिंबोळी अर्काची किंवा ॲझाडीरॅक्टीन 10 हजार पीपीएम 10 मिली किंवा 1500 पीपीएम 25 मिली किंवा ॲझाडिरॅक्टीन 3 हजार पीपीएम 50 मिली प्रती 10 लिटर पाण्यातून प्रतिबंधात्मक फवारणी करावी. किडीने आर्थिक नुकसानीची पातळी ओलांडल्यानंतरच लेबल क्लेमनुसार रासायनिक किटकनाशकाचा आलटून पालटून वापर करावा. वरील कीटकनाशकाचे प्रमाण साध्या पंपासाठी आहे. पेट्रोल पंपासाठी हे प्रमाण तीन पट वापरावेत. शेतात कीटकनाशचे द्रावण करताना व फवारणी करताना चष्मा, हातमोजे व तोंडावर मास्कचा वापर करावा. पायरेथ्राईड गटातील किटकनाशकाची (लॅमडा सायहॅलोथ्रीन) फवारणी नोव्हेंबर महिन्याअखेर सुरु करु नये. यामुळे पांढऱ्या माशीचा उद्रेक होऊ शकतो. जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी पिकावरील कीड व रोग नियंत्रणासाठी उपाययोजना कराव्यात, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी केले आहे. ******

राज्य नाट्य स्पर्धेच्या प्रवेशिका सादर करण्याकरीता मुदतवाढ देण्यास, सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांची मान्यता

हिंगोली (जिमाका), दि. 27 : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत घेण्यात येणाऱ्या, राज्य नाट्य स्पर्धेतील प्रवेशिका सादर करण्यास 5 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आली आहे. राज्य नाट्य स्पर्धेतील हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, बालनाट्य व दिव्यांग बालनाट्य या वर्गवारीसाठी प्रवेशिका सादर करण्याचा अंतिम दिनांक 26 ऑगस्ट हा होता. मात्र काही नाट्यसंस्था व संघटनांनी या प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ द्यावी, अशी मागणी सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांच्याकडे केलेली होती. जास्तीत जास्त संघाना या स्पर्धेत भाग घेता यावा यासाठी, प्राप्त झालेल्या निवेदनांचा विचार करून; सांस्कृतिक कार्य मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी प्रवेशिका सादर करण्यास मुदतवाढ देण्यात यावी अशी सूचना सांस्कृतिक कार्य संचालनालयास केली होती. या सूचनेच्या अनुषंगाने प्रवेशिका सादर करण्यास दिनांक 5 सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ देण्यात आल्याची माहिती सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक विभीषण चवरे यांनी दिली आहे. या मुदतवाढ निर्णयाच्या अनुषंगाने, राज्य नाट्य स्पर्धेतील हौशी मराठी, हिंदी, संस्कृत, संगीत, दिव्यांग बालनाट्य, बालनाट्य या स्पर्धेत भाग घेण्यास इच्छुक असलेले संघ, ऑनलाइन पद्धतीने दिनांक 5 सप्टेंबर पर्यंत प्रवेशिका सादर करू शकतील असे प्रसिद्धीपत्रक सांस्कृतिक कार्य संचालनालयाने प्रसिद्ध केले आहे. संबंधित संघानी https://mahanatyaspardha.com या वेबसाईटवर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा असेही प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. ******

मुख्यमंत्री वयोश्री व तीर्थदर्शन योजनेची कार्यक्रमात दिली माहिती

हिंगोली (जिमाका), दि. 27 : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवनात दि. 23 ऑगस्ट, 2024 रोजी आयोजित कार्यक्रमात कर्मचाऱ्यांना मुख्यमंत्री वयोश्री योजना व मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेची माहिती देण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके हे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून समाज कल्याण विभागाचे प्रादेशिक उपायुक्त कार्यालयाचे वित्त व लेखा विभागाचे सहायक संचालक पी. व्ही. डाके, सहायक लेखाधिकारी श्रीकांत कारडे, बार्टीचे प्रकल्प अधिकारी सिध्दार्थ गोवंदे उपस्थित होते. या कार्यक्रमात हिंगोली जिल्हयातील सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे अधिनस्त सुरु असलेले अनु.जातीच्या केंद्रीय आश्रमशाळेतील कर्मचारी, दिव्यांग आश्रमशाळेतील कर्मचारी तसेच अनुदानित वसतिगृहाचे कर्मचारी व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे अधिनस्त सुरु असलेल्या विजाभज आश्रमशाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक व वसतिगृह अधिक्षक असे 200 पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांना योजनेची माहिती देण्यात आली. यावेळी पी. व्ही.डाके यांनी " मुख्यमंत्री वयोश्री योजना " व " मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना " या दोन योजनांची सविस्तर माहिती देत प्रत्येक कर्मचारी यांनी किमान 10 अर्ज भरुन सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय,हिंगोली येथे अर्ज सादर करावेत, अशा सूचना देऊन प्रत्येक उपस्थित कर्मचारी यांना वरील दोन्ही योजनेचे प्रत्येकी 10 अर्जाचे मोफत वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू एडके यांनी केले तर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन गृहपाल विजयकुमार सोनटक्के यांनी केले. यावेळी सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे व इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सर्व कर्मचाऱ्यांनी कार्यक्रम यशस्वीतेसाठी सहकार्य केले. *******

अनुदानाच्या जलद वितरणासाठी आभासी वैयक्तीक ठेव लेखा कार्यपध्दतीबाबत कार्यशाळेत मार्गदर्शन

हिंगोली (जिमाका), दि. 27 : अनुदानाच्या जलद वितरणासाठी आभासी वैयक्तीक ठेव लेखा (VPDA) कार्यपध्दती लागू करण्यात आली आहे. याबाबत माहिती देण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आहरण व संवितरण अधिकारी व त्यांचे सहायक यांच्यासाठी आज कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगांबर माडे, जिल्हा कोषागार अधिकारी माधव झुंजारे, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी शशीकांत उबाळे, अपर कोषागार अधिकारी एम. जी. वानखेडे यांच्यासह विविध कार्यालयांचे आहरण व संवितरण अधिकारी यावेळी उपस्थित होते. यावेळी कोषागार कार्यालयाचे लेखा लिपिक अविनाश भगत यांनी मकोनि-44 वरील देयकाद्वारे राज्याच्या एकत्रित निधीतून तपशीलवार शीर्ष 27-लहान बांधकामे, 31-सहायक अनुदान (वेतनेत्तर), 33-अर्थसहाय्य, 35-भांडवली मत्तेच्या निर्मितीकरिता अनुदान, 50-इतर खर्च, 53-मोठी बांधकामे आणि वित्त विभागाने वेळोवेळी घोषित करता येतील अशा अन्य उद्देश शीर्षाअंतर्गत आहरित केल्या जाणाऱ्या निधीकरिता आभासी वैयक्तीक ठेव लेखा (VPDA) प्रणालीद्वारे अनुदानाच्या जलद वितरणासाठी रक्कम कोषागारातून आहरित करणे आवश्यक आहे. यासाठी संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या कामकाजात अचूकता येण्यासाठी आभासी स्वियप्रपंजी लेखा कार्यपध्दतीचे स्थूल स्वरुप, प्रशासक घोषणा आणि नोंदणी, व्हीपीडीए खाती रक्कम जमा करणे, प्रणालीत अदात्याची नोंदणी, अदात्यांना प्रदान करणे, प्रणालीवरील लेखांकन, ताळमेळ, कोषागार कामकाज, प्रशासकाशी ताळमेळ आणि प्रणालीच्या लाभाविषयी सादरीकरणाद्वारे उपस्थित सर्व आहरण व संवितरण अधिकारी, त्यांचे सहायक यांना कार्यशाळेत सविस्तर मार्गदर्शन केले. याप्रसंगी एम.जी. फड यांनी आभासी वैयक्तीक ठेव लेखा (VPDA) कार्यपध्दती अवलंबण्याबाबत प्रात्यक्षिक सादर केले. कार्यशाळेच्या सुरुवातीला जिल्हा परिषदेचे मुख्य लेखा व वित्त अधिकारी दिगांबर माडे, उम मुख्य लेखा व वित्त अधिकारी उबाळे यांचे जिल्हा कोषागार अधिकारी माधव झुंजारे यांनी पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. *****

25 August, 2024

हिंगोली जिल्ह्यात सरासरी 16 मिमी पाऊस

हिंगोली (जिमाका), दि. 25 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 15.70 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, सेनगाव तालुक्यात सर्वात जास्त 28.40 मि.मी. पाऊस झाला आहे. तर वसमत तालुक्यात सर्वात कमी 7.60 मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 19.20 (614.10), कळमनुरी 10.80 (580), वसमत 7.60 (538.50), औंढा नागनाथ 12.50 (529.20) आणि सेनगाव तालुक्यात 28.40 (580.30) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2024 ते 25 ऑगस्ट, 2024 पर्यंत सरासरी 571.10 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 71.81 अशी आहे. ******

24 August, 2024

हिंगोली जिल्ह्यात सरासरी 26 मिमी पाऊस

हिंगोली (जिमाका), दि. 24 : जिल्ह्यात गेल्या 24 तासात सरासरी 26.20 मिलीमीटर पावसाची नोंद झाली असून, वसमत तालुक्यात सर्वात जास्त 50.10 मि.मी. पाऊस झाला आहे. तर हिंगोली तालुक्यात सर्वात कमी 12.50 मि.मी. पाऊस पडला आहे. जिल्ह्यात आज सकाळपर्यंत नोंदला गेलेला तालुकानिहाय सरासरी पाऊस पुढीलप्रमाणे असून कंसातील आकडेवारी 1 जूनपासून आजपर्यंत झालेल्या पावसाची आहे. हिंगोली 12.50 (594.10), कळमनुरी 21.20 (570), वसमत 50.10 (530.90), औंढा नागनाथ 24.90 (516.70) आणि सेनगाव तालुक्यात 20.30 (551.90) मि. मी. पाऊस पडला आहे. सर्व आकडेवारी मिलीमीटर परिमाणात आहे. हिंगोली जिल्ह्यात दिनांक 1 जून 2024 ते 24 ऑगस्ट, 2024 पर्यंत सरासरी 555.40 मिलीमीटर पाऊस पडला आहे. त्याची टक्केवारी 69.84 अशी आहे. ******

मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजनेचा लाभ घ्या - जिल्हा प्रशासनाचे आवाहन

हिंगोली दि.24 (जिमाका) : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या नेतृत्वातील राज्य शासनाने राज्यातील नागरिकांना तीर्थक्षेत्रांचे दर्शन घडवून आणण्यासाठी मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना सुरु केली असून, या योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. आपल्या देशात सर्व धर्माचे व पंथांचे अनुयायी वास्तव्यास आहेत. महाराष्ट्र ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते. राज्यात सर्वाधिक महान संत तसेच धर्मगुरु होऊन गेले आहेत. त्यांच्या विचारांचा प्रसार हा देशाच्या सीमा ओलांडून झाला असून, एक पावनभूमी म्हणून राज्याची ओळख आहे. येथे वारकरी संप्रदाय, भक्ती मार्गाची शेकडो वर्षांची परंपरा असून यात लाखो लोक धर्म-समाजकार्य भक्ती मार्गाने करत असतात. दैनंदिन कर्तव्य पार पाडताना देवदेवतांचे-भगवंताचे नामस्मरण, चिंतन करत आयुष्य जगत असतात. देशात हिंदू धर्माचे चारधाम यात्रा, माता वैष्णोदेवी यात्रा, अमरनाथ यात्रा तसेच इतर धर्मीयांचीही मोठी तीर्थस्थळे आहेत. आयुष्यात एकदा तरी जाण्याचे बहुतांश ज्येष्ठ नागरिकांचे स्वप्न असते. पुण्यकर्म म्हणून तीर्थस्थळी जाण्याची सुप्त इच्छा असते. परंतु गोरगरीब, सर्वसामान्य कुटुंबातील ज्येष्ठ नागरिक त्यांच्या परिस्थितीमुळे वा सोबत नसल्याने आणि पुरेशी माहिती नसल्याने अनेक ज्येष्ठ नागरिकांचे तीर्थयात्रा करण्याचे स्वप्न पूर्णच होत नाही. ज्येष्ठ नागरिकांना देशातील मोठ्या तीर्थ स्थळांना जाऊन मनःशांती तसेच अध्यात्मिक पातळी गाठणे सुकर व्हावे, यासाठी राज्यातील सर्व धर्मातील ज्येष्ठ नागरिक 60 वर्षे व त्याहून अधिक वयाचे असणारांना राज्य आणि देशातील तीर्थक्षेत्रांना मोफत भेटीची-दर्शनाची संधी देण्यासाठी ‘मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना’ सुरु करण्यास मान्यता देण्यात आली आहे. मुख्यमंत्री तीर्थ दर्शन योजना योजनेचे उदि्दष्ट : राज्यामधील ज्येष्ठ नागरिकांना तीर्थदर्शन यात्रा मोफत उपलब्ध करून देणे. आवश्यक कागदपत्रे : योजनेच्या लाभासाठी दिनांक 31 ऑक्टोबर 2024 पूर्वी ऑफलाईन व त्यानंतर ऑनलाईन अर्ज करता येतील. सक्षम प्राधिकारी यांनी दिलेला कुटुंब प्रमुखाचा उत्पन्नाचा दाखला वार्षिक उत्पन्न अडीच लाखापर्यंत असणे अनिवार्य किंवा अंत्योदय अन्न योजना/ प्राधान्य कुटुंब योजना/वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या आत असलेले मात्र प्राधान्य कुटुंब नसलेले शिधापत्रिकाधारक पात्र ठरतील. प्रवासासाठी एजन्सी तथा टुरिस्ट कंपन्याची निवड : या योजनेंतर्गत विविध दळणवळणाच्या साधनाद्वारे प्रवासाचे आयोजन करण्यासाठी अधिकृत टुरिस्ट कंपन्या तसेच भारतीय रेल्वे विभाग किंवा समकक्ष अधिकृत असलेल्या नोंदणीकृत कंपन्याची निवड विहित नियमांचे निविदा प्रक्रियेने पालन करून करण्यात येईल. लाभार्थ्याची निवड : प्रत्येक ठिकाणच्या प्रवासासाठी जिल्हानिहाय कोटा निश्चित केला जाईल, यामध्ये अर्जदाराच्या संख्येसह त्या जिल्ह्याच्या लोकसंख्येच्या प्रमाणात अधिभार देऊन कोटा निश्चित केला जाईल, विहित कोट्यापेक्षा जास्त अर्जाच्या उपलब्धतेवर आधारित पारदर्शक पद्धतीने लॉटरीद्वारे प्रवाशांची निवड केली जाईल. कोट्यातील 100 टक्के अतिरिक्त लोकांसाठी प्रतीक्षा यादी तयार केली जाईल. मात्र दिनांक 31 ऑक्टोबर, 2024 पर्यंत राज्यातील प्रत्येक जिल्ह्याकरिता कमाल एक हजार पात्र लाभार्थ्यांचा कोटा निश्चित करण्यात येत असून कोट्याचा कमाल मर्यादेत तसेच प्रति लाभार्थी तीस हजार रुपयांच्या कमाल मर्यादेत शासनाने दिनांक 14 जुलै 2024 च्या शासन निर्णयान्वये विहित केलेल्या तीर्थक्षेत्रांमधून तीर्थदर्शन यात्रा (टूर पॅकेज) निश्चित करण्याचे अधिकार जिल्हास्तरीय समितीस असतील. निवडलेले प्रवासी आणि प्रतीक्षा यादी विभागाच्या पोर्टलवर (दिनांक 31 ऑक्टोबर, 2024 नंतर) जिल्हाधिकारी कार्यालय आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर आणि योग्य वाटेल अशा इतर माध्यमांद्वारे प्रसारित केली जाईल. जर पती-पत्नीने स्वतंत्र अर्ज केला असेल आणि एकाची लॉटरीत निवड झाली असेल, आणि दुसऱ्या जोडीदाराची लॉटरीत निवड झाली नसेल तर जिल्हास्तरीय समिती त्यांना किंवा तिला यात्रेवर पाठवण्याचा निर्णय घेऊ शकतील. अर्ज करण्याची प्रक्रिया योजनेचा अर्ज दिनांक 31 ऑक्टोबर, 2024 पूर्वी ऑफलाईन व त्यानंतर योजनेचे अर्ज पोर्टल, मोबाईल ॲपद्वारे ऑनलाईन भरले जाऊ शकतात. त्यासाठी पुढील प्रक्रिया विहित केलेली आहे. पात्र व जेष्ठ नागरिकास या योजनेसाठी दिनांक 31 ऑक्टोबर, 2024 पूर्वी ऑफलाईन व त्यानंतर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करता येईल. दिनांक 31 ऑक्टोबर, 2024 पूर्वी ऑफलाईन अर्ज सादर करता येत नसेल त्यांच्यासाठी अर्ज भरण्याची सुविधा सहाय्यक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, हिंगोली येथे विनामूल्य उपलब्ध असेल. तात्पुरत्या यादीचे प्रकाशन : ऑफलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची तात्पुरती यादी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आणि समाजकल्याण विभागाच्या सहाय्यक आयुक्त कार्यालयाच्या सूचना फलकावर जाहीर केली जाईल आणि ऑनलाईन अर्ज प्राप्त झाल्यानंतर पात्र अर्जदारांची यादी पोर्टल-अँपवर जाहीर केली जाईल. मूळ अर्जदारासह जीवनसाथी-सहाय्यकाच्या प्रवासासंबंधीच्या तरतुदी : 75 वर्षावरील अर्जदाराच्या जीवनसाथी किंवा सहाय्यक यांचे वय 60 वर्षापेक्षा कमी असले तरीही जीवनसाथी किंवा सहाय्यक यापैकी एक अर्जदारासोबत प्रवास करू शकेल. सहायकाचे किमान वय 21 ते कमाल 50 वर्ष असावे. एखादा सहायक प्रवासात घेतल्यास त्यालाही सारख्याच सुविधा मिळतील. सहायकाने शारीरिकदृष्ट्या निरोगी आणि प्रवासासाठी तंदुरुस्त असल्याचे वैद्यकीय प्रमाणपत्र सादर करणे आवश्यक राहील. या योजनेची नवीन वेबसाईट/पोर्टल बनवण्याचे काम महाराष्ट्र माहिती तंत्रज्ञान महामंडळाकडून किंवा सामाजिक न्याय व विशेष सहाय्य यांच्या अधिनस्त महामंडळाकडून तयार करून घेण्यात येत आहे. त्यामुळे जिल्ह्यातील जास्तीत जास्त पात्र ज्येष्ठ नागरिकांनी योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे. ********

23 August, 2024

अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगारांनी स्वयंरोजगारासाठी ऑनलाईन कर्ज प्रस्ताव 15 सप्टेंबर पर्यंत सादर करावेत

हिंगोली (जिमाका), दि. 23 : शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्या. नाशिक शाखा कार्यालय किनवट अंतर्गत कार्यक्षेत्र नांदेड, परभणी व हिंगोली हे तीन जिल्हे येत आहेत. या कार्यालयामार्फत अनुसूचित जमातीच्या सुशिक्षित बेरोजगारांना त्यांचे जीवनमान उंचावण्याकरिता स्वयंरोजगारासाठी कर्ज स्वरुपात अल्प व्याजदराने एन.एस.एफ.टी.डी.सी. नवी दिल्ली पुरस्कृत विविध योजना राबविण्यात येतात. या यो जनेसाठी वरील तिन्ही जिल्ह्यासाठी सन 2024-25 साठी 30 चा लक्षांक प्राप्त झाला असून त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. किनवट प्रकल्प कार्यालयासाठी महिला सबलीकरण योजना (दोन लाख रुपये) -5, कृषि आणि संलग्न व्यवसाय (पाच लाख रुपये)- 01, हॉटेल ढावा व्यवसाय (5 लाख रुपये)-02, स्पेअर पार्ट, गॅरेज, ॲटो वर्क शॉप (5 लाख रुपये)- 01, वाहन व्यवसाय (10 लाख रुपये) -01, वाहन व्यवसाय (10 लाख रुपयापेक्षा जास्त व 15 लाखापर्यंत) 01, लघु उद्योग व्यवसाय (तीन लाख रुपये) - 02, ॲटो रिक्षा, मालवाहू रिक्षा (तीन लाख रुपये)- 01 व स्वयं सहाय्यता बचत गट (5 लाख रुपये)-02 असे एकूण 16 चा लक्षांक प्राप्त झाला आहे. कळमनुरी प्रकल्प कार्यालयासाठी महिला सबलीकरण योजना (दोन लाख रुपये) -4, कृषि आणि संलग्न व्यवसाय (पाच लाख रुपये)- 01, हॉटेल ढावा व्यवसाय (5 लाख रुपये)-01, स्पेअर पार्ट, गॅरेज, ॲटो वर्क शॉप (5 लाख रुपये)- 02, वाहन व्यवसाय (10 लाख रुपये) -01, वाहन व्यवसाय (10 लाख रुपयापेक्षा जास्त व 15 लाखापर्यंत)- 02, लघु उद्योग व्यवसाय (तीन लाख रुपये) - 01, ॲटो रिक्षा, मालवाहू रिक्षा (तीन लाख रुपये)- 01 व स्वयं सहाय्यता बचत गट (5 लाख रुपये)-01 असे एकूण 14 चा लक्षांक प्राप्त झाला आहे. वरील लक्षांक वेळेत पूर्ण करण्यासाठी www.mahashabari.in या संकेतस्थळावर ऑनलाईन कर्ज प्रस्ताव दि. 15 सप्टेंबर, 2024 पर्यंत सादर करावेत, असे आवाहन शाखा व्यवस्थापक, शबरी आदिवासी वित्त व विकास महामंडळ मर्यादित, नाशिक शाखा कार्यालय, किनवट यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. *******

हिंगोली तालुक्यातील सवड येथील शेती शाळेत सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक नियंत्रणाबाबत मार्गदर्शन

हिंगोली (जिमाका), दि. 23 : तालुका कृषी अधिकारी कार्यालयामार्फत आज हिंगोली तालुक्यातील सवड येथे राज्य पुरस्कृत मूल्य साखळी योजनेअंतर्गत सोयाबीन पिकावरील शेतीशाळा आयोजित करण्यात आली होती. या शेती शाळेत जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी राजेंद्र कदम यांनी सोयाबीन पिकावरील चक्री भुंगा व खोडमाशी नियंत्रणाबाबत शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. तसेच शेतकऱ्यांना शेती शाळेचे महत्त्व समजावून सांगितले. याप्रसंगी तालुका कृषी अधिकारी कमलाकर सांगळे यांनी सोयाबीन पिकावरील पिवळा मोझॅक नियंत्रणाबाबत माहिती देताना "सोयाबीनवरील पिवळा मोझॅक हा विषाणूजन्य रोग असून त्याचा प्रसार पांढरी माशीमुळे होत असतो. यासाठी शेतकऱ्यांनी पांढऱ्या माशीचे वेळीच नियंत्रण करणे आवश्यक आहे. पांढरी माशी ही रस शोषण करणारी कीड असून ती नैसर्गिकरित्या पिवळ्या रंगाकडे आकर्षित होते. यासाठी शेतकऱ्यांनी एकरी दहा पिवळ्या रंगाचे चिकट सापळे सोयाबीन पिक असलेल्या शेतामध्ये लावावे, तसेच रोगाच्या सुरुवातीच्या अवस्थेत कमी संख्येने असलेली प्रादुर्भावग्रस्त झाडे तातडीने उपटून शेताबाहेर दूर नेऊन नष्ट करावेत. पांढरी माशीच्या नियंत्रणासाठी आंतरप्रवाही कीटकनाशक इमिडाक्लोप्रिड 17•8 टक्के किंवा डायफेनथीरॉन 50 टक्के किंवा फिप्रोनील 15 टक्के + फ्लोनीक्यामिड 15 यापैकी कोणतेही एका कीटकनाशकाची फवारणी करावी" असे आवाहन उपस्थित शेतकऱ्यांना केले. कृषी पर्यवेक्षक एस. एम. कोटे यांनी कीटकनाशकांची फवारणी करताना घ्यायची काळजी याबाबत प्रात्यक्षिक करून उपस्थित शेतकऱ्यांना मार्गदर्शन केले. शशिकांत कऱ्हाळे यांनी "स्थानिक सामग्री मधून जैविक कीटकनाशकांची निर्मिती व फवारणी" याबाबत मार्गदर्शन केले. तर सुशांत जाधव यांनी नॅनो युरिया व नॅनो डीएपी बाबत मार्गदर्शन केले. या शेतीशाळेचे यशस्वी नियोजन कृषी सहाय्यक गजानन शिंदे यांनी केले. याप्रसंगी कृषी सहाय्यक दामोदर रोडगे, यशवंत चोपडे, शिवप्रसाद धोंडगे , गणेश बिचारे, विलास गिरी, श्रीमती शिल्पा जंपणगिरे, श्रीमती संजीवनी शिंदे या कर्मचाऱ्यांनी सहभाग नोंदविला. या शेती शाळेत गणेश थोरात, मारुती फाजगे, राजकुमार थोरात, केदारलींग थोरात , जयवंत जोजार, अमोल तारे, शंकर ताटे ,अशोक जावळे, ईश्वर जावळे व इतर शेतकरी उपस्थित होते. *******

डेंग्यू, हिवताप आजाराच्या निर्मूलनासाठी नागरिकांचा सहभाग महत्वाचा • जिल्ह्यात आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत डास आळी सर्व्हेक्षण व गप्पी मासे पैदास केंद्र स्थापन

हिंगोली (जिमाका), दि. 23 : कीटकजन्य आजार डेंग्यू व हिवताप निर्मूलनासाठी उपचाराबरोबर प्रतिबंध महत्त्वाचा आहे. त्यासाठी नागरिकांचा सहभाग महत्त्वाचा आहे. या आजाराच्या प्रतिबंधासाठी परिसर स्वच्छ राखणे आवश्यक असल्याने नागरिकांनी प्रामुख्याने पावसाळ्यात याची खबरदारी घ्यावी, असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. गणेश जोगदंड यांनी केले आहे राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रमांतर्गत डेंग्यू, चिकन गूनिया आणि हिवताप आजाराविषयी जनतेमध्ये जनजागृती निर्माण होऊन प्रतिबंधात्मक उपाययोजना व अंमलबजावणीमध्ये सक्रिय सहभाग करून घेण्यासाठी आरोग्य कर्मचाऱ्यामार्फत कीटक शास्त्रीय सर्वेक्षण करून जनजागृती करण्यात येत आहे. वापरण्याचे पाणीसाठे हौद, रांजन, टाकी यांची तपासणी करण्यात येत आहे. डास आळी आढळून आलेल्या भांडीमध्ये डास आळी नाशक औषधे टाकण्यात येत असुन छोटे कंटेनर रिकामी केली जात आहेत. डेंग्यू, हिवताप हा किटकजन्य आजार असून अनेक आजारांपैकी एक गंभीर आजार आहे. गर्भवती महिला व बालकांना यांचा सर्वाधिक धोका संभवतो. वेळीच उपचार घ्यावा. आवश्यक उपायोजना कीटकनाशक, आळी नाशकाची, डासोउत्पत्ती स्थानामध्ये डासअळी भक्षक गप्पी मासे सोडणे, डासांचा उपद्रव पूर्णपणे टाळण्यासाठी पाण्याच्या सर्व टाक्या तसेच पिंप साठे व्यवस्थित झाकून ठेवावे. इमारतीच्या गच्चीवर आणि परिसरात अनावश्यक पाणी साचू देऊ नये. वैयक्तिक सुरक्षिततेसाठी मच्छरदाणीचा वापर करावा, डास प्रतिबंधक यंत्रे, मलम, अगरबत्तीचा वापर, घरांच्या खिडक्यांना बारीक जाळीचे पडदे लावणे, घराच्या व सभोवताली परिसरामध्ये पाण्याची डबके साचू देऊ नये. ते वाहते करावी किंवा त्यामध्ये जळके ऑइल किंवा रॉकेल टाकावे, नारळाच्या करवंट्या, टायर्स, फुलदाण्या, कुलर्स यामध्ये पाणी साचू देऊ नये. आठवड्यातून एक दिवस शनिवार हा कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा. या दिवशी आपल्या घरातील सर्व पाणी साठा स्वच्छ पुसून कोरडे करून त्यानंतरच त्यामध्ये पाणी भरावे. जेणेकरून डासांची उत्पत्ती होणार नाही, याकडे सर्वांनी लक्ष द्यावे. कोरडा दिवस पाळा, डेंग्यू हिवताप आजार टाळा, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलास शेळके यांनी केले आहे. *******

नागरिकांच्या तक्रारींचे वेळीच व गुणवत्तापूर्ण निराकरण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल उपयुक्त - जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

• आपले सरकार पोर्टल 2.0 बाबत जिल्हास्तरीय सर्व शासकीय विभाग प्रमुखांना दिले प्रशिक्षण हिंगोली (जिमाका), दि. 23 : सर्वसामान्य नागरिक हा आपल्या शासन, प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या तक्रारींचे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण निराकरणासाठी 'आपले सरकार पोर्टल 2.0' ही प्रणाली उपयुक्त आहे. या प्रणालीद्वारे प्राप्त तक्रारींचा निपटारा विहीत कालावधीत करण्याला सर्व शासकीय विभागांनी प्राधान्य द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिल्या. आपले सरकार पोर्टल 2.0 प्रणालीच्या वापराबाबत आयोजित प्रशिक्षणावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, प्रशिक्षक देवांग दवे, विनोद वर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांच्यासह जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते. तक्रारींचा निपटारा गतिमान होण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये नव्याने काही बदल करण्यात आले आहेत. या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचा संवेदनशीलपणे निपटारा होण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या संकल्पनेतून आपले सरकार पोर्टलबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून प्रणालीचा प्रभावी वापर कशाप्रकारे करावा, याबाबत माहिती दिली जाणार आहे. या माहितीचा वापर प्रत्यक्ष कामकाजात करून नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, असे जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी यांनी सांगितले. नागरिकांना आपल्या तक्रारी घरातून, गावातूनच शासन, प्रशासनापर्यंत पोहचविता याव्यात, यासाठी आपले सरकार पोर्टल सुरू करण्यात आले. आता नागरिक आणि शासकीय यंत्रणांसाठी सुसह्य ठरतील, अशा सुधारणा करून 'आपले सरकार पोर्टल 2.0' हे नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. कामकाजातील पारदर्शकता वाढविण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरणार आहे, असे प्रशिक्षक देवांग दवे यांनी सांगितले. तसेच शासकीय कार्यालये, नागरिकांना या पोर्टलचा कशाप्रकारे वापर करता येईल, याबाबत माहिती दिली. आयटीचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निरज धामणगावे यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण आयोजनाचा हेतू विषद केला. तर शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी या प्रशिक्षणातून प्रणालीचा प्रभावीपणे वापर करुन आपले सरकार पोर्टलवरील तक्रारीचा निपटारा जलदगतीने करण्यास मदत होणार असल्याचे सांगून शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले. *****

22 August, 2024

येता संकट बालकावरी 1098 मदत करी

हिंगोली (जिमाका), दि. 22 : आपल्या आजूबाजूला आपल्याला जर बालकामगार, बाल भिक्षेकरी, लैंगिक अत्याचार ग्रस्त बालके, हरवलेली बालके तसेच सापडलेली बालके, मदतीची आवश्यकता असलेली संकटग्रस्त बालके आढळल्यास अशा बालकांना त्वरित आवश्यक मदत कोठून व कशी मिळवून देता येईल, यासा्ठी कोठे संपर्क करावा याबाबत सामान्य नागरिकांमध्ये संभ्रम असतो. अशा संकटग्रस्त बालकांना त्वरित मदतीसाठी भारत सरकार, महिला व बाल विकास विभाग नवी दिल्ली व महाराष्ट्र शासनाचे महिला व बालविकास विभाग यांच्यामार्फत 0 ते 18 वयोगटातील कोणत्याही प्रकारच्या अडचणीत, संकटात सापडलेल्या तसेच काळजी व संरक्षणाची गरज असलेल्या सर्व बालकांसाठी चाईल्ड हेल्पलाईन सेवा 1098 संपूर्ण महाराष्ट्रात कार्यान्वित आहे. या सेवेअंतर्गत संकटग्रस्त बालकांना 24x7 हेल्पलाईन सेवा उपलब्ध आहे. या सेवेचा लाभ बालक स्वत: घेऊ शकतो किंवा इतर कोणीही सदर सेवेद्वारे बालकाला मदत मिळवून देऊ शकतात. त्यामुळे 1098 या टोल फ्री क्रमांकावर कॉल करुन संकटग्रस्त बालकांना मदत करावी, असे आवाहन डॉ. प्रशांत नारनवरे, आयुक्त, महिला व बालविकास, महाराष्ट्र राज्य यांनी केले आहे. ***********

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत तात्काळ नियुक्त्या देऊन युवा कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन द्यावी - जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

हिंगोली (जिमाका), दि. 22 : ऑनलाईन पोर्टलवर नोंदणी केलेल्या, 18 ते 35 वयोमर्यादा असलेल्या तसेच आवश्यक किमान शैक्षणिक पात्रता धारण करणाऱ्या पात्र उमेदवारांना मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत त्यांना तात्काळ नियुक्त्या देऊन युवा कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सर्व नियुक्ती अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर शासकीय कार्यालयात काम करण्याच्या संधीसोबत मानधन देण्यासाठी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा आज जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. परदेशी बोलत होते. जिल्ह्यातील सर्व शासकीय कार्यालयांनी कौशल्य विकास विभागाकडून पात्र इच्छूक उमेदवारांची यादी उपलब्ध करुन घ्यावी. त्या पात्र उमेदवारांना दूरध्वनी करुन बोलावून घ्यावे. त्यांच्या कागदपत्राची तपासणी करुन जास्तीत जास्त युवकांना युवा कार्य प्रशिक्षणाची संधी उपलब्ध करुन देण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात व त्यांना रुजू करुन घ्यावेत. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठविण्याचे निर्देशही सर्व नियुक्ती अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली असून, या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा मुख्य हेतू आहे. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये काम करण्याच्या संधीसोबत कार्य प्रशिक्षण मानधन देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करणे अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. या आढावा बैठकीस निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, संदीप सोनटक्के, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके यांच्यासह विविध विभागातील अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय अधिकारी, सर्व तहसीलदार, सर्व गटविकास अधिकारी, नगर परिषदेचे मुख्याधिकारी दूरदृष्यप्रणालीव्दारे ऑनलाईन उपस्थित होते. *****

21 August, 2024

राज्यातील कुशल मनुष्यबळाला जर्मनीत नोकरीची संधी

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या राज्यास महाराष्ट्रातील विविध क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरविण्यासाठी 25 फेब्रुवारी 2024 रोजी महाराष्ट्र शासनामार्फत सामंजस्य करार करण्यात आला आहे. यामुळे जर्मनीत नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. यानुसार राज्यातील 10 हजार कुशल मनुष्यबळ टप्याटप्याने पुरविले जाणार आहे. आरोग्य विभागातील परिचारिका, वैद्यकीय सहायक, रेडीओलॉजी सहायक, केअर टेकर, कौशल्य विकास विभागातील सेवक, वेटर, स्वागत, कक्ष संचालक, स्वयंपाकी, हॉटेल व्यवस्थापक, तंत्रशिक्षण विभागातील इलेक्ट्रीशिअन, औष्णिक वीज तंत्री, गवंडी कामगार, प्लंबर, वाहनचालक, सुरक्षा रक्षक, पॅकर्स व मुवर्स अशा वेगवेगळ्या 30 क्षेत्रातील कुशल मनुष्यबळ पुरवायचे आहे. याकरिता गोथे संस्थेच्या मार्फत ऑनलाइन व ऑफलाईन स्वरुपात जर्मन भाषा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. हे प्रशिक्षण वर्ग जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, गणेशवाडी, हिंगोली या ठिकाणी प्रशिक्षणार्थीच्या सोयीनुसार सकाळ व संध्याकाळ सत्रात आयोजित केले जाणार आहेत. प्रत्येक वर्गात 25 प्रशिक्षणार्थी असतील. या जर्मन भाषा प्रशिक्षणासाठी डॉ. माणिक जाधव, अधिव्याख्याता, जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था, हिंगोली हे समन्वयाचे काम करणार आहेत. जर्मन भाषा वर्गाचे प्रशिक्षण पूर्ण झाल्यानंतर प्रशिक्षाणार्थीना त्यांच्या कामाच्या स्वरूपानुसार A1, A2, B1, B2 या स्तराच्या परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक आहे. या प्रशिक्षणाचा खर्च शासन करणार आहे. त्यानंतर गरज लागली तर संबधित क्षेत्रातील तांत्रिक कौशल्य प्रशिक्षण सुद्धा देण्यात येणार आहे. या प्रकल्पाच्या प्रभावी अंमलबजावणीसाठी जिल्हास्तरीय समिती गठीत करण्यात आली आहे. या समितीचे मुख्य समन्वयक म्हणून डायटचे प्राचार्य काम पाहणार आहेत. या संदर्भात दि. 11 जुलै 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. जर्मन भाषा शिकून जर्मनीत नोकरी करण्यास इच्छुक असलेल्या कौशल्य प्राप्त व्यक्तींनी पुढील लिंकवर नावनोंदणी करावी. https://www.maa.ac.in/GermanyEmployment/ तसेच जर्मन भाषा शिकविणाऱ्या तज्ञ व्यक्तींचे प्रमाण वाढण्यासाठी स्थानिक स्वराज्य संस्था आणि अनुदानित शिक्षकांना जर्मन भाषा प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील ज्या शिक्षकांना जर्मन भाषा शिकायची आहे त्यानी https://forms.gle/1Q32ByNwp9MnHmHe7 या लिंकवर नाव नोंदणी करावी, असे आवाहन डायटचे प्राचार्य डॉ. दीपक साबळे यांनी केले आहे. *****

इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे उमरा येथे तालुकास्तरीय मेळावा

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यात 15 ते 31 ऑगस्टदरम्यान इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची सुरुवात दि. 15 ऑगस्ट, 2024 रोजी सामाजिक न्याय भवन हिंगोली येथे तालुकास्तरीय मेळाव्याने झाली आहे . या उपक्रमाचा भाग म्हणून दि. 20 ऑगस्ट, 2024 रोजी कळमनुरी तालुक्यातील उमरा येथील उगम ग्रामीण विकास संस्थेमध्ये तालुकास्तरीय मेळावा घेण्यात आला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी उपविभागीय अधिकारी प्रतिक्षा भुते या होत्या. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू येडके, उमरा येथील उगम ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, श्रीमती सुशिला पाईकराव उपस्थित होत्या. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत वारंगा फाटा येथील वसंतराव नाईक आश्रमशाळेचे मुख्याध्यापक ब्रम्हानंद गिरी यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत आयोजित तालुकास्तरीय मेळाव्याचे महत्त्व विशद केले. यावेळी समाज कल्याण अधिकारी राजू एडके व उगम संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच निरीक्षक मनीष राजूलवार यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली, वसंतराव नाईक महामंडळाचे ज्ञानेश्वर धुळे यांनी वसंतराव नाईक महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती दिली. अनिल फुले यांनी ओबीसी महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती दिली. या मेळाव्याची सुरुवात महामानवांच्या प्रतिमा आणि वसुंधरा पूजनाने करण्यात आली. तसेच वसंतराव नाईक माध्यमिक आश्रमशाळेतील कु.संजीवनी राठोड, कु. राजश्री राठोड, कु. भूमिका पवार, कु. अनुष्का कदम या विद्यार्थिनींनी स्वागत गीत सादर केले. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळू पवार व श्रीकांत पतंगे यांनी केले तर आभार प्रदर्शन बाळू पवार यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी निरीक्षक मनिष राजूलवार, वरिष्ठ लिपिक श्री.वाकळे, ग्रंथपाल बाळू पवार, रविकुमार बोक्से तसेच उगम ग्रामीण विकास संस्थेचे सर्व कर्मचारी वृंद यांनी प्रयत्न केले. *****

'मंकी पॉक्स'ला आळा घालण्यासाठी आरोग्य विभागाची प्रतिबंध सर्वेक्षण मोहीम

हिंगोली (जिमाका), दि. 21 : सध्या विविध देशात मंकी पॉक्स या विषाणूजन्य आजाराचा संसर्ग वाढत आहे. केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालय दिल्ली यांनी संसर्गाचा वेग व तीव्रता कमी करण्याच्या अनुषंगाने वेळीच प्रतिबंध सर्वेक्षण नियंत्रणाबाबत उपाययोजना करण्याच्या सूचना आरोग्य विभागांना दिल्या आहेत. जगात आजघडीला मंकी पॉक्सचा संसर्ग वाढला आहे. देशात तो संसर्ग वाढू नये म्हणून केंद्रीय आरोग्य व कुटूंब कल्याण मंत्रालयाच्या वतीने विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. या आजाराला प्रतिबंध करण्यासाठी आरोग्य विभागाला सूचना देत त्याची अंमलबजावणी तात्काळ जिल्हास्तरावर करण्यासाठी आरोग्य विभाग दक्ष आहे. त्यासाठी जिल्ह्यात आरोग्य विभागाच्या वतीने प्रतिबंध सर्वेक्षण मोहीम राबविण्यात येणार असून या आजाराविषयी नागरिकांमध्ये जनजागृतीसह विविध उपाययोजना करण्यात येणार आहेत, अशी माहिती आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. मंकी पॉक्स म्हणजे काय ? मंकी पॉक्स हा आजार ऑर्थोपॉक्स आर या डीएनए प्रकारच्या विषाणूमुळे होतो. काही प्रकारचे खारी आणि उंदरांमध्ये हा विषाणू आढळतो. हे प्राणी या विषाणूचे नैसर्गिक स्त्रोत आहेत. साधारणत: अंगावर पुरळ उमटण्यापूर्वी एक ते दोन दिवसांपासून ते त्वचेवरील फोडावरील खपल्या पडेपर्यंत किंवा ते पूर्णपणे मावळेपर्यंत बाधित रुग्ण इतर व्यक्तीसाठी संसर्गजन्य असतो. जर खूप वेळ बाधित व्यक्तीचा संपर्क आला तर श्वसन मार्गातून बाहेर पडणाऱ्या मोठ्या थेंबावाटे मंकी पॉक्स होऊ शकतो. मंकी पॉक्स आजाराची लक्षणे मागील तीन आठवड्यात मंकी पॉक्स बाधित देशांमध्ये प्रवास करून राज्यात आलेल्या व्यक्तीच्या शरीरावर अचानक पुरळ उठणे आणि सुजलेल्या लसिका ग्रंथी, ताप, डोकेदुखी, अंगदुखी, प्रचंड थकवा अशी लक्षणे दिसून येतात, मंकी पॉक्स न होण्यासाठी घ्यावयाची काळजी मंकी पॉक्स टाळण्यासाठी जनजागृती आवश्यक आहे. मंकी पॉक्स प्रसार रोखण्यासाठी नागरिकांनी काळजी घेणे आवश्यक आहे. निकट सहवासितांचा शोध घेणे व आढळल्यास त्याची योग्य प्रकारे निगा राखणे, संशयित मंकी पॉक्स रुग्णास वेळीच विलगीकरण करणे. रुग्णांच्या कपड्यांची अथवा अंथरुणा पांघरुणाशी संपर्क येऊ न देणे, हातांची स्वच्छता ठेवणे, आरोग्य संस्थेमध्ये मंकी पॉक्स रुग्णाशी उपचार करताना पीपीई किट्सचा वापर करणे, निकट सहवासीतामध्ये 21 दिवस पाठपुरावा करून रुग्णास ताप आल्यास प्रयोगशाळेत तपासणी करून घ्यावी, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ कैलास शेळके यांनी केले आहे. ******

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून 97 जणांची निवड

हिंगोली (जिमाका), दि. 21 : राज्यातील युवकांना त्यांच्या शिक्षणानंतर प्रत्यक्ष कामाचे प्रशिक्षण देऊन नोकरी मिळण्याची त्यांची क्षमता वाढविण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरु केली आहे. या योजनेअंतर्गत हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत 2 हजार 810 उमेदवारांनी ऑनलाईन नोंदणी केली आहे. तर 93 आस्थापनांनी 1 हजार 373 पदे अधिसूचित केलेली आहेत. आतापर्यंत 97 उमेदवारांना नियुक्ती पत्र दिले असून ते प्रत्यक्ष रुजू झाले आहेत. तसेच पदे अधिसूचित करण्याची व निवडीची प्रक्रिया सुरु आहे. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून उद्योजक, खासगी क्षेत्रातील आस्थापना, सेवा क्षेत्र, केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय तथा निमशासकीय आस्थापनांना मनुष्यबळ मिळणार आहे. यासाठी इयत्ता बारावी पास प्रशिक्षणार्थींना 6 हजार रुपये, आयटीआय, पदविकाधारक प्रशिक्षणार्थींना 8 हजार रुपये आणि पदवीधर, पदव्युत्तर प्रशिक्षणार्थींना 10 हजार रुपये प्रतिमाह विद्यावेतन मिळणार आहे. शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग आणि मुख्यमंत्री जनकल्याण कक्ष यांच्यामार्फत संयुक्तपणे ‘मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना’ राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत खाजगी क्षेत्रातील आस्थापना, उद्योजकाकडे एकूण कार्यरत मनुष्यबळाच्या 10 टक्के व सेवा क्षेत्रासाठी 20 टक्के इतके उमेदवार कार्य प्रशिक्षणसाठी घेता येतील. केंद्र व राज्य शासनाच्या शासकीय, निमशासकीय आस्थापना, उद्योग, महामंडळ यामध्ये मंजूर पदाच्या 5 टक्के किंवा किमान एक उमेदवार कार्य प्रशिक्षणासाठी घेता येतील. लघु आणि मध्यम व मोठे उद्योग, शासकीय, निमशासकीय आस्थापना, महामंडळ, आणि विविध आस्थापना यांना आवश्यक असलेल्या मनुष्यबळाची मागणी https://rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने नोंदवावी. किमान 20 रोजगार देणाऱ्या आस्थापना या कार्यप्रशिक्षणामध्ये सहभागी होण्यासाठी पात्र असतील. या कार्य प्रशिक्षण योजनेंतर्गत प्रशिक्षणार्थींना त्यांच्या शैक्षणिक अर्हतेप्रमाणे विभागामार्फत विद्यावेतन दिले जाईल. या योजनेचा लाभ घेण्यासाठी इच्छुक उमेदवारांनी वरील वेबपोर्टलला भेट देऊन योजनेमध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन जिल्हा कौशल्य विकास व उद्योजकता विकास केंद्राचे सहाय्यक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे यांनी केले आहे. *******

मुख्यमंत्री-माझी लाडकी बहीण योजनेत 2 लाख 65 हजार 950 महिलांचे अर्ज प्राप्त

हिंगोली (जिमाका), दि. 21 : राज्य शासनाच्या ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ या महत्त्वाकांक्षी योजनेसाठी हिंगोली जिल्ह्यात आतापर्यंत एकूण 2 लाख 65 हजार 950 पात्र लाभार्थी महिलांनी अर्ज भरले असल्याची माहिती जिल्हा महिला व बालविकास अधिकारी आर. आर. मगर यांनी दिली आहे. जिल्ह्यात दि. 21 ऑगस्ट, 2024 पर्यंत ॲपवर 1 लाख 79 हजार 208 अर्ज व पोर्टलवर 86 हजार 742 अर्ज प्राप्त झाले आहेत. ॲपवर प्राप्त झालेल्या 1 लाख 79 हजार 208 प्राप्त अर्जापैकी 1 लाख 77 हजार 241 अर्ज मंजूर करण्यात आले असून 1403 अर्ज तात्पुरत्या स्वरुपात रद्द करण्यात आलेल्या आहेत. मंजूर अर्जाची टक्केवारी 98.9 अशी आहे. तर पोर्टलवर प्राप्त झालेल्या 86 हजार 742 अर्जापैकी 3 अर्ज मंजूर करण्यात आले आहेत, तर 25 हजार 501 अर्ज तात्पुरते मंजूर करण्यात आले आहेत. उर्वरित अर्जाची छाननी करुन मंजुरी देण्याचे काम सुरु आहे. ग्रामीण भागातील जास्तीत जास्त पात्र महिला लाभार्थ्यांनी या योजनेचा लाभ घेण्यासाठी जिल्हा परिषदेच्या महिला व बालकल्याण विभागाच्या वतीने जिल्ह्यातील सर्व बाल विकास प्रकल्प अधिकारी, पर्यवेक्षिका, अंगणवाडी सेविका यांच्याशी संपर्क साधून अर्ज भरावेत. "मुख्यमंत्री - माझी लाडकी बहीण" योजनेंतर्गत महिला लाभार्थ्यांचे अर्ज भरण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यासाठी www.ladkibahin.maharashtra.gov.in हे संकेतस्थळ दि.1 ऑगस्ट पासून सुरु करण्यात आले आहे, ज्या लाभार्थ्यांनी "नारी शक्ती दूत" ॲपवर अर्ज भरले आहेत त्यांना पुन्हा या पोर्टलवर अर्ज भरण्याची गरज नाही. ज्या पात्र इच्छुक महिला लाभार्थांनी अद्याप अर्ज भरलेले नाहीत त्यांनी www.ladkibahin.maharashtra.gov.in या संकेतस्थळावर जाऊन आपले अर्ज भरावेत, असे आवाहनही जिल्हा महिला व बालविकास अधिकारी श्री. मगर यांनी केले आहे. *******

होमगार्ड अनुशेष पूर्ण करण्यासाठी आजपासून नोंदणी सुरु

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यातील रिक्त होमगार्ड अनुशेष पूर्ण करण्यासाठी दि. 22 व 23 ऑगस्ट, 2024 रोजी होमगार्ड नोंदणीचे आयोजन करण्यात आले आहे. त्याचा तपशील पुढीलप्रमाणे आहे. दि. 22 ऑगस्ट, 2024 रोजी नाव नोंदणी अर्ज क्रमांक 6 ते 9448 मधील सर्व 1135 महिला व दि. 16 ऑगस्ट, 2024 रोजी रद्द केलेल्या नाव नोंदणीपैकी 01 ते 555 अर्ज क्रमांकाच्या 500 पुरुष उमेदवारांना होमगार्ड नोंदणीसाठी बोलाविण्यात येत आहे. तर दि. 23 ऑगस्ट, 2024 रोजी 7947 ते 9455 अर्ज क्रमांकाचे पुरुष उमेदवार व दि. 16 ऑगस्ट, 2024 रोजी रद्द केलेल्या नाव नोंदणी पैकी 556 ते 1106 अर्ज क्रमांकाच्या अशा एकूण 1870 पुरुष उमेदवारांना होमगार्ड नोंदणीसाठी बोलाविण्यात आले आहे. सर्व संबंधित उमेदवारांनी वरील दिलेल्या तारखेस उपस्थित राहून होमगार्ड नोंदणी करुन घ्यावी, असे आवाहन अर्चना पाटील, जिल्हा समादेशक होमगार्ड तथा अपर पोलीस अधीक्षक, हिंगोली यांनी प्रसिध्दीपत्रकाद्वारे केले आहे. ******

इतर मागास बहुजन कल्याण विभागातर्फे तालुकास्तरीय मेळाव्याला सुरुवात

हिंगोली (जिमाका), दि. 21 : जिल्ह्यात 15 ऑगस्ट ते 31 ऑगस्ट, 2024 या कालावधीत इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत तालुकास्तरीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्याची सुरुवात दि. 15 ऑगस्ट, 2024 रोजी झाली . या कार्यक्रमाची सुरुवात दिपप्रज्वलन व स्वागत गिताने करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जिल्हा जात पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश सोनावणे हे होते. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषदेचे जिल्हा समाज कल्याण अधिकारी राजू येडके, उमरा येथील उगम ग्रामीण विकास संस्थेचे अध्यक्ष जयाजी पाईकराव, सामाजिक कार्यकर्ता विशाल इंगोले, आत्माराम बोधीकर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रस्तावनेत इतर मागास बहुजन कल्याण विभागाचे सहाय्यक संचालक यादव गायकवाड यांनी समाज कल्याण विभागातून इतर मागास बहुजन कल्याण विभाग वेगळा झालेला असून समाज कल्याण विभागाच्या धरतीवर इतर मागास बहुजन कल्याणतर्फे विविध योजना राबविल्या जातात त्या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले. यावेळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्करार्थी विजय निलावार यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. तसेच निरीक्षक बालाजी टेंभुर्णे यांनी इतर मागास बहुजन कल्याण विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची माहिती दिली, वसंतराव नाईक महामंडळाचे प्रादेशिक व्यवस्थापक पी. एम. झोंबाडे यांनी वसंतराव नाईक महामंडळामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती दिली. श्री.अनिल फुले यांनी ओबीसी महामंडळातर्फे राबविण्यात येणाऱ्या विविध योजनेची माहिती दिली. या कार्यक्रमात पीएसआयपदी निवड झालेल्या महेश आत्माराम बोथीकर या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमाचे सुत्रसंचालन बाळू पवार तर आभार प्रदर्शन सुरेश पठाडे यांनी केले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठो कार्यालयातील कर्मचारी निरीक्षक मनिष राजूलवार, निरीक्षक बालाजी टेंभुर्णे, वरिष्ठ लिपिक श्री.वाकळे, ग्रंथपाल बाळू पवार, श्रध्दा तडकसे, रविकुमार बोक्से, उखा मुरकुटे, जयदीप देशपांडे, पंचशील कुऱ्हाडे, प्रतिक सरनाईक व इतर कर्मचाऱ्यांनी प्रयत्न केले. *****

20 August, 2024

‘अमृत’च्या लक्षित गटातील युवकांना MKCLमार्फत संगणक कौशल्य विकास प्रशिक्षणाची सुवर्णसंधी

हिंगोली (जिमाका), दि. 20 : महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील युवकांना कोणताही विभाग /संस्था अथवा महामंडळ यांचेमार्फत लाभ मिळत नाही अशा युवकांना संगणक कौशल्यात विकसित व प्रशिक्षित बनण्यासाठी आवश्यक कौशल्य, ज्ञान आणि पाठबळ देऊन त्यांना सक्षम करणे आणि उद्योगाभिमुख रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून स्वावलंबनाला चालना देणे हे या योजनेचे उद्दिष्ट आहे. त्या अनुषंगाने दिनांक 16 ऑगस्ट 2024 रोजी ‘अमृत’ आणि MKCL यांच्यामध्ये महत्त्वपूर्ण सामंजस्य करार करण्यात आला. या कराराअंतर्गत MKCL मार्फत राबविण्यात येणाऱ्या काही निवडक प्रशिक्षणासाठी प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याना निवड झाल्यावर लाभ देण्यात येईल. ‘अमृत’तर्फे प्रशिक्षणासाठी निवड झालेल्या युवकांना MKCL च्या नियमानुसार सुरुवातीस सुरक्षा शुल्क स्वतः भरावयाचे आहे. योजनेच्या पात्र लाभार्थीनी प्रशिक्षण पूर्ण केल्यावर त्या प्रशिक्षणाचे शैक्षणिक शुल्क अमृत संस्थेमार्फत MKCL संस्थेस परस्पर दिले जाईल. यासंबंधी सर्व माहिती अमृतच्या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात येईल. या सामंजस्य कराराच्या वेळी MKCL च्या व्यवस्थापकीय संचालक श्रीमती वीणा कामत, संयुक्त व्यवस्थापकीय संचालक समिर पांडे, वरिष्ठ महाव्यवस्थापक अमित रानडे, उपमहाव्यवस्थापक डॉ. पाटेकर आणि अमृतचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी, विशेष कार्यकारी अधिकारी उदय लोकापल्ली तसेच मुख्य लेखा व वित्त अधिकारी महेश वाघचौरे उपस्थित होते. अमृतच्या लक्षित गटातील जास्तीत जास्त तरुणांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन निबंधक, महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), पुणे यांनी केले आहे . *******

डायलेसिस विभागातील आदर्श रुग्ण, किडनी दानशूर, अधिकारी व कर्मचारी यांचा स्वातंत्र्य दिनी प्रशस्तीपत्र देऊन गौरव

हिंगोली (जिमाका), दि. 20 : जिल्हा रुग्णालयातील डायलेसिस विभागात दिल्या जाणाऱ्या शासकीय सेवा सुबिधा व उपचाराबाबत लोकांमध्ये, जनतेमध्ये, किडनी आजाराबाबत व किडनी प्रत्यारोपण बाबत, किडनी अवयव दानाबाबत व डायलेसिस उपचाराबाबत जनमानसात जनजागृती व्हावी व माहिती व्हावी तसेच रुग्णालयाची प्रतिमा उंचावण्यासाठी व रुग्णांचे मनोवल वाढवण्यासाठी व प्रोत्साहन देण्यासाठी आदर्श रुग्ण, आदर्श किडनी दानशूर यांचा सत्कार तसेच डायलेसिस विभागातील अधिकारी व कर्मचारी यांचा मागील 10 वर्षात उत्कृष्ट व उल्लेखनीय कार्य केल्याबद्दल जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी , पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार या सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते आदर्श रुग्ण विजय विश्वनाथ गीते, आदर्श किडनी दानशूर श्रीमती सोनाली बालाजी मस्के, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.नितीन तडस, अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे, किडनी विकार तज्ञ डॉ. संतोष दुरुगकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. तुकाराम आउलवार, इन्चार्ज सिस्टर श्रीमती बिना जॉर्ज, डायलेसिस सायंटिफिक ऑफिसर एजाजखान पठाण, अरविंद कदम, संतोष गिरी, स्टाफ नर्स श्रीमती जिजा रुंजे, श्रीमती प्रिती काकडे, कक्षसेवक कैलास गवळी, सफाई कामगार देविदास वाव्हळ यांचा स्वातंत्र्य दिनी प्रशस्तीपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरविण्यात आले. हिंगोली येथील जिल्हा रुग्णालयात दि. 2 जानेवारी, 2014 रोजी डायलेसिस विभाग कार्यान्वित झाले आहे. या विभागात एकूण चार डायलेसिस मशीन कार्यान्वित आहेत. मागील 10 वर्षात 31 जुलै 2024 पर्यंत एकूण 19 हजार 13 रुग्णांवर डायलेसिस उपचार करण्यात आले. या विभागात आदर्श रुग्ण विजय विश्वनाथ गिते वय 31 वर्ष रा. अंजनवाडी ता. औंढा येथील असून हा रुग्ण जिल्हा रुग्णालय येथे जून 2015 पासून आजपावेतो मागील वर्षभरापासून नियमित डायलेसिस उपचार घेत आहेत. तसेच एक किडनी प्रत्यारोपण रुग्ण बालाजी सटवाराव मस्के वय 37 वर्ष रा. हनकदरी ता.सेनगाव येथील रुग्णांचे ऑगस्ट 2021 ला जिल्हा रुग्णालय येथे डायलेसिस उपचार सुरु झाले. या रुग्णाच्या पत्नीस व रुग्णाला डायलेसिस विभागातर्फे किडनी प्रत्यारोपण करण्याबाबत सल्ला देऊन रुग्णाच्या पत्नी श्रीमती सोनाली मस्के यांना किडनी दान करण्यासाठी प्रवृत्त केले. या रुग्णाचे के.ई.एम. शासकीय रुग्णालय मुंबई येथे गतवर्षी यशस्वी किडनी प्रत्यारोपण झाले. सध्या पती व पत्नी निरोगी जीवन जगत आहेत. डायलेसिस विभागात उपलब्ध सुविधा डायलेसिस विभाग जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. नितीन तडस व अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. दीपक मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली व देखरेखीमध्ये चालते. डायलेसिस विभाग जिल्हा रुग्णालय येथे सर्व शासकीय सेवा सुविधा मोफत दिल्या जातात. डायलेसिस विभागातील अधिकारी व कर्मचारी हे अनुभवी व प्रशिक्षित असून सर्व सेवाभावाने कामे करतात व तत्पर आरोग्य सेवा देतात. सर्व डायलेसीस रुग्णांना मोफत तपासणी, रक्त चाचण्या, एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्कॅन, ई.सी. जी. रक्त पुरवठा, आय.सी.यु, व लसीकरण केले जाते. तसेच जिल्हा परिषद अंतर्गत दुर्धर आजाराच्या प्रत्येक रुग्णाला 10 हजार रुपये एक वेळ शासकीय अनुदान, संजय गांधी निराधार योजना लाभ, एस.टी. बस. मोफत प्रवास, आयुष्यमान भारत योजना, महात्मा जोतीबा फुले जन आरोग्य योजना, प्रधानमंत्री नँशनल डायलेसीस प्रोग्राम योजना इत्यादी योजनेअंतर्गत रुग्णांना सर्व सेवा सुविधा दिल्या जातात. आतापर्यंत डायलेसीस रुग्णांच्या उपचाराचे अंदाजे 6 ते 7 कोटी रुपये शासनाकडून वाचविण्यात आले. सर्व रुग्णांना चहा, नाश्ता, जेवण, शुद्ध पिण्याचे पाणी, वातानुकुलीत सुसज्ज डायलेसिस सेवा दिल्या जातात. ******

महा-आयटीमार्फत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध, शेतकरी बांधवांनी आधार प्रमाणिकरण करुन घेण्याचे आवाहन

हिंगोली (जिमाका), दि. 20 : महात्मा ज्योतीराव फुले शेतकरी कर्जमुक्ती योजना-2019 अंतर्गत प्रोत्साहनपर लाभ योजनेंतर्गत लाभासाठी पात्र ठरलेल्या (विशिष्ट क्रमांक देण्यात आलेल्या) परंतु आधार प्रमाणिकरण न झालेल्या शेतकऱ्यांसाठी दि. 12 ऑगस्ट ते दि.7 सप्टेंबर, 2024 पर्यंत महा-आयटीमार्फत आधार प्रमाणिकरणाची सुविधा उपलब्ध करुन दिली आहे. यात हिंगोली जिल्ह्यातील 251 शेतकऱ्यांचा समावेश आहे. वरील कालावधीत संबंधित 251 शेतकरी बांधवानी आपले आधार प्रमाणिकरण करुन घ्यावे, असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, हिंगोली यानी केले आहे. *******

जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिवस साजरा

हिंगोली (जिमाका), दि. 20 : भारताचे माजी पंतप्रधान स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात सद्भावना दिन साजरा करुन त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषाविषयक भेद न करता सर्वांनी सामंजस्याने कार्य करावे आणि अहिंसा व संविधानाच्या मार्गाने मतभेद सोडविण्याचा प्रयत्न करण्यासंदर्भातील सदभावना दिवसाची प्रतिज्ञा उपजिल्हाधिकारी (सामान्य) अनिल माचेवाड यांनी उपस्थित अधिकारी, कर्मचारी यांना दिली. यावेळी जिल्हा सूचना व विज्ञान अधिकारी बारी सिध्दीकी, नायब तहसीलदार डी. एस. जोशी, संतोष बोथीकर तसेच जिल्हाधिकारी कार्यालय व प्रशासकीय इमारतीतील अधिकारी, कर्मचारी यांनी सामुहिक प्रतिज्ञा घेतली. ******

19 August, 2024

जर्मनीच्या क्षितिजावर मराठी युवकांना रोजगाराच्या संधी • युवकांना जर्मन भाषा शिकण्याची सुवर्णसंधी

हिंगोली, दि. 19 (जिमाका): महाराष्ट्र राज्यातील युवकांना युरोपियन देशांमध्ये नोकरी व रोजगाराच्या संधी उपलब्ध आहेत, ही बाब विचारात घेऊन राज्य शासनाने जर्मनीतील बाडेन बुटेनबर्ग या राज्याशी कुशल मनुष्यबळ प्रशिक्षित करून उपलब्ध करून देण्याबाबत नुकताच सामंजस्य करार केला आहे. त्यामुळे जर्मन भाषा शिकण्यासोबतच जर्मनीमध्ये काम करण्याची संधी उपलब्ध होत आहे. या सुवर्णसंधीचा लाभ राज्यातील जास्तीत जास्त युवक-युवतीने घेण्याचे आवाहन जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्थेचे प्राचार्य डॉ. दीपक साबळे यांनी केले आहे. या कामकाजाची दिशा ठरविण्यासाठी दि. 11 जुलै, 2024 रोजी शासन निर्णय निर्गमित करण्यात आला असून, या अनुषंगाने जर्मन भाषा शिकविण्यासाठी ग्योथे इन्स्टिट्यूट, मॅक्सम्युलर भवन, पुणे व राज्य शैक्षणिक संशोधन व प्रशिक्षण परिषद, महाराष्ट्र, पुणे यांच्यात नुकताच सामंजस्य करार करण्यात आला आहे. यानुसार महाराष्ट्र राज्य व जर्मनीचे वाटेन-बूटेनवर्ग राज्य यांच्यामधील सामंजस्य करारानुसार जिल्हा स्तरावर शिक्षक व कुशल युवकांसाठी प्रशिक्षण वर्ग सुरु करण्यात येणार आहेत. देशातील ही पहिली आणि ऐतिहासिक योजना असून, राज्यातील कुशल-अकुशल बेरोजगार युवक-युवतींना जर्मनी येथे रोजगारासाठी अधिकृतरित्या पाठविण्यासाठीची राज्य शासनाची योजना आहे. युवक-युवतींना आपल्याच जिल्ह्यात मोफत्त व जवळच जर्मन भाषेचे प्रशिक्षण मिळणार आहे. तसेच आवश्यक कौशल्य सुधारणेचे निवासी आणि मोफत प्रशिक्षण देण्यात येणार आहे. जर्मनी येथे नोकरी मिळवण्यासाठी महाराष्ट्रातच निवड प्रक्रिया व नोकरीच्या नियुक्तीचे वाटप, व्हिसा आणि पासपोर्टसाठी संपूर्ण मार्गदर्शन करण्यात येणार आहे. जर्मनी येथील सुरुवातीच्या काळातील आवश्यक मदतही महाराष्ट्र शासन करणार आहे. त्यामुळे जास्तीत जास्त युवकांनी सहभागी होऊन कौशल्य विकसित करून राज्याला आंतरराष्ट्रीय स्तरावर झळकवता येणार आहे. रोजगाराच्या संधीतून स्वतः, कुटुंब आणि समाजाची प्रगती करण्याची ही संधी शासनाने उपलब्ध करून दिली आहे. यामध्ये आरोग्य सेवांमधील तंत्रज्ञ, परिचारिका (रुग्णालय), वैद्यकीय सहाय्यक (एमएफए), प्रयोगशाळा, रेडियोलॉजी, दंतशल्य सहाय्यक, आजारी व वृद्ध व्यक्तींसाठी शुश्रूषा सेवक, फिजिओथेरपीस्ट, दस्तऐवजीकरण आणि संकेतीकरण, तृतीय पक्ष प्रशासन, लेखा व प्रशासन, आतिथ्य सेवांमधील तंत्रज्ञ, वेटर्स / सर्व्हर्स, स्वागत कक्ष संचालक, रिसेप्शनिस्ट आचारी, हॉटेल व्यवस्थापक, लेखापाल, हाऊसकीपर, क्लीनर, स्थापत्य सेवांमधील तंत्रज्ञ, विद्युततंत्री (इलेक्ट्रीशियन), नविनीकरण उर्जेमधील विशेष विद्युततंत्री (रिन्यूएबल एनर्जी, सोलर इ.), औष्णिक विजतंत्री (हिटिंग तंत्रज्ञ), रंगारी, सुतार, वीट, फरशीकरिता गवंडी, प्लंबर्स, नळ जोडारी, वाहनांची दुरुस्ती करणारे (हलकी व जड वाहने), विविध तंत्रज्ञ, वाहन चालक (बस, ट्राम, ट्रेन, ट्रक), सुरक्षा रक्षक टपाल सेवा वितरक, सामान बांधणी व वाहतूक करणारे (पॅकर्स व मुव्हर्स), विमानतळावरील सहाय्यक, स्वच्छताकर्मी, सामान हाताळणारे, हाऊसकीपर विक्री सहाय्यक गोदाम सहाय्यक पदांचा यामध्ये समावेश आहे. जर्मन भाषा शिकण्याबाबतच्या अधिक माहितीसाठी आणि या योजनेचा लाभ घेण्यासाठी क्यू आर कोड स्कॅन करून https://maa.ac.in/GermanyEmployme. या योजनेत सहभागी होता येणार आहे, असे प्राचार्य डॉ. साबळे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे. ******

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत दोन दिवसात नियुक्त्या द्या - जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

हिंगोली, दि. 19 (जिमाका) : मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यातील स्थानिक युवकांना प्राधान्य देत उर्वरित सर्व नियुक्त्या दोन दिवसात द्याव्यात, असे निर्देश जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सर्व नियुक्ती अधिकाऱ्यांना दिले आहेत. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेतून जिल्ह्यातील बेरोजगार युवकांना स्थानिक पातळीवर शासकीय कार्यालयात काम करण्याच्या संधीसोबत मानधन देण्यासाठी योजना सुरु करण्यात आली आहे. या योजनेचा आज जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी जिल्हाधिकारी कार्यालयातून दूरदृष्यप्रणालीव्दारे आढावा घेतला. त्यावेळी जिल्हाधिकारी श्री. परदेशी बोलत होते. मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेत जिल्ह्यातील स्थानिक युवकांना प्राधान्य देऊन त्यांना तात्काळ नियुक्त्या देण्यात याव्यात. तसेच केलेल्या कार्यवाहीचा अहवाल पाठविण्याचे निर्देशही सर्व नियुक्ती अधिकाऱ्यांना दिले आहेत. राज्य शासनाने मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सुरू केली असून, या योजनेच्या माध्यमातून जास्तीत जास्त बेरोजगार युवक-युवतींना स्थानिक पातळीवर रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्याचा मुख्य हेतू आहे. तसेच शासकीय कार्यालयांमध्ये काम करण्याच्या संधीसोबत कार्य प्रशिक्षण मानधन देण्यात येणार आहे, असे त्यांनी सांगितले. त्यासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता विभागाच्या संकेतस्थळावर नावनोंदणी करणे अनिवार्य आहे, असे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. या आढावा बैठकीस मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, उप मुख्य कार्यकारी अधिकारी अनंत कुंभार, सहायक आयुक्त डॉ. राजपाल कोल्हे, जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी राजाभाऊ मगर, शिक्षणाधिकारी प्रशांत दिग्रसकर, जिल्हा व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण अधिकारी वि. प्र. रांगणे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कैलाश शेळके आदी उपस्थित होते. *****

सर्व गरोदर महिलांची पहिल्या तिमाहीत एचआयव्हीसह सर्व तपासणी करावी - उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड

• त्रैमासिक आढावा बैठकीत दिल्या सूचना हिंगोली, दि. १९ (जिमाका) : जिल्ह्यातील सर्व गरोदर स्त्रियांची पहिल्या तिमाहीत नोंदणी व एचआयव्हीसह सर्व तपासण्या करून घ्याव्यात, अशा सूचना उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांनी दिल्या. आज येथील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात जिल्हा एड्स प्रतिबंध व नियंत्रण समितीची त्रैमासिक आढावा बैठक उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी नोडल अधिकारी डॉ. बालाजी भाकरे, वरिष्ठ वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश कोठूळे, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत बांगर, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रकाश जाधव, जिल्हा माहिती अधिकारी प्रभाकर बारहाते, कामगार विभागाचे प्रतिनिधी एन. एस. भिसे, जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी, नायब तहसीलदार एस. डी. बोथीकर, विहानच्या श्रीमती अलका रणवीर, सेतूचे इरफान कुरेशी, एचआयव्ही /टीबी पर्यवेक्षक रविंद्र घुगे, डापकुचे संजय पवार, आशिष पाटील, टीना कुंदनानी आदी अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. यावेळी जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी जिल्ह्यातील एचआयव्ही, एड्स कार्यक्रमाच्या कामाचा अहवाल सादर केला. हिंगोली जिल्ह्यात सन 2002 पासून आतापर्यंत एकूण 4 हजार 208 सामान्य गटातील रुग्णांची व 279 गरोदर स्त्रियांची नोंद झाली असून एकूण 3 हजार 863 रुग्णांची एआरटी केंद्रात नोंदणी झाली आहे. त्यापैकी 1946 रुग्णांना औषधोपचार सुरु आहेत. तसेच सन 2024-25 मध्ये एप्रिल ते जून, 2024 या तिमाहीत एकूण 10 हजार 610 व्यक्तींची तपासणी करण्यात आली. त्यामध्ये 28 एचआयव्ही संसर्गित आढळून आले आहेत. तर 9 हजार 002 गरोदर महिलांची तपासणी करण्यात आली होती. त्यापैकी एक नवीन व दोन यापूर्वीच एचआयव्ही संसर्गित रुग्ण असल्याचे आढळून आले आहे. तसेच एचआयव्ही संसर्गित महिलांच्या 4 मुलांचे 18 महिन्यानंतरचे तपासणी अहवाल संसर्गित आढळून आले नाहीत, अशी माहिती दिली. तसेच त्यांनी एचआयव्ही सहजीवन जगणाऱ्या व्यक्ती व देहविक्रय करणाऱ्या महिलांना इतर सामाजिक लाभाच्या बाल संगोपन, संजय गांधी निराधार योजना, राशन कार्ड, बस पास, घरकुल योजना, मतदान कार्ड, इत्यादी योजनांचा लाभ देण्यात येत असल्याची माहितीही त्यांनी दिली. एचआयव्ही बाधित इंडेक्स तपासणी विशेष अभियानात 597 जणांची तपासणी एचआयव्ही बाधित रुग्णांच्या जोडीदार, त्यांच्या कुटुंबातील मुले तसेच शारीरिक संबंध आलेल्या इतर संशयित व्यक्तीपर्यंत पोहोचून, त्यांची संमती घेऊन एचआयव्हीची तपासणी करण्याची विशेष इंडेक्स तपासणी मोहीम 15 एप्रिल ते 15 ऑक्टोबर, 2024 दरम्यान राबविण्यात आली. या अभियानात 1937 जणांना तपासणीबाबत कळविण्यात आले होते. त्यापैकी 597 जण तपासणीसाठी तयार झाले. यापैकी 14 जण बाधित आढळून आले असल्याचे जिल्हा कार्यक्रम अधिकारी ज्ञानेश्वर चौधरी यांनी सांगितले. ******

17 August, 2024

शासकीय यंत्रणांनी योग्य समन्वयातून सर्वसामान्य जनतेची कामे करावीत • मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांचे अधिकाऱ्यांना आवाहन

हिंगोली,दि.१७(जिमाका): जिल्ह्यातील सर्वसामान्य जनतेचा जिल्हा प्रशासनातील महसूल विभाग, ग्रामीण जनतेशी निगडीत असणारा जिल्हा परिषद आणि पोलीस प्रशासनावर प्रचंड विश्वास असून, या शासकीय यंत्रणांनी योग्य समन्वय राखून जनतेची कमीत कमी वेळेत प्राधान्याने कामे करावीत,असे आवाहन हिंगोलीचे मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना केले. जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांची नुकतीच धुळे येथे बदली झाली असून, जिल्हा प्रशासकीय यंत्रणेच्या वतीने त्यांचा शुक्रवार (दि.16) रोजी जिल्हा नियोजन समिती सभागृहात हृदय सत्कार आणि निरोप समारंभ आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी श्री. पापळकर बोलत होते. यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी तर प्रमुख पाहूणे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, नूतन जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्या सुविद्य पत्नी श्रीमती सुप्रिया पापळकर, निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक, उपजिल्हा निवडणूक अधिकारी रामेश्वर रोडगे, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव, सेवा सदनच्या संचालिका श्रीमती मिरा कदम यांची प्रामुख्याने व्यासपीठावर उपस्थिती होती. ग्रामीण भागातून येणारा नागरिक, शेतकरी, कष्टकरी, विद्यार्थी हा त्याचे काम होईलच, असा विश्वास ठेवून प्रचंड अपेक्षा घेऊन आलेला असतो. कारण त्याला त्याचा प्रश्न, अडचणी सोडवून घ्यायच्या असतात. मार्गदर्शन हवे असते. त्यामुळे त्याचे म्हणणे ऐकून घेतलेच पाहीजे. सर्वसामान्य नागरिकांचा जिल्हाधिकाऱ्याच्या खुर्चीवर विश्वास आजही कायम आहे. त्यामुळे त्यांच्या संवेदना, व्यथांमधून जिल्ह्यातील नेमकी परिस्थिती माहीत होते, असेही श्री. पापळकर यांनी सांगितले. आजही सर्वसामान्य नागरिकांचा जिल्हा यंत्रणेवर विश्वास कायम असल्याचे सांगताना प्रशासनात नवीन येणाऱ्या अधिकाऱ्यांनी काळानुरुप बदलत्या आव्हानांना सोबत घेत जनतेची कामे प्राधान्याने, चांगल्या पद्धतीने आणि कमीत कमी वेळेत अधिक कार्यक्षमतने यंत्रणा राबवून ती पूर्ण करावीत, अशा शब्दांत मावळते जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी मार्गदर्शन केले. जिल्हाधिकारी पदाची खुर्चीवर केवळ काटे, आणि खिळेच असतात असे नव्हे तर ती नवनवीन आव्हानांच्या स्फोटकांनी भरलेली असते. ऐनवेळी कोणती परिस्थिती उद्भवेल हे सांगता येत नाही, असे सांगून त्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकीर्दीवर प्रकाश टाकला. त्यामध्ये उपजिल्हाधिकारी, उपविभागीय अधिकारी, महसूल उपायुक्त, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी ते जिल्हाधिकारी पदी असताना आलेले विविध आव्हानात्मक अनुभव त्यांनी सांगितले. मराठवाड्यात काम करताना येथील आव्हानात्मक परिस्थिती, दुष्काळ, महापूर आदींचा सामना करावा लागतो. हिंगोली जिल्ह्यात काम करताना कुरुंदा गावातील सततच्या महापुराच्या आठवणी सांगताना वसमतचे उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ यांनीही सतत पाठपुरावा केल्याचे सांगत हा प्रश्न कायमचा मार्गी लागल्याचे त्यांनी समाधान व्यक्त केले. त्याशिवाय जवळा बाजार येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या समस्या, त्यांच्या व्यथा, त्यांच्या अपत्यांचे शिक्षण, आरोग्यविषयक काम, रेशन कार्ड, कपडे, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि ती सोडवताना आलेली आव्हाने याचा तपशील त्यांनी सांगितला. तसेच येथे काम करताना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, मराठवाडा मुक्ती संग्रामाचा अमृत महोत्सव, महानाट्य, महासंस्कृती, शासन आपल्या दारी आणि लोकसभेची सार्वत्रिक निवडणूक आदी कामे केल्याचे नमूद करत, त्यांनी जिल्ह्यात दिव्यांगांसाठी काम करणारी सेवा सदन ही संस्था, त्यांच्या संचालिका श्रीमती मिरा कदम यांच्या कामाचा विशेषत्वाने उल्लेख केला. या संस्थेतून एक मुलगा परिस्थितीशी दोन हात करत आज वैद्यकीय शिक्षण घेण्यास मदत करता आल्याचे समाधान व्यक्त करून यापुढेही ही कामे सुरुच ठेवणार असल्याचे श्री. पापळकर यांनी सांगितले. प्रशासनातील माणुसकीचा चेहरा सोबत घेऊन चालणारा अधिकारी – खुशालसिंह परदेशी जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांच्याकडे पाहिल्यावर प्रशासनात आजही मानवता आहे, माणुसकी आणि संवदेनशिलता जीवंत आहे. या संवेदनशिलतेमुळे काहींच्या आयुष्यातील अंधार दूर झाला आहे तर अनेकांच्या आयुष्यातील तो अंधार दूर करण्याचे अविरत प्रयत्न जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर करत आहेत. त्यांच्यामुळे प्रशासनात माणुसकी जिवंत असल्याचे पदोपदी जाणवते. त्यामुळे प्रशासनातील माणुसकीचा चेहरा सोबत घेऊन चालणारा अधिकारी अशा शब्दांत प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. कठीण प्रसंगात यातना सोसल्या. दु:ख सोसले मात्र सोबतच्या अधिकाऱ्याला-कर्मचाऱ्याला आनंदच शेअर केल्याचे सांगत, सोबतच्याला मानवी संवेदना जीवंत ठेवत मार्ग काढला. हीच त्यांची खरी कमाई असल्याचे सांगताना त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनातील लोकप्रतिनिधींनी केलेल्या आंदोलनाची आठवणही प्रभारी जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी यावेळी सांगितली. प्रशासकीय यंत्रणेत जिल्हाधिकारी पदाच्या खुर्चीला काटेरी खिळे असून, ते फक्त त्या खुर्चीवर बसलेल्या व्यक्तीलाच जाणवतात. असे असले तरीही जिल्हाधिकारी श्री. पापळकर यांनी गेल्या तीन वर्षात कित्येक कठीण प्रसंगांना हसतमुखाने तोंड दिले. कधीही त्या प्रसंगाची त्यांनी समोरील व्यक्तीला जाणीव होऊ दिली नसल्याचे सांगत त्यांना भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या. यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, जिल्हा पोलीस अधीक्षक श्रीकृष्ण कोकाटे, जिल्हा ग्रामीण यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, उपविभागीय अधिकारी डॉ. सचिन खल्लाळ, सेवा सदनच्या संचालिका श्रीमती मिरा कदम यांनीही समायोचित मनोगत व्यक्त केले. तर निवासी उपजिल्हाधिकारी गणेश महाडीक यांनी प्रास्ताविक आणि तहसीलदार सखाराम मांडवगडे यांनी आभार मानले. अश्रू भरल्या नयनांनी जिल्हाधिकारी कार्यालयातील कर्मचाऱ्यांचा घेतला हृदयी सत्कार व निरोप मावळते जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर यांना त्यांच्या सुविद्य पत्नीसह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांनी हृदयी सत्कार व निरोप दिला. गेल्या तीन वर्षाच्या त्यांच्या कार्यकाळात जिल्हाधिकाऱ्यांसोबत काम करताना पालकत्वाच्या भूमिकेतून मार्गदर्शन केल्याचे अनेकांनी सांगितले. तर कधी काही चुकले तरीही कधी रागावले नाहीत तर उलट प्रेमळपणे चूक लक्षात आणून दिल्याचे सांगताना अनेकांचे डोळे पानावले होते. यावेळी जिल्हाधिकारी व त्यांच्या अर्धांगिनी श्रीमती सुप्रिया पापळकर यांचा फेटा बांधून आणि त्यांच्या दालनापासून ते नियोजन समिती सभागृहापर्यंत गुलाबपाकळ्या अंथरल्या होत्या. शिवाय निरोपाची लक्षवेधक आणि तितकीच आकर्षक रांगोळीही काढण्यात आली होती. यावेळी त्यांच्या दोन्ही कन्या उपस्थित होत्या. यावेळी जिल्हा प्रशासनासोबतच विविध सामाजिक स्वयंसेवी संस्थांचे पदाधिकारी, अधिकारी-कर्मचारी आणि पत्रकार, नागरिकांची मोठ्या प्रमाणावर उपस्थिती होती. *****

जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलेच्या खात्यात रक्कम जमा होईपर्यंत योजनेचे काम सुरूच राहणार - जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी

• मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा शुभारंभ • लाडकी बहीण योजनेच्या लाभातून महिलांनी आर्थिकदृष्ट्या स्वयंपूर्ण व्हावे हिंगोली, दि.17 (जिमाका): राज्य शासन विविध घटकांना मदत करणाऱ्या योजना राबवित आहे. नव्याने सुरू झालेली मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेत जिल्ह्यातील असंख्य महिलांना लाभ देण्यात येणार आहे. जिल्ह्यातील प्रत्येक पात्र महिलांच्या खात्यात पैसे जमा होईपर्यंत योजनेच्या नावनोंदणीचे काम सुरूच राहणार असल्याचे सांगून जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी उपस्थित लाभार्थी महिलांना आज रक्षाबंधनाच्या शुभेच्छा दिल्या. जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजन भवनात मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा जिल्हास्तरीय शुभारंभ कार्यक्रम पार पडला. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे, निवासी उप जिल्हाधिकारी गणेश महाडीक, उपविभागीय अधिकारी समाधान घुटूकडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी गणेश वाघ, जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी राजाभाऊ मगर, तालुका महिला व बालविकास अधिकारी विलास चव्हाण, विवेक वाकडे आदी उपस्थित होते. जिल्ह्यात माझी लाडकी बहिण योजनेत आतापर्यंत 2 लाख 60 हजार महिलांचे अर्ज प्राप्त झाले आहेत. त्यापैकी 1 लाख 76 हजार 794 लाडक्या बहिणी पात्र ठरल्या आहेत. ही नावनोंदणीची आकडेवारी दि. 1 जुलै ते 31 जुलैदरम्यान करण्यात आलेली आहे. काही अर्ज तात्पुरत्या स्वरुपात नामंजूर झाले आहेत. अर्जातील त्रुटी पूर्तता झाल्यावर त्यांच्याही खात्यात रक्कम जमा होणार आहे. यात टप्प्याटप्याने महिलांच्या खात्यात पैसे जमा होण्यास सुरुवात झाली आहे. केवळ बँक खाते आधार संलग्न नसल्याने योजनेची मदत देण्यास अडचण येत आहे. त्यामुळे महिलांनी प्राधान्याने बँक खाते आधारशी संलग्न करावे, असे जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी सांगितले. जिल्हा आणि तालुकास्तरासह ग्रामीण भागात या योजनेत पात्र महिलांची नावनोंदणी करण्याचे काम जिल्हाधिकारी जितेंद्र पापळकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार यांच्या चमूने अतिशय मेहनतीने केले. त्यामुळे सर्व अंगणवाडी सेविकांसह सर्वांचे अभिनंदन केले. तसेच या पुढील टप्पा हा अतिशय महत्त्वाचा असल्याचे सांगून, तात्पुरत्या स्वरुपात अपात्र ठरलेल्या अर्जामधील त्रुटी पूर्तता करण्याचे काम वेगाने हाती घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले. याशिवाय मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण, मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजना, मुख्यमंत्री वयोश्री योजना, मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजना, मुलींना उच्च शिक्षणासाठी 100 टक्के मोफत योजना यासह इतरही योजनांसाठी नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी केले आहे. यावेळी जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकल्प संचालक नामदेव केंद्रे यांनी आभार मानताना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणि प्रधानमंत्री व मुख्यमंत्री शेतकरी निधी सन्मान योजनेतील रक्कम एकत्रित केल्यास शेतकरी कुटूंबाला मोठा आर्थिक हातभार लागणार असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन बालविकास अधिकारी विलास चव्हाण यांनी केले. *****