23 August, 2024
नागरिकांच्या तक्रारींचे वेळीच व गुणवत्तापूर्ण निराकरण करण्यासाठी आपले सरकार पोर्टल उपयुक्त - जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी
• आपले सरकार पोर्टल 2.0 बाबत जिल्हास्तरीय सर्व शासकीय विभाग प्रमुखांना दिले प्रशिक्षण
हिंगोली (जिमाका), दि. 23 : सर्वसामान्य नागरिक हा आपल्या शासन, प्रशासनाचा केंद्रबिंदू आहे. त्याच्या तक्रारींचे वेळेत आणि गुणवत्तापूर्ण निराकरणासाठी 'आपले सरकार पोर्टल 2.0' ही प्रणाली उपयुक्त आहे. या प्रणालीद्वारे प्राप्त तक्रारींचा निपटारा विहीत कालावधीत करण्याला सर्व शासकीय विभागांनी प्राधान्य द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकारी खुशालसिंह परदेशी यांनी दिल्या.
आपले सरकार पोर्टल 2.0 प्रणालीच्या वापराबाबत आयोजित प्रशिक्षणावेळी जिल्हाधिकारी बोलत होते. यावेळी जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अनुप शेंगुलवार, अपर पोलीस अधीक्षक अर्चना पाटील, प्रशिक्षक देवांग दवे, विनोद वर्मा, निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, हिंगोलीचे उपविभागीय अधिकारी समाधान घुटुकडे, वसमतचे उपविभागीय अधिकारी विकास माने, जिल्हा नियोजन अधिकारी सुधाकर जाधव यांच्यासह जिल्हास्तरीय शासकीय विभाग प्रमुख, अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.
तक्रारींचा निपटारा गतिमान होण्यासाठी आपले सरकार पोर्टलमध्ये नव्याने काही बदल करण्यात आले आहेत. या माध्यमातून नागरिकांच्या तक्रारींचा संवेदनशीलपणे निपटारा होण्यासाठी राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या संकल्पनेतून आपले सरकार पोर्टलबाबत जिल्हास्तरीय प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणातून प्रणालीचा प्रभावी वापर कशाप्रकारे करावा, याबाबत माहिती दिली जाणार आहे. या माहितीचा वापर प्रत्यक्ष कामकाजात करून नागरिकांच्या तक्रारींचा तातडीने निपटारा करावा, असे जिल्हाधिकारी श्री. परदेशी यांनी यांनी सांगितले.
नागरिकांना आपल्या तक्रारी घरातून, गावातूनच शासन, प्रशासनापर्यंत पोहचविता याव्यात, यासाठी आपले सरकार पोर्टल सुरू करण्यात आले. आता नागरिक आणि शासकीय यंत्रणांसाठी सुसह्य ठरतील, अशा सुधारणा करून 'आपले सरकार पोर्टल 2.0' हे नवीन पोर्टल सुरू करण्यात आले आहे. कामकाजातील पारदर्शकता वाढविण्यासाठी हे पोर्टल उपयुक्त ठरणार आहे, असे प्रशिक्षक देवांग दवे यांनी सांगितले. तसेच शासकीय कार्यालये, नागरिकांना या पोर्टलचा कशाप्रकारे वापर करता येईल, याबाबत माहिती दिली.
आयटीचे जिल्हा प्रकल्प व्यवस्थापक निरज धामणगावे यांनी प्रास्ताविकात प्रशिक्षण आयोजनाचा हेतू विषद केला. तर शेवटी निवासी उपजिल्हाधिकारी अभिमन्यू बोधवड यांनी या प्रशिक्षणातून प्रणालीचा प्रभावीपणे वापर करुन आपले सरकार पोर्टलवरील तक्रारीचा निपटारा जलदगतीने करण्यास मदत होणार असल्याचे सांगून शेवटी सर्व उपस्थितांचे आभार मानले.
*****
Subscribe to:
Post Comments (Atom)
No comments:
Post a Comment